ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, डिसेंबर १०, २००९

काळा बाजार

नाशिकला (आणि आणखी ब-याच गावांमध्येही असेल) बुधवारचा बाजार भरतो. जुन्या नाशकात, गोदेकाठी सकाळी सकाळी ताजी भाजी विकायला येते. जुने जाणकार (कापडी!)पिशव्या घेऊन आपापल्या ठरलेल्या विक्रेत्याकडून भाजी घेतात. मग तिथल्या तिथेच थोडीशी घासाघीस आणि बराचसा हसी-मजाक होतो.

लहानपणी बाबांबरोबर जायचो बाजारात तेव्हाच्या "भाSSSऊ.. अरे तोंडली गोड हायती. सस्ती लावली" अशा हाका अजून कानात आहेत. मग अर्धा किलो (तेव्हा अर्धा शेर म्हणायचे बहुतेक) घेताना ती भाजीवाली १००-२०० ग्रॅम अगदी सहजच जास्ती घालायची. शिवाय सकाळची पहिली ’भवानी’ असल्यामुळे भावातही अजून सूट मिळायची ती वेगळीच. आश्चर्य म्हणजे सगळ्यांनाच ही पहिली बोहनी मिळायची! भाजीच्या जागा ठरलेल्या-पालेभाजी कुणाकडे, तर कुणाकडे कांदे-बटाटे, आले-लिंबू-कोथिंबीर दुस-याकडून आणि शेवटी भिकाभाऊंकडून फळं! चार-पाच पिशव्या भरून भाजी घरी यायची. पिशव्या रीकाम्या केल्यावर, "अर्धाच्या भावात तीन पावशेर दिलेला दिसतोय कोबी" असे आईचे शब्द नेहमीचेच.

काळ बदलला तसा बाजारही बदलला. आता गंगेवर तुरळक बाजार भरतो. पूर्वी बुधवार आणि शनिवार दोन दिवस गर्दी लोटायची. आता थंडीतही विशेष भाजी येत नाही तिथे असं बाबा सांगतात. रीलायन्स फ्रेश किंवा मोअर किंवा अजून दुसरं काही अशा कितीतरी चकाचक दुकानांमध्ये आता भाज्या दिसतात. प्राणीसंग्रहालयातले प्राणी आणि ख-या जंगलातले प्राणी यांत जो फरक आहे तोच गंगेवरच्या आणि असल्या मॉलमधल्या भाज्यांमधे मला वाटतो. मॉलमध्ये दोन किलो कांद्यांवर एक लिंबू फुकट मिळत असले, तरी त्याला अर्ध्याच्या भावात तीन पावचा ओलावा नाही.

आणि मॉलमधल्या कोंडलेल्या शांततेचा आणि गंगेकिना-यावरच्या मोकळ्या आरडाओरड्याचा तर तीळमात्र संबंध नाही.

***
इथे अमेरीकेत काही ठिकाणी आपल्या गंगेसारखा बाजार भरतो, पण जास्त करून रीलायन्स फ्रेशचंच साम्राज्य. त्यातही सगळीकडे "डील्स" ची पद्धत. काही आठवड्यांपूर्वी जबरदस्त सेलचा अनुभव आला. इथे म्हणजे सगळ्याचाच अगदी बाजार मांडलेला! सगळ्या गोष्टींवर जबरदस्त सूट. लोक आदल्या रात्रीपासून दुकानांसमोर रांगा लावून उभे. पाच-दहा टक्के सूट आणि काही ठराविक गोष्टींवर तर ५०%पर्यंत! आम्ही गम्मत बघायला म्हणून त्या शुक्रवारी गेलो तर लोक बटाटे विकत घ्यावेत तसे टीव्ही विकत घेताना दिसले. पाच दहा सेकंदांत दहा-पंधरा टीव्ही विकले गेलेले दिसले. त्याचबरोबर सीडी-डिव्हीडीज, लॅपटॉप हे सगळंही जोरात खपत होतं. कपड्यांच्या दुकानांतही अशीच धूम असावी यात शंका नाही. सस्त्यातली एवढी मजा कोण सोडेल?

सणाच्या सुटीच्या दिवशी अशी सूट द्यावी अशी टूम ज्या बिझनेसमन नी काढली त्याला मानलं पाहिजे! (बाकी आख्खं पाश्चात्य विश्वच ’सूट’ या संकल्पनेवर जगत असावं - घालायला तो सूट, मागायची ती सूट आणि प्रेम-लग्नाच्या बाबतीतही ’सूटर’च! डिस्काऊन्ट सेल खतम झाल्यावर पाळायचं ते सुटक. पुरे!)

अशा खरेदी समारोहाच्या दिवसाला ब्लॅक फ्रायडे का म्हणतात हे एक कोडंच आहे (विकीपीडीयात हेही उत्तर मिळेल. पण असो).

***
असा हा काळा बाजार बघितल्यावर आपल्या देशी बाजाराची आठवण झाली म्हणून हे लेखनप्रयोजन!

बुधवार, डिसेंबर ०३, २००८

मी... शेतकरी!

फार म्हणजे फार जुनी काही गोष्ट नाही. आठवी-नववीत असेन तेव्हाची. मोठेपणी तुला काय व्हायचे आहे इत्यादी प्रश्नांचा ब-यापैकी अर्थ कळतो असं ते वय असावं. अर्थात प्रश्नाचा फक्त अर्थच कळतो, नेमकं उत्तर मात्र ठाऊक नसतं असं ते वय (म्हणजे अजुनही सापडलंय की नाही ते माहित नाही, असो); पण मुद्दा तो नाही. त्यावेळी तो प्रश्न कुणी seriously विचारला असता, तर माझं उत्तर अगदी तयार होतं --- शेतकरी!

अगदी पाचवी-सहावीत असल्यापासून शेतावर जाण्याच्या आठवणी अगदी पक्क्या आहेत. शनिवार किंवा रविवारी दुपारी, ढगाळ हवेत, किशोर कुमारच्या जुन्या गाण्याची कॅसेट गाडीत ऐकत किती तरी वेळा मी बाबांबरोबर आमच्या अंजनेरीजवळच्या शेतावर गेलो आहे. सगळीकडे भाताची हिरवी हिरवी शेतं, त्यांत डोक्यावर इरलं घेऊन राबणारे शेतकरी, बांधावर उगीच चार बाभळीची किंवा कडूनिंबाची झाडं, हात जरा वर केला तर हातात ढग येतील असं भरून आलेलं आकाश-- त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावर वर्षानुवर्षे हा सीन अगदी नेमानं, तसाच्या तसा घडत आलेला आहे. निसर्गाला याहून चांगलं स्क्रीप्ट अजून तरी सुचलेलं नाही! त्या वळणावळणाच्या रस्त्यावर महिरावणीजवळ दुथडी भरून वाहणारी नदी लागायची, एकेक करत ती छो्टी-छोटी हिरवी गावं मागे पडायची, आणि लांब समोर ढगांनी पांघरूण घातलेला त्र्यंबकचा डोंगर दिसायला लागायचा. डाव्या बाजूला नाणे संशोधन संस्थेची इमारत ओलांडून पुढे गेलं की लगेचच उजव्या बाजूला बेजे गावाकडे जाणारा रस्ता लागतो-- त्याच रस्त्यावर आमचं शेत!

अठरा एकरांवर पसरलेलं ते शेत म्हणजे "तीर्थ"क्षेत्रच होतं, म्हणजे फक्त पावसाळ्यात :-). एका बाजूला जुनी विहिर, त्यावर झुकलेलं चिंचेचं झाड-- पाणीपुरवठा समितीचा हा एकमेव asset! कालांतराने मग वरच्या अंगाला अजून एक विहिर खणली. विहिरीच्या बाजूनी भाताची सलग तीन-चार आवणं. वरच्या बाजूला टोमॅटोच्या रांगा (टोमॅटोला "तांबाडे" यापेक्षा सार्थ दुसरं नाव नाही मराठीत!) या सगळ्यांच्या सोबतीला शेडच्या जवळपास मग कुठे थोड्या मिरच्या, वालाचे वेल, थोडी पालेभाजी इत्यादी लागवड असे. प्रमुख उत्पादन म्हणजे भात आणि तांबाडेच. जागा, हवामान आणि उत्साह यांचा अंदाज घेऊन मग भूईमूग, उडीद आणि खुरासणी टाकली जायची. खुरासणी(किंवा कारळं)चं तेल काढतात. तेल काढून उरलेल्याची मग चटणी असायची. शेतावरच्या वालाची भाजी आणि एका पोळीत कारळ्याची चटणी मी अनंत वेळा डब्यात नेली आहे - विशिष्ट पदार्थ आणि स्थळांशी निगडीत अशा कितीतरी आठवणी घट्ट होतात - मजा आहे!

दिवाळी होऊन गेली, की 'निळी' भाताची आवणं पिवळी पडायला लागतात. आवणात अजूनही पाणी असेल आणि दाणा भरला असेल तर आवणाच्या बाजूला उभं राहून तो भाताचा सुगंध तासंतास अनुभवावा. "औंधा पाणी बराबर पडलं अन उतारा कसा बेस आलाय," याचा आनंद तिथे कसणा-या आमच्या संतूकाका आणि इतर मंडळींच्या डोळ्यांतून बघत रहावा. भाताच्या कापणीची आणि नंतर तो झोडपायची तयारी होते. वीस-वीस पंचवीस-पंचवीस मजूर रोजगारीवर बोलावले जातात. आवणा-आवणांतून पिवळं पडलेलं ते सोनं मग त्या छोट्या शेडच्या पुढ्यात आणून टाकलं जातं. झोडपून मग हिरव्या-पिवळ्या सालासकट तांदळाचा दाणा वेगळा केला जातो. हवेवर टाकून कचरा वेगळा होतो. बारदानात भरून एकामागून एक पोत्यांची गणना होते. अनपेक्षित पावसापासून संरक्षण म्हणून ती पोती आतल्या खोलीत आणि उरलेली ताडपत्री टाकून नीट रचून ठेवली जातात. काळ्या मातीत उगवलेलं ते सोनं अशा त-हेने तिजोरीत जमा होतं. भाताच्या उरलेल्या काड्यांचे व्यवस्थित ढिग करून ठेवले जातात. त्यावर पोरांचं खेळणं सुरू होतं - मनसोक्त खेळून झाल्यावर केसांत अडकलेली तुसं आणि अंगाला सुटलेली खाज या पोरांच्या तक्रारींकडे आया दुर्लक्ष करतात.

आमच्याच काय, आजूबाजूच्या सगळ्यांच शेतांत हे असंच नाट्य घडत असणार! वर्षानुवर्षं!

