रविवार, डिसेंबर १७, २००६

बेळगावी

काही कारणास्तव नुकताच बेळगावी जाण्याचा चान्स मिळाला. लोणी, हवा आणि व्यापार-उदिम अशा मुख्य कारणांसाठी कमी; मात्र 'सीमा' या ज्वलंत कारणासाठी सतत चर्चेत असणारं हे गाव!

बेळगावचे 'बेळगावी' असे नव्याने बारसे का केले गेले असावे हा एक प्रश्नच आहे. तशी कानडीत 'गावे' कमीच: हळ्ळी असतं, पाल्या असतं, 'उर' (चित्तूर सारखे) असतं; पण 'गाव' मात्र दुर्मिळच. हे एक कारण असू शकतं. ते दुर्मिळ तरी कशाला ठेवायचं म्हणून त्याच्या नावात ई जोडला गेला असावा.

बेळगावच्या गल्ली-बोळात (Duracel या बॅटरीसाठी) फिरताना अनेक मजेदार गोष्टी बघायला मिळाल्या. कुठे रीट्झ थिएटर दिसतंय का ते पाहतच होतो; पण तो भाग निराळाच असावा. त्याऐवजी, लाकडाची वखार (आता केवळ पाठ्यपुस्तकांमध्ये चित्र दाखवण्याइतकी दुर्मिळ झालेली) बघायला मिळाली (थिएटर आणि वखारीचा संबंध नाही: ठाऊक आहे!). आम्ही गेलो होतो त्या भागाला 'गोवा वेस' म्हणायचं - गोव्याकडे असलेलं बेळगावचं ते एक टोक असावं. एका मंदिराच्या पुढे "येथे मोबाईल फोन व कॅमेरा वापरण्यास मनाई आहे" अशी पाटी तर एका घराबाहेर "येथे १००% सुती साड्या मिळतील" अशी पाटी दिसली. तिथं कुठं सेलचा कुठे होलसेल सेल लागलाय काय या शोधात आम्ही होतो; परंतु बऱ्याच भटकंतीपश्चात, फोटोग्राफीच्या दुकानातही आम्हांस ते सेल न मिळाल्यामुळे सपशेल निराशाच झाली. पण एकंदरीत बेळगावच्या सुखद हवामानातली ती छोटीशी रपेट तिथल्या 'सकाळ'मधल्या बातम्यांइतकीच रंजक वाटली.

तिथल्या लोकल 'सकाळ' मध्ये एका लोकल चॅंपियनने इराणच्या कुस्तीगिराला कसं सपशेल चितपट केलं याची सचित्र बातमी होती. ह.भ.प. चौगुले यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन (यांनी अनेक व्यसनी तरुणांना सन्मार्गी लावले) केले गेल्याची बातमी होती. बच्चू नावाच्या कोण्या लोकल राजकारण्याने म्हणे पाण्याच्या टाकीवर आपले आंदोलन पुकारले होते. त्याची समजूत काढण्यासाठी खुद्द महाराष्ट्राचे गृहमंत्री कसे आले याचेही पाणीदार वर्णन होते. त्याचबरोबर त्या पेपरातील "दहावी अभ्यासमाला" मधले महाकठीण प्रश्न! प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले असूनही निम्म्याहून अधिक प्रश्नांमध्ये आम्ही नापास गोळे ठरलो. असं असताना कुठल्या 'गाढवाने' आम्हाला नोकरी दिली असा दुसऱ्याच्या क्षमतेवरच शंका घेणारा प्रश्न अस्मादिकांना पडला; ते साहजिकच होतं.

सेलच्या फेल मोहिमेनंतर आम्ही परत आलो तेव्हा अजून एक मनोरंजक पाटी दिसली. जिथे उतरलो होतो त्या ठिकाणाच्या शेजारीच एका व्यायामशाळेचा बोर्ड होता. नाव होतं, "मातोश्री जिम." टि. व्ही. समोर पडून शक्तिप्रदर्शक आणि कौशल्याचे खेळ तासंतास फक्त पाहणाऱ्या (माझ्यासारख्याच!) मुलांसाठी खास असा हा जिम असावा. मातोश्रींच्या समाधानासाठी का होईना व्यायामशाळेत जायचं ठरवलं तर जावं ते "मातोश्री जिम" मध्ये!

अरे हो, काय ते बेळगावाहून कुंदा आणि धारवाडहून पेढे आणायचं मात्र राहूनच गेलं की हो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: