कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, नोव्हेंबर २५, २०१५

येणारच नाव ...

Sunset and evening star,And one clear call for me!And may there be no moaning of the bar,When I put out to sea,
But such a tide as moving seems asleep,Too full for sound and foam,When that which drew from out the boundless deepTurns again home.
Twilight and evening bell,And after that the dark!And may there be no sadness of farewell,When I embark;
For tho' from out our bourne of Time and PlaceThe flood may bear me far,I hope to see my Pilot face to faceWhen I have cross'd the bar.




टेनिसनची हि कविता वाचनात आली.
अलिकडेच वाचेलेल्या बोरकरांच्या "येणारच नाव, जाणारच नावाडी" या शब्दांची आठवण झाली!

शनिवार, ऑक्टोबर २९, २०११

मी किनारा

कधी फेसाळणारी कधी सरसावणारी 
कधी थंडगार कधी बोचणारी

कधी आक्रमक कधी संथावणारी 
कधी खेळकर अशी कधी खोडकर तशी

कधी वादळात भीजवणारी जोरदार 
कधी उन्हात सुखावणारी आरपार

कधी येऊन येऊन नको नको वाटणारी
कधी जाता जाता फार फार रडवणारी

कधी भरतीची - स्वतःला लादणारी 
कधी ओहोटीची - हक्कानेच मागणारी

कधी मी ती लाट - कधी तू किनारा
कधी तू ती लाट - आणि मी किनारा!

रविवार, मार्च ०७, २०१०

कशाला?

तुझा राग तुझं प्रेम, तुझी चीड थोडा वेळ
तो ओलावा तो रुसवा आणि किंचित आरडाओरडा
हे सगळं सगळं अगदी आवडतं ना मला
सांगाया ते पुन्हा वर काव्य आणि कशाला?

तुझी स्वप्नं तुझ्या डोळी, तुझ्या ओठी घट्ट मिठी
तुझी चित्रं तुझी कला, तुझा हट्ट माझ्यासाठी
बोललो जास्त नाही तरी, सीमा नाही कौतुकाला
प्रेमाच्या अलगद शब्दांसाठी फुसकी चारोळी कशाला?

तू माझी माधुरी दीक्षित, तूच आहेस मधुबाला
तूच विश्वसुंदरी माझी, कोण कुठली ऐश्वर्या?
होऊ दे प्रेमाचा बोलबाला, घाबरतो का कुणाला!
अगं पण त्यासाठी फालतू फिल्मीगीते कशाला?

तुजसाठीच तर क्षणोक्षणी श्वास आहे घेतला
तुझ्यामुळेच तर आयुष्या अर्थ आहे लाभला
डोळ्यांनी कधी सांगितले नाही हे तुला?
आता सांगतो की! वेगळे महाकाव्य कशाला?

तरीही तुझा असेल आज शब्दांसाठी अट्टाहास
लिहितोच बघ कविता, आता माझीही आहे कवी-रास
अलंकृत करुनि भाषा, उपमांचा जोर आहे लावला
कळविण्या ते तुला अजून प्रेमपत्र कशाला?

नाही गड्या स्त्रीजातीला तू पुरता नाही ओळखला
नाजूक असेना का पण फुंकर लागतेच हो कळी खुलवायला
शब्दांनी तुझ्या प्रेमामध्ये रंग आहे ओतला
म्हणून लिहिली ही कविता, आवडते का बघ तुला!

गुरुवार, फेब्रुवारी २५, २०१०

अप्रेजल

आहे का कपाळी। वेतनवृद्धी ॥
गातात भूपाळी । कुबेराची ।

चटपट काम । उगीच घाम ।
कमीच दाम । कशासाठी ॥

आपुला डंका । सोन्याची लंका ।
मूर्ख घेती शंका । आपलीच ॥

नालायक पीपाणी। गातोया गाणी ।
साहेबा लोणी । नकोच ते॥

नेटाने अभ्यास । करूनि प्रयास ।
सारा विपर्यास । शेवटी का ॥

टाळंटाळ मंगळ । सगुण आळस ।
त्याचीच चंगळ । तोची हिरा ॥

करूनही कर्म । पाळला धर्म ।
पण फलप्राप्ती । परक्यादारी ॥

सोसा थोडी कळ । येईल वेळ ।
मिळेल फळ । कधी काळी ॥

आताची चरफड । विझवा चूड ।
उद्या वरचढ । सज्जनाची ॥

असेल सुबुद्धी । सत्याचे कवच ।
तुमचीच समृद्धी । अजित उवाच ॥

मंगळवार, फेब्रुवारी ०२, २०१०

॥ पुनरागमनायच ॥

कधी काळी गरम होता चहा
धगधगती ज्वाळा तप्त-संतप्त लोहा
अंगात होती रग - पारा शंभरावर सहा!

[परंतु कालपरत्वे]
कशी अचानक पडली थंडी - पहा
गोठली अक्षरे कल्पनांचा दुष्काळ महा
ठिणगी क्वचित आता सगळाच हशा - हाहा!

[उपसंहार]
कर्कश्श वाटते शांतता - असह्य प्रतिभा विरह हा
घे लेखणी हाती - फुटू देत धरण पुन्हा
परततोय मी आता - रसिकांनो, सावध रहा!

बुधवार, सप्टेंबर १६, २००९

पाझर तलाव

तिने चिडून एकदा मला
संबोधले--- "अरे दगडा,
कधी तरी पाझर फुटू देत की प्रेमाचा!"

आता दगडाला खरंच पाझर फुटायचा
म्हणजे केवळ अशक्य---
पण तुला असं पटवून द्यायचं असेल,

तर अगदी मनापासून म्हणतो,
"जरी मी दगड वाटलो तुजला,
प्रिये भासतेस भारी दगडफूल तू मला"


गुरुवार, जानेवारी २९, २००९

दोन वाटा

वाटचुकार वासराशिवाय फिरकलेले कोणी नसते
अशा जागी गेली वाट सरत सरत आली असते
तिथे पुन्हा दोन वाटा फुटलेल्याच्या खुणा दिसतात
एक जरा सरावलेली दुसरीवरती ठसे नसतात
तिने चाहूल नाही म्हणून पाऊल पाऊल ओढून नेले
सोडून दिल्या वाटेकडे फिरून फिरून पाहू दिले
किती वेळ दिसत होती धरली नाही तीच वाट
तिची वळणे हेलकावे तिचे उतार तिचे घाट
तिनेच गेलो असतो तर ही कदाचित मिटली असती
तसे व्हावयाचे नव्हते - हीच माझी वाट होती!


कवि अनिल

रॉबर्ट फ्रॉस्टच्या The Road Not Taken वरून स्फूर्ती घेऊन ही दशपदी कवि अनिलांनी लिहिली असावी! काय अनन्यसाधारण प्रतिभा सांगावी!!

गुरुवार, जुलै २६, २००७

एकादशी

एकादशी नि दुप्पट खाशी म्हणतात ते काही खोटं नाही. आषाढी एकादशीच्या या सुदिनी विंदांची एक खाशी मस्तच बालकविता आठवली ती अशी---

पंढरपूरच्या वेशीवरती आहे एक शाळा
सगळी मुले गोरी मात्र
एक आहे काळा

दंगा करतो फार, खोड्या काढण्यात अट्टल,
मारायचे कसे, मास्तर म्हणतात,
असायचा विठ्ठल!

गुरुवार, मे ०३, २००७

बगळ्यांची माळ...

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात

त्या भेटी त्या गोष्टी नारळीच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात

हातासह सोन्याचे साज गुंफताना
बगळ्याचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना
कमळापरि मिटती दिवस उमलुनि तळ्यात

तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे
तडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात

बगळ्यांची माळ फुले...


-- कवी वा.रा. कांत.

वा.रा. कांतांचे शब्द.
पं. वसंतरावांचे सूर..
आणि अविस्मरणीय त्या आठवणी...

मंगळवार, एप्रिल १७, २००७

नवकाव्य!

[प्रतिभेवर स्वतःच्याच बेहद्द खूष होऊन एकदा एक (नव)कवी तो वदला---]
आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके
देवाने दिधले असे आम्हांस दान यमकाचे नेमके.
मारतसू भरा-या गगनात आणि होतसू धूमकेतूवर स्वार
प्रतिभेचे दिवे अमुच्या तेवतसी, हं, सूर्याच्या पलिकडे पार!

