शुक्रवार, जुलै २९, २०११

गेल्या काही महिन्यांत वृत्तपत्रांत सुरु असलेल्या भ्रष्टाचारविरोधी प्रचारामुळे खालावत चाललेल्या 'काला'* निर्देशांकाने आज नवीन निचांक गाठला. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याना राजीनामा द्यावा लागणार अशी शक्यता कालपासूनच व्यक्त केली जात होती, आज त्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर काही मिनिटांतच लोअर सर्किट लागून व्यवहार थांबवावे लागले. मागच्या आठवड्यात केंद्र सरकारचे तिमाही भ्रष्ट आकडे प्रकाशित झाल्यावर गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली होतीच.

दोन वर्षांपूर्वीच्या जागतिक मंदीचा सखोल अभ्यास केल्यानंतर भारतीय उद्योगपतींनी उभा केलेला हा लाखो कोटींचा उद्योग ख-या अर्थांनी भरभराटीला यायच्या आधीच डबघाईला येतो की काय अशी शंका सर्वसामान्यांना आता सतावत आहे. करोडो भारतीयांचे कष्टाचे पैसे या उद्योगात गुंतलेले असल्याने ही भीती अनाठायी नक्कीच नाही हे खरे. 

"अमेरिकेतील गरीब लोकांनी घेतलेली गृहकर्जे काही मूठभर लोकांनी आख्या जगाला विकली आणि पैसा केला. आपल्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा हे सामान्य गरीब जनतेनी मूठभर लोकाना दिलेले कर्जच नाही का? ते का विकू नये, असा विचार २००८ नंतर आमच्या मनात आला आणि मग आम्ही अश्या प्रकारच्या काही financial instruments ची योजना केली," ज्येष्ठ अनुभवी उद्योगपती बी. बाजा सांगत होते. "आम्ही सुरुवात केली तेव्हा तोफगोळे आणि चा-याच्या व्यवहारामधून जमलेले साधारण ३५-एक कोट रुपये आणि सात-आठ तल्लख डोकी इतकंच आमचे भांडवल होतं. आता आजचे आकडे तर तुम्हाला ठाउक आहेतच!"

बी. बाजा ही या हजारो कोटींच्या उद्योगातील एक वजनदार हस्ती. ताराखात्याने आपली सेवा आणखी जलद करण्यासाठी नवीन तारजोडणीचे कंत्राट देण्याचे ठरवले तेव्हा ते तारमंत्री होते. हिशेब चोख न ठेवल्याचा आरोप ठेऊन काही भ्रष्ट राजकीय नेत्यांनी त्याना अलीकडेच राजीनामा द्यायला भाग पाडले होते. पुढे आणखी काही बाही आरोप झाल्याने त्याना नुकतेच स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते.

"बघा ना, इंडस्ट्रीला आत्ता माझी किती गरज आहे, आणि मी पडलो असा नजरकैदेत!" रिमोट कंट्रोलने ए/सी जरा कमी करत श्री. बाजा म्हणाले. "यंदा उन्हाळा जरा जास्तच आहे. नाही?" बाजांच्या या इंडस्ट्रीचे पहिले काही महिने खडतर गेले. "लोकांच्या विश्वासावर धंदा अवलंबून आहे आमचा, तो संपादन करायला वेळ लागणारच होता..." तो मिळाल्यावर श्री. बाजांनी आणि अर्थातच त्यांच्या सहका-यांनी अपेक्षित असे उज्ज्वल यश संपादन केले. "ब्यांक सुद्धा जास्तीत जास्त ९ टक्के व्याज देते हो. गेल्या दोन वर्षांत आम्ही ६५ टक्के परतावा दिलेला आहे!" बाजांच्या डोळ्यांत अभिमान दिसत होता. त्यांचे आकडे अगदी खरे होते. मात्र त्यांची काम करण्याची पद्धत बैन्केच्या अगदी विरुद्ध; कुठे कसली नोंद नाही. "मुंबईचे डबेवाले नाही का बरोबर डबे पोहोचवतात? आमचा पैशांचा व्यवहारही असाच - अगदी चोख, नोंदी ठेवण्याचा ओव्हरहेड कशाला?" मागच्या महिन्यात सिग्नलवर 'मामा'च्या हातून धाडलेली पन्नास रुपयांची गुंतवणूक आठवली. तुमच्या आमच्यासारखे जनसामान्य अश्या पन्नास रुपये ते  पन्नास हजारांपर्यंतच्या रकमा पोहोचवत असतात. पण मग कुठे तरी याचा हिशेब नको का? "अहो हीच तर खरी खासियत आहे या उद्योगाची. चोख हिशोब ठेऊनही शेवटी कोणीतरी घोटाळे करणार, मग ते भ्रष्ट राजकारणी शेम शेम चा ओरडा करणार. मग चौकशी --- हवाच कशाला हिशोब? स्पेक्युलेशन वरच तर मार्केट चालतंय!" साहेबांच्या बोलण्यात तथ्य होतं, म्हणूनच ते एक उद्योगपती होते, आणि मी केवळ  एक मामुली वार्ताहर.

इतकं सगळं सुरळीत सुरु असतांना अचानक या उद्योगाला अशी घरघर लागावी? "अहो धंदा म्हंटला की चढणं आलं नि बुडणं आलं!" अंतू बरवा मधलं वाक्य टाकून साहेब अजूनच रंगात आले. "सध्या राजकीय परिस्थिती जरा नरम आहे. इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे आम्हालाही फटका बसतोय. आप्पा शेकडे काय किंवा ते नाना घामदेव - त्यांचा आक्षेप आहे आम्ही बेहिशोबी कारभार करतो त्यावर. मगाशी म्हणालो त्याप्रमाणे आमच्या किफायतशीर असण्याचे हेच तर गमक आहे. त्यांच्या मागण्या नाही मान्य करू शकत अश्या सहजासहजी!"

निव्वळ हेच नाही तर कुरेश मोडकळीनी अंतरराष्ट्रीय लपंडाव खेळांच्या खर्चातून वाचवलेले पैसे असोत किंवा आत्ता अलीकडेच कर्नाटकातील लोहचुंबक विक्रीतील नफेखोरी. एकेका बातम्यांनी काला निर्देशांक दोन दोन टक्के घसरला आहे.  असे धक्के सोसुनदेखील मार्केट fundamentals शाबूत आहेत असे अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. या काही ठळक घडामोडी सोडल्या तरी आणखी काही उत्तम उत्पादने अजून चांगली कार्यरत असावीत. झाकली मूठ सव्वा अब्जाची हि आधुनिक म्हण खरी ठरवत गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतल्यास हा उद्योग खडतर परिस्थितीतून मार्ग काढत नेहमीच यशस्वी ठरला आहे असे दिसून येईल. 

उद्या महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या तिमाही निकालांकडे गुंतवणुकदार आणि दलाल डोळे लावून बसले आहेत. आदर्श झोपड्या आणि खालीबसा रिसोर्ट प्रकल्पांमधून आणखी गुड न्यूज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

येन-केन प्रकारेण उद्या मार्केटला अप्पर सर्किट बसावे आणि मार्केटचा लुजिंग स्ट्रीक तुटावा अशीच छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांची मनोकामना असेल.

---
*: काळा पैसा व लाचलुचपत निर्देशांक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: