प्रवासवर्णन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रवासवर्णन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, नोव्हेंबर १६, २००८

अमेरीकेत गेल्यानंतर सगळ्यांत पहिली गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, कुठेही गेलं तरी आपण हॉलिवूडच्या चित्रपटात वावरतो आहोत असंच वाटतं. एकदा एका मित्राला हे बोलून दाखवलं तर तो म्हणाला, की "अरे त्यांच्या सिनेमांमधे इथे जसं आहे तसंच दाखवतात, त्यात काय एवढं!"

"त्यात काय एवढं॒? हं".

एकदा युटाहच्या ट्रिपला गेलो असतानाची गोष्ट: रात्रीचे साधारण अकरा वाजले होते आणि आम्ही आमच्या मुक्कामाच्या म्हणजे 'पेज' गावी पोचतच होतो. तास-दोन तासाच्या रात्रीच्या ड्रायव्हिंग नंतर जरासं थकायला झालेलंच होतं, त्यात मागे बसलेली सगळी गॅंग पेंगत होती. पॉवेल लेकच्या जवळ धरण-वजा एक पूल आहे. तिथे २५ मैलाची मर्यादा पाहिली आणि मी गाडीला आवरलं. पूल संपता-संपता वेग घेतला तर समोरच पोलिसांची गाडी दिसली. जरा सावध होऊन त्यांना पार केलं तर आरश्यात पोलिसमामांनीही गाडी बाहेर काढलेली दिसली. 'पोलीस... हा 'म्हैस'मधला पेशल उच्चार आठवतो न आठवतो तोच आमच्या आरशात निळे-पांढरे दिवे चमकायला लागले, सायरनही वाजतो आहे असा भास झाला. "अरे स्पीड वाढव, स्पीड वाढव. लिमिटपेक्षा इतकं हळू जाणं चुकीचं आहे," असं माझा मित्र म्हणेपर्यंत हि दिवेलागणी होऊन गेलेली. मग कसला स्पीड वाढव! उजवीकडे (इंडीकेटर देऊनच) गाडी बाजूला घेतली. आता काय होणार या विचारात मग बसून राहिलो. मोठ्या रुबाबात मग पोलीस-साहेब आले. काच खाली केल्यावर मस्त गूड इव्हिनिंग वगैरे म्हणाले. कागदपत्रं दाखवल्यावर मग मला बाहेर येऊन 'चल जरा कोप-यात' असं म्हणतो की काय असंही वाटलं. पण तसं काही झालं नाही. त्याच्या मागे मागे त्याच्या गाडीपर्यंत गेल्यावर तो म्हणाला, "अरे विशेष काही नाही. २५ मैलाची मर्यादा होती. तू जरा जास्तच जोरात चालला होतास. तिकिट देत नाहिये तुला, वॉर्निंग देऊन सोडून देतो आहे." "हं, सुटलो. आणि मला माझा मित्र अजून स्पीड वाढवायला सांगत होता!" मग पोलिसाबरोबर गप्पांचं सेशन झालं. काही म्हणा, अमेरीकन लोग भलतेच गप्पीष्ट. रात्री अकरा वाजता, ओस पडलेला कुठल्यातरी हायवे, ही काय, "काय जेवलात आज?" असं विचारण्याची जागा आहे?. पण काय करणार. सगळ्या गप्पा झाल्या, कुठे कामाला आहे, मूळचा देश कुठला, कुठल्या शाळेत शिकलो, माझ्या आवडत्या सरांचं आणि नावडत्या भाजीचं नाव काय, सगळं सांगून झालं. तोपर्यंत मग त्यानी तो वॉर्निंगचा कागद फाडला, गूड नाईट म्हणालो तेव्हा कुठे मग त्यानी मला जाऊ दिलं.

तर सांगायची गोष्ट काय, तर जेव्हा ते निळे-पांढरे दिवे दिसले आरशात तेव्हा अगदी म्हणजे अगदी हॉलीवूडच्या सिनेमात असल्यासारखं वाटलं. फक्त वेग १५० मैल नसून फक्त ३५-४० मैल होता! तो वॉर्निंगचा कागद अगदी जपून मी इकडे घेऊन आलो आहे. फ्रेम करून कुठे तरी लावावी असा विचार आहे, बघू या...

अमेरीकेबद्दल अशा माझ्या ब-याच कल्पना होत्या. प्रत्यक्ष तिथे जाऊन आल्यावर त्यातल्या सगळ्याच काही ख-या नव्हत्या असं लक्षात आलं. मागे मलेशियाच्या छोट्या ट्रिपनंतर, "अच्छा! म्हणजे परदेशातले लोकही बाल्कनीत कपडे वाळत घालतात तर!" हे नवे ज्ञानकण आम्ही वेचले होते. अमेरीकेबद्दल, "तिथे म्हणजे बाहेरसुद्धा अगदी A/C त असल्यासारखं वाटतं म्हणे" अशी माझी काहिशी वेडगळ समजूत होती. तिथे गेल्यानंतर, ऍरीझोनाचा उन्हाळा सहन केल्यावर ती वेडी संकल्पना फक्त मनात ठेवण्याइतपत बरी आहे याची जाणीव झाली. 'तिकडे' जाऊन आलेल्यांबद्दल असं सारखं (टोचून) बोललं जातं की, "काय अमेरीकेला जाऊन आलात, आता काय फक्त पेप्सी आणि कोका-कोला पिणार तुम्ही. तिकडे पाणी मिळत नाही असं ऐकून आहोत आम्ही". ह्या तिरप्या बोलण्यालाही काही आधार नाही हेही कळलं. "वॉटर--नो आईस, प्लीज" असं म्हटलं की पाणी मिळतं हे आम्ही लगेचच शिकलो!

अशा काही कल्पना ख~या-खोट्या ठरवल्यानंतर काही नव्या गोष्टींचीही भर पडली. बेसबॉल या खेळात नेमकं काय करायचं असतं याची काहिही कल्पना नव्हती. परत येईपर्यंत वर्ल्ड सीरीज फायनलचे स्कोर बघण्यापर्यंत प्रगती झाली. तिच गोष्ट अमेरीकन फुटबॉल या खेळाची. लोकांकडून मिन्निआपोलीस, सॅन होजे, ऑस्टीन, सिऍटल, ऍटलांटा अशी शहरांची नावं एकामागून एक ऐकली जायची. मात्र ती सगळी अमेरीकेतली गावं आहेत, पण पूर्वेकडे की पश्चिमेकडे याचा भूगोलही शून्य होता. आता ब~याच रा्ज्यांच्या प्रमाणवेळांचीही चांगलीच माहिती झाली. डेमोक्रॅट की रिपब्लिकन या डाव्या-उजव्या विचारसरणीचाही बराच अभ्यास झाला. जाण्यापूर्वी यातही मला काहीच गती नव्हती!

सगळ्या रीतीभाती एकवेळ समजून घेता येतील, मात्र दुकानांमध्ये (विशेषतः कपडे किंवा बूटांच्या) पैसे देऊन झाल्यानंतर, "रीसीट बॅगमधे ठेवलेली आवडेल की तुमच्याकडे देऊ" असं विचारण्याची काय पद्धत आहे हे सात महिन्यांनंतरही मला उलगडलेलं नाही. "कुठेही ठेवा!!! काय फरक पडतोय? पैसे तर प्रचंड लावलेच ना!" असं पुणेरी उत्तर द्यावं असं ब~याच वेळा वाटूनही गेलं. पण उगीच संभाषण न वाढवता मी काढता पाय घ्यायचो. गप्पांमधे अडकलो, तर पुन्हा नावडत्या फळांची जंत्री म्हणून दाखवायला लागायची!

रविवार, सप्टेंबर १६, २००७

जावे त्यांच्या देशा...

(भाग ३)
(भाग १ व २ इथे आणि इथे वाचा)

"रांग" या सामाजिक वृत्ती-कम-सोयीबद्दल मला नेहमीच भीती वाटत आलेली आहे. ऍडमिशनची असो वा टेलिफोन/वीज बिलं भरण्याची, रेल्वे तिकिटासाठीची किंवा शाळेत पीटीच्या तासाला केलेली -- रांग मला मानवत नाही. रांगेत आपण कोणाच्या तरी मागे किंवा पुढे असतो-- त्यांच्या बरोबर नसतो! अशाच Emigration Check च्या रांगेत मी उभा राहिलो तेव्हा पावणे अकरा वाजून गेलेले होते आणि पोटात कावळे ओरडायला सुरूवात झाली होती. माझ्या पुढे अजूनही तीन-चार लोक होते; आणि Emigration Check मध्ये नेमकं काय करतात याचं निरीक्षण करण्यात मी दंग होतो.