शब्द सोडितसू ते विषारी बाण कधी, तर कधी प्रेमाचे मदनबाण,
केवळ सुपीक नसे माथे अमुचे, नव्हे, ते तर सोन्याची खाण!
अहो, अत्तराच्या कुपीतले सुगंधाचे कण शोधून देतसू, वाटले काय?
सुंदर कल्पना त्यावर सजवू, जणू म्हशीच्या दुधावर साय!

येता का राज्यात विहराया संगे अमुच्या होऊनिया हरणावर स्वार?
झाली तिकडे हंसांची गर्दी जलावर, हं..आणिक वाहतोय वारा गार!
चला चला दाखवतो वैभव अमुचे, वेलिंनी ती माळली फुले
पहा चोर तो वात बेभान, त्याने धुलीचे आतंक माजवले!

(एवढे वर्णन पुरे, पुरे म्हणून काय एक श्रोता उत्तरला---)

असो जातो आम्ही, आम्हांस कवीराज नसे पावला काळ
चुकेल अमुचा अग्निरथ पुढला, तुमच्या काव्यात उजाडेल उद्याची सकाळ
कविता जाणलो न कधी तुमची आम्ही खायची कशासंगे
उठूनि रोज प्रभाते मनी कचेरीतील कार्याची चिंता लागे!

(हे बेचव-भौतिक उत्तर एकून निराशले, कवीराज म्हणाले---)

हाय! मर्त्य मानवा, कधी रे होशील शहाणा? अरे!
कधीतरी कल्पनेच्या विश्वात फिराया जाशील ना रे?
पहा इकडे, निर्मितो आम्ही सोनेरी विश्व निराळे
करंटे तुम्ही न जाणले सामर्थ्य या कवीचे आगळे

अहो! कुठे फेडाल पाप हे सुंदर धरतीवरचे?
ती माई गंगामाई देईल काय तुम्हांस जल तिचे?
हाय दैवा का दिलासे जन्म नवकवीचा?
वर शिक्षा म्हणून काय न निर्मिला वंश रसिकाचा?
(नवकवीचे हे गर्वाचे बोलणे रसिकांस सहन न जाहले, ते वदले--)
काय कविता निर्मितसे असो जाणुनिया आम्ही पण
थोर उपमांचे पेरले मळे परी असे मातले तण
दिलेस काही वाचनीय अन् सुखावणारे मना
येऊच की आम्ही तडक ते तुजया जगीं भ्रमणा

बेचव नि अळणी मात्र चारलेस आम्हांस पदार्थ तू जर
बदडून काढू, अन् शिक्षा देऊ भयंकर, वर बहिष्कार
असशील शहाणा तर हे तू जाणशील---
न कधी कर अवमान रसिकाचा--- न ते क्षमाशील

जाणतसू आम्ही कोळसा दिसतसे कसा नि कसे चमकतसे सोने,
कर रटाळ वटवट, अर्थशून्य बडबड --- झुरशील तू रद्दीचे जिणे
लिही उच्च तू --- घेऊन माथ्यावर नाचू, गौरवू स्नेहिजनांत
नसशील तू केवळ पानांत, तर वसशील मना-मनांत!

रविवार, डिसेंबर ३१, २००६

नूतन वर्षाभिनंदन

नृप तो नभाचा । तेजस्वी भास्कर ।
सृष्टीचा तारक । दिनकर होय ॥

होई ना कधीही । अस्त जयाचा ।
देतसे उदयात । कोटी कोटी किरण ॥

जगी जन्मे त्यास । अंतही अटळ ।
सरले सालही । अखेरीस आज ॥

पोटात कालचा । घेऊनिया कोलाहल ।
सुखाची झालर । कुठे अश्रूंची माळ ॥

हास्याचे तरंग । वा क्रोधाची तळतळ ।
मत्सर असो की । नाजूक आठवण ॥

घेऊनिया ठेवा ते । वर्ष आज सरले ।
साल दोन हजार । आणिक सहा वर्षे ॥

ठेवा आता कालची । आठवण जपून ।
मात्र व्हा सुजन । स्वागता सज्ज ॥

आगळे नि निराळे । विविध अनुभव ।
नविन क्षितिजे । व आणखी विजय ॥

घेऊनि नाचत । येत वरीस नूतन ।
करू या स्वागत । अजित उवाच ॥

मंगळवार, डिसेंबर १९, २००६

एक कुंचला मज देशील आणून?


