खसखस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खसखस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जुलै २९, २०११

गेल्या काही महिन्यांत वृत्तपत्रांत सुरु असलेल्या भ्रष्टाचारविरोधी प्रचारामुळे खालावत चाललेल्या 'काला'* निर्देशांकाने आज नवीन निचांक गाठला. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याना राजीनामा द्यावा लागणार अशी शक्यता कालपासूनच व्यक्त केली जात होती, आज त्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर काही मिनिटांतच लोअर सर्किट लागून व्यवहार थांबवावे लागले. मागच्या आठवड्यात केंद्र सरकारचे तिमाही भ्रष्ट आकडे प्रकाशित झाल्यावर गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली होतीच.

दोन वर्षांपूर्वीच्या जागतिक मंदीचा सखोल अभ्यास केल्यानंतर भारतीय उद्योगपतींनी उभा केलेला हा लाखो कोटींचा उद्योग ख-या अर्थांनी भरभराटीला यायच्या आधीच डबघाईला येतो की काय अशी शंका सर्वसामान्यांना आता सतावत आहे. करोडो भारतीयांचे कष्टाचे पैसे या उद्योगात गुंतलेले असल्याने ही भीती अनाठायी नक्कीच नाही हे खरे. 

"अमेरिकेतील गरीब लोकांनी घेतलेली गृहकर्जे काही मूठभर लोकांनी आख्या जगाला विकली आणि पैसा केला. आपल्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा हे सामान्य गरीब जनतेनी मूठभर लोकाना दिलेले कर्जच नाही का? ते का विकू नये, असा विचार २००८ नंतर आमच्या मनात आला आणि मग आम्ही अश्या प्रकारच्या काही financial instruments ची योजना केली," ज्येष्ठ अनुभवी उद्योगपती बी. बाजा सांगत होते. "आम्ही सुरुवात केली तेव्हा तोफगोळे आणि चा-याच्या व्यवहारामधून जमलेले साधारण ३५-एक कोट रुपये आणि सात-आठ तल्लख डोकी इतकंच आमचे भांडवल होतं. आता आजचे आकडे तर तुम्हाला ठाउक आहेतच!"

बी. बाजा ही या हजारो कोटींच्या उद्योगातील एक वजनदार हस्ती. ताराखात्याने आपली सेवा आणखी जलद करण्यासाठी नवीन तारजोडणीचे कंत्राट देण्याचे ठरवले तेव्हा ते तारमंत्री होते. हिशेब चोख न ठेवल्याचा आरोप ठेऊन काही भ्रष्ट राजकीय नेत्यांनी त्याना अलीकडेच राजीनामा द्यायला भाग पाडले होते. पुढे आणखी काही बाही आरोप झाल्याने त्याना नुकतेच स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते.

"बघा ना, इंडस्ट्रीला आत्ता माझी किती गरज आहे, आणि मी पडलो असा नजरकैदेत!" रिमोट कंट्रोलने ए/सी जरा कमी करत श्री. बाजा म्हणाले. "यंदा उन्हाळा जरा जास्तच आहे. नाही?" बाजांच्या या इंडस्ट्रीचे पहिले काही महिने खडतर गेले. "लोकांच्या विश्वासावर धंदा अवलंबून आहे आमचा, तो संपादन करायला वेळ लागणारच होता..." तो मिळाल्यावर श्री. बाजांनी आणि अर्थातच त्यांच्या सहका-यांनी अपेक्षित असे उज्ज्वल यश संपादन केले. "ब्यांक सुद्धा जास्तीत जास्त ९ टक्के व्याज देते हो. गेल्या दोन वर्षांत आम्ही ६५ टक्के परतावा दिलेला आहे!" बाजांच्या डोळ्यांत अभिमान दिसत होता. त्यांचे आकडे अगदी खरे होते. मात्र त्यांची काम करण्याची पद्धत बैन्केच्या अगदी विरुद्ध; कुठे कसली नोंद नाही. "मुंबईचे डबेवाले नाही का बरोबर डबे पोहोचवतात? आमचा पैशांचा व्यवहारही असाच - अगदी चोख, नोंदी ठेवण्याचा ओव्हरहेड कशाला?" मागच्या महिन्यात सिग्नलवर 'मामा'च्या हातून धाडलेली पन्नास रुपयांची गुंतवणूक आठवली. तुमच्या आमच्यासारखे जनसामान्य अश्या पन्नास रुपये ते  पन्नास हजारांपर्यंतच्या रकमा पोहोचवत असतात. पण मग कुठे तरी याचा हिशेब नको का? "अहो हीच तर खरी खासियत आहे या उद्योगाची. चोख हिशोब ठेऊनही शेवटी कोणीतरी घोटाळे करणार, मग ते भ्रष्ट राजकारणी शेम शेम चा ओरडा करणार. मग चौकशी --- हवाच कशाला हिशोब? स्पेक्युलेशन वरच तर मार्केट चालतंय!" साहेबांच्या बोलण्यात तथ्य होतं, म्हणूनच ते एक उद्योगपती होते, आणि मी केवळ  एक मामुली वार्ताहर.

इतकं सगळं सुरळीत सुरु असतांना अचानक या उद्योगाला अशी घरघर लागावी? "अहो धंदा म्हंटला की चढणं आलं नि बुडणं आलं!" अंतू बरवा मधलं वाक्य टाकून साहेब अजूनच रंगात आले. "सध्या राजकीय परिस्थिती जरा नरम आहे. इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे आम्हालाही फटका बसतोय. आप्पा शेकडे काय किंवा ते नाना घामदेव - त्यांचा आक्षेप आहे आम्ही बेहिशोबी कारभार करतो त्यावर. मगाशी म्हणालो त्याप्रमाणे आमच्या किफायतशीर असण्याचे हेच तर गमक आहे. त्यांच्या मागण्या नाही मान्य करू शकत अश्या सहजासहजी!"

निव्वळ हेच नाही तर कुरेश मोडकळीनी अंतरराष्ट्रीय लपंडाव खेळांच्या खर्चातून वाचवलेले पैसे असोत किंवा आत्ता अलीकडेच कर्नाटकातील लोहचुंबक विक्रीतील नफेखोरी. एकेका बातम्यांनी काला निर्देशांक दोन दोन टक्के घसरला आहे.  असे धक्के सोसुनदेखील मार्केट fundamentals शाबूत आहेत असे अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. या काही ठळक घडामोडी सोडल्या तरी आणखी काही उत्तम उत्पादने अजून चांगली कार्यरत असावीत. झाकली मूठ सव्वा अब्जाची हि आधुनिक म्हण खरी ठरवत गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतल्यास हा उद्योग खडतर परिस्थितीतून मार्ग काढत नेहमीच यशस्वी ठरला आहे असे दिसून येईल. 

उद्या महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या तिमाही निकालांकडे गुंतवणुकदार आणि दलाल डोळे लावून बसले आहेत. आदर्श झोपड्या आणि खालीबसा रिसोर्ट प्रकल्पांमधून आणखी गुड न्यूज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

येन-केन प्रकारेण उद्या मार्केटला अप्पर सर्किट बसावे आणि मार्केटचा लुजिंग स्ट्रीक तुटावा अशीच छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांची मनोकामना असेल.

---
*: काळा पैसा व लाचलुचपत निर्देशांक 

बुधवार, ऑगस्ट २५, २०१०

सुतारपक्ष

आपलं बॉलीवूड ही खरीखुरी स्वप्ननगरी आहे यात शंका नाही. उदाहरणार्थ पुढील पटकथा घ्या:

एक तरूण. सर्वगुणसंपन्न/लाडावलेला. गरीब/श्रीमंत पालक. कमवायची अक्कल असलेला/नसलेला. हुशार/ढ.
एक तरूणी. लाडावलेली/सर्वगुणसंपन्न. श्रीमंत/गरीब पालक. कमवायची अक्कल नसलेली/असलेली. ढ/हुशार.

असे दोन जीव - ज्यांचा एकमेकांशी काडीमात्रही संबंध नाही - जवळ येतात. आपल्यात असलेली उणीव त्याच्यात/तिच्यात नाही हे पाहतात, प्रेमात पडतात. एखाद-दुस-या खलपात्रावर मात करतात. पत्रिका छापणे, केळवणं जेवणे, चांगले कार्यालय शोधून ते बूक करणे, उन्हाळ्यातला पाणी प्रश्न सोडवणे, तमाम फ्यामिलीबरोबर लग्नाची कपडेखरेदी करणे या सगळ्या फालतू अडचणींना बगल देत, पंडितजींचे (म्हणजे मराठीत गुरूजी किंवा भटजी) आशीर्वाद घेऊन त्यांच शुभमंगल पारही पडतं. पुढच्याच सीनमध्ये अगदी छान सजवलेल्या घरात प्रवेश होतो. कालांतराने "इन-लॉज’ चं घर मला छोटं पडतं अशा बायकोच्या तक्रारीला वैतागून आपला हिरो लगेच नवीन घर घेतो. एक दोन दिवसांतच दोघे या नवीन घरात सुखी संसार करायला लागतात.
असे सिनेमे/मराठी सीरीयल्स पाहिल्या की माझ्या तोंडी एकच हिंदी शब्द येतो: "काश"

एक वेळ मला ही सगळी प्रेमकहाणी पटेल - पण एक दोन दिवसांत नवीन घरात सुखी संसार?! ही शुद्ध फसवणूक आहे - शुद्ध चारसो बीसी.

लग्न पहावं करून आणि त्यानंतर घर पहावं बांधून या दोन्ही म्हणींमधला ’वं’ काढून टाकावा आणि ’च’ लावावा अशी माझी भाषापंडितांना नम्र विनंती आहे. कारण तसं केलं तरच त्यातला प्रथम पुरूषी ’प्रयोग’ नष्ट होईल आणि केवळ एक चेतावनी हा खरा अर्थ पुढे येईल.

लहानपणीच्या गोष्टींमधला लाकूडतोडा अगदी प्रामाणिक वगैरे असेल, पण ख-या जगातले फर्निचरवाले महाडॅंबिस. आमच्या नवीन घरातील साहसकथा अरबी सुरसकथांना लाजवतील अशा. अरेबियन नाईट्सप्रमाणे सविस्तर सांगायच्या तर आख्ख्या वर्षाच्या रात्री कमी पडतील. चवीपुरती एखाद दुस-या सांगतो:

स्वयंपाकघरातील सुखसुविधा:
स्वयंपाकघरासारखी दुसरी ज्वलंत जागा घरात दुसरी नाही! तो प्रश्न सोडवणं माझ्या दृष्टीनं काश्मीर प्रश्न सोडवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. तातडीनी आम्ही मॉड्युलर किचन वाल्याकडे गेलो:
दुकानदारीण (माझ्या पैशाचं पाकिट ठेवलेल्या खिश्याकडे बघत): "या या."
आम्ही: "आम्हाला आमच्या किचनचं सगळं काम करायचंय"
दु. "करू की. किती मोठं आहे? काही प्ल्यान वगैरे आणला आहे का?"
मी: "आहे, ब-यापैकी मोठं आहे. प्ल्यान असा आहे की महिन्याभरात सगळं करून हवंय"
ही: "अरे तसा प्ल्यान नाही. हं. हा बघा प्लोरप्ल्यान. एल-शेप्ड आहे."
...
...
[तांत्रिक बाबींना कात्री]
दु. "ठिक आहे. तुम्हाला उद्या आम्ही डिझाईन दाखवतो. मग कॉस्टींग वगैरे करू, मग काम सुरुच, कसं?"
मी (खूष होत) "नक्की आम्ही येतो उद्या मग परत."
दु. "हो हो. पण असं कसं जाता. कोल्ड-ड्रिंक मागवलंय ते कोण पिणार हाहाहा :-)"
आम्ही: "कोल्ड ड्रिंक का? वा वा वा! बरं - हा ऍडव्हान्सचा चेक!"

दुसरा दिवस:
आम्ही फोनवर "हॅलो. आज तयार आहे ना डिझाईन? येतो आम्ही मग."
दु. "ऍक्च्युअली आमचा डिझायनर आजारी पडला आहे."
आम्ही: "ठीक आहे. फोन करा मग केव्हा येऊ ते सांगा. काय?"
दु. "नक्की नक्की!"

दहावा दिवस:
आम्ही फोनवर "हॅलो. काय तुमचा फोन नाही आला?"
दु. "अहो आत्ता तुमचाच नंबर शोधत होते. शंभर वर्षं आयुष्य आहे. आमचा डिझायनर अजून आठ दिवस काही तापातून उठत नाही."
आम्ही "आठ दिवस? अहो दहा दिवस असेच उलटून गेलेत..." (या गाढवला स्वाईन फ्लू झाला की काय, अरे देवा!)
दु. "काळजी नको, आम्ही बघतो काहितरी जमवतो."
आम्ही (मनात): या रेटनी काम होणार असेल तर शंभर वर्षं हवीतच मला!

विसावा दिवस:
आम्ही: "चांगलं झालंय डिझाईन हं. केव्हा काम होईल सगळं"
दु. "पॉलिसीप्रमाणे पुढच्या ३०-४५ दिवसांत. सर, पुढचा चेक?"
आम्ही: "थोडं लवकर जमवा! हा चेक. कोल्ड ड्रिंक नाही का या वेळी?"


दोन महिन्यांनंतर:
आम्ही: "अहो तो सुतार त्याची हत्यारं घेऊन जायला अगदी आमच्या वेळेला मान देऊन येतो सकाळी लवकर. कामाच्या वेळेला मात्र आमच्या ऑफिसची मिटींग बुडवून यायला लागतं त्याचा स्वागतासाठी. काय हे?"
दु. "हो का? मी बोलते हं त्या सुताराशी!"
आम्ही: "बरं मग आता कपाटाची दारं कधी लावताय? दोन महिन्यांहून जास्त झालेत दिवस!"
दु. "ती दारांची ऑर्डर आम्ही मागच्याच सोमवारी दिलीये. पंधरा दिवसांत सगळं काम होईल.
आम्ही: "ठीक आहे. तुमची दारं ठोठवायची एवढंच काम आहे आम्हाला सुद्धा. चला."
दु. "सर, पुढचं पेमेंट? कंपनी पॉलिसीप्रमाणे १५% आत्ता द्यावे लागतील."
आम्ही: "असं का? तुमच्या माणसाला पाठवा चेक घेऊन जायला."

अजून एका दीर्घ महिन्यानंतर:
आम्ही: "हद्द झाली. आत्तापर्यंत तरी कामं पूर्ण व्हायलाच हवी होती."
दु. "मला तुमच्या ऑर्डरबद्दल कल्पना नाही. तुम्हाला हॅंडल करणारी सुट्टीवर आहे."
आम्ही: "बरं तीचा मोबाईल नंबर द्या"
दु. "कंपनी पॉलिसीप्रमाणे तो आम्ही देऊ शकत नाही"
आम्ही "ठीक आहे"

अजून पंधरा दिवसांनंतर शनिवारी संध्याकाळी ६:३० वा.:
फोन: "हॅलो सर. मी किचनचं मटेरीयल घेऊन आलोय. हो. तुमच्या दारातच उभा आहे. कुठे आहात तुम्ही? काय घरी नाही? किती वेळ लागेल? काय वीस मिनिटं? अहो खोळंबा होतोय. लवकर या हं, मी थांबलोय!"

अशा अनंत चित्रविचित्र संभाषणांनंतर किचनच खदखदता प्रश्न आत्ता कुठे सुटला आहे.
---

दुर्दैव असं की या सगळ्याची कल्पना आधीच न आल्यामुळे आम्ही बेडरूममधल्या कपाटाची ऑर्डरही त्यांनाच देऊन बसलो. असंख्य रंगछटांमधून आमच्या आवडीचा रंग आम्हाला निवडता येतोय म्हंटल्यावर आम्हालाही भरून आलं होतं. खरे रंग तर पुढेच दिसणार होते म्हणा. आधीच्या अंदाजाप्रमाणे, अहो अगदी १२ दिवसांत करून देतो आम्ही कपाट. कपाटाचं टेन्शन नाही, किचनलाच वेळ लागतो असं आम्ही ऐकलं होतं. वीस दिवसांनंतर म्हणे, की तुम्ही निवडलेला रंग जर्मनीहून मागवावा लागणार आहे. त्याला यायला २० दिवस लागतील. दिड महिन्यानंतर म्हणाले की हो, मटेरीयल आलं होतं पण ते डॅयामेज्ड होतं. आता पुन्हा तोच रंग मिळवायचा म्हणजे आमचा सप्लायर म्हणतो कि कधी मिळेल ते सांगता येत नाही. तुम्ही या इकडे आणि दुसरा रंग निवडा बरं.

आलिया भोगासी म्हणत आम्ही जातो. एक रंग (आम्हा दोघांचं एकमत व्हायला वेळ लागतोच) शेवटी आम्ही निवडतो. बहुतेक हा आहे ऍव्हेलेबल, पण मी सांगते कन्फर्म करून. त्यानंतर, सॉरी सर- तो रंग आहे, पण तुम्हाला जश्या लाईन्स करून हव्यात ना, तश्या नाही करता येणार असं म्हणतो आहे सप्लायर. ठीक आहे. मग कुठला रंग आहे आता? हा पहा हा फिका पिवळसर रंग आहे ना, तो एक आहे. तो वापरू?

काय बोलावं आता!
---

हे झालं फक्त सुतारकामाचं. प्लंबर, इलेक्ट्रीशियन, पेंटर असे अनेक खलनायक आमच्या फिल्म मध्ये फिचर करून गेलेत. "तेरे घर के सामने एक घर बसाऊंगा" असं गाण्या-या देव आनंदला माझं खुलं आव्हान आहे: घर बांधशील पठ्ठ्या, पण त्यात पटकन सेट्ल होऊन दाखव!

असो. फर्निचरवाल्याचा इतका उद्धार केल्यानंतर आता मात्र मला भीती वाटायला लागली आहे. पुढचा जन्म सुतारपक्ष्याचा मिळतो की काय!

गुरुवार, जुलै २९, २०१०

नट्स!

१ ऑगस्ट जवळ येतोय. शाळेत असताना, विशेषतः प्राथमिक शाळेत, एक ऑगस्टला हमखास टिळकांच्या आयुष्यातील गोष्ट सांगायची स्पर्धा असायची. त्यापैकी सगळ्यांत फेमस म्हणजे शेंगदाण्यांच्या टरफलांची गोष्ट.

दुस-या कोणीतरी (द्वाड) मुलाने दाणे खाऊन वर्गात सालांचा कचरा केला होता, आणि टिळकांच्या मास्तरांनी (काहीही कारण नसतांना) टिळकांना ती टरफले उचलून टाकायला सांगितले. "मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" असं बाणेदार उत्तर टिळकांनी दिलं होतं. यातूनच पुढे ’लोकमान्य’ बाळ गंगाधर टिळक मोठे झाले. अशी ती गोष्ट होती.

कधीही 'बाणेदार' आणि 'टरफल' यापैकी कुठलाही शब्द ऐकला की मला हीच गोष्ट आठवते. आजच्या ट्वीटर फेसबूक आणि ब्रेकिंग न्यूजच्या जगात ह्या घटनेचे पडसाद कसे उमटले असते?

@बाळटिळक: आज मला @मारकुटेमास्तरांनी टरफले उचलायला सांगितली. मी का उचलावीत? मी शेंगा खाल्याच नाहित. ज्यानी शेंगा खाल्या त्याला RT करा रे कुणीतरी!

@मारकुटेमास्तर: अरे @बाळटिळक शिक्षकांची आज्ञा पाळावी असे संस्कार झाले नाहीत वाटते तुझ्यावर? मोठा झाल्यावर याच लोकमान्याने माझी आज्ञा कशी धुडकाऊन लावली हे माझ्या पुस्तकात लिहिन!

@मुख्याध्यापक_चिखलीशाळा: @बाळटिळक वर्गशिक्षकांचे न ऐकल्याबद्दल शिक्षा म्हणून उद्या "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे" या विषयावर निबंध लिहून आण.

@आगरकर: इंग्रजी शिक्षणामुळे आपली विचारक्षमता वृद्धिंगत होईल. अशा जहाल पवित्रा आपल्या समाजाला पुढे नेऊ शकणार नाही. हळूहळू शाळांमध्ये शेंगांना बंदी घालण्यात यावी.

@मोकगांधी: टरफलास टरफल असे उत्तर सगळ्या जगाने द्यायला सुरुवात केली तर या विश्वात अनंत कचरा होईल. @बाळटिळक कुठल्या वर्गात पडली आहेत टरफलं? मी येतो.

@नेहरू_जवाहर_लाल: आपलं स्वतंत्र मत राखणं महत्त्वाचं आहे. रशिया आणि अमेरीका कोणासही ही टरफले उचलण्याचं कंत्राट देण्यात येऊ नये. आपण येत्या काही महिन्यांत त्या टरफलांचा बंदोबस्त करूच करू.

@शचंपवार: हरीतक्रांतीनंतर भारताचे कृषिउत्पादन पाच-पट झाले आहे. टरफलांची समस्या अशीच वाढत राहणार. परंतु त्याचे राजकिय भांडवल करणा-यांचा मी माझ्या पुढच्या सभेत जाहिर निषेध करणार आहे.

@बहुओबामा: हे वर्ष क्रांतीचं आहे. आत्तापर्यंत वर्गातल्या आडदांड मुलांचं राज्य होतं. आता तुमच्या-आमच्यासारख्या सामान्यांचं राज्य येणार (अशी आशा आहे). @बाळटिळक - सलाम!

@माझा_मॅनेजर: Such arrogant behavior has certainly cost Mr Tilak a promotion this year. He is NOT a team player, is all I can conclude!

@रा_ठाकरे: उत्तर भारतीय शेंगांमध्ये दाणे कमी आणि टरफले जास्त असतात. बहिष्कार असो!

@तुमची_राखी: love you @बाळटिळक मीसुद्धा असंच उत्तर दिलं असतं!

@माझे_बाबा: बघ, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे!

@मी: huh? RT @माझा_मॅनेजर Such arrogant behavior has certainly cost Mr Tilak a promotion this year. He is NOT a team player, is all I can conclude!

@माझा_कार्टा: टरफल म्हणजे काय हो फादर?

@माझ्या_कार्टयाचा_कार्टा: प्लास्टिक रॅपर्स नव्हते का त्या ओल्ड डेज मध्ये? ऍंड व्हॉट अबाऊट वॅक्युम? नट्स :)



गुरुवार, फेब्रुवारी २५, २०१०

अप्रेजल

आहे का कपाळी। वेतनवृद्धी ॥
गातात भूपाळी । कुबेराची ।

चटपट काम । उगीच घाम ।
कमीच दाम । कशासाठी ॥

आपुला डंका । सोन्याची लंका ।
मूर्ख घेती शंका । आपलीच ॥

नालायक पीपाणी। गातोया गाणी ।
साहेबा लोणी । नकोच ते॥

नेटाने अभ्यास । करूनि प्रयास ।
सारा विपर्यास । शेवटी का ॥

टाळंटाळ मंगळ । सगुण आळस ।
त्याचीच चंगळ । तोची हिरा ॥

करूनही कर्म । पाळला धर्म ।
पण फलप्राप्ती । परक्यादारी ॥

सोसा थोडी कळ । येईल वेळ ।
मिळेल फळ । कधी काळी ॥

आताची चरफड । विझवा चूड ।
उद्या वरचढ । सज्जनाची ॥

असेल सुबुद्धी । सत्याचे कवच ।
तुमचीच समृद्धी । अजित उवाच ॥

मंगळवार, फेब्रुवारी ०२, २०१०

॥ पुनरागमनायच ॥

कधी काळी गरम होता चहा
धगधगती ज्वाळा तप्त-संतप्त लोहा
अंगात होती रग - पारा शंभरावर सहा!

[परंतु कालपरत्वे]
कशी अचानक पडली थंडी - पहा
गोठली अक्षरे कल्पनांचा दुष्काळ महा
ठिणगी क्वचित आता सगळाच हशा - हाहा!

[उपसंहार]
कर्कश्श वाटते शांतता - असह्य प्रतिभा विरह हा
घे लेखणी हाती - फुटू देत धरण पुन्हा
परततोय मी आता - रसिकांनो, सावध रहा!

बुधवार, सप्टेंबर १६, २००९

पाझर तलाव

तिने चिडून एकदा मला
संबोधले--- "अरे दगडा,
कधी तरी पाझर फुटू देत की प्रेमाचा!"

आता दगडाला खरंच पाझर फुटायचा
म्हणजे केवळ अशक्य---
पण तुला असं पटवून द्यायचं असेल,

तर अगदी मनापासून म्हणतो,
"जरी मी दगड वाटलो तुजला,
प्रिये भासतेस भारी दगडफूल तू मला"


गुरुवार, जुलै ०२, २००९

एका सेतूची नामकहाणी

अडवाणीजींनी भेट दिलेल्या आपल्या (१९९२ सालच्या, किरकिरत्या टोयोटा) अग्निरथातून स्वा. सावरकर चालले होते. सकाळी अडवाणींसोबत "रामसेतूचे सांस्कृतिक महत्त्व आणि चिंतन" ही चर्चा चांगलीच रंगली होती, तेच विचार अजून त्यांच्या मनात घोळत होते. तेवढ्यात वरळी नाक्याच्या ट्रॅफिकच्या कोलाहलामुळे ते एकदम बिचकले -
"काय हो चालक - स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षं झाली ना? अजूनही चळवळी चालूच? एवढी कसली गर्दी जमली आहे?"
"क्या साब... पहली बार बंबई आये लगता है. इसको ट्रॅफिक बोल्ते है. रोज का मामलाये"
तेवढ्यात अचानक शिवसैनिकांचा एक मोर्चा आला - "हिंदुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे सुपुत्र, स्वतंत्रता संग्रामाचे सेनानी स्वा. सावरकर ह्यांचेच नाव समुद्रसेतूला द्यायला हवे". आधीचा तासभर विविध सोम्या-गोम्यांच्या (आणि त्यांच्या काकांच्या) वाढदिवसाचे, पक्षांतर्गत नेमणुकांचे आणि दहावी उत्तीर्णांच्या अभिनंदनाचे फलक पाहून हबकलेल्या सावरकरांना एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रातदेखील आपल्या नावाचा उच्चार झाल्याचे ऐकून मोद झाला. हे हिंदुह्रुदयसम्राट आणि त्यांचे सुपुत्र ह्यांची ताबड्तोब भेट घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ते चालकाला म्हणाले,
"अहो हे हिंदुह्रुदयसम्राट कुठे राहतात?"
"वो तो बांद्रा मैं रहते साब..... उधर जाना क्या?"
"हो. ताबडतोब भेटलेच पाहिजे त्यांना!"
"ट्रॅफिक बहुत रहता है साब - सावरकर रोड पे, शिवाजी पार्क के पास."
आपल्या नावाचा रस्तादेखील आहे हे ऐकून खूष झालेले स्वातंत्र्यवीर तिथेही खोळंबा असल्याचे ऐकून थोडे वैतागले.
"आप बोले तो नये ब्रिज से ले लूं? पचास रुपया ज्यादा लगेगा"
ब्रिज म्हणजे बहुदा तोच घोषणांतला समुद्रसेतू असावा असे त्यांनी ताडले.
"एकदम नया है, दस साल से बन रहा है"
पन्नास रुपये ही अंमळ जास्तच रक्कम असली तरी वेळ वाचेल म्हणून त्यांनी गाडी तिकडे वळवायला सांगितले.