माझ्या पुढे रांगेत असलेला माझा मित्र (ज्याच्या पासपोर्टबरोबर मी माझा पासपोर्ट पडताळून पाहिला होता) E.C. पार करून गेला आणि आता मात्र आपण special ठरू शकत नाही याची खात्री पटली. त्या आत्मविश्वासात मी पुढे सरसावलो. Emigration Check करणारा Clerk म्हणजे एक ध्यानच होतं. त्याचं English मला समजेना आणि माझं त्याल. भारतातून निघतानाच ही अवस्था तर तिकडे परदेशात कसं होणार अशी शंका डोकावली; पण त्याहूनही महत्त्वाचं तो मला काहीतरी दाखवू लागला, आणि ते समजावून घेण्याचा मी प्रयत्न करू लागलो. "तुझ्या पासपोर्ट वर ECNR (Emigration Check Not Required) चा शिक्का खोडलेला आहे. तू जाऊ शकत नाहीस," असं "काहीबाही" तो मला सांगू लागला. "अहो, पण आत्ताच तर तुम्ही माझ्या त्या मित्राला clear केलंत... त्याच्या पासपोर्टवरसुध्दा असंच आहे, तेव्हा मलाही जाऊ द्या," मी असं म्हणालो आणि हा गडी गोरामोरा झाला. "त्याला परत बोलाव पाहू" असं जेव्हा तो म्हणाला, तेव्हा (उशिराने का होईना) मी जीभ चावली.चांगला पास झालेला बिचारा, त्याला मी परत बोलावलं आणि आमच्या या गड्याने त्याचा बोर्डींग पास आणि पासपोर्टवरचा शिक्का दोन्ही रद्द केले, आणि आम्हाला त्याच्या वरीष्ठासमोर उभं केलं. बोंबला आता!

या सगळ्या प्रकरणाची आम्हाला कल्पना नव्हती. "You are offloaded. Go home now," असं जेव्हा तो ऑफिसर म्हणाला तेव्हा जोरदार सायरन वाजायला लागले. "असं कसं---आमची सगळी तिकिटं, हॉटेल बुकिंग सगळं काही तयार आहे, आमचे मॅनेजर तिकडे विमानात जाऊन बसलेत, आम्ही दोनच दिवसांसाठी चाललो आहोत, ही पहा परतीची तिकिटं" यातलं काहीसुध्दा तो ऐकून घ्यायला तयार नव्हता. "पासपोर्ट वर ECNR चा शिक्का दाखवा नाहीतरी घरी जाऊन निवांत झोपा," असा एकंदरीत त्याचा बाणा होता.

आता काय करायचं? सगळ्या trip चा असा विचका होताना समोर दिसत होता. आमचे बाकीचे सहकारी पुढे गेलेले. लाचलुचपत करावी तर खिशात शंभराची एक नोट आणि काही नाणी उरलेली (मित्राकडे दोनएकशे होते) -- सगळे पैसे देऊन परदेशी चलन घेतलेलं आणि ते दुस-याच मित्राकडे, तो आत जाऊन बसलेला. प्रसंग मोठा बाका आणि अर्थातच special!

खूपदा "जे घडतं ते भल्यासाठीच" ही कहावत खरी ठरते. खरी ठरते किंवा ती खरी आहे असं वाटतं तरी. या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात ती खरी ठरली हे आमचं भाग्यच.

त्या ऑफिसरचे अग्निशमन करण्याचे आम्ही जोरदार प्रयत्न सुरू केले. Travel Desk ने आम्हाला आधीच सांगायला हवं होतं, आमचा पासपोर्ट नीट बघायला हवा होता इत्यादी. पण तेही तो ऐकून घ्यायला तयार नव्हता. तुमच्या Travel Deskची चूक पोटात घेऊन मी अजून चुका करू का असं तो विचारायला लागला. त्याचंही बरोबरच होतं. चूक आमची होतीच. प्रश्न एवढाच होता की तिथल्या तिथे सुधारता येणार होती का?

इंजिनियर असल्यामुळे आम्ही प्रत्येक बाजूचा सखोल विचार करून पाहिला. "साम-दाम-दंड-भेद" च्या चालीवर "Please!, Why?, Won't do again, We understand and accept our mistake, but let us go this time," अशी निरनिराळी गाणी गाऊन पाहिली, पण सगळ्या रचना फ्लॉप!

Flight ची वेळ टळून गेलेली. साडेअकराच्या सुमारास Singapore Airlines वाले आमच्या शोधात आले. त्यांनाही या ऑफिसरने झापलं. "बोर्डिंग पास देताना पासपोर्ट नीट बघता येत नाही का तुम्हाला?" या क्षणी आम्ही एक रिस्क घेण्याचं ठरवलं. मी म्हणालो "तुमच्याच clerk नी या माझ्या मित्राला clear केलं होतं. बरं तर मी आपण होऊन त्याला परत बोलावलं. त्याला तरी जाऊ द्या. आणि असं दिसतंय की हा चेक अगदीच काही strict नाहीये, तेव्हा त्याला सोडलं तसं मलाही सोडा!" आमच्यातल्या एकाला सोडलं होतं हे ऐकून साहेब जाम चिडले. त्या नामी clerk ला बोलवून (कन्नडामध्ये) असा काही झापला की विचारायची सोय नाही. आमच्यावरचं संकट त्यानं आपल्या अंगावर घेतलं होतं. अखेरीस ११:३५ वाजता "आमची एक चूक झाली म्हणून तुम्हाला सोडतोय- खबरदार!" अशी आम्हाला समज देऊन त्यानं शेवटी clear केलं.

त्यानंतरची दोन मिनिटं exactly कायकाय झालं ते आठवत नाही. Singaport Airlines च्या लोकांनी खास fast-lane मधून आम्हाला नेलं आणि धावतच आम्ही विमान गाठलं.

उड्डाणाची घोषणा झाली तेव्हा ११:४५ आणि प्रत्यक्ष उडालो तेव्हा १२ वाजून गेले होते. आम्हा दोघांना विमानात पाहून आमच्या बॉसच्या आणि बाकीच्या दोन सहका-यांच्या डोळ्यांतला आनंद लपत नव्हता. चांगले दहा-बारा निश्वास आणि ग्लासभर ऑरेंज ज्यूस इतकं होईपर्यंत माझा "मी खरंच उडालोय" यावर विश्वास बसत नव्हता.

... आणि झालेला आनंद त्या प्रचंड Boeing 777 जंबो जेटमध्येच काय तर बाहेरच्या त्या शांत झोपी गेलेल्या आभाळातही मावणारा नव्हता!

(समाप्त)

शनिवार, सप्टेंबर १५, २००७

जावे त्यांच्या देशा...

(भाग २)

(भाग १ इथे वाचा)

तसा माझा स्वभाव शिस्तप्रिय आहे. म्हणजे अगदी कगदोपत्रीसुध्दा आमच्या appraisal च्या खणात discipline हा माझा नेहमीच प्लस पॉईंट असतो. नेमकी यावेळी थोडी शिस्त मोडायची बुध्दी झाली -- संध्याकाळी निघायचं आणि packing-तयारी काहीही झालेली नाही असं यावेळी घडलं. ऑफिसचं वाढतं काम आणि त्या कामातली शिस्त यातून वेळच काढता आला नाही. झालं! मग laundry तून कपडे आणणे, इस्त्री, camera तले cell विकत आणणे, महत्त्वाच्या कागदपत्रांचे print-out, सगळी एकच धांदल.एक चांगली गोष्ट म्हणजे एकूण दौरा तीनच दिवसांचा असल्यामुळे तशी खूप काही तयारी करायची नव्हती.