पावसाच्या पाण्यावर आणि क्रमेणं निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेली ही भातशेती प्रत्येक वर्षीच असं मोलाचं पीक देते असं होत नाही. अतिपाऊस किंवा दुष्काळाचा चटका कधी बसेल सांगता येत नाही. कधी रोग पडतो - कधी उंदीर भाताच्या मुळावर ताव मारतात - एक ना दोन - नैसर्गिक संकटं ही अशी पाचवीचीच पुजलेली. तांबाड्यांचही तसंच - उत्तम पीक आलं तर भाव कोसळणार - आणि पीक नाही म्हटल्यावर उत्तम भाव मिळत असूनही त्याचा काय उपयोग!

वर्षामागून वर्षं सरली - एका पावसाळ्यानंतर दुसरा येऊन गेला - अंजनेरीजवळ, बेजे गावाकडच्या वाटेशेजारी ही शेतजमीन तशीच्या तशी अजूनही उभी आहे. बैल जाऊन ट्रॅक्टर आले, डिझेल पंपाची जागा वीजेच्या मोटारींनी घेतली - भातानंतर रब्बीच्या गव्हाची पीकं घेणं सुरू झालं, लहान आंब्यांची कलमं मोठी झाली, डझनावारी आंबे येऊ लागले - कालांतराने मीही मोठा  झालो - माझं शेतकरी होण्याचं स्वप्नं तसंच राहिलं - आमचं शेतावरचं प्रेम काही आटलं नाही.

अलिकडे बाबांनी संतूकाकांना ते शेत विकलं. मात्र कितीही झालं तरी ते शेत मला "आपलंच" वाटत राहणार - आणि कदाचित शेतासाठीही मी आपलाच.

दहा वर्षांनंतर गेलो तरीही विहिरीवर वाकलेलं ते चिंचेचं झाड, "या साली पाणी काय बराबर नाय पडलं बा" म्हणून हळहळेल कदाचित; पण म्हणून काही सुगरण पक्षी त्याच्या खोप्याची जागा तिथून हलवणार नाही. "अजित तू आला -- थोडं आटवलेलं दूध घेऊन जा, वाल खुडायला सांगू का?" असं संतूकाका म्हणणार हे नक्की. "आता द्राक्ष लावतो, फक्त खाल्ल्या अंगाला भात करतो" अशा प्रगतीचा सार्थ अभिमान त्यांच्या डोळ्यांत चमकतांना दिसेल.

"अहो काय सांगू? शाळेत असताना शाळा सोडून मीही शेतीच करायचं ठरवलं होतं!" असं मी बोलून जाईन -- आणि माझ्याबरोबर हसता हसता एखादा थेंब त्यांच्या डोळ्यांत दिसेलही कदाचित. "आता करायची का? तांबाडे लावू या साली?" त्यांच्या या मनापासून विचारलेल्या प्रश्नाला मी फक्त स्मित करीन की दुसरं काही उत्तर देईन हे आत्ताच कसं सांगू?

शनिवार, जानेवारी १९, २००८

धोपट मार्गा सोडू नको!

  • जिथे सागरा धरणी मिळते... तिथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते.
  • ईशान्त शर्माने रीकी पॉंन्टींगला तंबूचा रस्ता दाखवला.
  • होऊनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती.
  • ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा.
  • लक्ष्मी रोड पुणे आणि रानडे रोड दादर इथे मिळणार नाही अशी एकही गोष्ट या जगात नाही.
  • भाय उस्की तो वाट लग गयी भाय!
  • राणी, मी तुझ्याच वाटेकडे डोळे लावून बसलो होतो (अगं आई) गं! [एखाद-दुसरा अश्रू]
  • वाट पाहुनि अती मी थकले, थकले रे नंदलाला...
  • पंथी हूं मै उस पथ का, अंत नहीं जिसका...
  • एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ.
वरील सगळ्या वाक्यांत एकाच बाबतीत एकवाक्यता आहे. ती म्हणजे, सगळी वाक्ये "रस्त्या"बद्दल आहेत. आणि आज रस्त्यांबद्दल लिहिण्याची हुक्की आली याचं कारण म्हणजे माझ्या घराजवळचे रस्ते!

खरं म्हणजे "देवाघरी गेलेल्यांबद्दल वाईट बोलू नये" या न्यायाने मी त्यांच्याबद्दल वाईट न बोलण्याचं ठरवलं आहे; पण अधून मधून अपशब्द गेले तरी मला त्यांच विशेष काही वाटणार नाही.

गेले काही दिवस मी नेमाने माझ्या घराजवळच्या भागात रस्ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे; पण तो सफल झाला तर शपथ! पाणी पुरवठा करण्याची लाईन टाकायची तर त्यासाठी सरकारी रस्त्यांसारखी सोयीची आणि आयती जागा दुसरी कुठली सापडणार? त्यासाठी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिका-यांच्या कल्पनाशक्तीचे कौतुकच करायला हवे. पुन्हा रस्त्याच्या कडेने पाईपलाईन टाकली तर रस्त्याच्या मध्येच उभे राहून खणायला लागेल; त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या अगदी मध्यभागीच खणायचे ठरवले. कर्कटक की काय म्हणतात त्याने मोजमाप घेतांना मी या डोळ्यांनी पाहिलं. रस्त्याच्या कडेला त्यामुळे अवाढव्य मशीनं उभं करणं सोयीचं झालं. तसंच नो पार्कींग, पुढे विमान क्रॉसिंग आहे, हाजमोलाच्या जाहिराती इत्यादींचे बोर्डही वाचले! शिवाय पुढच्या वेळेस जर काही मरम्मत करावी लागलीच तर अगदी मध्यभागीच लाईन असल्यामुळे फारसा शोध घ्यावा लागणार नाही अशीही काही दूरदृष्टी त्यांची असावी. शनिवार रविवारी काय लोक आपापल्या घरीच बसून वेळ घालवतात त्यामुळे शुक्रवारी काम अर्धे टाकायला काहिच हरकत नाही अशी त्यांची एक गोड गैरसमजूत असावी. IT कंपन्यांतले आमच्यासारखे (काही क-रोड?) लोक शनिवार-रविवारीही काम करतात, आणि वेळ घालवणे या कारणाव्यतिरीक्त इतर गोष्टींसाठीही लोकांना घराबाहेर पडावं लागतं याची या बिचा-या पाईपलाईनवाल्यांना काय कल्पना बरे!

गेला आठवडा घरातून बाहेर पडणे आणि घरी परत येणे म्हणजे एक शिक्षा होऊन बसली आहे. समोर अशी माझी गल्ली दिसत्येय, पण तिथे पोहोचायचं म्हणजे बाईकवर रस्त्यांच्या "डाय"व्हर्जन्स शोधीत पंधरा-वीस मिनिटं लागणार. परत त्या प्रवासात आणखी अर्धा किलो धूळ कपडे, नाक-डोळे (आणि हो, पायही) घरी घेऊन येणार. कोणाला माझ्या घरी येऊन पायधूळ झटकायची असेल तर आधीच बजावून ठेवतो -- नो एन्ट्री आहे सध्या! एकंदरीत काय आयुष्यात सध्या माझी खडतर वाटचाल सुरू आहे.

रॉबर्ट फ्रॉस्टची जगप्रसिद्ध कविता माहिती असेलच तुम्हाला --
I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence
Two roads diverged in a wood
And I took the one less traveled by
And that has made all the difference
आजच्या जगात आणि विशेषतः तुम्ही जर माझ्या एरीयासारख्या "जंगली" भागात रहात असाल तर फ्रॉस्टचे सांगणे बिल्कूल ऐकू नका. ज्या रस्त्यावरून मेजॉरीटी ट्रॅफिक गेलेला आहे तोच रस्ता धरा, तरच कमीत कमी खड्डे आणि कमीत कमी वेळात घरी पोचण्याचं तुमचं स्वप्न सत्यात येण्याची आशा आहे!

असो.

अहो, तुमच्या ओळखीत कोणी विल नावाचा इसम असेल तर मला जरूर कळवा. तुमचे खूप उपकार होतील. मी असं का म्हणतोय ते तुम्हाला वेगळे सांगणे न लगे, नाही का? :-)

शुक्रवार, नोव्हेंबर ०९, २००७

चकली!

आज गेली कित्येक वर्षे आमची आई दिवाळीला चकल्या करता आलेली आहे। म्हणजे, फक्त दिवाळीच्या फराळासाठीच नव्हे तर इतर वेळीसुद्धा - सुटटीचा खाऊ म्हणून आमच्याकडे चकल्या केल्या जातात। परन्तु लेखाच्या सुरुवातीलाच इतकं असत्य-वदनी असू नये असा आमचा प्रघात आहे; त्यामुळे आमच्याकडे कधी-कधी चकल्या केल्या जातात? यांची सनावळी देण्याऐवजी, आमच्याकडे कधीच चकल्या केल्या जात नाहीत असा गौप्यस्फोट करतो। दिवाळीच्या फराळावरचा असा खुसखुशीत लेख असा न-काराने सुरु करू नये हे जरी खरं असलन तरी त्यास इलाज नाही -- कारण आमच्याकडे कधीच चकल्या होत नाहीत; होतात ते तुकडे!

