मंगळवार, डिसेंबर १२, २००६

फिर धूम

मोटरसायकलीचा मला 'शौक' नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे एक दुचाकी वाहन असे मी माझ्या बाईकचे वर्णन करीन. 'धूम'मधल्या बाईक्स काय सही होत्या ना असं कोणी म्हणाल्यावर माझ्या कपाळाला थोड्या आठ्याच पडल्या. मागचे आसन घसरगुंडीसमान करायचे आणि नायिका उर्फ बाईसाहेबांना बसवून (तुळशीबागेत) एक चक्कर मारून आणायची एवढेच त्या 'सही' बाईकचे प्रयोजन असावे. पेट्रोल काय महाग झालेय याची नायकाला पर्वा नसावी. पोलीस खाते भरतेय ना पेट्रोल, आपल्याला काय त्याचं असा काहिसा त्यांचा बाणा असावा..

बाईक्स या एकमेव कारणासाठी 'धूम'चा पहिला भाग बघितलेले महाभाग दुसरा भाग पाहून काहिसे निराश होतील. रस्त्यावरच्या स्कूटर्सबरोबर या चित्रपटात पाण्यावर चालणाऱ्या स्कूटर्सही आहेत. मानेचा एक झटका देऊन क्षणात पाण्याखाली जाऊ शकणारे हे वाहन आणि त्यावरचा स्वार, दोन्ही अचाट. विदुषकी चाळे आणि निरर्थक बडबड करणारा चोप्रा जे आणतो त्यास वैताग आणि जे मांडतो त्यास उच्छाद असे म्हणतात. सुरुवातीस (म्हणजे प्रेमात पडण्याआगोदर) अत्यंत हुषार असल्याचा आव आणणारी ऐश्वर्या राय ह्रितिकच्या प्रेमात (धड)पडल्यानंतर अचानक बुध्दू कशी बनते हे एक गूढच. अत्यंत अचूक नेम साधणारी बिपाशा पोलीस खात्यात काय करते देव जाणे - तिला आधी दोह्याला पाठवायला पाहिजे. पण मग तिथे वाळवंटात, बुरख्याआडून त्या बिचारीच्या सौंदर्याची दखल कोण घेणार आणि कोणावर नेम धरणार; म्हणून तिला इथेच चित्रपटात काम दिले जात असावे. तिसरा पोलीस म्हणजे अभिषेक बच्चन. जिलेटच्या जाहिरातीत काम न मिळाल्याच्या दुःखात बिचऱ्याने (स्वतःची) दाढी करणे सोडले आहे अशी वार्ता आहे. हो, आणि शिवाय पोलिसांसाठी काम करणारी मिस. ऐश्वर्या ही ह्रितिक नावाच्या चोरावर फिदा झाल्यामुळे जडलेला हृदयरोग! पण अशा बिकट मानसिक परिस्थितीत त्याने आपल्या बुध्दीला गंज चढू दिलेला नाही. ह्रितिकने केलेल्या अर्धा डझन चोऱ्यांची ठिकाणे, काळ-वेळ फक्त सांगायचा अवकाश, आपले ज्यु. बच्चन तुम्हाला पुढच्या चोरीची जागा आणि वेळ लगेच सांगणार. (त्याच्या दिमतीला Core 2 Duo वाला laptop होता हे मात्र मी तुम्हाला सांगणार नाही!)

पुढची चोरी जुनागढ इथल्या गडावर असलेल्या प्राचीन तलवारीची होणार असे तोतया चोर ह्रितिक (म्हणजे ऐश्वर्या) बातमीवाल्यांना सांगते; आणि नाईलाजाने ह्रितिकला ही चोरी करावी लागते. झुरळ आणि न्यूज चॅनेलवाले शिरू शकणार नाहीत असा कडेकोट बंदोबस्त असलेल्या त्या खोलीत जाण्यासाठी चिमणीचा मार्ग मोकळा ठेवलेला असतो. मोठी धावपळ करत, हाश-हूश करत बाईसाहेब तिथे पोहोचतात तर अहो आश्चर्यम! ह्रितिक तिथे इडली-सांबार खात बसलेला असतो. त्या तलवारीला ती (म्हणजे ऐश्वर्या, इडली नव्हे) हात लावणार तोच - थांब ती idea मी केव्हाच रद्द केली आहे असे उद्गार ऐकू येतात. मग जादूचा चष्मा लावून बाईसाहेब तलवारीभोवती अदृश्य किरणांचे कसे कोंडाळे आहे, किरणांना स्पर्श होताच कसा भोंगा वाजेल हे ह्रितिक त्यांना समजावून सांगतात. प्रेक्षक ऐश्वर्यापेक्षा दहापटींनी चतुर असल्यामुळे त्यांना हे सगळे संवाद आधीच माहित असतात. या सगळ्या कडेकोट बंदोबस्तातून सहजगत्या त्या तलवारीची चोरी करून मग ही द्वयी जाते ती थेट नाच-गाण्याच्या उरुसात. गाण्या-बजावण्या-नाचल्याशिवाय पुढच्या कथानकाची link प्रेक्षकांना कशी लागणार बरे?