सगळं आवरून भारत-इंग्लंड ही लॉर्डसवरची शेवटची मॅच बघत बसलो होतो. (नेहमीप्रमाणे) आईनी "वेळेच्या आधीच जा तासभर" असा मौलिक सल्ला दिलेला खरा; पण इतर अनुभवी सहका-यांच मत रात्री ११-१५ च्या flight साठी ९ वाजता पोहोचलो तरी आराम असतो असं पडलेलं, त्यामुळे शेवटी ८-३० ला घरून निघालो तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा पराभव दिसायला लागलेला होता. परदेशी जा, घरी नाशिकला जायला निघा किंवा संध्याकाळी इथेच सिनेमाला जा, रीक्षावाल्यांना त्याचं काही सोयर-सुतक नसतं. ते येणार नाहीत म्हणजे नाहीत! तसा माझ्या घरापासून विमानतळ अगदी जवळ आहे; तरीही (किंवा म्हणूनच) ते येणार नाहीत. रीक्षाच्या भाड्याचं गणित फार क्लिष्ट असंत. दिवसाची वेळ, तुमच्याकडचं सामान, तुम्हाला कितपत घाई आहे आणि रीक्षावाल्यांचा पत्त्यांचा डाव किती रंगलेला आहे याप्रमाणे भाडं २५ रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत बदलतं. शेवटी एक भला (आणि भला मोठा!) रीक्षावाला ३० रुपयांत जायला तयार झाला आणि माझ्या प्रवासाची सुरुवात झाली!

शनिवार संध्याकाळची वेळ होती पण रस्त्यावर तशी फारशी रहदारी नव्ह्ती (कारण कदाचित क्रिकेट मॅच असेल? पण ती तर हरायला टेकलो होतो!) साधारण पावणेनवास आमचं (म्हणजे मी, रीक्षा आणि रीक्षावाला) विमानतळावर आगमन झालं. बाहेर पाहतो तर ही गर्दी. म्हणजे, मला सोडायला खरं तर इतक्या जणांनी (आणि जणींनीसुध्दा!) यायची तशी काहीच गरज नव्हती, दोन दिवसांत परत तर येणार होतो मी, पण तिथे मात्र गर्दी मी म्हणत होती. लवकरच लक्षात आलं की ही गर्दी काही मला बाय करायला आलेली नाहिये, तर स्वतः परदेशगमनासाठी गोळा झालेली आहे. बघताबघता लांबच लांब रांग तयार झाली आणि प्रामाणिकपणे मी आणि माझे इतर सहकारी त्या रांगेच्या शेवटी जाऊन उभे राहिलो.

"फारच गर्दी आहे बुवा," "एवढी गर्दी नसते नं कधीच international departure साठी," माझ्या सहका-यांचं हे निरीक्षण ऐकून माझी चुळबूळ सुरु झाली. मी म्हणजे काही special व्यक्तिमत्त्व नाहीये; पण अशा मोक्याच्या प्रसंगांत मी स्वतःला special सिध्द करण्यात बरेचदा यशस्वी झालेलो आहे. मागे एकदा दिवाळीच्या वेळी घरी जाताना आख्ख्या बंगलोरनी मला special ठरवलं होतं आणि असा काही ट्रॅफिक उभा केला होता की शेवटी माझी ट्रेनच हुकली होती.

यावेळी flight चुकण्याचे संकेत अजून तरी दिसत नव्हते; पण special असण्याची कुणकुण मात्र लागली होती. गंमत म्हणून, "पाहू, तुझा पासपोर्ट पाहू" असं म्हणून मी एका सहकारी मित्राच्या पासपोर्टबरोबर माझ्या पासपोर्टची comparison करून घेतली होती. त्यात special असं काही सापडलं नव्हतं. विमान उडेपर्यंत असं special काही सापडू नये अशी माझी प्रार्थना मात्र सुरू होती. काहीतरी missing होतं (hair-oil विसरलो होतो; पण त्याही व्यतिरीक्त!) एवढं खरं.

exactly काय missing होतं हे समजायला अजून एक तास अवकाश होता.

साडेनवाला पहिल्या हवालदाराला e-ticket दाखवून आम्ही पुढच्या रांगेत प्रवेश केला. फक्त carry-on सामान असल्यामुळे एका छोट्या रांगेत आमचं प्रमोशन करून Singapore Airlines नी आम्हाला खूष करून टाकलं. मग इकडच्या तिकडच्या गप्पा : सचिन तेंडूलकरनं retire व्हावं की नाही, बंगलोरचा ट्रॅफिक आणि पाऊस, आंतरराष्ट्रीय बाजारातले क्रूड ऑईलचे भाव आणि बाजरीवरची कीड (नाही, कीड नाही) यावर चर्चा करत अर्धा तास आम्ही काढला. सव्वा दहाच्या सुमारास मग माझा नंबर आला - आता बोर्डिंग पास मिळणार होता. माझा पासपोर्ट पाहिल्यावर बोर्डिंग पास माझ्या हातात ठेवेपर्यंत त्या attendant नी एक-दोनवेळा माझ्याकडे आणि त्याच्या समोरच्या screen कडे नजरानजर केली. एका सहाय्यकाला बोलावून घेतले, माझ्यावर अर्धी नजर ठेवत काहीशी कुजबूज केली. माझ्या नाडीचे ठोके जरा जलद झाले खरे; पण "have a pleasant flight" हे गोड शब्द कानावर पडताच, बोर्डींग पास नीट खिशात ठेवून मीही एक छान (आणि गडगडाटी) हास्य करत मी escalator कडे पळालो.

एवढं होईपर्यंत साडेदहा वाजून गेले होते. पुढचा टप्पा: परदेशी चलनाचा. तिथेही लांबलचक रांग! short-cut म्हणून आम्ही सगळ्यांनी पैसे एकत्र केले आणि रांगेत सगळ्यांत पुढे असलेल्या आमच्याच सहकारी मित्राकडे सुपूर्द केले. तिथेही पंधरा-वीस मिनिटं मोडलीच. पावणेअकरा वाजून गेलेले आणि emigration check आणि security check असे दोन पडाव उरलेले. मोठं Boeing 777 विमान मी कधीच पाहिलेलं नव्हतं. उत्सुकता होतीच, आणि पहिलाच परदेशगमनाचा प्रसंग असल्यामुळे उत्साहही मोठा!

"उरलेल दोन checks पूर्ण केले; आणि वाढत्या उत्साहात मग विमानात प्रवेश केला. विस्फारलेल्या नेत्रांनी ते भलं मोठं विमान न्याहळीत त्यातलं आपलं स्थान शोधत पुढे सरकलो. बसायची जागा सापडल्यावर, सामान नीट वर ठेवून आराम बसलो. मोठा काटा तीनावर सरकला आणि उड्डाणाची घोषणा झाली. सीटबेल्ट घट्ट केले आणि मी परदेशगमनस्थ झालो"

एवढंच लिहून हा भाग संपवला तर ते special ठरणार नाही. आपण special कसे आहोत हे त्यातून सिध्द होणार नाही. आत्तापर्यंत करत होतो ती "मी special नाही, मला जाऊ द्या" ची प्रार्थना संपवण्याची वेळ झालेली होती. त्या प्रार्थनेचा आज मला उपयोग होणार नव्हता हे लक्षात आलं....

आणि लगेचच, जिथे विमान उभं होतं, माझा इंतजार करत होतं, तिथपासून १०० मीटर अंतरावर माझी एक प्रमुख भूमिका असणारं चमत्कृतीपूर्ण आणि थरारक नाट्य सुरू झालं.

(क्रमशः)

जावे त्यांच्या देशा...

(भाग १)

नोकरीची जवळजवळ दोन वर्षं पूर्ण झाली आणि पहिल्यांदाच परदेशवारीसाठी माझ्या नावाची चर्चा सुरू झाली. सगळ्याच बाबतींत काही आपण अंतःक्रमांक योगात जन्मलेलो नाहियोत अशी जराशी खात्री पटली आणि तोपर्यंत आम्हांस VISA application च्या मागे लागा असा आदेश मिळाला. मिळालेल्या आदेशांचे अगदी नीटपणे पालन करणा-यांतला मी एक असल्यामुळे मी लगेचच हालचाल सुरु केली. नकटीच्या लग्नात म्हणे सतराशे साठ विघ्नं येतात - (माझ्या मते!) मी नकटा नसल्यामुळे (आणि परदेशगमन म्हणजे काही लग्न नसल्यामुळे) माझ्या मार्गात सतराशे साठ नाही पण (सुदैवाने) फक्त तीन-चारपेक्षा जास्ती काही विघ्नं आली नाहीत. जे एक मोठं विघ्नं आलं आणि त्याचं हरण मी कसं केलं ते ओघानं येईलच.

मलेशियाच्या राजाला माझे आधीचे, छान निळ्या background वर काढलेले फोटो पसंत पडले नाहीत. ते पसंत नाहीत असं कळल्यावर मग फोटोसाठी धावपळ सुरु झाली. "एकदम अर्जंट देतो - उद्या या" असं म्हणणा-या एका उत्साही छायाचित्रकाराकडून मी माझा अवतार पांढ-या background वर चित्रित करून घेतला. आमच्या travel desk च्या (सदैव इतराची तिकिटे काढून देणा-या पण स्वतःला कधीच भारताबाहेर न जाता आल्यामुळे वैतागलेल्या) मितभाषी वल्लींबरोबर आमचा वार्तालाप सुरु झाला. आमच्यासाठी ती देवमाणसंच होती -- आमचा passport, credit कार्डाचा नंबर, सगळं काही आम्ही त्याच्या हवाली केलं होतं. "एक-दोन दिवसांत मिळेल" पासून ते "मलेशिया ना? दहा दिवस जास्तीत जास्त!" अशी आमच्या visa बद्दलच्या प्रश्नांवर अनेकविध उत्तरं आम्हाला त्या travel desk च्या छोटेखानी खोलीत मिळाली. त्यानंतर आलं विमानाचं तिकिट-- एक अत्यंत किचकट असा फॉर्म भरून आम्ही त्यांना दिला होता. त्यात अनेक बिनकामाचे कुचकामी प्रश्न होते. "आवडती भाजी, नावडता मासा, किंवा आवडता रंग-पान-फूल पासून जन्मवेळ आणि रास" एवढ्याच गोष्टी विचारायचे बाकी ठेवले होते. त्या फॉर्मचे प्रयोजन केवळ क्रेडीट कार्डाचा नंबर आणि इतर तपशील पुरवणे इतकाच आहे असे कळल्यावर आम्ही तो फॉर्म भरण्यात एवढा वेळ का घालवला हे नवे कोडे आम्हाला पडले. मग हॉटेल बुकिंग झालं. एक हॉटेल तिथल्या "Little India" भागापासून हाकेच्या अंतरावर आहे असं लक्षात आल्यावर पहिल्यांदा आम्ही ते आमच्या list मधून काढून टाकलं. ऑफिसपासून चांगलं १५-२० किलोमीटरवर असणारं, समुद्रकिना-यावरचं "Hotel Evergreen Laurel" यावर आम्हा चौघांचं एकमत झालं.

दिवस भराभर सरत होते आणि रोज रोज Visa ची चौकशी करायचा कंटाळा येऊ लागला होता. शेवटी उड्डाणाच्या एक दिवस आधी संध्याकाळी चारपैकी तिघांचा visa त्या छोट्या खोलीत अवतीर्ण झाल्याची वार्ता आम्हाला लागली. तो चौथा अभागन मीच याची मला खात्री असल्यामुळे जेव्हा travel desk वाले मला म्हणाले की "Mr Ajit ना? तुमचा visa 'चुकून' Nokia च्या ऑफिसमध्ये गेला आहे... आत्त इतक्यात कधीही तो येईल!", तेव्हा मला त्याचं काही विशेष वाटलं नाही. संध्याकाळ जशी होत गेली तसतशी मात्र मला चिंता वाटायला लागली. शेवटी संध्याकाळी ऑफिस बंद करायच्या वेळी मी travel desk वाल्यांना गाठलं आणि त्या सुजनांनी visa चा stamp असलेला तो मौल्यवान visa आणि एक सुखद धक्का मला दिला.

माझ्या पहिल्या वाहिल्या परदेशगमनाची कथा-कहाणी इथे सुरु झाली.

(क्रमशः)

रविवार, मे १३, २००७

बांबुवंत

बंगलोरहून केरळात उतरताना बरीच जंगले लागतात. वायनाडचा घाट लागण्याआधी जंगलातून जाणा-या संस्मरणीय रस्त्यावर जागोजागी "इथे थांबू नका"च्या पाट्या आहेत. वाघोबा (आणि साथीला हत्ती) येऊन तुम्हाला उचलून पाहुणचारासाठी घेऊन जातील, अशा साधारण अर्थाची ती पाटी आहे. पण धीर करून आम्ही तिथे थांबलोच. थोडंसं जंगलात चालून गेलो तर ओढा (यास कवी निर्झर असे म्हणतात). आणि ओढ्याच्या कडेने सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वेडीवाकडी वाढलेली आंब्याची झाडे! एक-दोन कै-या पाडून दात आंबवण्यासारखे सुख नाही - तेही अशा घनदाट, किर्र-किर्र असं सतत पार्श्वसंगीत देणा-या रातकिड्यांच्या संगतीत.

हा जंगलातला रस्ता बांबूच्या झाडांतून कोरून काढला आहे की काय असे वाटावे इतकी बांबूची झाडे आहेत. आणि एकेक बेट म्हणजे शंभर-दोनशे बांबू! हळूच कुठे शीळ ऐकू येते की काय असा अंदाज घेतला, पण ऐकू काही आली नाही शीळ. इथे इतके बांबू आहेत की त्यांचा उद्योग केला तर नक्कीच बक्कळ पैका कमवू शकू. पण समजा, वादळात इ. खूप नुकसान झालं तर आली की दिवाळ्याची आफत. सुसाट वा-याने एखाद्या यशस्वी बांबुवंताची बांबूची बने अशी पार बसवली तर भयंकर नुकसान.. कदाचित यातूनच "बांबू बसला - बांबू बसला" असा वाक्प्रचार प्रचारात आला असावा!




असो!

रविवार, डिसेंबर १७, २००६

बेळगावी

काही कारणास्तव नुकताच बेळगावी जाण्याचा चान्स मिळाला. लोणी, हवा आणि व्यापार-उदिम अशा मुख्य कारणांसाठी कमी; मात्र 'सीमा' या ज्वलंत कारणासाठी सतत चर्चेत असणारं हे गाव!

बेळगावचे 'बेळगावी' असे नव्याने बारसे का केले गेले असावे हा एक प्रश्नच आहे. तशी कानडीत 'गावे' कमीच: हळ्ळी असतं, पाल्या असतं, 'उर' (चित्तूर सारखे) असतं; पण 'गाव' मात्र दुर्मिळच. हे एक कारण असू शकतं. ते दुर्मिळ तरी कशाला ठेवायचं म्हणून त्याच्या नावात ई जोडला गेला असावा.

बेळगावच्या गल्ली-बोळात (Duracel या बॅटरीसाठी) फिरताना अनेक मजेदार गोष्टी बघायला मिळाल्या. कुठे रीट्झ थिएटर दिसतंय का ते पाहतच होतो; पण तो भाग निराळाच असावा. त्याऐवजी, लाकडाची वखार (आता केवळ पाठ्यपुस्तकांमध्ये चित्र दाखवण्याइतकी दुर्मिळ झालेली) बघायला मिळाली (थिएटर आणि वखारीचा संबंध नाही: ठाऊक आहे!). आम्ही गेलो होतो त्या भागाला 'गोवा वेस' म्हणायचं - गोव्याकडे असलेलं बेळगावचं ते एक टोक असावं. एका मंदिराच्या पुढे "येथे मोबाईल फोन व कॅमेरा वापरण्यास मनाई आहे" अशी पाटी तर एका घराबाहेर "येथे १००% सुती साड्या मिळतील" अशी पाटी दिसली. तिथं कुठं सेलचा कुठे होलसेल सेल लागलाय काय या शोधात आम्ही होतो; परंतु बऱ्याच भटकंतीपश्चात, फोटोग्राफीच्या दुकानातही आम्हांस ते सेल न मिळाल्यामुळे सपशेल निराशाच झाली. पण एकंदरीत बेळगावच्या सुखद हवामानातली ती छोटीशी रपेट तिथल्या 'सकाळ'मधल्या बातम्यांइतकीच रंजक वाटली.