एक कुंचला मज देशील आणून?

आकाशाचे बनवीन निळे मी पान.
पावसाचा अन् थोडा 'वॉश' मी देईन.

कुठल्या भुरक्या मेघावरती
मग किरणांचे सोने पसरीन.

त्या चित्रावरती रेषा नाजूक
तिरप्या तिरप्या बलाक-माला.

दूर काढीन क्षितिज ते भव्य
दमल्या वाटा - तिथेच मिलन.

अशाच एका रम्य वाटेवर
त्याहुनि सुंदर फुले ती फुलविन.

त्या फुलांवर नाजूक पऱ्यांचे
अद्भुत असे ते पंख मी रंगविन.

कुठे मोर अन् कुठे बत्तक
भासे बेढब परी बेडूकही मोहक.

संपतील छटा नि संपतील रंग
दंव गुलाबावरी उरतील ओघळ.

अशाच चित्रात होऊनिया दंग
कळत-नकळत जाईन रंगून

मग एका फुलवाटेवर स्वतःस रेखून
चित्रात माझ्या जाईन मी हरवून!

एक कुंचला मज देशील आणून?

रविवार, ऑक्टोबर १५, २००६

बालकवि

माझे सर्वांत आवडते कवि कोण, हा एक गहन प्रश्न आहे. शाळेत असताना, ज्या कविता समजायला सोप्या (आणि अर्थातच, ज्यातले संदर्भासहित स्पष्टीकरण करायला सोपे!) त्या कवितांचे कवि माझे आवडते असायचे. मग दर वर्षी ते बदलायचे, कुसुमाग्रज दर एक वर्षाआड आवडते बनायचे, अनंत फंदिंचे 'फटके' सुद्धा जाम आवडून जायचे. संत कवि, त्या न्यायाने मला कधीच फारसे जवळचे वाटले नाहीत. एक तर त्यांची भाषा ब~यापैकी जुनी - आणि त्यातून उदाहरणे दिलेली जरा जडच जायची. पाठ्यपुस्तकातल्या सा~या कविंपैकी मला सतत जवळचे वाटत आलेले श्रेष्ठ कवि म्हणजे, आपले बालकवि. एकतर त्यांच्या नावातच 'बाल' असल्यामुळे लहानपणापासूनच एक प्रकारची विशेष मैत्री वाटायची. बालकविंची कविता समजायला सोपी, पाठ करायला सोपी! पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे क्षणांत डोळ्यासमोर निसर्ग उभा राहत असल्यामुळे ती केवळ "सविस्तर उत्तरे लिहा (आणि विसरा)" type ची कविता मुळीच वाटायची नाही. पाहिजे तेवढे सविस्तर उत्तर अगदी हसत खेळत लिहू शकू अशी त्याची कविता!

तो बालपणिचा काळ मुख्यतः पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा असल्यामुळे कवि आवडता होण्यामागची कारणेही थोडीशी 'पाठ्य' स्वरूपातलीच होती. आता पुन्हा त्या सगळ्या कविता वाचतो तेव्हा (आता उत्तरे लिहायची नसतात) तीच कविता आणखी वेगळी वाटायला लागते, प्रत्येक नवं वाचन त्या कवितेचं आणखी नवं रूप दाखवून जातं. त्याची मजा काही औरच. वेळ बदलते, संदर्भ बदलतात आणि तेच शब्द नवं काहितरी देऊन जातात. गद्य वाचनानंतरही असा अनुभव येतोच; पण पद्य वाचानानंतरचा नवा अनुभव अधिक परीणामकारक वाटतो.

बालकविंच्या कवितेबद्द्ल किती लिहावं!
"थबथबली ... ओथंबून खाली आली.
जलदाली ... दिसली सायंकाली."

केवळ सात शब्दांत आषाढ उभा करण्याचं सामर्थ्य आहे या शब्दांत.

"मधु मोती ... भूवर भरभर ओती" असं म्हणत, कवितेतला पाऊसच नव्हे तर प्रत्यक्ष कविताच अक्षरशः बरसते.

असं पावसाचं वर्णन असो वा नितांतसुंदर, लाज~या फुलराणीचं,
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना?
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी!
निसर्गसौंदऱ्याचं त्या निसर्गापेक्षाही सुंदर असं वर्णन वाचत रहावं; आणि पुनःपुनः वाचत रहावं.
पायवाट पांढरी तयांतुनि आडवीतिडवी पडे;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे
असे शब्द उच्चारले, की पाय टाकुनि जळात बसलेल्या औदुंबराकडे जायची हिरवी वाट हुबेहूब दिसायला लागते.
गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी!
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी?
काय हरवले? नव्हे, गवसले ते निव्वळ सोने!

संध्याकाळ सरत आलेली, रात्रीच्या प्रवेशाचा समय झालेला, अशा वेळी,

आली होती भरती आता अस्तसमुद्राला
त्या लाटांतुन काय सांडल्या या मौक्तिकमाला!
कल्पतरुची फुले उडाली की वाऱ्यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुदबुद हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे?
विश्वशिरावर टोप चढविला हिऱ्यामाणकांचा!
मंगल, मंगल जिकडे तिकडे जय मांगल्याचा.
अशी संध्याकाळ फक्त बालकविंनाच दिसो जाणे. अशी कितीतरी हिरेमाणके बालकविंनी घडवून ठेवली आहेत. किती वेचावीत; आणि किती वेळा! माझी झोळी रिकामीच राहणार की काय असे वाटत राहते.

श्रावणमासी बद्दल मी आधीही लिहिलं होतं. वदनी अपुल्या वाचुन घ्यावे असे ते बालकविंचे श्रावण महिन्याचे अविस्मरणीय गीत.

'मधुयामिनी' ही कविता पुढे लिहून आजचं लिखाण पुरं करतो.
मधुयामिनी नील लता
हो गगनी कुसुमयुता
धवलीत करि पवनपथा
कौमुदि मधु मंगला

दिव्य शांती चंद्रकरी
आंदोलित नील सरी
गिरिगिरिवरी तरुतरुवरि
पसरी नव भू तिला -

सुप्रसन्न, पुण्य, शांत
रामण्यकभरित धौत
या मंगल मोहनात
विश्वगोल रंगला

'खेड्यातली रात्र' ही खुणावतेय, पण ती पुन्हा कधितरी...

मंगळवार, ऑगस्ट १५, २००६

श्रावणमासी

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे
बंगलोरला यावर्षी आषाढ लागलाच नाही. थेट श्रावणच. आधीच बंगलोरची हवा आक्रमक आषाढाला साजेशी नाही. सोनेरी सकाळी ढगांचा मागमूस नसावा, झालाच तर संध्याकाळी थोडासा पाऊस, तेवढाच. मात्र तेवढा पाऊस इथली सारी तळी पूर्ण भरून टाकायला पुरेसा आहे - म्हणजे - तळी उथळ आहेत असं नाही - पाऊस पुरेसा आहे. आणि नुसताच पुरेसा नाही, तर सुखदही.

रोजच्या ऑफिसच्या जगात श्रावण काय आणि वैषाख काय, सगळ्या ॠतूंमधली A/C हवा आम्हाला सारखीच. त्याचबरोबर बंगलोरला हिरवळीचं तसं काही वावगंही नाहिये. 'आता नॉन व्हेज नाही महिनाभर' असं कुणीतरी म्हणाल्यावर श्रावण-आगमनाची आम्हाला वार्ता लागली. मग लक्षात आलं की, अरे! हवासुद्धा बदलली आहे बरं का! दोन-तीनदा इंद्रधनुष्य दिसल्यावर तर खात्रीच पटली.
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणि भासे
असे मंगल तोरण नभोमंडपात खुद्द निसर्गानेच बांधल्यावर मग सणासुदीला काय उत्साह! बाजारही फुलांनी ओसंडून वाहत होते (आजकाल आम्हाला रस्ते आणि बाजार, चुकलो, मॉल फक्त माणसांनीच ओसंडून वाहू शकतात असे वाटायला लागले होते). पूजेसाठी फळे, इतर गोष्टीही आल्याच त्याबरोबर. संध्याकाळ होऊ लागली की सूर्य तेवढा मावळायला सज्ज होतो, उत्साह नाही!
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे
संध्याकाळच्या ऊन-पावसाच्या लपंडावात मग रस्त्यांवरचे दिवेही सहभागी होतात. नुकताच शिडकावा होऊन गेला असल्यामुळे चमकणारे असंख्य थेंब आपसूकच लक्ष वेधून घेतात. पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याची निवलेली किरणे गवताची पाती मग त्याच असंख्य थेंबांमधून पिऊ पाहतात. तोच तेजोनिधी लोहगोल आपली दिवसातली शेवटची जादू मग आकाशात सादर करतो.
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