चोरी करून, नाचून थकल्यावर मग बास्केटबॉलचा खेळ : तोही पावसात. मग (खल)नायक (खल)नायिकेला चॅलेंज करणार. दोन तासात एकदा तरी बास्केट करून दाखव - तरच मी आणि तू चोरीच्या खेळात भागिदार. नाहितर तू वेगळी चोरी करायची, आणि मी वेगळी करणार. सुदैवाने (की दुर्दैवाने) एक तास पंचावन्न मिनिटांच्या धडपडीनंतर बाईंना एकदाचा चेंडू बास्केटमध्ये टाकता येतो आणि पुढचे कथानक घडणे शक्य होते.

आपल्या बाईसाहेब पोलिसांना सामिल आहेत हे कळताच ह्रितिकचा तिळपापड होतो. शिवाय बाईंना धड वरण-भात करता येत नाही याची निराशाही असतेच. मग एका हातात पिस्तूल घेऊन तो बाईंना पुकारतो. फक्त एक गोळी रिवॉल्वर मध्ये सरकवून मग नाट्याची सुरुवात होते.

"हे काय एकच गोळी? बहुत नाइन्साफी है बाई" - इति ऐश्वर्या
"अस्सं? और तुम हमारे प्यार को, हमारे वादे को निभा न पाई, उसका क्या?" - इति ह्रितिक.
"मुझे माफ कर दो आर्यन. लेकिन मेरी मजदूरी थी" - इति ऐश्वर्या.
"मजदूरी नाही. मजबूरी. कमाल आहे हं तुम्हारी!"
"हॉं. वही. लेकिन क्या अब तुम मुझे मार डालोगे?"
"ना. अब तुम्हे मुझे मारना पडेगा" - तिच्या हातात पिस्तूल सरकवतो.
"बरं. पण मला चालवता येत नाही हे, शिवाय (लाय)सेन्स पण नाहिये"
"माहित आहे मला. तुम ट्रेनी हो. लेकिन अब समय बहुत कम है" घड्याळ पाहतो.
"ठिक है." ती घोडा दाबते - कुठून तरी खिंकाळल्याचा आवाज प्रेक्षकांची परीक्षा पाहतो.
"छ्या! खाली थी. अब तुम्हारी बारी" ती पिस्तूल पुन्हा ह्रितिकला देते.
"ठिक है!" पुन्हा घोडा
पुन्हा फुस्स. पुन्हा "अब तुम्हारी बारी" असं सहा वेळा राज्य बदलतं. सहाही वेळा पिस्तूल रीकामं. बाई बुचकळ्यात; प्रेक्षक (स्वतंत्रपणे पुरवलेल्या) बुचकळ्यात.
"देखो - मैने गोली तो डाली ही नहीं थी! कैसे फॅंसाया!" इति. ह्रितिक.

अचानक भावूक संगीत वाजायला लागतं. अश्रूंचा पूर येतो. एकमेकांच्या गळ्यांत गळे घालून दोघेही मनसोक्त रडून घेतात. प्रेक्षक आपापल्या तिकिटांवरची किंमत सातव्यांदा पाहून खिन्न होतो.

खऱ्या, निस्सीम प्रेमाला बघ्यांची पर्वा नसते म्हणतात. मात्र ते इतकं खरं असेल असं वाटलं नव्हतं मला!