समुद्रसेतूवर पोचतापोचताच अजून अर्धा तास निघून गेला. सेतूच्या मध्यावरून मुंबईचे विहंगम दृष्यसुद्धा पाहून झाले. अजून उशीर व्हायला लागला तसे स्वातंत्र्यवीर रथातून उतरले. सर्वदूर गाड्याच गाड्या पाहून त्यांना एकदम कोंडल्यासारखे वाटले. तास-दोनतास तरी काही सुटका नाही अशी चिन्हं दिसायला लागली तेव्हा स्वातंत्र्यवीरांची चलबिचल सुरू झाली. अंदमानचा अनुभव आणि जरा वय झाले तरी बांद्र्यापर्यंतचे २-३ किमी आपण सहज पार करू हा त्यांना आत्मविश्चास होता. ’सागरा, प्राण तळमळला’ असं म्हणत त्यांनी अरबी समुद्राच्या काळ्या पाण्यात स्वतःला (स्वातंत्र्यसमरात झोकून द्यावं तसं) झोकून दिलं आणि ते बांद्र्याच्या दिशेने पोहू लागले. ट्रॅफिकच्या अशा आधुनिक ’कारा’गृहाला आपले नाव नकोच नको असे सेनाप्रमुखांना सांगायचे अशी त्यांनी मनोमन खूणगाठ बांधली.

****
आपल्या नजरेसमोर एका वयोवृद्ध माणसाने समुद्रात उडी मारलेली पाहून राजीव गांधी एकदम चकित झाले. बांद्र्याच्या टोल नाक्याहून अंमळ फर्लांगभर पुढे येऊन ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या मोटारीतून तत्काळ पायउतार होऊन ते चटकन त्या दिशेने बघू लागतात तोच त्यांच्या अनंत सुरक्षारक्षकांनी, गनिमांनी प्रतापगडाला घालावा तसा त्यांना वेढाच घातला. लगोलग मागल्या-पुढल्या गाड्यांतून विविध मंत्री, खासदार, आमदार उतरले. इतक्या भारदस्त असामींच्या एकत्र पावलांमुळे राजीवजींना आपल्या नावाचा सेतूही क्षणभर हलल्यासारखा वाटला. पंचायती राजच्या अवलंबनानंतर काही वर्षांतच राजकीय शक्ती समाजाच्या (नैतिक) तळागाळापर्यंत पोचली आहे हे पाहून मनोमन तेही हलले.

(गाळात गेलेल्या) महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, त्यातल्या त्यात कमी खाणारे असल्याने, धावत धावत सगळ्यांत आधी राजीवजींजवळ पोहोचले.
"क्या हुआ राजीवजी?"
"हमने देखा की एक आदमी अभी-अभी समंदर में कूद गया! क्या आप के राज्य मैं अभीभी खुदकुशी का सिलसिला जारी है?"
एकदम गुगली आल्याने बावरलेल्या चव्हाणांना (क्रिकेटचे सर्वेसर्वा असलेल्या) कृषीमंत्री पवारांनी सावरले---
"नहीं नहीं! बारिश थोडी देर से आयेगी लगता है, लेकिन उससे पहलेही हमारी सरकारने पॅकेज जाहीर किया है, तो खुदकुशीका मामला नहीं हो सकता. कोई तैराती वाला खिलाडी होगा" शरदचंद्रांनी आपले हिंदी पाजळले.
पवारांना आय-पी-एल च्या खेळाडूंना मिळालेल्या (आणि विविध देणगीदारांकडून निवडणुकांनिमित्त घेतलेल्या) फायनॅन्शिअल पॅकेजच्या शिवायही काही माहीत आहे हे पाहून राजीवजी जरा खूष झाले. त्यांनी फर्मान काढले:
"चव्हाणजी, आप यहॉंपर सुरक्षा का ऐसा प्रबंध करें ताकी आयिंदा यहॉंसे कोई कूद ना पाये."
मूकपणे मान डोलवणाऱ्या चव्हाणांना बाजूला सारून राजीवजी पुढे चालू लागले. विपुल प्रमाणात खर्च करून उभारलेला, आपले नाव उंचावणारा, भारताचे तंत्रकौशल्य सिद्ध करणारा दिमाखदार पूल निरखत, विविध (राष्ट्रवादी, परराष्ट्रवादी आणि इतर) कार्यकर्त्यांमधून वाट काढत राजीवजी जरा पुढे येतात तोच "मुंबईच्या समुद्रसेतूला भूमीपुत्राचेच नाव हवे" असा मोर्चा त्यांच्याकडे येताना दिसला.

आपला जन्म मुंबईचा असल्याने हे नवीन पाठीराखे कोण आले ते बघणाऱ्या राजीवजींच्या सुरक्षारक्षकांनी संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन इतका वेळ वर घोटाळणारे हेलिकॉप्टर जरा खाली घेऊन त्यातून दोरी सोडली. राजीवजींनी ती धरून लगेचच वर चढण्य़ास सुरुवात केली. खाली सुरु होऊ घातलेली (घोषणांची) तुफान लढाई टाळून ते हेलिकॉप्टरमध्ये शिरले. आकस्मिक राजकीय प्रवेशानंतर पहिल्यांदाच मिळालेली संधी साधून त्यांनी हेलिकॉप्टरचा ताबा घेतला आणि ते नरीमन पॉईंट कडे वळवले. तेवढ्यात हेलिकॉप्टरच्या दिशेने एक तोफगोळा भिरभिरत आला....

****
दूर समुद्रातून आपल्या तोफगोळ्याचा ह्या उडणाऱ्या यंत्रावरचा नेम हुकलेला पाहून कान्होजी आंग्रे नाराज झाले. ह्या महाकाय पुलावर काय धुमश्चक्री चालली आहे ते पाहण्यास त्यांनी आपल्या नावा तिकडे हाकल्या.

"हरहर महादेव!" एकदम अशा आरोळ्या आलेल्या ऐकून आधुनिक सेनेचे नवकार्यकर्ते भांबावून गेले. ख-याखु-या तोफा आणि खरेखुरे मावळे समोर आल्यावर त्यांची पाचावर धारण बसली. आपल्या राजपुत्र-कम-(नव)सेनापतीला एकाकी सोडून त्यांनी पाण्यात उड्या टाकल्या.
"काय रे, काय चालू आहे इथे? माझे दोन तोफगोळे वाया गेले ना" एव्हाना कान्होजी नांगर टाकून एका घोरपडीच्या मदतीने पुलावर चढून आले होते.
"क्षमा असावी दर्यावर्दीश्रेष्ठ!"
"ए काय रे, श्या देतोस मला?" कान्होजींना ही नवमराठीतली उपाधी रूचली नाही.
"तसं नाही आम्ही या पुलाला आपले नाव द्यावे अशी मागणी करायला जमलो होतो."
"आमचे नाव? आणि या पुलाला? कशाला?"
"महाराजांच्या महाप्रचंड महाआरमाराचे नेतृत्त्व करणा-या महाशूराचा हा योग्य महासन्मान ठरेल असं आम्हाला दिलसे, जानसे आणि मनसे सुद्धा वाटतं" (राज) की बात एका सैनिकाने सांगितली.
"आमचा काय सन्मान करायचा तो महाराजांनी केलाच की. आता तुमच्यासारख्या महाभागांकडून आम्हाला असलं काही नको!"
"हो! आमचंही म्हणणं असंच होतं--- म्हणून आधुनिक स्वातंत्र्यवीराचं, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राचं नाव आम्ही सुचवत होतो" ज्युनिअर ह्रुदयसम्राट बोलले.
"तसंच काही नाही, आमच्या थोर पूर्वजांनी मिळवलेल्या स्वातंत्र्य सुराज्यात बदलणा-या, मुंबईच्या पुत्राचं नाव द्यावं असं आम्ही म्हणत होतो!" घड्याळाचा टोला पडावा तसे कृषीमंत्र्यांचे एक चेले म्हणले.
"पूर्वी आम्ही मोगलांशी लढलो - अन्याय करणा-या जुल्मी बादशहाविरुद्ध रक्तं सांडलं. आता काय तुम्ही एकमेकांवरच अन्याय करताय की काय? काय एकेक लढतोय, वा!" इनका कुछ खरा नाही या आविर्भावात डोकं हलवून कान्होजी कडाडले.
"हे आम्ही चाललो. महाराजांचा विजय असो!"
इतकं बोलून कान्होजीं पुन्हा आपल्या जहाजाकडे निघाले.

"अहो पण मग या पुलाच्या नावाचा प्रश्न सोडवायचा कसा???"
"आधी या भयंकर रहदारीचा प्रश्न सोडवा. बघा किती माणसं अडून बसली आहेत. महाराजांच्या काळात असं नव्हतं. असं राह्यलं असतं तर मोगलांशी लढायला महाराज पोचलेच नसते. सगळी घोडी तिथेच अडली असती. काय कळलं??"