चकाल्यांच्या या तुकड्यांना इतिहास आहे - शाळेतल्या इयत्तांच्या तुकडीला असतो तसा। 'ड' तुकडी नेहमी दंगा घालणारी -- तसेच दिवाळीतले तुकडे विशेष करुण लक्षात राहणारे। प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते; ती वेळ आल्याखेरीज काही होत नाही म्हणतात। चकाल्यांचेही असंच असावं। प्रत्येक भाजणीची एक वेळ असते। उत्तम भिजवून त्यात (प्यारे) "मोहन" घालून, त्याहून छान वर्णन सांगून चकल्या पाडल्या की तुकडे तयार! मग आमची आई "या वर्षी तांदूळच कसा बरोबर नव्हता (म्हणजे गेल्या वर्षीसारखाच) " पासून ते "पावसाची लक्षणं ना बाहेर आज?" वरुन "सो-या जरा जास्तचा घट्ट बसलाय आज" ते "राजकीय अनिश्चितता आहे ना आफ्रिकेत" अशी सगळी कारणमीमांसा देते। त्यात मग आमचे सल्ले सुरु होतात। "गँस कमी करा -- गँस जास्त करा", "पीठ मळून देऊ का मजबूत हातांनी?" "पीठ जास्त मळायला नको होतं" "जाऊ द्या, पुन्हा भिजवा पीठ!" "नको? मग नवीन भाजणी आणा" आशा विविध सल्ल्यांनी आम्ही भंडावून सोडतो। अर्थात अशा गुगली सल्ल्यांनी आमची आई कधी "चकली"ये असं कधीही झालेलं नाही। "९४ साली सगळं व्यवस्थित हौनसुध्दा तुकडेच पडले होते ना?" असं काहीतरी ती पुटपुटते आणि पुढचा घाणा काढायला पुढे सरसावते।

४७च्या फाळणीनंतर कशाचे तुकडे झाल्याचं दुःख पुन्हा फारसं सारखं सारखं; आणि तेही दिवाळीच्या उत्साहात कोणाला आमच्याइतकं झालं नसेल।

या सगळ्या पूर्वेतिहासामुळे "चकली" या प्रकाराविषयी आम्ही फार संवेदनशील आहोत। "लाडू फार छान झालेत हो" किंवा "शंकरपाळी? झक्कास!" असं तुम्ही म्हणालात तर त्याचा आम्हाला फारसा अभिमान वाटेलाच असं नाही। मात्र, "चकलीची चव छान आहे, आणि नळी पण मस्त पडलीये" असं म्हणणार असाल तर तेवढ्यावरच थांबवा - पुढे "तुकडेच पडलेत म्हणून काय झालं" असे पुढचे पाच शब्द त्या तुकड्यांबरोबरच गिळून टाका -- कारण तो भलता धगधगता एरीया आहे - केव्हा दंगल भडकेल कळणारसुध्दा नाही। तीन दिवाळ्यांपूर्वी अशाच काहीतरी वक्तव्यांवरुन आमची आई भलतीच उ"चकली" होती। बरं तर बरं मागच्या वर्षी चकलीवर संभाषण येताच तिनं जो अविर्भाव केलेला तो पाहूनच आमची मामी बि"चकली" आणि गुपचूप चकलीचा तुकडा तोंडात टाकला होता।

एखादी न जमलेली गोष्ट पुन्हापुन्हा प्रयत्न केल्यानेच जमते हा सुविचार म्हणून चांगला आहे। चकल्यांच्या बाबतीत आमची आई तो आचरणात आणतेही आहे। अगदी जिद्दीनं - इरेस पेटूनाही चकली हां फराळरुपी प्रांत अजून तरी आमच्या अधिपत्याखाली आलेला नाहिये। एके दिवशी सारं काही मनासारखं होईल आणि छान गोलाकार, केवळ बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा, खमंग-रुचकर अत्यंत खुसखुशीत चकल्या आमच्या आईच्या सो-यातून घडतील आणि आम्ही सारे धन्य होऊ। असो, लेखाच्या अखेरिसही इतकं असत्य-वदनी असू नये अशी आमची काही तत्त्वे आहेत। "सत्यं वद" असं म्हणून म्हणतो की आजही आमची आई अवीट चवीचे जे तुकडे करते तेसुध्दा छान गोलाकार, इ। इ। विशेषणांनी ठासून भरलेल्या चकली नामक पदार्थाचेच असतात मिस्टर, आहात कुठे?

=-=-=-=-=

आमच्या तमाम रसिक वाचकांना शुभ दीपावली!

बुधवार, ऑक्टोबर २४, २००७

गिन्न्या

तिसरी चौथीत असतानाची गोष्ट - की दुसरीतली? कोण जाणे! प्राथमिक शाळेत असतानाची एवढं नक्की. कुणाला काय काय छंद असतात - पानं-फुलं वहीत घट्ट मिटून ठेवायची किंवा पोस्टाची तिकिटं जमवायची, खेळाडूंची चित्र जमवयची- शंख-शिंपल्यांचा खच जमवून ठेवायचा -- एक नाही तर दोन. मी त्या तिसरी-की-चौथीत असतानाची गोष्ट. आमच्या वर्गात गिन्न्या जमवायचं फॅड निघालेलं.

गिन्न्या म्हणजे रिकाम्या आगपेट्या - किंवा आगपेटीचं नुसतं वरचं चित्र. म्हणजे फक्त "शीप" किंवा "सायकल" पुरतं नाही; तर "कंदील" पासून ते इंपोर्टेड मेणाच्या काड्यापेट्यांपर्यंत! वर्गात त्याचं लोण पसरलेलं. सगळ्यांचाच हा छंद असल्यामुळे मग तुझ्याकडे किती - माझ्याकडे किती - डुप्लीकेट किती - exchange कुठल्या करणार इत्यादी व्यापार उदीम चालायचा. अर्थातच मधल्या सुटीमध्येच किंवा मग शाळा सुटल्यानंतर. सहा एक महिन्यांत माझ्याकडेही चांगला गठ्ठा जमलेला.

त्यावेळी (नाशिकच्या) यशवंत व्यायामशाळेतून जिमनॅस्टीक्सहून येताना मान खाली आणि नजर कुठली नवी गिन्नी रस्त्यावर दिसतेय याच्याकडे असायची. रस्त्यावरच्या कच-यात हात घालूनच हे सोनं मिळत असल्याने वडिलधा-यांच्या नजरा चुकवूनच करावे लागायचे. किंबहुना घरच्यांना गिन्न्या हे प्रक्रणच कदाचित माहित नसावं; इतकी या स्व-छंदाबद्दल गुप्तता मी पाळलेली. exchange इत्यादी वाटाघाटींच्या माध्यमातून माझ्याकडे मोठाच साठा जमलेला. आमच्या त्या वेळच्या घराच्या गच्चीच्या दारापाशी अडगळीचं म्हणाल्यास मोठा सन्मान होईल असं एक पिंपवजा डबडं होतं. त्याच डबड्यावजा तिजोरीत मी हे सारं ज्वालाग्राही कलेक्शन ठेवायचो.

दिवाळीच्या की उन्हाळ्याच्या मोठ्या सुटीनंतर एके दिवशी हा माझा खजिना लुटला गेला असल्याचं माझ्या लक्षात आलं. हा सारा गुप्त खजिना असल्यामुळे सांगायचं तरी कुणाला? वर-खाली दहादा त्या धुळीच्या कोप-यात शोधून झालं; सापडायचा पत्ता नाही!

आणि आजतागायत ती माझी संपत्ती गायब आहे ती गायबच.

त्यावेळी मला नक्की काय वाटलेलं ते आता पुसटसंही आठवत नाही. जीवापाड जपलेल्या अशा काही गोष्टी नाहिश्या होतात - परत कधीही न मिळण्यासाठी. हरवतात तेव्हा त्या अनमोल असतात ख-या; पुढे काळाची पुटं त्यावर चढतात आणि त्या सोनेरी आठवणी काळवंडून जातात. जखमांवर खपल्या चढतात ख-या; पण व्रण मात्र कायमचेच!

दहा पैशाच्या काड्यापेट्यांची ती दवडीमोल कव्हरं - छंदही काय जडलेला आम्हाला वाह! आज मनात आणलं तर अशा हजारो काड्यापेट्या विकत घेऊ शकीन; आहे काय त्यात. पण त्या जुन्या झालेल्या; धुळीने अर्ध्या भरलेल्या प्लॅस्टीकच्या पिशवीतल्या पन्नासेक गिन्न्या परत आणू नाही शकत. तीच पिशवी आज परत मिळाली तर काय मजा येईल असं अनेकदा वाटतं खरं; पण वास्तव मात्र एवढंच दिसतं की ती पिशवी काळाच्या पडद्याआड गेलेली आहे; परत न येण्यासाठी.

हे सगळं असं असलं तरी त्या जीवापाड जपलेल्या आणि कच-यातून शोधून काढलेल्या अमूल्य गिन्न्यांच्या आठवणी (अजून तरी) घट्ट माझ्याच आहेत.

आणि नेहमीच असतील!

रविवार, मार्च ०४, २००७

रविवार दुपार

'काय कटकट आहे,' असे उद्गार काढत डोळे उघडले तेव्हा समोर फक्त दोन बारीक ठिपके दिसत होते. महत्प्रयासाने पुन्हा त्या दोन ठिपक्यांवर नजर रोखली तेव्हा ते जरा मोठे झाल्यासारखे दिसले. त्या दोन ठिपक्यांच्या बाजूला शेजारीच चार चांगल्या मोठ्या रेघाही दिसत होत्या. खिडकीतून येणारे विविध अनाकलनिय आवाज कानाच्या पडद्यावर आघात करत होते. आणखी प्रयत्नानंतर या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करेपर्यंत आणखी चांगली चार-पाच मिनिटे गेली असावीत.

घड्याळाचे काटे सरकताहेत हे केवळ त्यांच्या टिकटिकीमुळे जाणवत होते. पापण्या जड झालेल्या होत्याच. 'मै कहॉ हू?' हा तद्दन फिल्मी विचार तेवढ्यात मनाला चाटून गेलाही. सभोवतालच्या वातावरणाचे (स्थळ, काळ, तापमान, आणि आर्द्रता) पूर्ण आकलन झाले तेव्हा असा निष्कर्ष काढण्यात मी यशस्वी ठरलो की आपण अजून पृथ्वीतलावरच असून समोर दिसणारे दोन ठिपके हे दोन मोठ्या कोळ्यांच्या शरीराकृती आहेत आणि त्या ठळक मोठ्या रेषा म्हणजे सीलिंग फॅनचे हात होत. आपले शरीर जमिनीस पूर्णतः समांतर पसरलेले असून डोळे उघडण्यास नेहमीपेक्षा अधिक प्रयास पडताहेत. काही क्षणांपूर्वी (किंवा काही मिनिटांपूर्वीही असावी) बाहेर दोनदा मोठा आवाज झालेला असून त्यामुळे लवकरच आपल्याला आपले शरीर सद्य अवस्थेतून हलवण्याची गरज आहे. इतके विश्लेषण करायलाही प्रचंड कष्ट घ्यावे लागले असावेत...