आकाश केवळ विमानांसाठीच तयार केलेले असावे असे वाटणाऱ्या आकाशात खरंच बगळे दिसतात. विश्वास बसत नाही - नेहमीच दिसत असावेत हे बगळे - आपली नजरच विमानांचा शोधात फिरत असावी - असंही वाटून जातं. पाच-पाच सात-सातच्या रांगा करून, वाऱ्याचा रोध कमी होईल अशा ऐटीत ही बलाकमाला क्षितिजावर आस्ते आस्ते अदृश्य मग होऊन जाते.
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
बालकविंच्या या प्रख्यात कवितेतले पुढले संदर्भ मात्र आमच्या शहरी जीवनात फारच विसंगत वाटतात. त्यामुळे त्या पंक्तीबद्दल जास्त वक्तव्य न करता आहेत तशाच पुढे लिहितो आहे-

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
आमच्यासारख्या पक्क्या "शहरी" झालेल्या वाचकांच्या मनांत (सुद्धा!) ही कविता वाचून श्रावण बरसला असेल अशी आशा आहे!

बुधवार, जून ०७, २००६

कहीं दूर...

सोनेरी संध्याकाळी कुठेतरी डोंगरात सूर्य अस्तास जावा, आणि त्याने जातांना आकाशात उधळलेले रंग पाहून मन तुझ्या आठवणींनी अजूनच व्याकूळ व्हावं.

वाऱ्याची झुळूक हलकेच गुदगुल्या करून जावी आणि उगीचच खुद्कन हसू फुलावं.

अचानकच एखादी सुरेखशी कल्पना सुचावी आणि त्याच भरात शब्दही तितकेच सुंदर उमटावेत.

जवळच ठेवलेली पेटी पुढे ओढावी आणि बोटं फिरवून सूरांचे लोट काढावेत.

तुझ्या आठवणींत असा असताना, मग आपसूकच माझ्या ओठांवर गाणं यावं:

काहीं दूर जब दिन ढल जाए
सॉंझ की दुल्हन बदन चुराए
चुपकेसे आए
मेरे खयालोंके आंगन में
कोई सपनोंके दीप जलाए, दीप जलाए

कहीं दूर...


गाणं संपताना नकळतच आलेले दोन अश्रू मग हळूच पुसून टाकावेत.

तुझी आठवण येत असताना हे सारे असेच व्हावे...

सोमवार, मे ०८, २००६

राग

राग -

लटका की कायसा ते ठाऊक नाही मला, पण तरीही राग!

किंवा कदाचित हेवा असावा तो, की मत्सर? नाही--- रागच.

कुणाचा? कशासाठी?

होय - नक्कीच राग.

त्या टेलिफोनचा.

का बरं?

अगं, आपलं बोलणं चोरुन नव्हे, अगदी राजरोसपणे ऐकतो तो- टेलिफोन.

म्हणूनच, बाकी काही नाही!

पण अगदीच काही दुष्ट नाहिये काही तो.

कसा?

या कानाचं त्या कानाला काही ऐकू जाऊ देत नाही तो-

:-)

रविवार, एप्रिल ०९, २००६

ये

मी म्हणालो, "ये - ये ना!"

अवचित, अचानक, अवेळी पाऊस यावा, तशी ये.
चांदण्यांनी लगडलेल्या आकाशात, सर्रकन तारा तुटतो, कधीही, तशी ये.
तापलेल्या उन्हांत, उकळत्या झळा लागतात तेव्हा, ये, मोगऱ्याचा दरवळ घेऊन.