आजूबाजूच्या जनतेने "पॉ पॉ!!!" हॉर्नच्या आवाजांनी कान्होजींना अनुमोदन दिले. तेव्हा कुठे इतका वेळ रस्त्याच्या बरोबर मधे झोपा काढत असलेल्या राजकारण्यांना जाग आली.

****
दूर बांद्र्याच्या किना-यावर आत्ताच पोचलेले स्वा. सावरकर, हेलिकॉप्टरमधून दक्षिण मुंबईत पोहोचलेले राजीवजी आणि अरबी समुद्राच्या खोल पाण्यात पोहोचलेल्या नौकेचे शूरवीर कप्तान या सगळ्यांनी एकाच वेळी हुश्श केलं. आणि साधारण त्याच सुमारास इतका वेळ आपल्या अंगावर झेललेला ट्रॅफिक मोकळा झाला हे पाहून आपल्या मुंबईच्या सी-लिंकने सुद्धा!


-अजित ओक आणि मिहिर महाजन

(क्षमस्व: तंबी दुराई)

बुधवार, मे १३, २००९

दम’दाटी’!

काल आमची हो.ही.* म्हणाली, "अरे हो, सांगत्येय, जरा दम धर!". आम्हाला अगदी म्हणजे अगदी रहावलं नाही. उत्तरलो, "हो, आता तू दम दिलास ना, मग (तो) धरायलाच पाहिजे!"

मराठीतल्या अशाच चित्रविचित्र वाक्प्रयोगांमुळे आपली भाषा इतकी मजेदार झाली आहे.

एका दमात असे काही शब्द आठवले मग एकदम लिहून काढावसं वाटलं!
- दमडी
- मुकादम (न बोलता दम भरणारा अधिकारी!)
- खायचा दम, द्यायचा दम, भरायचा दम
- नल आणि दमयंती!
- मदमस्त :-)
- दुर्दम्य

तुम्हाला सुचतंय का आणि काही?

---
हो. ही.: "होणारी ही"!

रविवार, मे ०३, २००९

चिकट विनोद!

फणस कापणे म्हणजे केक कापण्याइतकी सोप्पी गोष्ट नाही. 

हम केक खाने के लिये पेक्षा, हम गरे खाने के लिये किधर भी जा सकते है, यात जास्त निर्लज्जपणा आहे असे आम्हाला वाटते. ज्यांनी स्वतः फणस कापला आहे (किंवा प्रयत्न केला आहे) त्यांना आमचं म्हणणं नक्की पटेल. बाहेरचे काटेरी दात बाजूला करून  मुद्याला हात घालायचा; सुरीला तेल चोपडून तसंच घमघमाटात (तेलाच्या नव्हे, ग-यांच्या) एकेका ग-याची गच्ची पकडून त्याला चिकाच्या बंधनातून मुक्त करणं म्हणजे काही सोपं नाही! नुसत्या आठवणींनी थर’काप’ उडतो. अगदी ‘काप’रं भरतं, तुम्हाला सांगतो!

सुरी चालवण्यात सर्जनचा हात कोणी धरू शकत नाही असं म्हणतात (सर्जन सुरी चालवत असताना त्याचा हात कुणी धरूही नये म्हणा!). त्याच सर्जनला आमचं खुलं आव्हान आहे की फटाफट एक फणस कापून दाखवावा. बक्षीस म्हणुन बरका फणसाचे गरे मिळतील कापा! (सॉरी, बक्षीस म्हणून कापा फणसाचे गरे मिळतील बरंका!)

तर मुद्दा असा की फणस कापण्यापेक्षा तो खाणं, ही सोप्पी गोष्ट असावी. फणस कापणारा गडी जर तरबेज नसेल तर मग ग-यांना फणसाचा चीक चिकटून बसतो. मग चवीचवीनी गरे खाताना जर जीभ त्या चिकाच्या सापळ्यात अडकली, तर त्यालाच "टंग इन चीक" विनोद म्हणत असावेत...

हा विनोद रुचला नसेल, आणि त्यामुळे डोकेदुखीसद्रुष आजार बळावला असेल तर कायदेशीर मार्गानी या‘चिका’ दाखल करावी ही नम्र सूचना! आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवेपर्यंत ‘चिका’र याचिका दाखल झाल्या असतील, तेव्हा लाजू नका :-)

गुरुवार, सप्टेंबर १८, २००८

बेघर अर्थव्यवस्था

अमेरीकेची (आणि क्रमेणं जगाचीही?) आर्थिक घडी विस्कटण्यामागे अनिर्बंध-अमर्याद घरबांधणी हे मुख्य कारण असल्याचा निर्वाळा बुश प्रशासनाने दिल्याचं वाचलं. ही अशी घरघर लागलेली अर्थव्यवस्था कशी मार्गी लागणार अशा विचारात असताना, मला इतर भाषिक-सामाजिक गमतीदार प्रश्न समोर दिसू लागले आहेत---
  • अमेरीकेतली सामाजिक कारणांमुळे त्रस्त असलेली वृद्ध पिढी आता "कुणी घर घेता का घर?" असं विचारतील.
  • "एक बंगला बने न्यारा" या गाण्यावर सरकार बंदी आणणार (आणि कालांतराने "तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा" वरही).
  • जुगारात (याला गॅंबलिंग असा रोमॅंटीक प्रतिशब्द आहे) "House always wins" हा सिद्धांत आता खोटा ठरणार.
  • स्वतःचं घर सांभाळता येत नाही, चालले जग जिंकायला (ही "लक्ष्य" सिनेमानी लोकप्रिय केलेली) म्हण नुसती प्रसिद्ध नाही तर जगप्रसिद्ध होणार!
  • "हौसेला मोल नाही म्हणतात; पण आजच्या आर्थिक परीस्थितीत, "हौसांना" मोल नाही हेच खरं.
  • "Drinks on the house" अशा प्रकारच्या पार्ट्या आता कमी होणार.
  • अवघ्या जगाचं "माज"घर असलेल्या अमेरीकेला असा फटका बसलेला ऐकून काहींच्या चेह-यावर खुनशी स्मित उमलणार. अरे प्रेसिडेन्ट असशील स्वतःच्या घरचा असं म्हणायचीही सोय उरली नाही म्हणतात.
  • अमेरीकेबाहेरील प्रथितयश आर्थिक संस्थांना आता नफा झाल्यावर अमेरीकन कंपन्यांना हेवा वाटणं स्वाभाविक आहे. मात्र आता त्यांनी उगीचच टीका केली, तर "अरे जा, तुझ्याशी मला काही देणं-घेणं नाही. तुझ्या घरचं खातो की काय आम्ही" असं अभिमानानं उत्तर देण्याचा आत्मविश्वास आमच्या घरगुती कंपन्यांना नक्कीच मिळेल.
आणखी काही?

मंगळवार, जुलै २९, २००८

खादंती

नुकताच एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. "बाबा गनूश" इत्यादी मेन्यूही छान होता वाचायला दिलेला. तिथे गेल्यावर "व्हॉट इज हॉट" असं विचारायची हुक्की झाली, पण बाहेरची हवा (आणि वेट्रेस!) सोडल्यास गरम म्हणावं असं काही तिथे दिसेना.

अचानक एक "भयंकर" कॅटेगरीतलं संगीत (!) सुरू झालं. मित्राला म्हणालो, "हे फारच झालं--- This music sounds totally Greek to me!"

त्यावरून काही खाद्य-विनोद सुचले. ते ऐकून 'पकला' नाहीत तर कळवा!
  • एकच वांगं लागणा-या वांग्याच्या जातीला काय म्हणाल? "एक-प्लांट" (हा स्टार्टर समजा!). असं एगप्लांट खाऊन पोटात दुखलं नाही तरच मिळवली.
  • आता दोन कठीण प्रश्न:-
  • खूप जास्त (पण अगदी चवीनं) च्यूईंग गम चघळणा-याला काय म्हणाल? (अमेरीकन लोकांत हे फारच फॅड आहे): चावट.
  • ग्रीक (मेडेटेरियन) (प्र)देशातल्या पीटा ब्रेडबद्द्ल कदाचित तुम्हाला ठाऊक असेल-नसेल. हा एक चविष्ट ब्रेड असतो. खूप खपून बनवलेल्या पीटा ब्रेडला काय म्हणाल? - आटापीटा.
  • असं कुठल्या पेयाचं व्यसन आहे, जे नावानीच सांगत असूनही लोकांकडून सुटत नाही? (पुन्हा, अमेरीकन लोकांत हे फार दिसून येतं)- सोडा!

