कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, फेब्रुवारी ०८, २००८

नाट्य

सकाळचं धुकं विरघळलं आणि कोवळ्या उन्हानं उरलेलं दंव टीपून घ्यायला सुरुवात केली. कुठेतरी पलिकडे उगीच एखादी शेकोटी उरलेली; तीही धुराचे उरलेले लोट धापा टाकत हवेत सोडू लागली. हवेतला गारठा जाणवत होताच; पण दाट झाडीतून गाळून आलेलं का असेना पण छानसं ऊन पडायला लागलं आणि थंडीसुद्धा नाही म्हणायला नरम पडू लागली. धुकं म्हणावं की ढग; त्याच्या पांढुरक्या पडद्यातून सूर्याचं आख्खं दर्शन घडत होतं.

अशी सकाळ मला आवडते. विशेषतः छान न्याहरी झाल्यानंतर सायकलवरनं एक रपेट मारावी तर ती अशाच सकाळी. हात सोडून सायकल चालवण्यात काय मजा आहे ते हेल्मेट घालून मागे बसणा-याला नाही कळायचं. बहुतेक वेळा मी असाच हात सोडून निवांत सायकल मारत असतो. भोवतालच्या जगाकडे लक्ष असलं तरी सायकल चालवतांना तरी मी माझ्याच विश्वात हरवून जात असतो. त्या दिवशी मात्र असं काही घडणार नव्हतं.

माझ्या नेहमीच्या वाटेवरच्या त्या शाळेच्या मैदानापाशी पोहोचलो तेव्हा आपसूकच "काय मस्त हवा आहे, क्रिकेट खेळायची हवा" असं वाटून गेलं. त्या मैदानावर मुलं नेहमीच क्रिकेट खेळत असतात. त्या दिवशीही मस्त खेळ रंगात आलेला. मला काही फारशी घाई नव्हती त्यामुळे आधीच हळू जाणारी माझी सायकल मी थांबवली आणि एका कडूनिंबाच्या झाडाचा आधार घेत सायकलवर तोल सांभाळून बसलो. मॅच चांगलीच चुरशीची होत असावी; कारण जो तो अगदी रंगून गेला होता. नाही म्हणायला, "कमॉन, घेऊन टाक त्याला" असा पुकारा होत होता अधून मधून; पण एकंदरीत आजूबाजूला शांतताच होती.

कुठल्याही खेळात एक नाट्य असतं. फरक एवढाच की त्याची स्क्रीप्ट तयार नसते आणि त्या नाट्यातले कलाकार अभिनय करत नसतात! खरं पाहिलं ना तर सगळं आयुष्यच एक नाट्य आहे असं म्हणता येईल. अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रवेश काही अनन्यसाधारण नसतात आणि त्यामुळे त्यांचा रसिकवर्ग अगदीच मर्यादीत असतो. काही नाट्यांच्या नशिबात प्रसिद्धी नसते. गंमत म्हणजे अशा नाट्यांतल्या कलाकारांना त्याची अपेक्षाही नसते. त्या नाट्यात सहभागी होता येणं हेच त्यांच्यासाठी मोठं बक्षीस असतं.

त्या दिवशी थोडं असंच काहीसं घडलं. एक अफलातून झेल मी पाहिला; गडी बाद झाला; पुढचे गडी पटापट बाद होत गेले; आणि सामना क्षेत्ररक्षण करणा-या संघाने जिंकला असं माफक वर्णन करून मी पुढे सरकू शकलो असतो; पण तो अन्याय ठरेल. अगदी गुन्हा म्हणावा एवढा अन्याय.

तो फटका निव्वळ महान होता. क्रिकेटच्या तज्ज्ञांकडून त्याचं विश्लेषण करून घेता येईल; पण विश्लेषणाची चिरफाड केल्यानंतर कदाचित त्याचं सौंदर्यच बिघडून जाईल; म्हणून मी फारसं वर्णन करणं टाळतो. बॅटच्या पट्ट्यात आलेला तो चेंडू; जितक्या वेगानं आला तितक्याच वेगानं सीमारेखेकडे निघालेला. ज्या क्षणी बॅटचा आघात त्यावर झाला तेव्हाच जणू काही चार धावा त्यावर छापल्या गेलेल्या. पण कव्हर म्हणतात की काय त्या भागात उभ्या ठाकलेल्या त्या छोटूच्या मनात काही वेगळंच असावं. चेंडूवर नजर आणि मनात विश्वास ठेवून त्यानं आपलं लवचिक शरीर हवेत भिरकावलं. फुटबॉलमध्ये गोलकीपर जसा पूर्ण आडवा होत बॉल जाळ्यात जाण्यापासून वाचवतो; तशीच काही पोझ या बेट्यानं दिली आणि जो चेंडू पुढच्या क्षणी सीमारेखेपार जाणार होता, तो एकहाती झेलला! अगदी अशक्य वाटावा असा तो झेल!

त्याचे सगळे मित्र जमले; त्याला हवेत काय फेकला; काय आरडाओरडा काय विचारायला नको. माझ्या डोक्यावर जर त्यावेळी टोपी असती तर मी ती बिरबलासारखी खाशी हवेत भिरकावून दिली असती. हा सगळा खेळ पाहून माझी सकाळ अजूनच सुंदर झाली. मी इकडेतिकडे पाहिलं; कोणी होतं का माझ्यासारखंच नशिबवान ज्याला हे नाट्य बघायला मिळालं? कोणी नाही. झाडावरचे कावळे आपल्या नित्यक्रमात मश्गूल; एक रिक्षा प्रचंड धूर (आणि आवाज) सोडत पुढे निघालेली. तीन-चार बायका "काय एवढा गोंधळ आहे" असा एक त्रासिक चेहरा घेऊन रस्ता क्रॉस करत होत्या. बाजूच्याच घरातून एक काकू क्रिकेटकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत तुळशीला पाणी घालून आत गेल्या.

आणि मी? त्या विलक्षण नाट्यात सहभागी नाही तरी एक भाग्यवान प्रेक्षक बनल्याचं समाधान घेऊन सायकल हाकीत पुढे सरकलो.

---
माझ्याच "The Unsung Hero" वरून.

रविवार, ऑक्टोबर ०७, २००७

एक सुखद महामूर्ख

काही वेळा आपण जगातले नव्हे विश्वातले सर्वोत्तम महामूर्ख आहोत असं वाटतं. नुसतं वाटतंच असं नाही; तर ते खरंही असतं! म्हणजे तसे आपण नसतो महामूर्ख वगैरे, चांगले हुषार असतो; पण म्हणतात ना, की नुसतं हुषार असून काय उपयोग? तसंच होतं कधीकधी...
एक सुखद दिवस
ऑफिसमधे सुखद दिवस कमीच. त्यातही ब-याच मिटींगा झाल्यानंतरही दिवस सुखद ठरावा हा आणखी एक सुखद धक्का त्या दिवशी मला मिळाला. सवयीनुसार कोणी जास्त कामाचा भार माझ्यावर टाकला नाही. सवयीनुसार मी देखील जास्त कामाचा भार ओढवून घेतला नाही. दुपार उलटून गेली तशी ती दुपार आणखीनच सुखद वाटायला लागली. छान नवी गाणी लावून वगैरे मी नेहमीचीच रटाळ जुनी कामं उरकत होतो. त्यात व्यत्यय आणायला कोणीही क्युबमध्ये येऊन उगाच प्रश्न-बिश्न विचारत नव्हते. अर्धे अधिक लोक रजेवर असावेत, कारण एकंदरीत कचेरीत शांतता सुखनैव नांदत होती.

आज संध्याकाळी ट्वेन्टी-२० ची फायनल मॅच होती आणि त्याकडेच अस्मादिकांचे डोळे लागले होते.

एक सुखद संध्याकाळ
जरा लवकर निघावं ऑफिसातनं तर लोकांच्या भुवया एक दोन इंच वर जातात इतर दिवशी, पण आज नाही. कारण सगळेच लवकर निघणार होते. क्रिकेटज्वराने मॅनेजरलादेखील ग्रासले होते. त्यामुळे मोठ्या दिमाखातच मी निघालो. एक-दोन जणांशी ठरलेले हास्यविनोद उरकून बाईकवर बसलो तेव्हा साडेपाच वाजून गेले असावेत. ट्रॅफिक नावाच्या दिव्यातून आजही जावे लागणार या चिंतेतच मी किक मारली आणि निघालो. नशिब कधीकधी (च) आपल्या वाटेने चालून येतं; तसं ते आज आलं आणि आणखी सुखद वाटायला लागलं. निघालो तर नेहमी लागतात तसे ट्रक-बस-आणि मोटारींचे लोंढे गायब! म्हणजे अगदीच गायब नाहीत; पण मला जायचे त्या दिशेने गायब! काय सुखद संध्याकाळ असा विचार करत चौथ्या गियरमध्ये बाईक टाकली तेव्हा वेळेवर पोहोचीन असे नुसते मनसुबे नव्हते; तर घराचं दारच जणू दिसत होतं.