तिथल्या लोकल 'सकाळ' मध्ये एका लोकल चॅंपियनने इराणच्या कुस्तीगिराला कसं सपशेल चितपट केलं याची सचित्र बातमी होती. ह.भ.प. चौगुले यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन (यांनी अनेक व्यसनी तरुणांना सन्मार्गी लावले) केले गेल्याची बातमी होती. बच्चू नावाच्या कोण्या लोकल राजकारण्याने म्हणे पाण्याच्या टाकीवर आपले आंदोलन पुकारले होते. त्याची समजूत काढण्यासाठी खुद्द महाराष्ट्राचे गृहमंत्री कसे आले याचेही पाणीदार वर्णन होते. त्याचबरोबर त्या पेपरातील "दहावी अभ्यासमाला" मधले महाकठीण प्रश्न! प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले असूनही निम्म्याहून अधिक प्रश्नांमध्ये आम्ही नापास गोळे ठरलो. असं असताना कुठल्या 'गाढवाने' आम्हाला नोकरी दिली असा दुसऱ्याच्या क्षमतेवरच शंका घेणारा प्रश्न अस्मादिकांना पडला; ते साहजिकच होतं.

सेलच्या फेल मोहिमेनंतर आम्ही परत आलो तेव्हा अजून एक मनोरंजक पाटी दिसली. जिथे उतरलो होतो त्या ठिकाणाच्या शेजारीच एका व्यायामशाळेचा बोर्ड होता. नाव होतं, "मातोश्री जिम." टि. व्ही. समोर पडून शक्तिप्रदर्शक आणि कौशल्याचे खेळ तासंतास फक्त पाहणाऱ्या (माझ्यासारख्याच!) मुलांसाठी खास असा हा जिम असावा. मातोश्रींच्या समाधानासाठी का होईना व्यायामशाळेत जायचं ठरवलं तर जावं ते "मातोश्री जिम" मध्ये!

अरे हो, काय ते बेळगावाहून कुंदा आणि धारवाडहून पेढे आणायचं मात्र राहूनच गेलं की हो!

गुरुवार, फेब्रुवारी २३, २००६

यातायात

माझे office माझ्या घरापासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. बेंगलोरच्या मानाने ८ हा काही फार मोठा आकडा नाही. पण खरं सांगायचं तर बेंगलोरमध्ये अंतर हे वेळेत मोजतात, उदाहरणार्थ, माझे office माझ्या घरापासून सकाळी ७ वाजता १० मिनिटांवर असते, तर सकाळी ९ वाजता तेच office कमीत कमी अर्धा तास अंतरावर असते.

यामध्ये फार मोठा वाटा हा रहदारीचा आहे, रस्ता तोच, पण रहदारी दर पंधरा मिनिटांनी दुप्पट होत असते. असो, त्याबाबत माझी तक्रार नाही. या भागातली एकूण सगळी offices लक्षात घेतली तर ते अगदी साहजिकच आहे.

मुद्दा हा, की तेवढीच वाहनसंख्या दिली असताना, वेळ कमी कसा करायचा, जेणेकरून officeला पोहोचेपर्यंत इतका शीण येऊ नये की लगेचच परत घरी जावेसे वाटेल (अर्थात असे वाटले तरी परतीचा प्रवास सुखकर ठरणार नाही ही गोष्ट निराळीच).

माझी काही निरीक्षणे अशी आहेत -

signal वर वेळेचे counters देऊन बेंगलोर म.न.पा.ने खूप मोठी सोय करून दिलेली आहे; पण त्याचा फायदा चालक बिलकूल घेताना दिसत नाहीत. दिवा हिरवा झाला की मग पहिले वाहन signal पार करेपर्यंत पाच ते दहा सेकंद गेलेले असतात. संपूर्ण signal चा कालावधी जर अवघा ४५ सेकंद असेल, तर सरळसरळ १०-१५% वेळ यात वाया गेलेला आढळून येईल.

अजून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पादचाऱ्यांचे वर्तन. वाहनांसाठी signal लाल असताना पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडला तर त्यास कोणी हरकत घेणार नाही. पण सगळ्यात जास्त "घाई" कोणाला असेल तर अशा बेशिस्त पादचाऱ्यांना. त्यांना वाटते थोडासा speed कमी करून मला जाऊ दिले तर या चालकाचे काय बिघडणार आहे? बरोबर आहे, रहदारी तुरळक असेल तर हे पूर्णतः बरोबर आहे. पण ४५ सेकंदाच्या तुटपुंज्या कालावधीत फक्त पाच पादचाऱ्यांनी प्रत्तेक हिरव्या खेपेला अशी अपेक्षा केली तर एकूण वाहतुकीच्या वेगावर फार मोठा परीणाम होणार आहे. आणि तो होतोच. शिवाय चालक वैतागतो. त्यातच मग कधीकधी clutch निसटतो आणि गाडी बंद पडते. अशा वेळी मागची वाहने horn वाजवून वाजवून त्यास/तीस मग बेजार करून टाकतात.

याचे मानसिक परीणाम पण होतात. पुढच्या वेळेस, मागच्या अनुभवाचा "बदला" घेतला जातो इत्यादी. हे सारे viscious circle आहे. कुठेतरी ते मोडले गेले पाहिजे.

साधी वाटणारी ही शिस्त जर अर्ध्या लोकांनी जरी पाळली तरी प्रवासाची ही यातायात कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

तुमची मते?

मंगळवार, नोव्हेंबर ०८, २००५

नाशिक-पुणे द्रुतगती प्रवासाचे वर्णन

सकाळी ११:४० ला पुण्याहून उद्यान एक्स्प्रेस निघते. बंगलोरला परतण्यासाठी ही एकच "सोयी"ची गाडी. त्याच दिवशी पहाटे नाशिकहून मी पुण्याला येण्यासाठी निघतो. पहाटे ५:३० ची "एशियाड" बस मिळते. पूर्वी पहाटे ५ लाही एक बस असायची; पण आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहित. जर बस उशिरा पोहोचली पुण्याला तर रेलगाडी चुकणारच. आणि यावेळी आमचा तसाच योग येतो की काय अशी पाळी आली!

५:३० ची बस ५:३० ला निघाली तरच आश्चर्य! त्यात मी सीट मिळायलाच हवी म्हणून आधीच अर्धा तास येऊन बसलो होतो स्टॅंडावर. बसमध्ये वाहक नसणे याचा एक सीट वाचवणे याच्यापेक्षा फारसा काही उपयोग नाही. उलट संगमनेर-नारायणगाव स्थानकांमध्ये चढणाऱ्या प्रवाश्यांना तिथल्या "लोकल" वाहकाची वाट बघत बसावे लागते. असो.

तर ५:३० च्या आमच्या विनावाहक बसचा चालक बस पूर्ण भरेपर्यंत बसून होता. मग हो-नाही म्हणत शेवटी ५:४० च्या सुमारास बस निघाली. आणि मी (पहिला) नि:श्वास टाकला. आता या पाच-साडेपाच तासांच्या प्रवासात काय काय होऊ शकते ते पहा -

- बस नाशिक स्थानकातून बाहेर पडते न पडते तोच एका मारुती कारने आमचा पाठलाग करून आम्हांस थांबवले. मग गाडीतून एक (उमदा) तरुण उतरला, आपली बॅग सावरत बसच्या दाराशी झटापट करून झाल्यावर आत येऊन बसला. त्यात आणखी २ मिनिटे गेली. (तसा गाडीचा वेग जेमतेमच होता, त्यामुळे २ मिनिटांमध्ये काही फारसे अंतर कापले नसतेच, पण असो)

- नाशिकरोड स्थानकात, काहीही कारण नसताना गाडी जातेच. मग ती नाशिकलाच पूर्ण भरुन निघालेली का असेना. तिथे भोज्याला शिवले नाही तर पुणे महामार्गाला जाऊ देतच नसावेत. महामार्गाला गाडीचा चक्रस्पर्श झाला तेव्हा जवळजवळ सहा-वीस झालेले होते.

- विनावाहक गाडीने संगमनेरात मोठ स्टॉप घेणे अपेक्षित नाहिये. पण ७:२० ला जेव्हा आमची गाडी संगमनेरी दाखल झाली तेव्हा "इथे पाच मिनिटे गाडी थांबेल" अशी घोषणा करुन वाहक दिसेनासा झाला. इकडे माझ्या काळजाचे ठोके जलद होत होते. ११:१५ पर्यंत तरी पुणे गाठायलाच हवे होते.