शुक्रवार, एप्रिल ०४, २००८

हसून हसून पुरेवाट होणे

कधीतरी नकळत एखादा विनोद आठवून तुम्ही चार-चौघांत उगाचच हसलात आणि बाकिच्यांनी "काय आहे? काय झालं?" असं विचारल्यानंतर "काही नाही एक ज्योक आठवला" असं तुम्ही म्हणून गेल्यावर सगळ्यांनी नाक मुरडलं की त्यातच त्या विनोदाचं यश आलं. ("...चा पुतळा उगाचच ख्याक्क करून हसला तर कसं वाटेल" या वाक्याचं तसंच आहे; ते आठवलं की मला हसू येतंच)

खरा विनोद सांगणारा इसम जर स्वतःच हसू लागला तर त्या विनोदाची वाट लागली असं समजावं. मात्र अतिशय प्रामाणिकपणे (आणि भोळेपणाचा आव आणत) अत्यंत विनोदी वाक्य तो बोलून गेला (अर्थातच, आणि नंतर जर हसू आलं) तर मी त्यास चांगला विनोद मानतो.

ग्राउचो मार्क्स हा त्याच वंशातला कलाकार. त्याचं प्रत्येक आणि प्रत्येक वाक्यं नीट कान देऊन ऐकायला लागतं! त्याच्या विनोदाचे किती तरी प्रकार! एकेका प्रकारावर निबंध लिहावा (आणि त्याच्याच शैलीत-- आपलाच पाण'उतारा' करून घ्यावा!)

केवळ अतिशयोक्तीतून कसा अप्रतिम आणि निखळ विनोद तयार होऊ शकतो ते पहा---




हसून हसून पुरेवाट होणे या वाक्प्रचाराचा खरा अर्थ तुम्हाला आता उमगला असेल!

गुरुवार, फेब्रुवारी १४, २००८

कारणे दाखवा नोटीस

आजचा दिवस "जागतिक हृदयरोग व हृदयविकार निर्मूलन दिवस" म्हणून का साजरा करू नये?

शनिवार, जानेवारी १९, २००८

धोपट मार्गा सोडू नको!

  • जिथे सागरा धरणी मिळते... तिथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते.
  • ईशान्त शर्माने रीकी पॉंन्टींगला तंबूचा रस्ता दाखवला.
  • होऊनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती.
  • ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा.
  • लक्ष्मी रोड पुणे आणि रानडे रोड दादर इथे मिळणार नाही अशी एकही गोष्ट या जगात नाही.
  • भाय उस्की तो वाट लग गयी भाय!
  • राणी, मी तुझ्याच वाटेकडे डोळे लावून बसलो होतो (अगं आई) गं! [एखाद-दुसरा अश्रू]
  • वाट पाहुनि अती मी थकले, थकले रे नंदलाला...
  • पंथी हूं मै उस पथ का, अंत नहीं जिसका...
  • एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ.
वरील सगळ्या वाक्यांत एकाच बाबतीत एकवाक्यता आहे. ती म्हणजे, सगळी वाक्ये "रस्त्या"बद्दल आहेत. आणि आज रस्त्यांबद्दल लिहिण्याची हुक्की आली याचं कारण म्हणजे माझ्या घराजवळचे रस्ते!

खरं म्हणजे "देवाघरी गेलेल्यांबद्दल वाईट बोलू नये" या न्यायाने मी त्यांच्याबद्दल वाईट न बोलण्याचं ठरवलं आहे; पण अधून मधून अपशब्द गेले तरी मला त्यांच विशेष काही वाटणार नाही.

गेले काही दिवस मी नेमाने माझ्या घराजवळच्या भागात रस्ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे; पण तो सफल झाला तर शपथ! पाणी पुरवठा करण्याची लाईन टाकायची तर त्यासाठी सरकारी रस्त्यांसारखी सोयीची आणि आयती जागा दुसरी कुठली सापडणार? त्यासाठी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिका-यांच्या कल्पनाशक्तीचे कौतुकच करायला हवे. पुन्हा रस्त्याच्या कडेने पाईपलाईन टाकली तर रस्त्याच्या मध्येच उभे राहून खणायला लागेल; त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या अगदी मध्यभागीच खणायचे ठरवले. कर्कटक की काय म्हणतात त्याने मोजमाप घेतांना मी या डोळ्यांनी पाहिलं. रस्त्याच्या कडेला त्यामुळे अवाढव्य मशीनं उभं करणं सोयीचं झालं. तसंच नो पार्कींग, पुढे विमान क्रॉसिंग आहे, हाजमोलाच्या जाहिराती इत्यादींचे बोर्डही वाचले! शिवाय पुढच्या वेळेस जर काही मरम्मत करावी लागलीच तर अगदी मध्यभागीच लाईन असल्यामुळे फारसा शोध घ्यावा लागणार नाही अशीही काही दूरदृष्टी त्यांची असावी. शनिवार रविवारी काय लोक आपापल्या घरीच बसून वेळ घालवतात त्यामुळे शुक्रवारी काम अर्धे टाकायला काहिच हरकत नाही अशी त्यांची एक गोड गैरसमजूत असावी. IT कंपन्यांतले आमच्यासारखे (काही क-रोड?) लोक शनिवार-रविवारीही काम करतात, आणि वेळ घालवणे या कारणाव्यतिरीक्त इतर गोष्टींसाठीही लोकांना घराबाहेर पडावं लागतं याची या बिचा-या पाईपलाईनवाल्यांना काय कल्पना बरे!

गेला आठवडा घरातून बाहेर पडणे आणि घरी परत येणे म्हणजे एक शिक्षा होऊन बसली आहे. समोर अशी माझी गल्ली दिसत्येय, पण तिथे पोहोचायचं म्हणजे बाईकवर रस्त्यांच्या "डाय"व्हर्जन्स शोधीत पंधरा-वीस मिनिटं लागणार. परत त्या प्रवासात आणखी अर्धा किलो धूळ कपडे, नाक-डोळे (आणि हो, पायही) घरी घेऊन येणार. कोणाला माझ्या घरी येऊन पायधूळ झटकायची असेल तर आधीच बजावून ठेवतो -- नो एन्ट्री आहे सध्या! एकंदरीत काय आयुष्यात सध्या माझी खडतर वाटचाल सुरू आहे.

रॉबर्ट फ्रॉस्टची जगप्रसिद्ध कविता माहिती असेलच तुम्हाला --
I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence
Two roads diverged in a wood
And I took the one less traveled by
And that has made all the difference
आजच्या जगात आणि विशेषतः तुम्ही जर माझ्या एरीयासारख्या "जंगली" भागात रहात असाल तर फ्रॉस्टचे सांगणे बिल्कूल ऐकू नका. ज्या रस्त्यावरून मेजॉरीटी ट्रॅफिक गेलेला आहे तोच रस्ता धरा, तरच कमीत कमी खड्डे आणि कमीत कमी वेळात घरी पोचण्याचं तुमचं स्वप्न सत्यात येण्याची आशा आहे!

असो.

अहो, तुमच्या ओळखीत कोणी विल नावाचा इसम असेल तर मला जरूर कळवा. तुमचे खूप उपकार होतील. मी असं का म्हणतोय ते तुम्हाला वेगळे सांगणे न लगे, नाही का? :-)

रविवार, डिसेंबर १६, २००७

येह मज़धार!

शुक्रवार सकाळ उजाडली तीच मुळी धुकं आणि एकंदरीत कुंद वातावरण घेऊन. त्यातूनच "आज दाढी करायचा दिवस म्हणजे वाटच" अशा विचारांत असताना वीज चमकावी तशी एक आयडिया चमकून गेली आणि त्याच उत्साहात दाढी उरकून घेतली. दाढी करण्याचा मला फार कंटाळा. पंधरा-वीस मिनिटं आरशासमोर घालवायची आणि (स्वतःचे) गाल कुरवाळायचे. पुन्हा तीन दिवसांनंतर दाढी पुन्हा उगवलेली!

असो. मुद्दा दाढी हा नसून, ती करण्याचे हत्यार म्हणजे वस्तर उर्फ रेझर हा आहे. डोक्यात मगाशी चमकलेले उत्तर ठेऊन मग मी माझ्या अड्ड्यातल्या मित्रांना bcc मध्ये मेल दाढल्या (सॉरी धाडल्या) आणि विचारणा केली, "धार गेलेल्या रेझरला काय म्हणाल?" इमेलचा सब्जेक्ट होता, "शुक्रवार सकाळचा गहन प्रश्न".

संध्याकाळपर्यंत काय काय उत्तरे येतात बघू आणि त्यावर एखादा निबंध लिहून टाकू असा काहिसा स्वार्थी हेतूही त्यामागे होता; परंतु ते राहू देत.

थोड्याच वेळात आमचे आ(वड)त्ते बंधू मिहिर यांचे पहिले उत्तर आले: "निर्धार?" (धार गेलेला रेझर असेल तर दाढी करायला उपयोगी पडतो तो निर्धार!"

"हाहाहा! good answer! माझं उत्तर होतं "खरडपट्टी अगदीच लॅटरल असं!" इति मी.

"on a related note, उसन्या घेतलेल्या रेझरला काय म्हणाल? उधार!
improvised version of razor? सोप्पये - सुधार" मी फटाफट पुढची मेल पाठवली.

"महाग रेझरला? वधार! 'हॉट' रेझरला? धारोष्ण!" इति मिहिर.

"दाढी करताना सांडलेल्या रक्तपेशींना काय म्हणाल? धारातीर्थी पडलेल्या" पुन्हा मिहिर.