एक सुखद प्रवास
ऑफिसपासून माझं घर किती अंतरावर आहे असं विचारण्यापेक्षा किती मिनिटांवर आहे असं विचारणं संयुक्तिक ठरेल. म्हणजे मी उत्तरही त्या दृष्टिनेच देतो नेहमी. आठ किलोमीटर अंतर पार करायला बॅंगलोरमध्ये दहापासून शंभरपर्यंत कितीही मिनिटे लागू शकतात. ही झाली घड्याळातली मिनिटं, एकेक चौक पार करताना एकेक युग उलटतंय असे untimely विचार माझ्या मनात अनेकदा डोकावून जातात.

आजचा दिवस मात्र खासा निराळा. म्हणजे सगळं कसं जुळून आलेलं. आपल्याला जायचंय त्या दिशेने ट्रॅफिक नाही, ऑफिसकडे जायच्या दिशेने मात्र शेकडो वाहनं रांग करून (आणि मोडूनही) ही अशी उभी. "आयला, ऑफिसच्या दिशेने कोण एवढे लोक जाताहेत बोंबलायला संध्याकाळी, घरी जाऊन मॅच बघायची मस्त तर नाही," असे "देवा यांना माफ कर, ते काय करताहेत ते त्यांचं त्यांना कळत नाहिये" धर्तीवरचे पवित्र विचार मी मनाशी बांधून ठेवले. ट्रॅफिक इतका कमी होता की हे फक्त मनाचे खेळ होते अशी शंका आल्यामुळे मी एकदोनदा रस्त्याच्या मध्येच एकदम गाडी बंद पाडून किती हॉर्न ऐकू येतात हेही पाहून घेतलं. माझ्यामुळे कोणालाच अडथळा झालेला नव्हता. दुस-या बाजूला तिष्ठत उभ्या असलेल्यांसाठी एक करमणूकीचा खेळ करून दाखवला एवढंच.
एक सुखद महामूर्ख!
ट्रॅफिक आणि प्रतिस्पर्धी संघ नेहमी आगाऊ वक्तव्यांचा सूड घेतात. घेतला तर घेऊ देत. आज हमें कोई नहीं रोक सकता! मुख्य रस्ता डावलून घराकडे जाणा-या छोट्या गल्लीत वळलो तेव्हा बहुदा टॉस झालेला होता. भारताची पहिली बॅटींग एवढी पुसटशी बातमी मी पादचा-यांच्या तोंडून ऐकली आणि चला, घरी लवकर पोहोचतो आहोत, आणि पहिली बॅटींग, वाह, असं वाटलं. पुढच्या एक दोन गल्ल्यातून तर मी जणू काही उडतोच आहे की काय अशा थाटात बाईक हाणली आणि बिल्डींगच्या पार्किंगमध्ये लॅंड झालो. घड्याळात फक्त पावणेसहा वाजले होते. म्हणजे पंधरा मिनिटांत घरी तेसुध्दा संध्याकाळी, अहाहा काय सुखद अनुभव!

"चक देSSS इंडिया" --- शीळ घालतच जिने चढलो, जॅकेट काढलं आणि घरची किल्ली बाहेर काढण्यासाठी हात खिशात घातला. तत्क्षणी साधारण साताठ ठोके चुकले आणि आपण एक सुखद महामूर्ख आहोत याची खात्री पटली.

आज आम्ही घराची किल्ली ऑफिसमध्येच विसरून आलेलो होतो!!!