रविवार दुपारचा हा प्रसंग तसा काही नवा नाही. दुपारचे उशिरा आणि जड झालेले जेवण म्हटले की त्यानंतरची वामकुक्षी ही आलीच. आठवड्याचे पाच दिवस डोळ्याला डोळा लागू न देण्याची काळजी घेणारे कचेरीतले काम रविवारी गुंडाळून ठेवले की अशी काही सपाटून झोप लागते की वाह! त्यास 'तोड' (की मोड?) नाही. पण अशी तोडीची झोप मिळायला भाग्य लागतं. "आराम हराम है।" या चाचा नेहरुंच्या संदेशाची शिकवण इतरांना देण्याची जबरदस्त हुक्की कपाळावर आठ्या असलेले इस्त्रीवाले, भूतकाळातले वर्तमानपत्र विकत घेणारे रद्दी पेपरवाले, दहादा इकडून तिकडे फेऱ्या मारणारे हजार फेरीवाले, मोजे-हातरूमाल-टाय विकणारे मोजके एजंट, एनसायक्लोपीडीया ९०% सूट देत विकणारे ज्ञानवंत, इ.इ. महान व्यक्तिंना रविवारीच येते. नुसते रस्त्यावरून 'पेSSSपSSSSर,' अशा आरोळ्या मारून थोडीच त्यांचा डेली कोटा पूर्ण होतोय, म्हणून अगदी वर येऊन बेल वाजवून विचारपूस करणारे उद्योगी फेरीवाले आमच्या भागात कार्यरत आहेत. रविवार म्हटला की मंडळी नक्की घरी सापडणार या अपेक्षेने मग एकामागून एकांची रांगच लागते. बिचाऱ्यांना काय ठाऊक की ही सगळी साहेब मंडळी दुपारच्या झोपेत असतील! एखाद दुसरा असला 'वाला' 'sorry to disturb you' अशीही सुरुवात करतो. झोपमोड झालेल्या त्या अवस्थेत खरं तर काहीही सुधरत नसतं. मगाशी सांगितलं तशी 'मै कहॉ हू?" अशी पंचाईत झालेली असते, अशा मोडकळीस आलेल्या परीस्थितीत काय मोजे विकत घ्यायचे! पण इलाज नसतो, एकाला कटवून पुन्हा आडवे व्हावे तर पुन्हा झोप कसली येतेय. मग अशा वेळी भिंतीवरचे कोळीनृत्य पाहण्यात एक दोन मिनिटे जातात आणि कधीकधी निद्रादेवी प्रसन्न होते.

आमचे एक शेजारी आहेत तमीळ. माझ्या सुदैवाने या भाषा मला कळत नसल्याने माझ्या निद्रेवर त्याचा फारसा परीणाम होत नाही. खिडकीतून येणारा गरम वारा आणि सूं सूं करत जाणारे तमीळ शब्द अक्षरश: माझ्या डोक्यावरून निघून जातात. त्यामुळे त्याचा मला फारसा त्रास होत नाही.

दुसऱ्या शेजाऱ्यांच्या गोंडस मुलास (यास मराठीत कार्टं असाही शब्द राखून ठेवलेला आहे) भिंतीवर ठोकठोक करायचा खेळ बऱ्याचदा सुचतो (तसं हुषार आहे कार्टं!). मग त्यामागून त्याच्या वडीलांचे रागावणे ऐकू येते. या मुलाचे बाळबोध तेलुगू मला आणि माझे बालबोध हिंदी किंवा इंग्रजी त्याला कळत नसल्याने आमची फक्त हाय-हॅलो एवढीच मैत्री आहे. भिंतीवरच्या ठोक-ठोक मध्ये काहीतरी 'कोड' दडलेला आहे आणि तो सोडवण्याची माझी खटपट चालू आहे असे धूसर स्वप्न त्या भर दुपारी मला पडू लागले की मग माझी खात्री पटते की मला परत झोप लागलेली आहे तर.


सकाळी अत्यंत आरामात वाचलेल्या बातम्या मनात घर करून असतात. सकाळी निवांत ऐकलेल्या 'गुजरी तोडी'ची धून कुठेतरी एक कोपऱ्यात वाजत असते. दुपारच्या फक्कड 'जमलेल्या' खिचडीची चव अजूनही चवीच्या केंद्रात रेंगाळत असते. काल संध्याकाळी जरा जास्तच खेळल्यामुळे पायात बारीकशी दुख असते. भरपेट आणि उशिरा जेवल्यामुळे 'चढलेली' सुस्ती पोटाचा ताबा पूर्ण घेऊन बसलेली असते. चढती दुपार त्या सुस्तीला पोषकच ठरते. आंघोळ बिंघोळही निवांत आणि मनसोक्त झालेली असल्यामुळे सगळं अंगं कसं relax झालेलं असतं. आणि अशा सगळ्या परीस्थितीत निवांत लागलेली झोप! यासारखे सुख दुसरे ते काय! अर्थात अशात कोणा तिऱ्हाईतामुळे जर निद्रानाश झाला तर त्यासारखे दुर्दैव नाही दुसरे.

म्हणूनच म्हणतो, श्रेष्ठ भीष्माचार्यांना इच्छामरणाचा वर मिळाला होता. आजच्या आधुनिक जगात जर कोणी मला इच्छानिद्रेचा वर दिला तर काय बहार येईल... अर्थात त्याचबरोबर अशी रविवारच्या दुपारी झोपमोड होणार नाही असा 'उप-वर' किंवा accessory मात्र हवीच, नाही का?

गुरुवार, डिसेंबर २८, २००६

सुवर्णकळा

लोकहो, आजचं युग हे यंत्रयुग आहे.

कपडे धुण्यासाठी यंत्र, पाव भाजण्यासाठी यंत्र, धान्य दळण्यासाठी यंत्र, व्यायाम करण्यासाठी यंत्र, वजन वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठीही यंत्रच. ऑफिसध्ये असो वा घरात, बस स्थानकावर असो वा सरकारी कचे~यांमध्ये, भाजीवाल्याकडे असो वा केशकर्तनालयात, जिकडे तिकडे यंत्रेच यंत्रे. अगदी हा लेख लिहिण्यासाठीसुध्दा शेवटी यंत्रच.

आजच्या यंत्र युगात एका गोष्टीचे जर चांगलेच फावलेले असेल, तर ती म्हणजे आळस. ही अचाट यंत्रे चालवायची म्हणजे तशी काही सोपी गोष्ट नाही. शिवाय यंत्राच्या प्रत्येक खुबीची माहिती करून घेण्याचा एकंदरीत आळसच. त्यावर उपाय म्हणून मग ही यंत्रे वापरायला सोपी करण्यासाठी आणखी नवी यंत्रे आली. रीमोट कंट्रोल हे त्यातलेच एक. अशा सगळ्या यंत्रावळीचा वापर सोपा करण्यासाठी त्यावर नानाविध प्रकारची बटणे आली. दहा पैशाच्या नाण्याच्या आकाराहूनही कमी अशी ही बटणे, त्यावरच ते कसे वापरायचे, कशासाठी कुठले बटण वापरायचे याची माहिती रंगवलेली. संगणकाचेही पहा त्याच्या भल्या मोठ्या पाठीवर लहान-लहान बटणे - आज्ञा देण्यासाठी.

ही कळ दाब -तर ते दार उघडणार. ती दाब तर कुठली तरी खिडकी बंद होणार. एक कळ नि हजार भानगडी. पण यंत्रांचा उत्तम वापर करायचा म्हणजे मग आता ही थोडी कळ सोसायलाच हवी. आजच्या यंत्रयुगात कुठल्या अगदी सरस्वती देवीपासून ते विष्णू-महादेवापर्यंत सगळ्यांनाच अवघड पडलं असतं नक्की. पण एका देवाचा अपवाद वगळता! ते भगवान म्हणजे आपले 'कळी'चे नारदमुनी! द्या कुठलाही रीमोट, कसा झटक्यात वापरायला शिकले असते ते.

मोबाईल फोन नामक यंत्राचा उपयोग फोन करण्यासाठी कमी आणि गाणी ऐकणे, फोटो काढणे, खिशातून/पर्समधून उगाचच आत-बाहेर करणे यासाठीच जास्त होत असावा. स'कळ' जनांना त्याची सवय असली तरी सगळीच features काही कळायला सोपी नसतात. त्यातून मोग~याच्या कळीहूनही लहान अशी त्याची बटणे. तोच न्याय laptop लाही लागू होतो.

या कळीचं अगदी स्तोम माजलंय असं म्हणत होतो. उकळत्या चहाचा कप हातात घेऊन सकळी वर्तमानपत्र उघडलं तर या बातम्या: अय्यय्यो! तिथेही प्रत्येक बातमीत एक कळ होतीच... बातमी आणि त्यांची सदरे अशी होती:
  • फुटकळ वस्तूंनाही सोन्याचा भाव - बाजार फेरफटका
  • साधी कामं करवून घेण्यासाठी अगदी कळकळीची विनंती करावी लागते - वाचकांचा पत्रव्यवहार.
  • मंत्र्यांच्या भाषणात बाष्कळ गोष्टींचाच भरणा. आश्वासने आणि कामे यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. - विरोधी पक्ष
  • खंडणी उकळणा~यांची चलती - गुन्हेगारी जगतात.
  • जुन्या, हाताने करण्याच्या कारागिरी उद्योगावर अवकळा - बेकारी एक समस्या?
एकंदरीत काय, तर आजचं युग हे कलियुग नसून कळयुग आहे असं म्हणायला हरकत नाही असं मनाशी पक्कं करत मी चहाचा शेवटचा घोट संपवला...

रविवार, नोव्हेंबर २६, २००६

रसिक

दिवसभराच्या कामाचा उरक पाडून रसिकजन एकामागून एक सभागृहात स्थानापन्न व्हावेत. हवेतला उष्मा कमी होऊन हवेत एक प्रसन्न गारवा यावा. दूर जलाशयावरून येणाऱ्या झुळुकेचा स्पर्श वातानुकुलित सभागृहातही जाणवावा. अशा अतिशय आनंददायक वातावरणात मंचावरचा पडदा उघडला जावा. टाळ्यांच्या कडकडाटात तानपुऱ्याचा 'सा-प-सा' मिसळून जावा. सुजाण रसिकांची इजाझत घेत मग गायकाने आपली आलापी सुरू करावी.

सकाळच्या प्रसन्न प्रहरी शौकिनांनी प्रेक्षागारात हजेरी लावावी. कोवळ्या उन्हांनी खेळपट्टीवरील दंव शोषण्यास सुरूवात करावी. संघनायकांमधल्या नाणेफेकीनंतरच्या हस्तांदोलनात स्पर्धाभावनेची ऊबही असावी. पंचांच्या आगमनानंतर पाठोपाठ टाळ्यांच्या कडकडाटात फलंदाजांचेही आगमन व्हावे. मोठ्या उत्साहात गोलंदाजाने आपला छोटासा सराव करून घ्यावा. फलंदाजाने आपली 'पट्टी' आखून घेतल्यावर प्रेक्षकांमध्ये रोमांचाची रेख उमटावी. "प्ले!" अशा पारंपारीक सूचनेनंतर गोलंदाजाने आपली धाव सुरू करावी.