"आफ्टरशेव म्हणून तेल लावायचं ठरवलं तर कुठला ब्रॅंड वापराल?" अर्थातच धारा. इति मी. हा काहिच्या काही होता.

"अरे आत्ताच दुस-या एका मित्राने उत्तर पाठवलं: इ-रेझर!" इति मी.

"रेझर बोथट करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणाल? अन् -धार!" मी पेटलो.

"कमी प्रतीच्या रेझरला कश्या शिव्या द्याव्यात? त्याचा उद्धार करावा!"

"सकाळी सकाळी पहिलं गि-हाईक म्हणून न्हाव्याकडे गेलो तर तो आपली दाढी कशी करेल? पहिल्या धारेची" पुन्हा मी!

"अगदीच बोथट झालेल्या रेझरला पुन्हा धार लावायची म्हणजे काय करायचं?" त्याचा जीर्णोद्धार करायचा - मीच तो. मीच तो.
एकंदरीत काय, शुक्रवार सकाळी चांगली गेली! बोथट रेझरनी दाढी केलेली असूनसुद्धा!!

शनिवार, डिसेंबर ०८, २००७

एक अवघड विनोद

फूट ऍन्ड माऊथ डिसीज [फूट इन माउथ नाही ;-)] बद्दल अधिक माहिती सगळ्यांना असण्याचं तसं काही कारण नाही. गो-या साहेबांच्या काळ्या गाई-म्हशींना होणारा हा फिरंगी आजार (म्हणजे माणसांनाही होऊ शकतो म्हणा) होय. याविषयी अधिक माहिती करून घेण्याची इच्छा असेल तर इथे पहा. इच्छा नसेल तरीसुद्धा तुम्ही ती लिंक पाहू शकताच म्हणा. अर्थातच, तसं करणं पुढच्या परीच्छेदाच्या वाचनासाठी अनिवार्य नाहिए.

असो. तर, कळायला ब-यापैकी अवघड विनोद असा आहे, की या आजार-व्याधीचे मराठीत नामकरण करायचे झाल्यास (एका शब्दाचे) काय नाव ठेवाल?

हरलात? मग पुढे माऊसने हायलाईट करून बघा बरं: चरण

:)


अजूनही ट्यूब पेटली नसेल तर कठीण आहे बुवा! विशेषतः हा रोग गाई-म्हशी-रेडे-बैल यांच्याशी निगडीत असल्याचे आधीच सांगितलेले असूनही!!

शुक्रवार, नोव्हेंबर ०९, २००७

चकली!

आज गेली कित्येक वर्षे आमची आई दिवाळीला चकल्या करता आलेली आहे। म्हणजे, फक्त दिवाळीच्या फराळासाठीच नव्हे तर इतर वेळीसुद्धा - सुटटीचा खाऊ म्हणून आमच्याकडे चकल्या केल्या जातात। परन्तु लेखाच्या सुरुवातीलाच इतकं असत्य-वदनी असू नये असा आमचा प्रघात आहे; त्यामुळे आमच्याकडे कधी-कधी चकल्या केल्या जातात? यांची सनावळी देण्याऐवजी, आमच्याकडे कधीच चकल्या केल्या जात नाहीत असा गौप्यस्फोट करतो। दिवाळीच्या फराळावरचा असा खुसखुशीत लेख असा न-काराने सुरु करू नये हे जरी खरं असलन तरी त्यास इलाज नाही -- कारण आमच्याकडे कधीच चकल्या होत नाहीत; होतात ते तुकडे!

चकाल्यांच्या या तुकड्यांना इतिहास आहे - शाळेतल्या इयत्तांच्या तुकडीला असतो तसा। 'ड' तुकडी नेहमी दंगा घालणारी -- तसेच दिवाळीतले तुकडे विशेष करुण लक्षात राहणारे। प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते; ती वेळ आल्याखेरीज काही होत नाही म्हणतात। चकाल्यांचेही असंच असावं। प्रत्येक भाजणीची एक वेळ असते। उत्तम भिजवून त्यात (प्यारे) "मोहन" घालून, त्याहून छान वर्णन सांगून चकल्या पाडल्या की तुकडे तयार! मग आमची आई "या वर्षी तांदूळच कसा बरोबर नव्हता (म्हणजे गेल्या वर्षीसारखाच) " पासून ते "पावसाची लक्षणं ना बाहेर आज?" वरुन "सो-या जरा जास्तचा घट्ट बसलाय आज" ते "राजकीय अनिश्चितता आहे ना आफ्रिकेत" अशी सगळी कारणमीमांसा देते। त्यात मग आमचे सल्ले सुरु होतात। "गँस कमी करा -- गँस जास्त करा", "पीठ मळून देऊ का मजबूत हातांनी?" "पीठ जास्त मळायला नको होतं" "जाऊ द्या, पुन्हा भिजवा पीठ!" "नको? मग नवीन भाजणी आणा" आशा विविध सल्ल्यांनी आम्ही भंडावून सोडतो। अर्थात अशा गुगली सल्ल्यांनी आमची आई कधी "चकली"ये असं कधीही झालेलं नाही। "९४ साली सगळं व्यवस्थित हौनसुध्दा तुकडेच पडले होते ना?" असं काहीतरी ती पुटपुटते आणि पुढचा घाणा काढायला पुढे सरसावते।

४७च्या फाळणीनंतर कशाचे तुकडे झाल्याचं दुःख पुन्हा फारसं सारखं सारखं; आणि तेही दिवाळीच्या उत्साहात कोणाला आमच्याइतकं झालं नसेल।

या सगळ्या पूर्वेतिहासामुळे "चकली" या प्रकाराविषयी आम्ही फार संवेदनशील आहोत। "लाडू फार छान झालेत हो" किंवा "शंकरपाळी? झक्कास!" असं तुम्ही म्हणालात तर त्याचा आम्हाला फारसा अभिमान वाटेलाच असं नाही। मात्र, "चकलीची चव छान आहे, आणि नळी पण मस्त पडलीये" असं म्हणणार असाल तर तेवढ्यावरच थांबवा - पुढे "तुकडेच पडलेत म्हणून काय झालं" असे पुढचे पाच शब्द त्या तुकड्यांबरोबरच गिळून टाका -- कारण तो भलता धगधगता एरीया आहे - केव्हा दंगल भडकेल कळणारसुध्दा नाही। तीन दिवाळ्यांपूर्वी अशाच काहीतरी वक्तव्यांवरुन आमची आई भलतीच उ"चकली" होती। बरं तर बरं मागच्या वर्षी चकलीवर संभाषण येताच तिनं जो अविर्भाव केलेला तो पाहूनच आमची मामी बि"चकली" आणि गुपचूप चकलीचा तुकडा तोंडात टाकला होता।

एखादी न जमलेली गोष्ट पुन्हापुन्हा प्रयत्न केल्यानेच जमते हा सुविचार म्हणून चांगला आहे। चकल्यांच्या बाबतीत आमची आई तो आचरणात आणतेही आहे। अगदी जिद्दीनं - इरेस पेटूनाही चकली हां फराळरुपी प्रांत अजून तरी आमच्या अधिपत्याखाली आलेला नाहिये। एके दिवशी सारं काही मनासारखं होईल आणि छान गोलाकार, केवळ बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा, खमंग-रुचकर अत्यंत खुसखुशीत चकल्या आमच्या आईच्या सो-यातून घडतील आणि आम्ही सारे धन्य होऊ। असो, लेखाच्या अखेरिसही इतकं असत्य-वदनी असू नये अशी आमची काही तत्त्वे आहेत। "सत्यं वद" असं म्हणून म्हणतो की आजही आमची आई अवीट चवीचे जे तुकडे करते तेसुध्दा छान गोलाकार, इ। इ। विशेषणांनी ठासून भरलेल्या चकली नामक पदार्थाचेच असतात मिस्टर, आहात कुठे?

=-=-=-=-=

आमच्या तमाम रसिक वाचकांना शुभ दीपावली!

रविवार, ऑक्टोबर ०७, २००७

एक सुखद महामूर्ख

काही वेळा आपण जगातले नव्हे विश्वातले सर्वोत्तम महामूर्ख आहोत असं वाटतं. नुसतं वाटतंच असं नाही; तर ते खरंही असतं! म्हणजे तसे आपण नसतो महामूर्ख वगैरे, चांगले हुषार असतो; पण म्हणतात ना, की नुसतं हुषार असून काय उपयोग? तसंच होतं कधीकधी...
एक सुखद दिवस
ऑफिसमधे सुखद दिवस कमीच. त्यातही ब-याच मिटींगा झाल्यानंतरही दिवस सुखद ठरावा हा आणखी एक सुखद धक्का त्या दिवशी मला मिळाला. सवयीनुसार कोणी जास्त कामाचा भार माझ्यावर टाकला नाही. सवयीनुसार मी देखील जास्त कामाचा भार ओढवून घेतला नाही. दुपार उलटून गेली तशी ती दुपार आणखीनच सुखद वाटायला लागली. छान नवी गाणी लावून वगैरे मी नेहमीचीच रटाळ जुनी कामं उरकत होतो. त्यात व्यत्यय आणायला कोणीही क्युबमध्ये येऊन उगाच प्रश्न-बिश्न विचारत नव्हते. अर्धे अधिक लोक रजेवर असावेत, कारण एकंदरीत कचेरीत शांतता सुखनैव नांदत होती.