मंगळवार, ऑगस्ट २३, २००५

फुलवाली

एखादी व्यक्ती आपल्याला का लक्षात राहते आणि अनेक व्यक्ती का राहत नाहीत याला कारण नाही. त्यातही लक्षात राहणाऱ्या व्यक्तीचे पहिले दर्शन मला आठवेलच असे नाही. तिच्या बाबतीतही असंच काहिसं झालं. नवे शहर, नवी नोकरी, आणि नवी भाषा यांमध्ये तेव्हा अडकून पडलेल्या मला आता ती सांगते, की वर्षानुवर्षे ती त्याच ठिकाणी गजरे विकत आलेली आहे. तोच कोपरा, तोच कट्टा आणि जवळजवळ तेच गिऱ्हाईक. तिचं पहिलं दर्शन मात्र काही केल्या मला आठवत नाही. मात्र तिला आठवतं असं ती मला सांगते.

मला आठवतो तो प्रसंग मात्र ती "पहिला" म्हणून सांगत नाही. संध्याकाळची वेळ होती. पाऊस पडून गेलेला होता. मी ऑफिसचं काम संपवून घरी येत होतो. घराजवळचा तो कॉर्नर मोगरा-सायलीच्या सुगंधाने दरवळला होता. अनंत ट्रॅफिकच्या जंजाळातून वाट काढत आमची बस माझ्या स्टॉपवर आली आणि थकलेल्या इंद्रियांसंगे मी उतरलो. आयुष्यातकाही गोष्टी कुठल्याही प्रसंगात ताजेतवाने करणाऱ्या असतात. ताजी फुले त्यात अग्रगण्य असावीत. त्या कॉर्नरजवळ आलो आणि पावले मंदावली. अत्यंत कुरूप असं वर्णन झटक्यात करता येईल अशी एक बाई तिथे मोगऱ्याचे गजरे करण्यात मग्न होती. ओठांवर कळ्यांइतक्याच नाजूक आवाजातलं एक गाणं असावं. शेजारीच एक मूल हातातल्या मळकट खेळण्याबरोबर चिमुकल्या हातांनी झटापट करण्यात रमलं होतं. त्या क्षणी ते द्रुष्य मोहकही होतं आणि जरासं विचित्रही.

जरा थांबून मी त्या फुलांकडे पाहत होतो तोच सायकलवरून एक "बाप्या" असं वर्णन करता येईल असा "इसम" आला. तिच्या ओठांवरचं गाणं अचानक थांबलं, मूलही स्तब्ध झालं. मी अजूनही तिथून काही ऐकू येण्याच्या अंतरावर नव्हतो.फुलांचा दरवळ मात्र होता. त्या इसमाच्या एकंदरीत वागणूकीवरून तो काही एक चांगला पती वाटत नव्हता. त्याने तिच्याकडे पैसे मागितले असावेत. तिने जरा टाळंटाळ करायचा प्रयत्न केला, तो ऐकेना तेव्हा दोन-चार नोटा त्याच्या हातात कोंबल्या. अपेक्षेप्रमाणेच तो नाराजच वाटला. अजून काही अबोध शब्द उच्चारून मूठभर फुले काहीही कारण नसताना आपल्या मूठीने चुरगाळून तो आला तसाच निघून गेला. संध्याकाळची वेळ आणि चेहऱ्यावरचे भाव पाहून तो कुठल्या दिशेला गेला असावा याचा मला अंदाज आला.

माझं लक्ष आता त्या फुलवालीकडं परतलं. थोड्याशा नाराजीनंतर तिचे ते सरावलेले हात पुन्हा फुलांकडे वळले होते. वाऱ्याच्या झुळुकेबरोबर आता सुगंध माझ्याकडे परतत होता. माझी पावले तिच्या टोपलीवजा दुकानाकडे वळली. वास्तविक गजरा घेण्याचं मला काहीच कारण नव्हतं. पण फुलं माझा उत्साह परत आणण्यात नेहमीच यशस्वी ठरतआलेली आहेत. आणि माझ्या त्या लहानश्या घरात फुलांनी आणलेला उत्साह मला हवाहवासा वाटत होता. पण तरीही फक्त फुलं कशी दिलीस, आणि मग पाच रुपयांची दे, आणि हा मी चाललो, असं करावसं मला काही वाटत नव्हतं. वास्तविक जगात अशा कितीतरी स्त्रिया असतील ज्याना नवऱ्याच्या व्यसनापायी त्रास सहन करावा लागतोय. आणि मी काय अशा सगळ्यांविषयी सहानुभूती दाखवत बसणाऱ्यांत नव्हतो. तरीही, त्या दिवशी मला तिच्याशी बोलावसं वाटलं. तिच्या टोपलीतल्या फुलांच्या रंगाचा तिच्या आयुष्यातल्या अंधाराशी काही एक संबंध नव्हता. पण तिला कदाचित त्याचं काही वाटतही नसावं. गजरे करताना तिच्य चेहऱ्यावरचा तजेला त्या अंधाराला पळवून लावायला पुरेसा होता. इच्छा असुनही त्या दिवशी मी तिच्याशी काही तसा संवाद साधू शकलो नाही.