- गाडी थांबली की खाली उतरलेच पाहिजे असा काही प्रवाश्यांचा समज असतो. मग कुठे गोळ्या बिस्किटे घे, पोरांना "शू" करायला घेउन जा, काही नाही तर लोकल कंडक्टरबरोबर गप्पा-टप्पा कर, याशिवाय प्रवास पूर्ण होत नसतो अशी यांची समजूत असते. मग अशा नगांमधले काही नग वाहकाने गाडी चालू केली, दार प्रचंड आवाज करुन ओढून घेतले तरी गाडीत परतलेले नसतात. मग आतले सहप्रवासी आरडाओरडा करून वाहकाचे ईंजिनच बंद पाडतात. आपल्याला नको असले की हमखास असे प्रसंग घडतातच. यावेळी तर मला अशा हरकती बिलकुल नको होत्या. त्यामुळेच, हे सगळं यथासांग पार पडल्यानंतरच, म्हणजे जवळजवळ ७:३० ला आम्ही संगमनेर सोडले.

- अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे खादंती. यास खास मराठीत "फक्त चहा घेऊ" असेही संबोधले जाते. जवळजवळ अर्धा रस्ता पार झाल्यावर मग सगळ्यांच्या "चहा"ची वेळ झाली. इथे माझी चहा-कॉफ़ी कसलीच इच्छा नव्हती. एकदा पुण्याला पोहोचवा, मग चहा-कॉफीच काय कोल्ड-ड्रिंकही घेऊ असा माझा साधारण पवित्रा होता. पण जनमताविरुद्ध एकटा माणूस काय करणार! चहाच्या "इथे" मग अजून १५ मिनिटे खाल्ली. आता आठ वाजून गेलेले होते.

- नारायणगाव हे गाव काही माझ्या आवडत्या गावांमध्ये मोडत नाही. मागे एकदा माझी एक बॅग नारायणगावातल्या स्टॅंडावर चोरीला गेली होती. आणि इथले "लोकल" वाहक फार वेळ लावतात तिकेटे द्यायला. नारायणगावच्या बस स्टॉपमध्ये बस शिरली आणि थेट डेपोतच घुसली. आता बसमध्ये काय बिघाड झाले आहे की काय अशा विचारातच होतो, तेवढ्यात डिझेल भरणे हा चालकाचा हेतू असल्याचे समजले. आधीच डिझेल भरून निघायला काय झाले होते, हा प्रश्न अगदी ग्राघ्य असला तरी आता फारच केविलवाणा होता. त्यात भर म्हणून की काय, तिथली वीज गायब होती! मग चालक महाशयांनी आपल्या हातांनी पंपाचा दांडा फिरवायला सुरुवात केली. त्यातच तो दांडा एकदा स्लीप होऊन हातातच आला. या सगळ्या भानगडीत १० मिनिटे गेली.

- बरं आता डिझेल भरून झाल्यावर तडक निघावे, तर नाही. पुन्हा स्थानकात अगदी रिव्हर्स घेऊन गाडी लावली. नवे प्रवासी अगदी शेवटच्या सीटपर्यंत जाऊन बघत होते, "आरं नाहिये झागा हितं" म्हणून परत उतरत होते. काही विचारू नका. दोन नवी "शीटं" आलेली, त्यांना तिकिटं द्यायला मग एक खाकीधारी (एकदाचा) उगवला. तब्बल वीस मिनिटे घालवल्यानंतर मग आमच्या बसने प्रयाण केले.

- चाकण-पुणे हा २५-३० किलोमीटरचा रस्ता उत्तम झाला आहे. परंतु एका पुलाचे काम मात्र पार रेंगाळले आहे. Bottleneck चे उदाहरण हवे असल्यास मी या पुलाचा दाखला देईन. या ठिकाणी मात्र आमच्या चालकाने आपले कौशल्य पणाला लावले, आणि जिथे २० मिनिटे लागली असती तिथे १५ मिनिटांतच "चटकन" गाडी पुढे काढली!

- पुण्यातले सिग्नल्स साथ देतील तर ते पुण्यातले सिग्नल्स कसले! प्रत्येक ठिकाणी एकदा मिनिटभर थांबून "दर्शन" घेतल्याशिवाय पुढे जाताच आले नाही. मात्र आता मी जरासा relax झालेलो होतो, कारण घड्याळात फक्त ११ वाजले होते, आणि रेल्वे आता काही चुकत नाही याची खात्री होती.

तर तात्पर्य असे की जो प्रवास फक्त तीन-साडेतीन तासांतही करता येईल, तोच असा साडेपाच तासांचा चित्तथरारक करायचा आणि प्रवाश्यांना त्यांच्या पैशांचा पुरेपूर मोबदला कसा मिळेल याची काळजी एस.टी. महामंडळ पदोपदी घेत असते. आणि तेच तर महामंडळाचे वेगळेपण आहे!

मंगळवार, ऑगस्ट ०९, २००५

"Let the world change you,
and you will change the world"


यातल्या दुसऱ्या भागाबद्दल शंका वाटत असली तरि पहिला भाग अनुभवायला काहिच हरकत नाही.

IISC सोडल्यानंतर Intel मध्ये रुजू होईपर्यंत मधे दोन आठवड्यांचा पूर्णत: रिकामा वेळ हाती लागला, आणि मग उत्साहाने त्या दरम्यान हिमालयाच्या trek चा बेत आखला गेला. १९९८ मध्ये मी-आई-बाबा-स्नेहल नैनीतालला गेलो होतो. रानीखेत-कौसानीहून हिमालयाचे दर्शन घडले होते. यावेळेस मात्र Valley of Flowers आणि हेमकुंड साहिब अशी प्रत्यक्ष हिमालयावरच स्वारी होणार होती. संपूर्ण प्रवासाची diary अशी वेगळी लिहिली आहेच.आलेल्या अनुभवांवर काहिशी टिप्पणी :

- रेल्वेचा प्रवास मला नेहमीच आवडत आलेला आहे. प्रवासात जो काही शांतपणा (मनाला,प्रत्यक्षात नव्हे) मिळतो तो फारच हवाहवासा वाटतो. प्रवासात डोक्यात चाललेले विचार हे मात्र फारच volatile असतात. प्रवास संपल्यानंतर फारसं आठवत नाही; मात्र एकंदरीत स्वतःमध्ये फरक पडलेला असतो हे नक्की.

- प्रवासातला सहप्रवासी हा साधारणपणे एक संशोधनाचा विषय आहे. काही जणांना प्रत्येक-अगदी लहानसहान गोष्टींवर comment करण्याची सवय असते. आणि या comments बहुतेक वेळा कुचकटच असतात. माझा अशा लोकांबरोबरचा संयम बऱ्याचदा तोकडा पडतो. बंगलोर-दिल्ली प्रवासातल्या सहप्रवाश्याने माझी चांगलीच परीक्षा घेतली.

- असा लांब पल्ल्याचा प्रवास करतान आपला देश किती विस्तीर्ण आणि विविधता असलेला आहे याची प्रकर्षाने जाणीव होते. एका रात्रीत हवामान बदलते. निघालो तेव्हा बंगलोर आणि परिसरात अजिबातपाऊस नव्हता. दुसऱ्या दिवशी आंध्र प्रदेशात नद्यांना पूर आलेले दिसत होते. तिसऱ्या सकाळी मध्य प्रदेशातही बराच पाऊस लागला. दिल्लीतच त्या मानाने कमी पाऊस होता. २५०० किलोमीटर्सच्या प्रवासानंतरही अजून उत्तरेला हिमाचल-पंजाब-काश्मीर उरलेले होतेच. यावेळेस विदर्भात जाण्याचा योग आला. नागपूर-चंद्रपूर-वर्धा अशी स्टेशने लागली.

- इतके प्रचंड अंतर कापण्याऱ्या रेल्वेला बऱ्याचशा transitions मधून जावे लागते. बंगलोरला काऽऽफी पासून महाराष्ट्रात चहाऽऽ चहाऽऽ ते मध्य-उत्तर प्रदेशात कुल्हड में गरमचाऽऽय अशा आरोळ्या ऐकू येतात. प्रवासी आणि आगगाडी तीच असते. शहरे मागे पडत असतात.

- general, sleeper class ते A/C, first class अशा निरनिराळ्या डब्यांतून प्रवास करणाऱ्यांना आपल्या नियोजित स्थळी पोहोचवणारे engine मात्र एकच असते.engine ला अपपरभाव मुळीच नसतो. माझ्या आठवणीप्रमाणे पुलंनी याविषयी एका लेखात भाष्य केलेलं आहे.