आज संध्याकाळी ट्वेन्टी-२० ची फायनल मॅच होती आणि त्याकडेच अस्मादिकांचे डोळे लागले होते.

एक सुखद संध्याकाळ
जरा लवकर निघावं ऑफिसातनं तर लोकांच्या भुवया एक दोन इंच वर जातात इतर दिवशी, पण आज नाही. कारण सगळेच लवकर निघणार होते. क्रिकेटज्वराने मॅनेजरलादेखील ग्रासले होते. त्यामुळे मोठ्या दिमाखातच मी निघालो. एक-दोन जणांशी ठरलेले हास्यविनोद उरकून बाईकवर बसलो तेव्हा साडेपाच वाजून गेले असावेत. ट्रॅफिक नावाच्या दिव्यातून आजही जावे लागणार या चिंतेतच मी किक मारली आणि निघालो. नशिब कधीकधी (च) आपल्या वाटेने चालून येतं; तसं ते आज आलं आणि आणखी सुखद वाटायला लागलं. निघालो तर नेहमी लागतात तसे ट्रक-बस-आणि मोटारींचे लोंढे गायब! म्हणजे अगदीच गायब नाहीत; पण मला जायचे त्या दिशेने गायब! काय सुखद संध्याकाळ असा विचार करत चौथ्या गियरमध्ये बाईक टाकली तेव्हा वेळेवर पोहोचीन असे नुसते मनसुबे नव्हते; तर घराचं दारच जणू दिसत होतं.

एक सुखद प्रवास
ऑफिसपासून माझं घर किती अंतरावर आहे असं विचारण्यापेक्षा किती मिनिटांवर आहे असं विचारणं संयुक्तिक ठरेल. म्हणजे मी उत्तरही त्या दृष्टिनेच देतो नेहमी. आठ किलोमीटर अंतर पार करायला बॅंगलोरमध्ये दहापासून शंभरपर्यंत कितीही मिनिटे लागू शकतात. ही झाली घड्याळातली मिनिटं, एकेक चौक पार करताना एकेक युग उलटतंय असे untimely विचार माझ्या मनात अनेकदा डोकावून जातात.

आजचा दिवस मात्र खासा निराळा. म्हणजे सगळं कसं जुळून आलेलं. आपल्याला जायचंय त्या दिशेने ट्रॅफिक नाही, ऑफिसकडे जायच्या दिशेने मात्र शेकडो वाहनं रांग करून (आणि मोडूनही) ही अशी उभी. "आयला, ऑफिसच्या दिशेने कोण एवढे लोक जाताहेत बोंबलायला संध्याकाळी, घरी जाऊन मॅच बघायची मस्त तर नाही," असे "देवा यांना माफ कर, ते काय करताहेत ते त्यांचं त्यांना कळत नाहिये" धर्तीवरचे पवित्र विचार मी मनाशी बांधून ठेवले. ट्रॅफिक इतका कमी होता की हे फक्त मनाचे खेळ होते अशी शंका आल्यामुळे मी एकदोनदा रस्त्याच्या मध्येच एकदम गाडी बंद पाडून किती हॉर्न ऐकू येतात हेही पाहून घेतलं. माझ्यामुळे कोणालाच अडथळा झालेला नव्हता. दुस-या बाजूला तिष्ठत उभ्या असलेल्यांसाठी एक करमणूकीचा खेळ करून दाखवला एवढंच.
एक सुखद महामूर्ख!
ट्रॅफिक आणि प्रतिस्पर्धी संघ नेहमी आगाऊ वक्तव्यांचा सूड घेतात. घेतला तर घेऊ देत. आज हमें कोई नहीं रोक सकता! मुख्य रस्ता डावलून घराकडे जाणा-या छोट्या गल्लीत वळलो तेव्हा बहुदा टॉस झालेला होता. भारताची पहिली बॅटींग एवढी पुसटशी बातमी मी पादचा-यांच्या तोंडून ऐकली आणि चला, घरी लवकर पोहोचतो आहोत, आणि पहिली बॅटींग, वाह, असं वाटलं. पुढच्या एक दोन गल्ल्यातून तर मी जणू काही उडतोच आहे की काय अशा थाटात बाईक हाणली आणि बिल्डींगच्या पार्किंगमध्ये लॅंड झालो. घड्याळात फक्त पावणेसहा वाजले होते. म्हणजे पंधरा मिनिटांत घरी तेसुध्दा संध्याकाळी, अहाहा काय सुखद अनुभव!

"चक देSSS इंडिया" --- शीळ घालतच जिने चढलो, जॅकेट काढलं आणि घरची किल्ली बाहेर काढण्यासाठी हात खिशात घातला. तत्क्षणी साधारण साताठ ठोके चुकले आणि आपण एक सुखद महामूर्ख आहोत याची खात्री पटली.

आज आम्ही घराची किल्ली ऑफिसमध्येच विसरून आलेलो होतो!!!

सोमवार, सप्टेंबर २४, २००७

माझीही ग्राफिटी!

  • आपल्या मोटरसायकलच्या आरश्यात विमान मावलं म्हणजे तुम्ही आकाश जिंकलं असं नाही!
  • कोण म्हणतो महाराष्ट्र बॅंकेचा शेयर म्हणजे महा-भाग नाही?
  • बसमधून उभ्याने जाणा-या एका आजोबांचे आडनाव बसू असेल तर आपली जागा सोडून त्यांना बसू द्यावे का?
  • बॉक्सिंगच्या मॅचमध्ये म्हणे मॅच सोडायची असेल तर पंचाला "आय ऍम थ्रोईंग इन टॉवेल" असं सांगावं लागतं!
  • दारू ही आरोग्याला वाईट असूनही तिला "पेय" असे का म्हणतात?
  • मला कुठला अलंकार आवडतो? सोन्याची चैन! नाही नक्कीच नाही. माझा आवडता अलंकार म्हणजे श्लेष!
  • लिंबू सरबताच्या रसिकाला आंबटशौकीन का म्हणत नाहीत?
  • अधिक पैसे मिळवायचे असतील तर शेयर मार्केटच्या फंदात तरी पडा किंवा एखाद्या चांगल्याशा फंडात तरी!

गुरुवार, ऑगस्ट ०९, २००७

दोन उगाच-कथा

मे. गोकुळदास भगवानदास पटेल यांचं किराणा आणि भुसार (म्हणजे नक्की काय ते माहिती नाही) मालाचं दुकान भगवानदास भोलाराम पटेल मार्गावर सापडेल. हे दुकान अत्यंत स्वच्छ कारभारासाठी प्रसिध्द होतं (आणि आहेही). कुठल्याही मालाची गॅरेंटी स्वतः शेठ तुम्हाला देतील. या दुकानाच्या अवघ्या इतिहासात केवळ एकदा निकृष्ट माल सापडल्याची कथा सांगितली जाते. कधी काळी म्हणे एकदा कुठल्यातरी भामट्या लघु-उद्योजकाने पटेलशेठला अगदी खराब गूळ पुरवला. किंमत मात्र चोख मोजून घेतली होती. पटेलशेठच्या लक्षात ही चूक यायला तसा बराच वेळ लागला -- म्हणजे गि-हाईकाने तो विकत घेऊन मग त्याचं काही करून बघितल्याशिवाय कळणार कसं? गि-हाईकांकडून तक्रारी ऐकू आल्यावर त्याने त्या गूळाचे पैसे परत केलेच पण पुन्हा कधी असं होऊ न देण्याची जणू काही शपथच घेतली. नफा हे उद्दीष्टासाठीच धंदा करणा-या पटेलशेठला कोणीतरी म्हणाले की काय असा गूळ तुम्ही फुकट कसा दिला लोकांना? त्यावर पटेलशेठ काय उत्तरले असावेत?

"अहो चालायचंच--- तो गूळ बंडलच होता. त्यामुळे मी काही किंमत घेतली नाही त्याची. म्हणूनच गि-हाईकांसाठी इट वॉज गूड् फॉर नथिंग!"

---

जर तुम्ही शेतात भरपूर वाल लावले आणि भरपूर पीक आलंसुध्दा, तर पहिल्या वालाच्या शेंगेला तुम्ही काय म्हणाल?

highlight --> अग्रवाल

नंदनच्या कॉमेंटप्रमाणे, जर वालाचं उत्तम पीक आलं तर त्यास काय म्हणाल?
highlight --> मस्तवाल

वालाचं शेत जर ओस पडलं तर त्यास काय म्हणाल?
highlight --> ओस्वाल

वालाच्या मोठ्या दुकानाला काय म्हणाल?
highlight --> वाल-मार्ट

वालाच्या भावाची चौकशी काय विचारून कराल?
highlight --> स-वाल

वालाची कमी मसाला घालून, बिन-मिरचीची भाजी केली तर त्यास काय म्हणाल?
highlight --> म-वाल

हे सगळं वालाचं रामायण लिहिणा-या माझ्यासारख्या कॅरेक्टरला काय म्हणाल?
highlight --> वाल्मिकी!

तुम्हीही सुचवू शकता...!