त्या दिवसानंतर ती मला रोजच दिसयला लागली. म्हणजे तशी ती वर्षानुवर्षे तिथेच आपले दुकान मांडायची;माझ्या ध्यानात ते आता नोंदलं गेलं. फुलांचा सुगंध मला तिच्या टोपलीकडे खेचून न्यायचा. तिच्या नवऱ्याला मी बऱ्याच वेळा पाहिलं, अगदी त्याच अवस्थेत. हे सारं मला एक कोडंच होतं.
तो रस्ता, ती संध्याकाळ, तो धुंद सुगंध. एके दिवशी असाच त्या रस्त्याने येत असताना मला ती कथा सुचली. त्या फुलवालीच्या आयुष्याभोवती मी माझ्या कल्पना गुंफत गेलो. कल्पनेला शब्दांची साथ मिळत गेली. कथेची कल्पना जरी त्या फुलवालीपासून सुरू झालेली असली तरी तसा त्या कथेचा तिच्या खऱ्या आयुष्याशी फारसा काहीच संबंध नव्हता. परंतु ती कथा चांगलीच जमून गेली. एका मासिकाच्या दिवाळी अंक कथा स्पर्धेत मग मी ती पाठवली. लिखाणातून मिळणाऱ्या आनंदापुरताच मी लिखाणाचा उद्देश्य मर्यादित ठेवायचो. यावेळी मात्र मला कोण जाणे पण ती कथा स्पर्धेत पाठवाविशी वाटली.

दिवाळीच्या तीन आठवडे आगोदर निकाल जाहीर झाला. माझ्यासारख्या हौशी लेखकाने यावेळी पहिले पारितोषिक पटकावले होते. परिक्षकांनी माझ्या मते त्या कथेची जरा जास्तच प्रशंसा केली होती. मला साहजिकच अत्यानंद झाला. स्वतःवर जाम खूष झालो. एका स्वतःपुरते-स्वतःसाठीच लिहिणाऱ्याच्या कथेला आज व्यावसायिक स्पर्धेत यश मिळाले होते. साधारण त्याच काळात त्या फुलवालीचं दुकान अचानक बंद झालं. तो कोपरा सुनासुना वाटायचा. पण लवकरच मला त्या सगळ्याचा विसर पडला. माझ्या लिखाणात मी गुंग होतो. आता मी प्रथितयश तरूण लेखक बनलो होतो. आणि हळुहळू व्यावसायिकही. त्यानंतर माझे अनेक लेख प्रसिद्ध झाले. बक्षिसंही बरीच मिळाली. खूष होतो मी.

त्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनंतर ती मला परत दिसली. त्याच कोपऱ्यावर तिनं तिचं टोपलीवजा दुकान थाटलं होतं. फुलं तिच होती. ताजी-टवटवीत. मी आता बदललेलो होतो. संध्याकाळी येणारा फुलांचा सुगंध मला त्यांच्याकडे बोलवायचा. मी मात्र जरा दुरूनच तिथून वाट काढीत निघून जायचो. तिचा नवरा मात्र मला काही कधी दिसला नाही.

एकदा जुनी पुस्तके आवरताना कपाटात तळाशी तो दिवाळी अंक सापडला. आणि अचानक मला त्या फुलवालीची परत आठवण झाली. माझ्या पहिल्या कथेची ती नायिका होती. आणि मला तिचा विसर पडला होता? त्याच संध्याकाळी तिच्याशी बोलायचं मी ठरवलं. ते सुरुवातीचे दिवस डोळ्यासमोरून तरळून गेले.

तिनं मला ओळखलं. असंच बोलताना मी तिला माझ्या त्या कथेविषयी सांगितलं. आणि तिच्या आग्रहाखातर मी तिला सगळी कथा सांगितली. ती विशेष कौतुकाने ते सगळं ऐकत होती. कथा संपत आली होती. पाहतो तर तिच्या डोळ्यात अश्रू. कथा तशी भावनाप्रधानच 'केलेली' होती. मला कळेना की एवढं काय झालं.

"त्यानंतर काय होतं ते सांगू?" असं तिनं विचारताच मी चमकलो. तिनं त्यानंतर जे सांगितलं तसंच कथेत होतं. त्या लिहिता-वाचता न येणाऱ्या बाईला साहित्याची बरीच जाण होती म्हणायची.

"तुम्हाला कसं कळलं?" मी विचारताच ती उत्तरली, "ही तुम्ही फक्त लिहिली आहे कथा, मी ही कथा जगले आहे. असो. आज माझ्याकडून तुम्हाला ही स्पेशल फुलं! फार छान सांगता तुम्ही कथा."

तिनं दिलेली फुलं घेऊन मी परतलो. मला माझ्या बक्षिसाची लाज वाटली. कल्पनाशक्तिच्या जोरावर अशा भराऱ्या मी मारल्या होत्या. लेखक या नात्याने मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर केला होता. यश मिळाल्यावर तर याचं प्रमाण फारच वाढलं होतं. ते चांगलं की वाईट हे मला ठाऊक नाही, पण ते आंधळं होतं. मी माझ्याच स्वप्नील जगात जगत होतो. त्या फुलवालीनं मला जागं केलं होतं.

ती रात्र अशीच विचारमग्न अवस्थेत गेली. सकाळ झाली तेव्हा सगळं मळभ दूर झालेलं होतं. मी परतलो होतो. तोच मी होऊन जो कधी काळी संवेदनाशील होता. जो भौतिक जगाचा तितकाच भाग होता जितका काल्पनिक जगाचा. दोन जगांमधला तुटलेला सांधा जुळला होता.

तिनं काल दिलेली फुलं अजूनही तितकीच टवटवीत होती.

बुधवार, मे ०४, २००५

३ मे १९०५

आता याच जगाचं उदाहरण घ्या!

या जगात घटना आणि त्याची कारणं यांची कधीकधी अदलाबदल होतेय असं जाणवेल - आणि कदाचित तसं जाणवणार होतंच याचा उलगडा जाणीव झाल्यावर होईल!

या जगात भूत आणि भविष्यकाळ एकमेकांवर अवलंबून आहेत.

(१)

रम्य नदिकिनारी, एका टुमदार बंगलीच्या गच्चीत एक व्यक्ती कठड्याला रेलून उभी आहे. नदिच्या प्रवाहाकडे खिन्नपणे पाहते आहे. कालप्रवाह या नदिच्या संथ पण एकाच दिशेने वाहणाऱ्या प्रवाहासारखा असता तर? यात कारण-परीणामांचे या जगातल्यासारखे भोवरे सापडले नसते. काहिही कारण नसताना जगाने त्या व्यक्तीकडे आज पाठ फिरवलेली आहे. त्याला आता कोणीही विचारत नाही - भेटायला येत नाही. इतकी सगळी वर्षे सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी ही व्यक्ती - अहो जगन्मित्रच! काय झालं असावं? (किंवा काय होणार असावं?)

या क्षणापासून फक्त सात दिवसांत त्या व्यक्तीची वागणूक पार बदलून जाते - वेडसर झाक येते त्याच्या बोलण्यात - चीडचीड, राग - अजागळ कपडे - कोणीही मग त्याच्या वाटेला जात नाही.

यात भविष्य कुठलं आणि भूतकाळ कुठला?
कारण काय आणि परीणाम?

(२)
या दुसऱ्या एका गावात शस्त्रास्त्रांवर आता बंदी घालण्यात आली आहे- नुकतीच. विळे कोयतेसुद्धा परवानगीशिवाय विकता/विकत घेता येत नाहित. गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांची ठिकठिकाणी झडती घेतली जाते आहे. पोलीसभरती दुपटीने वाढवण्यात आली आहे. काहितरी घडणार याची ही नांदी असावी का?

महिन्याभरातच त्या गावात अराजक माजतं. गुंडागर्दीला सुमार उरत नाही. जाळपोळ, लुटालूट - पार हद्द होते. जडजवाहिर- बाजारपेठा- सगळीकडे फक्त विनाश.

महिन्याभरापूर्वीचे 'नवे' शस्त्रास्त्रविरोधी कायदे-नियम हा या गुन्हेगारीवरचा उपाय होता? की त्याचं कारण?

(३)
एका विस्तीर्ण उद्यानात एक तरुणी हिरवळीवर बसली आहे. तशी ती दर रविवारी या उद्यानात येते; पण आजचा रविवार वेगळा आहे. गर्द लाल गुलाब, सुगंधी निशिगंध, धुंद कुंद - सगळं काही ती अचानक विसरते. क्षणात लाजेनं चूर चूर होऊन जाते. अत्यानंदानं स्वत:भोवती गिरकी घेते - अचानक!

थोड्याच दिवसांनंतर तिला तो राजबिंडा तरूण भेटतो.

या दोन घटना एकमेकांवर अवलंबून आहेत का?

(४)
या जगात वैद्नानिक अगदी बिचारे आहेत. त्यांची भाकितं ही फक्त दुजोरा ठरतात, जे सापडणार आहे याची. जुगारी माणसांसारखी ही शास्त्रद्न्य जमातदेखील हा शोधांचा जुगार अव्याहतपणे खेळत असते. या विचित्र जगात विद्न्यानाच्या मार्गाने सरळ जाणारा शास्त्रद्न्य वेडा ठरतो . ( की या सरळ जगात शास्त्रद्न्यच वाकड्या वाटेने जात असतो?) या 'विना'कारण जगात काहिही सांगता येत नाही!

(५)
या जगात कलाकार खरे राजे आहेत त्यांच्या जीवनाचे. त्यांच्या चित्रांतून, संगीतातून, लेखनातून सदैव कल्पनातीत गोष्टी पुढे येत असतात - आणि या जगात कल्पनातीत हेच वास्तव असल्यामुळे त्या या जगाशी एकरुप होऊन जातात.

--
या जगातले लोक एक गोष्ट शिकले आहेत- ती म्हणजे हा-आत्ताचा क्षण पुरेपूर जगायचा. जर भूतकाळाचा भविष्यावर जर काही परीणाम होणार असेल, आणि जर ते निश्चितच नसेल, तर भूतकाळात जगून काय फायदा? आणि जर वर्तमानाचं भविष्यावर फारसं नियंत्रण नसेल, तर भविष्यासाठी कशाला जगायचं? या जगात प्रत्येक क्षण हे एक बेट आहे. त्या बेटापुरतंच त्याचं महत्त्व आणि अस्तित्वसुद्धा.

या जगात उच्चारलेला प्रत्येक शब्द त्या क्षणापुरता आहे. प्रत्येक श्वास, फक्त त्या श्वासापुरता. प्रत्येक कटाक्ष त्या नजरेतल्या भावनांपुरता, त्याला न भूतकाळ आहे किंवा भविष्यकाळ.

प्रत्येक सूर फक्त त्या सूरापुरता...

प्रत्येक स्पर्श फक्त त्या स्पर्शापुरता...

प्रत्येक क्षण फक्त त्या क्षणापुरता...

---
उपसंहार :
Allan Lightman च्या Einstein's Dreams मधल्या ३ मे १९०५ च्या स्वप्नाचा हा अनुवाद आहे. अनेक दिवसांपासून मी एखाद्या स्वप्नाचे भाषांतर करावं असा विचार करत होतो. आज सकाळी सहज पुस्तक चाळता-चाळता या "स्वप्नावर नजर" पडली. आणि लिहून टाकलं. त्यानंतर शीर्षक देण्यासाठी पुन्हा पहिले पान पाहिले तर "३ मे १९०५". काही गोष्टींचे स्पष्टिकरण देता येत नाही. आजची तारीख आहे ३ मे २००५! आणि योगायोग पहा - कारण आणि परीणाम यांची गफलत झालेल्या काळाचं हे स्वप्न आहे.

प्रत्येक गोष्टीला कारण नसतं हेच खरं!