पहिला स्वर गायक कसा लावेल? कुठला राग असेल, अशी सगळी उत्सुकता रसिकांमध्ये नेहमीच असते; त्यात कुठली बंदिश असेल बरे, याची भर पडावी. गायकाने पहिला आलाप सुरू करताच तबलजीने हळूच तबला कडक लागला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. रागाच्या उत्तम आरंभाची पावती हार्मोनियम साथीदाराने आपल्या झुकलेल्या नजरेने द्यावी. आलापीला थोड्याच वेळात शब्दांचा साज चढताच तबलजी आणि रसिकजन सावध व्हावेत. बरोब्बर समेवर 'धीं" ची थाप पडावी आणि हळूहळू रसिकांच्या मनात एकतालाची धुंदी चढू लागावी.

फलंदाजाने पहिल्या चेंडूला योग्य मान देऊन यष्टीरक्षकाकडे जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा. पहिल्या एक-दोन षटकांत दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीचा रंग पारखलेला असावा. फलंदाजांची कसोटी पाहत गोलंदाजाने उसळते चेंडू टाकावेत. एखादा तेज चेंडू यष्ट्यांची हालहवाल विचारत अगदी जवळून सळसळत जावा. प्रेक्षकांच्या मनातले बोल फलंदाजाने आपल्या बॅटमधून काढावेत. दहा-पंधरा षटकांनंतर गोलंदाज आणि फलंदाज आपापल्या लयीत मग्न झालेले दिसावेत. प्रेक्षकांनी फलंदाजांच्या नजाकतीला "वाह" ची शाबासकी द्यावी; आणि गोलंदाजांच्या दिमतीला आपल्या टाळ्यांची फौज धाडावी.

प्रत्येक तानेपाठोपाठ हार्मोनियमची साथ अधिकच सरस होत जावी. गायकाच्या कल्पकतेस ती साथ वरचेवर मोलाची ठरावी. अवखळ सरगम मग प्रेक्षकांवर आपली भुरळ पाडण्यासाठी अवतीर्ण व्हावी. रसिकांची तिने थोडी फिरकी घ्यावी, आणि कळत-नकळत भिंगरीसारख्या तानेत अदृश्यच होऊन जावी. "वाह, क्या बात है!" ची दाद पहिल्या रांगेपासून शेवटच्या आसनापर्यंत सगळ्यांनाच आधीच ठरवल्याप्रमाणे एकाच वेळी द्यावी लागावी. आपल्या विनम्र परंतु आश्वासक नजरेने गायकाने या कौतुकाचा स्वीकार करावा. आणि मग मंद लयीचे अचानक जलद तीनतालात रुपांतर व्हावे.

प्रत्येक चेंडूला योग्य सन्मान देत तो खेळून काढावा. एखाद्या कमजोर चेंडूला सीमेपार धाडण्याचा विश्वास फलंदाजांत चेंडूगणिक वाढतच जावा. खेळपट्टीच्या पुढे, मागे, डावीकडे-उजवीकडे चौफेर फलंदाजीचा आनंद फलंदाजांपेक्षा प्रेक्षकांनाच अधिक वाटावा. उच्च प्रतीचा झेल प्रेक्षकांनी डोक्यावर घ्यावा. मैदानावरील सामन्याचा थरार एखाद्या उत्तुंग षटकाराने प्रेक्षकांमध्ये झटक्यात पसरावा. सहा मात्रांच्या तालावर फलंदाजांनी आपली लयकारी रंगवावी.

दृत तीनतालात, अगदी नवख्या रसिकालाही भावेल असा आक्रमक तराणा बोलू लागावा. एकाहून एक सरस-सुरील्या तानांना साथ करताना साथीदारांची थोडीशी धांदलच उडावी. पहिल्या षड्जरूपी कळीला या अखेरच्या आवर्तनांमध्ये बहर यावा. टाळ्यांच्या अविस्मरणीय कडकडाटात आकर्षक तिय्या घेत मैफिलीची समाप्ती व्हावी.

अखेरच्या षटकांतील चुरशीला अनोखा रंग चढावा. दोन्ही संघांमधील स्पर्धा अधिकच तिखट व्हावी - आणि त्याबरोबरच सामन्यातील रंजकता आणखी वाढत जावी. एका फलंदाजाच्या किंवा गोलंदाजाच्या कामगिरीमुळे, आणि अर्थातच त्याच्या साथीदारांच्या मदतीमुळे संघ विजयाच्या समीप पोहोचावा. असंख्य चाहत्यांच्या साक्षीने वरचढ संघाने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करावे. विजेत्या संघाचेच नव्हे; तर पराभूत संघाचेही चाहते एक उच्च दर्जाचा सामना बघितल्याच्या खुशीत मैदानातून बाहेर पडावेत.

"वाह! काय सामना झाला!"
आणि
"वाह! काय मैफिल जमली होती!"
असे दोन्ही उद्गार एकाच जल्लोषात उमटावेत.

सच्च्या रसिकाला शास्त्रीय संगीत असो वा क्रिकेटचा सामना, दोन्ही तितक्याच तीव्रतेने भावणार, नाही का? थोडक्यात काय, तर शास्त्राच्या पलिकडे जाणारे संगीत आणि तंत्राच्या पलिकडे जाणारा खेळ; दोहोंचा आनंद लुटण्यासाठी फक्त रसिकता आणि अमाप उत्साह यांचीच आवश्यकता असते. शास्त्र आणि तंत्र जाणण्याची नव्हे!

गुरुवार, नोव्हेंबर ०९, २००६

जो जे...

ज्ञानेश्वरांनी पसायदानात अशी इच्छा व्यक्त केली आहे:
दुरितांचे तिमिर जाओ। विश्व स्वधर्मे सुर्ये पाहो।
जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥
ज्याला जे हवे ते मिळणे हे महाकठीण. एकाला जे हवे ते दुसऱ्याला नको. तिसऱ्याला नको ते पाचव्याला मात्र पसंत; मात्र दुसऱ्याला ते पाचव्याला मिळायला नको असे वाटणार. या सगळ्या भानगडीत जो जे वांछील त्याला ते ते कसे मिळणार? आणि ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेली ही इच्छा तरी कशी पूर्ण होणार (स्वतः ज्ञानेश्वरही 'जो जे वांछील' या गटात बसतात!)

ज्ञानेश्वरांच्या या प्रख्यात ओळी पुन्हा पुन्हा वाचल्यावर मला multi-variable optimization या linear/non-linear programming मधल्या प्रकरणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही! गणिताच्या दृष्टीने हे सगळे प्रश्न computer वापरून थोड्या परिश्रमानंतर आणि बऱ्याच वेळानंतर सुटू शकतील. परंतु ज्ञानेश्वरांने जे इप्सित आहे ते प्रत्यक्ष आयुष्यात अशक्यप्रायच वाटतंय. खरं सांगायचं तर प्रत्यक्ष आयुष्यात असं काही सुटेलच असं नाही. कारण आयुष्यातली 'multi' variables नुसती multi नसतात, तर (दुर्दैवाने?) जवळजवळ अनंतच असतात.

सोडवायला प्रश्न उरले नसते, तर माझ्यासारख्या engineer ला नोकरीच उरली नसती. नोकरीचं सोडा; पण सगळेच प्रश्न सुटत नाहीत म्हणूनच तर खरी मजा आहे. Right?

सोमवार, ऑक्टोबर ३०, २००६

संपूर्ण

संस्कृतातला श्लोक आठवतोय का? पूर्णा‍‌‍त् पूर्णमिदं... खोलात गेलो तर समजायला महाकठीण. पूर्णात पूर्ण सामावलेले आहे, पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच उरते अशी ही अनंत आणि 'पूर्णा'ची कल्पना आहे. इंग्रजीतला infinity minus infinity equals infinity हा सिध्दांत त्याच कल्पनेला दुजोरा देणारा आहे.

समजायला सोप्पं असं याच श्लोकाचं दुसरं रुप असू शकतं ते म्हणजे,
अपूर्णात अपूर्ण पूर्णपणे सामावलेले आहे. अपूर्णातून अपूर्ण काढून घेतले तरी उरते ते अपूर्णच.

आणि नुसताच time pass नाही तर यातूनही विचार करायला लावणारा अर्थ निघू शकतो.
बघा पुन्हा वाचून; पटलं आता?

---
पुरणात पुरण सामावलेले आहे, हे खरे; पण ते अपूर्ण सत्य. संपूर्ण पुरणपोळीत पुरण पूर्ण सामावलेले आहे; हे खरे सत्य.

हो. पुरे करतो आता!

मंगळवार, सप्टेंबर १२, २००६

नारळाचं झाड

नारळ नीट सोलून तो फोडून देण्याचं काम लहानपणीपासून माझ्याकडे लागलेलं. छानपैकी एकेक करून त्याची शेंडी काढायची, मग नारळाचा "तिसरा डोळा" दिसला की सोलणं थांबवायचं. नेहमीचा स्क्रू ड्रायव्हर जवळ आणून ठेवायचा. पाण्याची एक गोलाकार रेष आखून पायरीच्या काठावर एक जबरदस्त दणका दिला आणि निम्मं पाणी पायरीवर सांडलं नाही तरच मिळवलेली असायची. स्क्रू ड्रायव्हरने मग नारळाला पडलेल्या भेगेला मोठं करून उरलेलं पाणी नेहमीच्या भांड्यात गोळा करायचं. पाढरी शुभ्र वाटी पुरी उघडून आईला खोवायला द्यायची. नारळाच्या शेंड्यांचा पसारा आवरून उरलेलं पाणी प्राशन केल्यानंतर खोवलेलं खोबरं चाखायची वेळ झालेली असायची. "गोड आहे बुवा" म्हणत पुन्हा पुन्हा हात पुढे करायचा, आणि ओशट हात शेवटी चड्डीला पुसून स्वयंपाक घरातून काढता पाय घ्यायचा. असा सगळा नारळ-फोड कार्यक्रम बऱ्याच वेळा मी करत असे.