मी म्हणालो, "ये - ये ना!"
तू माझ्या मनी नसतांना नकळत ये.
तू माझ्या स्वप्नी नसतांना अलवार ये,
तू माझ्या भावविश्वात नसतांना ये- हळूच.

आणि जे घडलं ते साहजिकच, तू कधीच आली नाहीस!

शनिवार, फेब्रुवारी ०४, २००६

पारवा

भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो

सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.

तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित

चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून

झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.

दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.

-बालकवि

या पूर्ण कवितेत, एक जळजळीत उन्हाळा सतत जाणवत राहतो. एक जुनी पडकी - इमारत, वर ऊन तळपते आहे, पटांगणावरुन चमकणारा प्रकाश डोळ्यांना सहन होत नाहिये. आणि अशा वातावरणात, एक पारवा - पारवा हा काही रंगीबेरंगी पक्षी नव्हे - गोड गाणारा तर नाहीच - एकटाच बसून खिन्न नीरस केविल'गाणे' गातोय.

अशा उन्हाळ्यातल्या एखाद्या दुपारी, शुद्ध सारंग ऐकावा - सारे चित्र कसे झटक्यात डोळ्यांसमोर उभे राहिल.

पारवा हे माझ्या मते प्रतीक आहे, अशा भकास वातावरणाचे (अशा वातावरणात पिसारा फुलवून नाचणारा मोर शोभेल का?!) त्यातच कविचे मनही असेच खिन्न - दुःखी. कविच्या जगात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याबद्दलची पारव्याची बेफिकिरी कविला आणखीच दुःखी करून जाते आणि मग उमटतात ते हे सारे शब्द!

मंगळवार, जानेवारी १०, २००६

विंदांना ज्ञानपीठ

विंदांना यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहिर झाला आहे!

"स्वप्नात पाहिला राणीचा बाग
हत्तीच्या पाठिवर खेळतो नाग" , आणि

"एक झुरळ रेडिओत गेले
गवई होउन बाहेर आले"

सारख्या मुलांच्या कवितांपासून ते "माझ्या मना बन दगड", "देणाऱ्याने देत जावे-घेणाऱ्याने घेत जावे" अशा कितीतरी कविता झटकन समोर येतात.

"तेच ते" ही माझी आवडती कवित पुढे लिहितो आहे-

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते। तेच ते
माकडाछाप दंतमंजन
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते। तेच ते

खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणे शक्य नव्हतं
काकूपासून ताजमहाल
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला गरम मसाला
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी
तेच ते आंबट सार
सुख थोडे दुःख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नांचे शिल्पकार
कवी थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा
शिळा शोक बुळा बोध
नऊ धागे एक रंग
व्याभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तिचा तोच रोग
तेच मंदिर तीच मूर्ती
तीच फुले तीच स्फूर्ती
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमियोची आत्महत्त्या
दधीचीची आत्महत्त्या
आत्महत्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते.

शुक्रवार, जानेवारी ०६, २००६

कविता

शब्द विवश करतात तेव्हा,
विचार घुसमटून जातात तेव्हा,
अंधार अंधार वाटतो तेव्हा,
जन्मते कविता!

शब्द चित्रे रेखाटतात तेव्हा,
फुलपाखरे स्वच्छंद बागडतात तेव्हा,
निसर्ग साद देतो तेव्हा,
जन्मते कविता!

शब्द गर्जत घुमतात तेव्हा,
कष्टांत विसावा देतात तेव्हा,
एकच तारा दिसतो तेव्हा,
जन्मते कविता!

शब्द रुसून बसतात तेव्हा,
तरीही बिलगून जातात तेव्हा,
चारच ओळी उमटतात तेव्हा,
जन्मते कविता!

शब्द मिठी मारतात तेव्हा,
भावनांचा बांध फोडतात तेव्हा,
आठवणी विव्हल करतात तेव्हा,
जन्मते कविता!

शब्द मनांवर बिंबतात तेव्हा,
फिरुनि ओठांवर येतात तेव्हा,
गालातल्या गालात हसतात तेव्हा,
जगते कविता!

(६ सप्टेंबर २००३, बंगलोर)