मग पुढे जे घडतं त्याचं धावतं वर्णन मी काय करावं. घ्रूम-घ्रूम करत ज्यु. बच्चन जे पाठलाग करतात! नदी-नाले, चिऊ-काऊ, आगगाड्या-बोगदे, गल्ली-बोळ, किडा-मुंगी कश्श्या-कश्श्याची पर्वा न करता घसरगुंडीवर प्रिय बाईसाहेबांना बसवून ह्रितिक आपली बाईक जो हाणतो- आपण फक्त बघत रहावं. बाईक फॅन्स खूष होतात. एखाद-दोन जण शिट्ट्याही मारतात.

शेवटी जे घडायचं तेच घडतं. पेट्रोल संपतं! बच्चनच्या आणि विदुषकी चोप्राच्या हाती ही द्वयी लागते. मग तीन चार( आधीच पाठ करून ठेवलेले) डायलॉग मारून बाईंच्या हातून चांगल्या तीन-चार गोळ्या खाऊन ह्रितिक खूप खोल धबधब्यात पडतो आणि प्रेक्षकांना वाटतं की व्वा! झालं...संपलं सगळं. पण कसंच कसंचं! अजून सहा महिन्यांनंतर साहेब ठणठणीत; आणि अर्थातच स्वयंपाकघरात - अजून कुठे असणार - कांदे चिरताना दिसतात. बाई खूष - आयता वरण-भात, अजून काय हवं? असा सगळा आनंदी-आनंद पाहून प्रेक्षक उठणार तोच सन्नाटा पसरतो- बाहेर अभिषेकजी मिल्कशेक पीत (अजून दाढी तशीच) (नुसतेच, संजय नाही) दत्त म्हणून उभे. मग चोरसाहेब आपला सगळा चोरीचा माल परत करतात. बच्चनजी मनातल्या मनात म्हणतात, की आता सगळे 'आयटेम' परत म्युझियम्समध्ये पाठवायचे त्याचा खर्च आपल्यालाच करावा लागणार! अशा तऱ्हेने त्यांचा खरोखरचा 'मामा' करण्यात चोरसाहेब यशस्वी ठरलेले असतात. "बरंय तर मग. पुन्हा चोराचा पट्ट्या-पटट्यांचा डगला आणि गॉगल चढवलास तर मग मलाही माझ्या बाईकची सर्व्हिसिंग करून घ्यायला लागेल" अशी जबरी समज देऊन ह्रितिकला सोडून देण्यात येतं.

...आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनाही. प्रेक्षक आत्तापर्यंत बाजूला काढून ठेवलेले आपले डोके उचलतो; पुन्हा खांद्यावर ठेवतो आणि प्रेक्षागृहाबाहेर जाण्याच्या रस्ता शोधू लागतो.

तरूण हृदयांचा सम्राट ह्रितिक रोशन महोदयांचा 'धूम - भाग दुसरा' हा अचाट, अनाकर्षक, अतर्क्य, अशक्य, अतिरेकी, अवास्तव, अवाजवी, अस्मिताशून्य, कल्पनातित, करामतीमय, कर्णकर्कश्श, भन्नाट, भयंकर, भितीदायक, भलताच 'हा', विदुषकी, विनोदी, वेळकाढू असा अ-विस्मरणीय चित्रपट (एकदाचा) संपल्यावर मी एकच धूम ठोकतो हे सूज्ञांस सांगणे न लगे!

४ टिप्पण्या:

yogesh म्हणाले...

हा हा...
हहपुवा झाली. भयानक चित्रपट आहे तो.

अनामित म्हणाले...

मस्तच लिहिले आहे. मात्र ह्रितिक बद्दल काहीच वाईट लिहिलेले दिसत नाही आणि ते योग्यच वाटते. अशा भयाण चित्रपटालाही निव्वळ त्याच्या हजेरीमुळे प्रेक्षक लाभलेत.

Marathi blogger म्हणाले...

mi atyant sunya prekshak aahe. hindivaril ragamuLe mi kadhich hindi film paise deun pahat nahi. mazya ghari dhoom chi cd load keli hoti mazi sahanshakti keveal 1 tasch rahili. asha chitrapatanviruddha manavadhikar samiti kahich karu shaknar nahi ka?

अनु म्हणाले...

chhaan ahe lekh..
Ha mi lihila hota kahi mahinyapurvi dhoom 2 tisaryanda pahilyavar. http://www.manogat.com/node/8865
Gani changali ahet baghayala pan picture bhayankar illogical ahe.