आमच्या बागेत नारळाची तीन-चार तरी झाडं लावलेली. पण एका तरी कल्पतरूला फळ धरेल तर शप्पथ. नारळ लागावेत म्हणून किती तरी प्रयत्न आणि प्रयोग करून झाले. नारळाला दमट हवा मानवते. पण नाशिकला समुद्रकिनाऱ्याची दमट हवा कशी आणणार! नारळाला भरपूर पाणी लागतं - मग परसात आम्ही भांडी घासायच्या मोरीतून डायरेक्ट अशी पाईपलाईन टाकून पाहिली. अति-पाण्यामुळे माती जरा जास्तच क्षारयुक्त झाली तरी नारळ लागायचं नाव नाही. खडे मीठ झाडांच्या आळ्यांमध्ये टाकून पाहिलं, तरी काही म्हणजे काही नाही. (जास्त मीठ टाकू नका असं माझं म्हणणं होतं - हो, नाहीतर नारळाचं पाणी खारट लागायचं!) हे सिंगापूरी नारळांचं कलम आहे, आमच्या माळी बुवांचं म्हणणं होतं की, "जरा" वाट बघावी लागेल. अशी "जरा" वाट बघत बघत सात-आठ वर्षं झाली - आमची दहावी-बारावी-डिग्री, अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तरी काही ढिम्म नाही त्या झाडाला. गेल्या वर्षी अचानक तुरे लागलेले पाहून कोण आनंद झालेला. मग त्यानंतर छोटे छोटे नारळही दिसू लागले. पण त्या कल्पतरूच्या (किंवा आमच्या) नशिबात नारळयोग नसावा - एकेक करून सारे छोटे नाल्ल (हा छान कोकणी शब्द!) बिचारे पडून गेले. हाती उरल्या फक्त झावळ्या...

पुण्याला आमच्या मामाच्या घरी नारळाची दोन-दोन मोठ्ठी झाडं. ही झाडं नारळाची असूनही "ताड-माड" उंच झालेली. खालून बघितलं तर छोटे दिसणारे नारळ जेव्हा थाडकन खाली पडायचे तेव्हा होणारा आवाज जरा भितीदायकच असायचा. तिकडे मामाकडे नारळच नारळ! आणि आमच्याकडे...छ्या!

एक दिवस आमच्या नारळाला धोधो नारळ लागतील. माठात साध्या पाण्याऐवजी नारळाचं गोडं पाणीच आम्ही भरून ठेऊ. नारळ सोलायचं काम इतकं वाढेल, की एका भल्या मोठ्या गोणीत भरून ती सगळी "शेंडेफळं" सलूनमध्ये न्यावी लागतील - बघाच तुम्ही. नारळाची बर्फी, नारळाचे मोदक, नारळाच्या करंज्या, अवीयलमध्ये नारळ, खीरीत नारळ, सांबारात नारळ, नारळाची चटणी, श्रावणघेवड्याच्या भाजीत - अगदी बटाट्याच्या भाजीतसुध्दा नारळ, फिश-करीत ओला नारळ, अहो, कोशिंबीरीत आणि शिकरणीत पण नारळ असा आमच्याकडे थाट असेल. उरलेल्या नारळांच्या वाट्या वाळवून कोरडं खोबरं - मग मसाल्यांत खोबरं, ह्याच्यात खोबरं, त्याच्यात खोबरं, इथे खोबरं, तिथे खोबरं असे बेत सुरू असतील. नारळ पडल्याच्या आवाजाने झोप मोडली तरी, झोपेचं अगदी खोबरं झालं बरं का असं कौतुकाने म्हणू. वैतागणार तर नाहीच नक्की. आणि तुम्ही घरी आलात, तर निरोप देताना हाती नारळ दिला तर रागवायचं नाही बरं का - त्यास श्रीफल म्हणायचं, काय?

याच सगळ्या स्वप्नांच्या नादात, "कधी एकदा आपल्या नारळाच्या झाडाला नारळ लागताहेत असं झालंय" असं बोलून गेलो, तर ते वाक्य तोडून "असू दे हं. जा, जरा वाण्याकडून नारळ घेऊन ये बरं" असा हुकूम आला. "घरच्या नारळाचं आईस्क्रीम कित्ती छान लागेल नाही?" असं म्हणणार होतो; पण ते सारे "टेन्डर" मनसुबे मनातच ठेऊन मी पिशवी घ्यायला सटकलो...

आपल्या तेहतीस कोटी देवांच्या यादीत एक तरी नारळाचा देव असेल, नाही? त्याला नवस बोलून, तो फेडायला वाटेल तेवढे नारळ फोडायला हा बंदा तयार आहे. आमच्या नारळाचा झाडाला नारळ तेवढे लागू देत बुवा!

मंगळवार, ऑगस्ट २२, २००६

पाऊस उत्सव

पाऊस पडतो.
पाऊस कोसळतो.
पावसाचा शिडकावा होतो.
पाऊस बरसतो.

रीमझिम पाऊस.
वळवाचा वर्षाव.
श्रावणातला घन-निळा.
पावसाची संततधार.

हुलकावणी देणारा पाऊस.
चिंब भिजवून टाकणारा पाऊस.
वीज चमकवून घाबरवणारा पाऊस.
कमळाच्या पानांवर नाचणारा पाऊस.

मुसळधार पाऊस.
गारांचा मारा.
मातीला सगंधित करणारी एकटीच सर.
शाळेला सुट्टी देणारा मोठ्ठा पाऊस.

वाहत्या पाण्यात बुडबुडे तयार करणारा पाऊस.
सगळ्यांच्या छत्र्यांची उचलबांगडी करणाऱ्या धारा.
इंद्रधनुष्यासाठी लागणारे तुषार फवारणारा पाऊस.
माळरानावर गवताची पाती खुलवणारा पाऊस.

पावसाची अशी अनंत रुपे आपण पाहिली, अनुभवली आणि मनसोक्त लुटली असतील. बंगलोरच्या भारतीय विद्याभवनात गेल्या रविवारी झालेल्या मल्हार उत्सवात पावसाने अशीच दिलखुलास हजेरी लावली. सौ. जयश्री पाटणेकर यांचे शास्त्रीय गायन आणि त्यानंतरची व्यासमूर्ती कट्टी आणि रविंद्र कातोटी यांची हार्मोनियमची जुगलबंदी या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली.

सूरांच्या वर्षावात आणि तालाच्या कडकडाटात अवघे रसिक न्हाऊन निघाले हे सांगणे न लगे!

मंगळवार, ऑगस्ट १५, २००६

श्रावणमासी

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे
बंगलोरला यावर्षी आषाढ लागलाच नाही. थेट श्रावणच. आधीच बंगलोरची हवा आक्रमक आषाढाला साजेशी नाही. सोनेरी सकाळी ढगांचा मागमूस नसावा, झालाच तर संध्याकाळी थोडासा पाऊस, तेवढाच. मात्र तेवढा पाऊस इथली सारी तळी पूर्ण भरून टाकायला पुरेसा आहे - म्हणजे - तळी उथळ आहेत असं नाही - पाऊस पुरेसा आहे. आणि नुसताच पुरेसा नाही, तर सुखदही.

रोजच्या ऑफिसच्या जगात श्रावण काय आणि वैषाख काय, सगळ्या ॠतूंमधली A/C हवा आम्हाला सारखीच. त्याचबरोबर बंगलोरला हिरवळीचं तसं काही वावगंही नाहिये. 'आता नॉन व्हेज नाही महिनाभर' असं कुणीतरी म्हणाल्यावर श्रावण-आगमनाची आम्हाला वार्ता लागली. मग लक्षात आलं की, अरे! हवासुद्धा बदलली आहे बरं का! दोन-तीनदा इंद्रधनुष्य दिसल्यावर तर खात्रीच पटली.
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणि भासे
असे मंगल तोरण नभोमंडपात खुद्द निसर्गानेच बांधल्यावर मग सणासुदीला काय उत्साह! बाजारही फुलांनी ओसंडून वाहत होते (आजकाल आम्हाला रस्ते आणि बाजार, चुकलो, मॉल फक्त माणसांनीच ओसंडून वाहू शकतात असे वाटायला लागले होते). पूजेसाठी फळे, इतर गोष्टीही आल्याच त्याबरोबर. संध्याकाळ होऊ लागली की सूर्य तेवढा मावळायला सज्ज होतो, उत्साह नाही!
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे
संध्याकाळच्या ऊन-पावसाच्या लपंडावात मग रस्त्यांवरचे दिवेही सहभागी होतात. नुकताच शिडकावा होऊन गेला असल्यामुळे चमकणारे असंख्य थेंब आपसूकच लक्ष वेधून घेतात. पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याची निवलेली किरणे गवताची पाती मग त्याच असंख्य थेंबांमधून पिऊ पाहतात. तोच तेजोनिधी लोहगोल आपली दिवसातली शेवटची जादू मग आकाशात सादर करतो.
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

आकाश केवळ विमानांसाठीच तयार केलेले असावे असे वाटणाऱ्या आकाशात खरंच बगळे दिसतात. विश्वास बसत नाही - नेहमीच दिसत असावेत हे बगळे - आपली नजरच विमानांचा शोधात फिरत असावी - असंही वाटून जातं. पाच-पाच सात-सातच्या रांगा करून, वाऱ्याचा रोध कमी होईल अशा ऐटीत ही बलाकमाला क्षितिजावर आस्ते आस्ते अदृश्य मग होऊन जाते.
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
बालकविंच्या या प्रख्यात कवितेतले पुढले संदर्भ मात्र आमच्या शहरी जीवनात फारच विसंगत वाटतात. त्यामुळे त्या पंक्तीबद्दल जास्त वक्तव्य न करता आहेत तशाच पुढे लिहितो आहे-

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
आमच्यासारख्या पक्क्या "शहरी" झालेल्या वाचकांच्या मनांत (सुद्धा!) ही कविता वाचून श्रावण बरसला असेल अशी आशा आहे!

सोमवार, जुलै २४, २००६

आठवण

आठवण...
सायकल चालवताना पहिल्यांदा पडलो तेव्हाची.
गणपतीला नैवेद्य दाखवायच्या आधीच मोदक खाल्ला तेव्हाची.
चिंचेच्या झाडावर मारलेला दगड नेम चुकून विहिरीत पडला तेव्हाची.
"उंदिर पळाला"च्या घोषात भोकाड पसरून रडलो तेव्हाची.
कागदी बोट पावसाच्या पाण्यात वाहून गेली तेव्हाची.
बेभान वाऱ्याशी स्पर्धा करत पेच खेळलो तेव्हाची.
मधल्या सुट्टीत सगळ्यांसमोर पाय घसरून पडलो तेव्हाची.
जिलबी ताटात पुढे दिसल्यावर दिलखुलास हसलो तेव्हाची.
जत्रेतून आणलेला फुगा घरी येताच फुटला तेव्हाची.
फुलाचा जवळून वास घेताना मधमाशीच चावली तेव्हाची.
रंगपंचमीला अर्धेवट रंगूनच पुरणपोळी हादडली तेव्हाची.
'इंद्रधनुष्यात सातच रंग का'च्या प्रश्नात तासंतास हरवलो तेव्हाची.
सीताफळाची बी गिळून बसलो तेव्हाची.