- जगातील सर्वात मोठी organisation असलेल्या भारतीय रेल्वेचा सुरळीत कारभार हे एकफार मोठे आश्चर्य आहे. निव्वळ प्रवासाचे माध्यम अशा द्रुष्टीने याकडे बघितल्यास या कारभाराचीअवाढव्यता लक्षात येणार नाही. मालगाड्या, प्रवासी गाड्या, पॅसेंजर गाड्या, त्यांची आगाऊ आरक्षणे, signaling, आणि रोजची लहानतल्या लहान स्टेशनांवरची 'routine' कामे हे काम नसे थोडके...

- Cloak room ही केवढी उपयुक्त सेवा आहे याची जाणीव दिल्ली स्टेशनावर झाली. तिथे सामान ठेवून आम्ही अक्षरशः जीवाची दिल्ली केली. दिल्लीची metro-rail आवडली. विशेषतःकलकत्त्याचा अनुभव आठवणीत ताजा असल्यामुळे यावेळी अधिकच मजा आली.

- "रेल्वे वेळेवर धावतात" या नियमामुळे किती सुविधा होते याची जाणीव फक्त एका आठवड्यातच आम्हास होणार होती. पंचाईत होत नाही तोपर्यंत एखाद्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही. चालून चालून प्रचंड थकल्यावर एक सायकलसुद्धा विमानस्वरूप भासते.

- रेल्वेचा खूप लांबचा प्रवास करूनही प्रवासाचा थकवा जाणवत नाही. बंगलोर-दिल्ली ३२ तासांच्या प्रवासानंतर आम्ही लगेचच देहरादूनच्या गाडीत बसलो - खरं तर झोपलो. सकाळ झाली तेव्हा भारताच्या विविधतेचं आणखी एक रूप समोर आलं. क्षितिजापर्यंत एकही डोंगर किंवा टेकडी नाही, हिरवीगार शेते आणि त्यांना छेदून जाण्याऱ्या फेसाळत्या, प्रचंद नद्या असं रूप आता निसर्गाने धारण केलं होतं. मका आणि उसाच्या शेतीत पॉपलरच्या झाडांनी नेटके plots पाडलेले दिसत होते. नदिच्या पात्रात नर्मदेतल्या गोट्यांसारखे रंगीत गोटे प्रचंड प्रमाणात दिसत होते. single trackअसल्याने आमच्या train ला देहरादूनला पोहोचण्याची काहीच घाई नव्हती. आणि बाहेरचं द्रुष्यपाहण्यात गुंग झालेल्या आम्हालाही!

- देहरादुन हे अपेक्षेप्रमाणेच एक थंड (हवेचं) शहर निघालं. थोडासा पाऊस पडत होता, हवेत गारठाही चांगलाच होता. हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांनाही थंडी भरली असावी - सगळी कामं थंडावली होती. थंड हवा आणि त्यात पाऊस यामुळे सगळीकडे हिरवाई होती. दक्षिण भारत आणि उत्तर भारत आणि आता उत्तरांचल यांच्यातले फरक आता पदोपदी जाणवत होते.

- खूप मोठ्या break नंतर करायला मिळणारी आंघोळ हा सुंदर अनुभव असला तरी तो काही असा break घेण्यासाठी उद्युक्त करत नाही, ही एक चांगली गोष्ट आहे :)

- एखाद्या व्यक्तिचा आवाज आणि बोलण्याची लकब यावरून त्याच्या दिसण्याचा- पेहरावाचा केलेला अंदाज किती चुकू शकतो याचा प्रत्यय आला. आमचे गाईड मधवलजी यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं होतं, त्यावरून ही व्यक्ती बुटकी, सफारी सूट, पान चघळणारी असावी असा आम्ही तर्क केला होता. प्रत्यक्षात मधवलजी सहा फूटांहून जास्त उंच, धिप्पाड आणि चक्क jeans मध्ये वावरणारेनिघाले!

- IISc ही मी आत्तापर्यंत पाहिलेली सर्वांत हिरवीगार Institute होती. देहरादूनमधल्या Forest Research Institute ने सगळे निकष बदलून टाकले. नजर पोहोचेल तिथपर्यंत हिरवळ आणि क्षितिजावर शिवालिक पर्वतरांगा! प्रत्येक व्रुक्षाचा निराळा हिरवा रंग, अत्यंत सुंदर आणि देखणी इमारत ही आणखी वैशिष्ट्ये सांगता येतील. मुख्य रस्त्याच्या बाजूला प्राध्यापकांची घरे आहेत.प्रत्येक घरासमोर बाग -नव्हे, चक्क शेती आहे. एका घरासमोरच्या शेतीत भाताची लावणी चाललेली आम्ही पाहिली. प्रत्यक्ष institute मध्ये पाच वनसंग्रहालये आहेत - त्यात सामाजिक वनिकरण, इत्यादी संशोधनावरची बरीच माहिती प्रदर्शित केलेली आहे. लाकडांचे उपयोग, वनौषधी, झाडांना होणारे रोग, वनांची शास्त्रीय पद्धतीने तोडणी, पुनर्लागवड, वनांतले कीटकजीवन इ. अनेक गोष्टींवर संग्रहालयात विभाग आहेत. सदैव computer-electronics वर डोके लढवणाऱ्या आम्हांसहा अनुभव सुखद आणि थक्क करणारा होता.

- या अवघ्या परीसरात लक्ष वेधून घेतात ते क्षितिजावरचे डोंगर - पर्वतरांगा. नुकताच पाऊस पडून गेलेला असल्यामुळे हवा स्वच्छ होती. पांढरेशुभ्र ढग हलक्या झुळुकेबरोबर तरंगत होते. एकूणच वातावरणातला तजेला आणि चैतन्य वर्णन करण्यासारखं होतं - आणि मनातलही!

- डोक्यावर कुठल्याही प्रकारचं ओझं नसण्याचे ते काही दुर्मिळ दिवस होते. आणि तिथलं वातावरणही असं होतं की, नजिकच्या भविष्य/भूतकाळातल्या दगदगीची आठवण होणं शक्यच नव्हतं. अधूनमधून जाणीव होत होती की हे सारं क्षणिक आहे. थोड्याच दिवसांत काम-नोकरीच्या पसाऱ्यात आपल्याला हरवून जायचं आहे.

- मी काही फार साहसी आहे असं नाही. मात्र माझ्या मर्यादेत मला स्वतःला test करायला आवडतं. आता मी train/बसच्या प्रवासाला कंटाळलो होतो. डोंगर मला खुणावत होते, माझं उत्तर येणाऱ्या प्रतिध्वनीत मिसळून जात होतं.

- देहरादून ते जोशीमठ हे अंतर रस्त्याने पाहिलं तर ३०० किमी आहे; पण नकाश्यावर trace केलं तर माझी खात्री आहे, सरळ रेषेतलं अंतर त्याच्या निम्मं असणार. ९०% रस्ता म्हणजे एक अखंड घाट आहे.

- लहानपणी - लहानपणीच काय, अगदी आत्ता-आत्तपर्यंत हरीद्वार, ह्रुषिकेश, केदारनाथ-बद्रिनाथ ही ठिकाणं फार म्हणजे फार दूर आहेत असं वाटायचं. मात्र उत्तरांचलात पोहोचलो आणि ही सगळी तीर्थक्षेत्रं फारच जवळ आली.

- गंग नदीचं खरं रौद्र स्वरूप दिसलं ह्रुषिकेशमध्ये. उगमापासून त्या मानने खूपच कमी अंतरात गंगानदीचा विस्तार प्रचंद वाढलेला दिसतो. पुराचं प्रचंड, गढूळ पाणी वेगाने वाहताना दिसत होतं. एक नदी एखाद्या देशाच्या अर्थ-समाज आणि संस्क्रुती कारणात केवढी महत्त्वाच्यी असते हे विचार करण्यासारखं आहे. एक गंग नदी जर नसती, तर केवढा फरक पडला असता याचा अंदाज गंगेचंहे विशाल दर्शन घेतल्यावरच आला.

- हिमालयाच्या या पायथ्याजवळच्या पर्वतराजीत रस्ते बांधणं हे एक महाकठीण काम आहे. एक तर डोंगरांच्या size मुळे बोगदे काढणं economical नाही, त्यामुळे घाटरस्ते खूप जास्त लांबीचे बांधावे लागतात. नद्यांवर पूल बांधणं अशक्यप्राय आहे - त्यामुळे नदी ओलांडण्यासाठी उतरत उतरत नदीच्या त्यातल्या त्यात चिंचोळ्या भागाजवळ यावं लागतं. त्यानंतर छोट्या पुलावरून नदी पारकरून मग रस्ता पुन्हा डोंगर चढू लागतो. रस्ते बांधतान विविध प्रकारच्य वाहनांचा, त्याच्या क्षमतेचा किती विचार करावा लागत असेल हे इथं जाणवतं.

- देहरादून ते जोशीमठ सगळा रस्ता उजव्या बाजूला दरीत नदी आणि डाव्या बाजूला उंचच्या उंचडोंगर-बहुतेक झाडांनी आच्छादलेले असा आहे. महाराष्ट्रातल्या घाटांशी तुलना केली तर अतिप्रचंड उंचीआणि सगळीकडे जंगल अशा दोन गोष्टी हिमालयात प्रकर्षाने दिसून येतात.

बुधवार, मार्च ३०, २००५

प्रत्येक दिवस हा एक मोठा अनुभव असतो. आपण कदाचित त्याकडॆ अशा द्रुष्टिकोनातून बघत नसू; पण हे सत्य आहे. पुस्तकाच्या हजार पानांचा डोंगर सर करताना जसे प्रत्येक पान महत्त्वाचे असते; पण शेवटी लक्षात राहते ते पूर्ण पुस्तक - त्यातली स्वतंत्र पाने नव्हेत. रोजच्या कामातसुद्धा एकेका दिवसाचे काम महत्त्वाचे असते; पण लक्षात राहतात ते फक्त milestones.

मनात येणाऱ्या विचारांचंही असंच काहिसं आहे. एखादा thread मनात घोटाळत असतो; परंतु असे अनेक धागे एकत्र जुळल्याशिवाय काहिही निर्माण होत नाही. एखादा धागा अवेळी तुटतो आणि इतर विचारांच्या गर्दीत बिचारा हरवून जातो. एखादी जलद धून अचानक जणू निसटून जावी, आणि मग प्रयत्न करूनही परत न आठवावी...

बुधवार, जानेवारी १२, २००५

कोलकाता आमी तुमिको पोशन्द कोडी!

२ जानेवारी २००५
"पहाटे" ६:०० - ५:४० चा right time असलेली हावडा मेल late झालेली आहे -- चांगलंच आहे. खिडकीतून बाहेरचं धुकं दिसतंय. मधूनच एखादं station हिरवा बावटा दाखवून पुन्हा आळसावतंय. हवेत चांगलाच गारठा आहे. उत्सुकतेनं मी उजाडायची वाट पाहतो आहे.

सकाळचे ६॥ - आता चांगलंच उजाडलंय आणि नारळाच्या झाडांच्या रांगांना मधेच छेद देणार्या "नद्या" दिसताहेत. शाली ओढलेले बंगाली बाबू लगबगीने रस्ता काटताहेत.

सकाळचे ७ - अखेर हावडा station वर आमची train आलेली आहे आणि "हावडावाडी" असं "गावडेवाडी"च्या तालावर कोणीही न म्हणताही आम्ही आमची train तडक सोडलेली आहे. बाहेर आता चांगलंच उजाडलेलं आहे. पहिलं दर्शन होतं ते प्रसिद्ध हावडा bridge चं. धुक्याच्या पांघरुणात पहुडलेलं ते structure आमची wicket घेऊन जातं. सवयीप्रमाणे आम्ही त्या भव्य structure च्या वरती बघतो. पण hanging bridge असल्याने आम्हाला कोणत्याही प्रकारची वाहतूक दिसत नाही - वाहतूक पुलाच्या बर्याच खालून चालली आहे! एक-दो-एक करत आम्ही bus-stand कडे आमचा मोर्चा (की 'march'a) वळवतो! bus 44-A रविवारी वाहतूक करत नाही. मग प्रथेप्रमाणे आम्ही चुकीच्या bus मध्ये चढतो. शेवटी दुसरी bus करून आम्ही (आणखी) तब्बल २ तासांच्या प्रवासानंतर guest house वर पोहोचतो.

सकाळचे १० - झोप कधी लागली ते कळलंच नाही!

सकाळचे ११ - आवराआवरीनंतर आम्ही breakfast च्या शोधात निघतो. माझे सगळे सहकारी Pure vegetarian आहेत. जरा अवघड दिसतंय. शेवटी दोन मिठाईची दुकानं सापडतात (२ तासांच्या प्रवासात एकूण किती मिठाईची (आणि औषधांची :)) दुकानं दिसली याला गणती नाही). मग सामोसा आणि खीर कदम यांची न्याहरी होते. खीर कदम म्हणजे आत रसगुल्ला आणि बाहेरून खव्याचा लेप असलेला लाडू! मला आवडतो. आणि सुभाषचंद्र बोस "कदम कदम बढाए जा" असं म्हणाले होते, त्यातला "कदम" हा "खीर कदम" होता की काय असा विचार मनाला चाटून जातो. २३५ नंबरच्या bus ने मग आम्ही conference च्या registration साठी निघतो. bus भर गावातून, रहदारीच्या रस्त्याने जाते.

...

कलकत्ता शहर बाकीच्या metros प्रमाणे प्रचंड पसरलेलं आहे. रस्त्यावर पादचारी, पिवळया taxi, आणि हळूबाई trams अशी कितीतरी वाहनं गर्दीतून वाट काढताना दिसतात. रहदारीचा वेग फारच कमी आहे - trams आल्या की त्यांना वाट करुन द्यावी लागते. कलकत्ता शहर आम्हाला आमच्या मुंबईची आठवण करून देतं. Fort area मधल्या इमारतींप्रमाणेच इथल्या इमारती british architecture ची साक्ष आहेत. अतिपावसामुळे आणि वयोमानामुळे इमारतींवर एक प्रकारचा शेवाळलेला काळा रंग चढलेला आहे.

...

कलकत्ता हे भलतेच "गोड" गाव आहे. हावडा station ते Salt Lake City मधले guest house या प्रवासात आम्हाला याचा अनुभव (की ऑनुभोव) पुरेपुर आला. प्रत्येक गल्लीत, छोट्या-मोठ्या रस्त्यांवर ठळक उठून दिसतात ती "मिष्टान्न भांडारे". 'भांडार' हा शब्द मी खादी भांडार वगॆरे wholesale context मध्ये ऎकला होता. बाग्ला भाषेत भांडार म्हणजे दुकान असल्यामुळे इथे पानाचे दुकान सुद्धा पान-भांडार अशी शेखी मिरवते. एकंदरीतच वंगभाषा अतिशयोक्तीसाठी विशेष वाटते. साधा त्रास सुद्धा "ऑशुबिधा" असा लांबलचक वॆताग देउन जातो. एका bus मध्ये साध्या "no smoking" साठी एक भले मोठे ५-६ शब्दांचे वाक्य पाहून तर मला याची खात्रीच पटली. इथे bakery ला confectioners असं म्हणतात. कलकत्त्यात गोडीबरोबरच स्वस्ताईदेखील सुखसमाधानाने नांदते आहे, मिष्टी दोई ६ रुपये आणि खीर कदम ३ रुपये/piece मिळतो. इथे मिठाई piece प्रमाणे विकली जाते - वजनावर नाही.

...

joke of the day !
एका corner वर मी "World Peace Conference" चे banner पाहीले. भर कलकत्त्यात "peace conference" ची कल्पना वाचून हसून-हसून पुरेवाट झाली.

PS: हा विनोद कळण्यासाठी तुम्हाला किमान दोन बंगाली बाबूंबरोबर गप्पा मारायला हव्यात. माझा एक मित्र म्हणतो, गर्दीचा scene dub करायचा असेल तर दोन-तीन बंगाल्यांना बोलवा-पुरेसे आहे ;-)

...

हे सगळे अनुभव तुटक-तुटक असण्याचं कारण म्हणजे, ते कलकत्त्यातच वेळ मिळेल तसे लिहिले होते, आणि आणखी editing च्या भानगडीत न पडता तसेच post करतो आहे.