अशी जपून ठेवलेली एकेक आठवण: पुन्हा पुन्हा परतून येते, आणि जाणवतं ते काय?
ते चिमुकलं जग मागे सोडून आपण फार पुढे आलेलो आहोत.

किंवा ते चिमुकलं जगच आपल्याबरोबर मोठं झालंय.

खूपदा मला त्या जगात पुन्हा जावसं वाटतं - पळून...

आणि मग मी माझा कप्पा उघडतो, माझी वही माझ्याकडे पाहून हसते, आणि हे असं काहीतरी लिहायला भाग पाडते!

गुरुवार, मे ०४, २००६

जोडसाखळी!

नंदन ने सुरू केलेला हा tagging चा खेळ मला जोडसाखळी या लहानपणी खेळलेल्या खेळाची आठवण करून देतो. एकेक करून सगळ्या गड्यांना आपल्या साखळीत सामील करून घेणे हे त्याचे उद्दीष्ट! असो. आता मी आऊट होतो.

तर खेळ असा आहे, की आपल्या आवडत्या पुस्तकांबद्दल लिहायचे, आणि एकमेकांबरोबर त्याची चर्चा करायची. खेळाच्या चालीमध्ये मुख्यत्त्वेकरून प्रश्नोत्तरांचा समावेश केलेला आहे. तर मग सुरुवात करतो -

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
"शारदा संगीत" - प्रकाश नारायण संतांचे गाजत असलेले पुस्तक. शेवटचे विकत घेतलेले पुस्तक - "मौनाची भाषांतरे - अर्थात संदीप खरे!

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
लंपनच्या भावविश्वाची अगदी मॅड अशी सैर!

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -
ययाति - वि. स. खांडेकर
झोंबी - आनंद यादव
पडघवली, शितू - आदि गोनीदांची कोकणवर्णने
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
माझा साक्षात्कारी हृदयरोग - अभय बंग

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-
पंखा-वनवास-झुंबर - प्रकाश नारायण संत
बालकविंची कविता - बालकवि
पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
* - अनिल अवचट
(* - आतापर्यंत वाचलेली अनेक) - व्यंकटेश माडगूळकर

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
सर्वांत प्रथम मी झोंबी वाचले तेव्हा मी माझ्या आठवणीप्रमाणे नववीत होतो. कागलच्या अत्यंत अंधाऱ्या जगातली ही सत्यकथा. मुखपृष्ठावरच्या काजळीने माखलेल्या तेलाच्या दिव्याप्रमाणे, जळणारे आयुष्य ज्याच्या नशिबी आले, आणि अनंत अडचणींवर मात करून ज्यांनी जीवनास जिंकले अशा आनंद यादवांच्या आयुष्याची ही सत्यकथा. मॅट्रीकची परीक्षा पास होण्यापर्यंतचा कालावधी या कादंबरीत आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. त्यानंतरची नांगरणी, आणि घरभिंती ही पुस्तकेही मग मी अधाश्यासारखी वाचून संपवली.

आतापर्यंत मी झोंबी कमीत कमी तीन वेळा तरी पूर्ण वाचले असेन.
---
आता या खेळाच्या नियमाप्रमाणे, इतर गड्यांच्या पाठीमागे लागले पाहिजे. ते कोण? हा लेख ज्यांनी वाचला ते सारेच जण!

शुक्रवार, एप्रिल १४, २००६

मराठी साहित्य आणि मी

नंदन (हा Internet जगात झालेला नवा मित्र!) च्या blog वर "मराठी साहित्याचा दर्जा" -- "उच्च प्रतीचे" साहित्य आणि "हीन दर्जाचे" लेखन यावरची चर्चा वाचून ही सगळी विचारमाला सुरू झाली. या विचारांमधल्या काहींना शब्दरुप देण्याचा हा प्रयत्न ---

"एक होता काऊ आणि एक होती चिऊ" या शेणा-मेणाच्या घराच्या गोष्टीपासून कदाचित माझा "साहित्य" प्रवास सुरु झाला असावा! शेवटी साहित्य साहित्य म्हणजे तरी काय? कल्पनेच्या विश्वात संचार करण्याचे एक माध्यम - तो प्रवास सुखकर करणारे ते "साहित्य". लहानपणी आई-बाबा-आजी-आजोबांनी हा प्रवास गोष्टींमधून सुरू करून दिलेला असतो. पुढे शालेय शिक्षणातून स्वतः लिखाण-वाचन करणे शिकल्यानंतर आपण स्वतंत्रपणे अशी साधने शोधायला लागतो. अशा वयात (आणि कदाचित पुढेसुध्दा) मासिके, वर्तमानपत्रे - जे काय वाट्टेल ते समोर येईल ते वाचून खाऊन टाकणे याचे व्यसन लागणं ही भाग्याचीच गोष्ट म्हणायची. सुरुवातीचा, जे समोर दिसेल ते खाऊन टाकण्याचा अधाशीपणा मग वयाप्रमाणे बदलत जातो. शाळेतल्या पाठ्यपुस्तकांमधले लेखक वाचून काढण्याचा सपाटा सुरु होतो. वाचनालयात अशा प्रत्येक लेखक-कवींची असंख्य पुस्तके सापडतात. मग हळूहळू कथा-कादंबऱ्या-लघुनिबंध-निबंध-वैचारीक अशी विभागणी व्हायला लागते. मित्रमंडळी आदींकडून पुस्तकांची देवघेव सुरु होते, आणि कधीमधी पुस्तकांवर चर्चासुध्दा. मला स्वतःला अशी चर्चा कधीच करता आली नाही. पुस्तकांच्या बाबतीत मी प्रचंड स्वार्थी होतो - आहे. पुस्तक वाचतानाचा आलेला अनुभव मी फक्त माझ्याकडेच जपून ठेवतो. किंबहुना, मला तो इतरांना योग्य पध्दतीने सांगता येत नाही -पुस्तक परीक्षण हे फक्त त्या पुस्तका"बद्दल" लिहिणं असतं. ते पुस्तक प्रत्यक्ष वाचताना आलेला अनुभव अशा परीक्षणांतून व्यक्त करणं अशक्यच आहे! तो प्रत्येकाने आपापल्या परीने लुटायला हवा.

तर, "एक होता काऊ आणि एक होती चिऊ" यापासून प्रत्येकाचा सुरू झालेला प्रवास हळूहळू विविध दिशांकडे जातो. वैयक्तिक आवडी-निवडी तयार होतात. त्याप्रमाणे निरनिराळे विषय हाताळले जातात. कविता-कथा-कादंबऱ्यांमध्येही आणखी वर्गीकरण केले जाते. शेवटी मग एक प्रकारचा समतोल साधला जातो. आणि तेच महत्त्वाचं!

माझ्या मते माझ्या या प्रवासात फार मोठा वाटा माझ्या शाळेचा आणि शाळेतल्या ग्रंथालयाचा आहे. माझ्या नशिबाने मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेच्या वाचनालयात (तेव्हाच) दहा हजार पुस्तके होती - आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे उत्तेजन देणारे शिक्षक! पाचवी ते दहावी या पाच वर्षांत मी प्रचंड पुस्तके वाचली. आणि शेवटी एक वेळ अशी आली की केवळ एक वाचक न उरता, मी स्वतः लिखाण करायला लागलो. ती वर्षे अशी होती, की निबंधाची वही आणि निबंध स्पर्धा यापलिकडे लिखाणाची फारशी संधी मिळायची नाही. पण तेवढ्यांत का होईना, मी माझी हौस भागवून घ्यायचो. मी जात्याच अबोल असा आहे, त्यामुळे वक्तृत्त्व स्पर्धा वगैरेंच्या वाटेला मी कधीच गेलो नाही; पण ते सारं उट्टं (!) मी निबंध-लेखनातून फेडायचो. पुढे Engineering शिक्षणाच्या काळात मी माझं लेखनप्रेम पत्रलेखनातून सुरू ठेवलं. त्यापलिकडे फारसं लेखन घडायचं नाही. पुढे नोकरी सुरू झाल्यानंतर डायरीत अनेकदा लिहायचो. पण खऱ्या अर्थाने व्यसनाधीन झालो; ते म्हणजे "blog" च्या उदयानंतर. माझ्या मते blog ही एकंदरीतच साहित्य जगाला मिळालेली दैवी देणगी आहे. प्रत्येकाच्या ठायी असलेला सुप्त लेखक-कवी जागा करण्याचं फार मोठं काम या माध्यमाने केलं आहे. आता "साहित्य" हा तसा जड शब्द फक्त ख्यातनाम लेखकांशी निगडीत उरला नाही. म्हणायचं तर आता प्रत्येक blogger (आणि हो, मीसुध्दा!) एक साहित्यिकच आहे!

आता पुढचा प्रश्न असा की मग त्यांत चांगला साहित्यिक कोण? किंवा blog वर प्रकाशित होणाऱ्या साहित्याचा "दर्जा" काय? साहित्याचा दर्जा ही "पुरणपोळीची चव" यासारखीच एक अभौतिक गोष्ट आहे. अर्थातच, सगळ्यांनाच पुरणपोळी आवडतेच असं कुठे आहे! माझ्या मते पुरणपोळी करून वाढण्याचा आईचा आनंद ती खाणाऱ्या मुलाच्या आनंदात सामावून जातो - अगदी तसंच; लिखाण करणाऱ्याचा आनंद, जर ते लिखाण वाचकाला आवडलं तर कित्येक पटींनी मोठा होत असतो...

आधीच सांगितल्याप्रमाणे साहित्याच्या बाबतीत मी बराच स्वर्थी आहे. मी वाचतो ते माझ्या आनंदासाठी. मी लिहितो ते मुख्यतः माझ्या आनंदासाठी. पुलंच्या कीर्तनकाराप्रमाणेच, ऐकायला कोणी आहे किंवा नाही याची पर्वा न करता मी लिहितो. यास उद्दामपणा/उर्मटपणा म्हणा हवं तर - पण आजच्या मितीस तरी हे असं आहे. आनंदाची बाब अशी की मित्रांना - वाचकांना ते बऱ्याचदा आवडतं आणि त्यातून लिहिण्यास मला प्रोत्साहनही मिळतं.

याच धर्तीवर, "साहित्याचा दर्जा" यावर भाष्य करताना मला वाटतं की लेखकाच्या दृष्टीने ही फार वेदनादायक चर्चा आहे. मान्य आहे की एकंदरीत समाजाच्या लेखी एखादं लिखाण अत्यंत हीन दर्जाचं ठरू शकतं. जर तो लेखक शहाणा असेल तर तो यास एक "चांगला" अभिप्राय मानून तो पुढे सुधारणा करेलही; परंतु सारखीसारखी अशी चर्चा करण्यात तरी काय हशील आहे? एकदा "दुय्यम दर्जाचा" असा शिक्का बसलेल्या लेखकाचं सगळंच लिखाण कायमच दुय्यम ठरावं का? 'र' ला 'र' ; 'ट' ला 'ट' लावून लिहिलेल्या कवितांमध्ये नेहमीच "काहीच" नसतं का? ती कविता लिहिताना मिळालेला आनंद वाचक कवीकडून अशा पध्दतीने जेव्हा हिरावून घेतो तेव्हा कवीला दुःख होणारच. ती निराशा- तो राग मग त्याच्या पुढच्या कामावर विपरीत परीणाम करणार इत्यादी इत्यादी. अर्थात, याचा अर्थ वाचकाने सतत असे "दुय्यम" साहित्य मान्य करावं असा नाही. परंतु लेखकाला योग्य संधी मिळायला हवी एवढेच.

पुरणपोळी अगोड झाली कधीतरी तरीसुध्दा आपण आईच्या हातची ती पोळी चवीने खातोच की - त्यातलंच हे झालं...

शनिवार, मार्च १८, २००६

खेळाची वही

परवा असाच बोलताबोलता विषय निघाला -

मित्र म्हणाला, "काय तू स्पोर्टस्टार वाचतोस?"

"हो, का?"

"काय फोटो कापून ठेवतोस का आणि?"

"नाही. फोटो कापून नाही ठेवत."

आणि झटकन मला माझ्या शाळेतल्या "खेळाच्या वहीची" आठवण झाली. किती आटापीटा करून आम्ही खेळाची वही तयार करत असू. दर वर्षी मार्च-एप्रिल महिना उगवला की खेळाची वही submit करायची वेळ व्हायची. मग एकच धांदल. "मी तुला अझरुद्दीन देतो, तू मला स्टेफी ग्राफ दे" असे सौदे सुरु व्हायचे. डाव्या बाजूला खेळाडूचा फोटो आणि उजव्या पानावर त्याचे "वर्णन" की काय ते. लोकल (नाशिकच्या गांवकरी - देशदूत - सकाळ) वर्तमानपत्रांमधून कापलेले ते (दिव्य) फोटो म्हणजे एक प्रकरणच असायचं. कुणीतरी मग आपल्या आई-बाबांकडे हट्ट करून एखादे स्पोर्टस्टार मिळवायचा. मग त्याची चंगळ असायची. एक स्पोर्टस्टार एका वर्षाची खेळाची वही पूर्ण करायला पुरेसा असायचा. रंगीत फोटो असल्याने आमचे खेळाचे सरही खूष होण्याची शक्यता वाढायची. पण बहुतेक मुलांच्या वह्या मात्र लोकल डिंक आणि लोकल वर्तमानपत्रांतले फोटो यांनी पूर्ण "फुगलेल्या" असायच्या.

ते काहीही असो, मात्र खेळाची वही हा एक अत्यंत आवडता उपक्रम असायचा.

त्या लहान वयात आम्ही ती खेळाची वही प्रयत्नपूर्वक तयार करून नक्की काय मिळवलं ते मला सांगता येणार नाही. मला तर काय सगळेच खेळ प्रचंड आवडायचे (आता तर आणखीच जास्त आवडतात), त्यामुळे कुठल्याही प्रसिद्ध खेळाडूची चित्रं मी चिकटवायचो. अगदी मनापासून. तेव्हा त्या लहान वयात "role model" वगैरे concepts नव्हत्या. नव्हत्या असं नाही, पण त्याचा बाऊ असा नव्हता - मला अझर आवडायचा, आणि पीट सांप्रस!

मला तर खूप सही याचंच वाटतं की तेव्हा मी छोट्या-छोट्या गोष्टी कशा पद्धतीने करतो याची चिकित्सा कोणी केली नाही. माझ्या चित्रकलेवरून (कला?) माझ्या स्वभावाबद्दल कोणी अंदाज बांधले नाहीत. माझ्या मामे-मावस-चुलत भावंडांच्या शाळेतल्या activities आणि पालक सभा यांच्याबद्दल मी जेव्हा ऐकतो तेव्हा मला तर भितीच वाटते.

असो.

मला नुकत्याच वाचलेल्या एका कवितेचं नाव आठवतं - ज्या ज्या वयात जे जे करायचं त्या त्या वयात ते ते करायचं. तसंच करतो, आणि फारशी मीमांसा न करता, आवरतं घेतो!

मंगळवार, फेब्रुवारी २१, २००६

नाशिक शहर माहिती आहे का तुम्हाला?

नाशिकचे मध्यवर्ती बसस्थानक CBS या नावाने ओळखले जाते. तो reference धरलात, तर शरणपूर रस्त्याने सरळ canada corner कडे मोर्चा वळवायचा. डावीकडे पतंग हॉटेल लागेल- ते सोडायचं, मग पुढे कुलकर्णी बाग लागेल, तिथूनही पुढे जायचं. पुढचा डावा रस्ता सोडून मग त्यानंतरच्या डावीकडच्या गल्लीत शिरायचं. सरळ आत चालत गेलात तर डावीकडे मग एक architect's guild की काहितरी अशी एक इमारत दिसेल. तिथूनही अजून पुढे जायचं. उजवीकडे मैदान दिसेल - तसंच थोडं पुढे गेलात की मग तुम्हाला माझ्या शाळेची मोठी इमारत लागेले.

साधना - सम्रुध्दी - समता असे ब्रीदवाक्य आणि "महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित" "रचना विद्यालय" असं मोठं रंगवलेलं तुम्हाला दिसेल. हीच माझी शाळा.

पण हे सगळं फक्त space मध्ये झालं. "माझी शाळा" तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला time मध्ये प्रवास करायला हवा.

ती फक्त इमारत झाली. खरी शाळा तर माझ्या मनात आहे!

मंगळवार, जानेवारी २४, २००६

आनंदाचे झाड

या क्षणी माझ्यासमोर एक पांढराशुभ्र, गुळगुळीत, नितळ कोरापान, कागद आहे. शाई भरलेले माझे आवडते, सरावाचे पेन आहे. मुख्य म्हणजे मला भरपूर निवांत वेळ आहे. डोक्यात नाना प्रकारच्या कल्पनाही उचंबळत आहेत. मग लिहायला विलंब का? कागदाला पेन टेकण्याचा अवकाश, मनात येईल ते मी या कागदावर लिहू शकेन.

पण हा विचार मनात येतो न येतो तोच त्याच्या पाठोपाठ दुसरा विचार तितक्याच वेगाने येऊन थडकतो. मी लिहायला हवेच का? कागद नि पेन पुढ्यात मिळाले, की काहीतरी लिहावेसे वाटणे ही लेखक जमातीतल्या लोकांच्या मनात खोलवर रुजलेली एक विक्रुती तर नसेल? हा इतका शुभ्र, तलम, नितळ गुळगुळीत कागद. खरे तर हा नुसताच बघावा. या पांढऱ्याशुभ्र, निर्मळ प्रवाहात डोळे अलगद सोडून द्यावेत, या तलम प्रुष्ठभागावरून हळुवार बोटे फिरवावीत. त्याचा मऊ स्पर्श अंगाअंगात भिनवून घ्यावा. हा कोरा करकरीत कागदी वास खोलवर हुंगावा. त्रुप्तीचा निःश्वास टाकावा.

खरोखर कागद पाहून मनाची होणारी प्रतिक्रिया अधिक स्वाभाविक नव्हे का? ही स्वाभाविक व्रुत्ती सोडून कागद दिसला रे दिसला, की तो चिताडण्याची अस्वाभाविक व्रुत्ती माणसात आली कशी? कुठून आली?

हे जर खरे, तर मला तरी लिहिण्याचा संकोच का वाटावा? अनेकदा मनात येते, लिहायचे कशासाठी? हे वाचणार कोण? याचे महत्त्व केवढे? केवळ आपल्या क्षणभंगूरतेची सलणारी जाणीव विसरावी, कशाच्या तरी द्वारा मरणानंतर चार दिवस जगात उरावे, इतरांच्या थोडेफार आठवणीत राहावे, म्हणून तर आपण हा लेखनप्रपंच करीत नसू? ही मानसिक विक्रुती नसून ती आपली एक आंतरीक गरज तर नसेल? तसे असेल तर या गरजेची इतकी लाज का वाटावी? माणसाच्या अंगी अनेक प्रकारचा दुबळेपणा आहे. त्यांतलाच हाही एक दुबळेपणा असेल. तर मग तो स्वीकारून मनोमन त्याची जाणीव बाळगून, जमेल तसे, न जमेल तसेसुद्धा लिहायला हरकत काय?

मग मनात कल्पना दाटून येतात, शब्द कानांत कुजबुजतात, गुणगुणत राहतात, ते द्रुश्य रुपाने मला खुणावीत माझ्याभोवती फेर धरतात; लिहावेसे वाटते. लिहावेसे वाटते.

- शांता शेळके "आनंदाचे झाड"

शनिवार, सप्टेंबर १७, २००५

इद्रधनुष्य

आकाशात कायमच ढगांची गर्दी असते. त्यातल्या त्यात संध्याकाळी जरा मोकळीक मिळते आणि लहानश्या पोकळीतून निळ्या आकाशाचं दर्शन घडतं. वाऱ्याची मर्जी असेल तर ही पोकळी आणखी मोठी होते. पुर्वेकडे मात्र राखाडी ढग कायमच रेंगाळत बसलेले दिसतात.

अशाच एका संध्याकाळी पश्चिमेकडे जरा उघडीप मिळाल्यावर छान उन पडलं होतं. कललेले सोनेरी किरण प्रसन्न वाटत होते. पूर्वेकडच्या ढगांकडे लक्ष जाताच अप्रतिम इंद्रधनुष्य दिसलं. अर्धं! त्या द्रुष्यातल्या नजाकतीत काहितरी कमी होतं. बराच वेळ विचार करूनही त्याचं कारण मला सापडेना. इतकी छान संध्याकाळ, आल्हाददायक वारा आणि एकंदरीतच हवामानातला उत्साह, त्यात हे अपूर्ण इंद्रधनुष्य खटकत होतं.

तुला याची हकिकत सांगितल्यावर तूही असाच अनुभव आल्याचं म्हणालीस.

चित्र आता पुरं झालेलं होतं...