शुक्रवार, फेब्रुवारी ०८, २००८

नाट्य

सकाळचं धुकं विरघळलं आणि कोवळ्या उन्हानं उरलेलं दंव टीपून घ्यायला सुरुवात केली. कुठेतरी पलिकडे उगीच एखादी शेकोटी उरलेली; तीही धुराचे उरलेले लोट धापा टाकत हवेत सोडू लागली. हवेतला गारठा जाणवत होताच; पण दाट झाडीतून गाळून आलेलं का असेना पण छानसं ऊन पडायला लागलं आणि थंडीसुद्धा नाही म्हणायला नरम पडू लागली. धुकं म्हणावं की ढग; त्याच्या पांढुरक्या पडद्यातून सूर्याचं आख्खं दर्शन घडत होतं.

अशी सकाळ मला आवडते. विशेषतः छान न्याहरी झाल्यानंतर सायकलवरनं एक रपेट मारावी तर ती अशाच सकाळी. हात सोडून सायकल चालवण्यात काय मजा आहे ते हेल्मेट घालून मागे बसणा-याला नाही कळायचं. बहुतेक वेळा मी असाच हात सोडून निवांत सायकल मारत असतो. भोवतालच्या जगाकडे लक्ष असलं तरी सायकल चालवतांना तरी मी माझ्याच विश्वात हरवून जात असतो. त्या दिवशी मात्र असं काही घडणार नव्हतं.

माझ्या नेहमीच्या वाटेवरच्या त्या शाळेच्या मैदानापाशी पोहोचलो तेव्हा आपसूकच "काय मस्त हवा आहे, क्रिकेट खेळायची हवा" असं वाटून गेलं. त्या मैदानावर मुलं नेहमीच क्रिकेट खेळत असतात. त्या दिवशीही मस्त खेळ रंगात आलेला. मला काही फारशी घाई नव्हती त्यामुळे आधीच हळू जाणारी माझी सायकल मी थांबवली आणि एका कडूनिंबाच्या झाडाचा आधार घेत सायकलवर तोल सांभाळून बसलो. मॅच चांगलीच चुरशीची होत असावी; कारण जो तो अगदी रंगून गेला होता. नाही म्हणायला, "कमॉन, घेऊन टाक त्याला" असा पुकारा होत होता अधून मधून; पण एकंदरीत आजूबाजूला शांतताच होती.

कुठल्याही खेळात एक नाट्य असतं. फरक एवढाच की त्याची स्क्रीप्ट तयार नसते आणि त्या नाट्यातले कलाकार अभिनय करत नसतात! खरं पाहिलं ना तर सगळं आयुष्यच एक नाट्य आहे असं म्हणता येईल. अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रवेश काही अनन्यसाधारण नसतात आणि त्यामुळे त्यांचा रसिकवर्ग अगदीच मर्यादीत असतो. काही नाट्यांच्या नशिबात प्रसिद्धी नसते. गंमत म्हणजे अशा नाट्यांतल्या कलाकारांना त्याची अपेक्षाही नसते. त्या नाट्यात सहभागी होता येणं हेच त्यांच्यासाठी मोठं बक्षीस असतं.

त्या दिवशी थोडं असंच काहीसं घडलं. एक अफलातून झेल मी पाहिला; गडी बाद झाला; पुढचे गडी पटापट बाद होत गेले; आणि सामना क्षेत्ररक्षण करणा-या संघाने जिंकला असं माफक वर्णन करून मी पुढे सरकू शकलो असतो; पण तो अन्याय ठरेल. अगदी गुन्हा म्हणावा एवढा अन्याय.

तो फटका निव्वळ महान होता. क्रिकेटच्या तज्ज्ञांकडून त्याचं विश्लेषण करून घेता येईल; पण विश्लेषणाची चिरफाड केल्यानंतर कदाचित त्याचं सौंदर्यच बिघडून जाईल; म्हणून मी फारसं वर्णन करणं टाळतो. बॅटच्या पट्ट्यात आलेला तो चेंडू; जितक्या वेगानं आला तितक्याच वेगानं सीमारेखेकडे निघालेला. ज्या क्षणी बॅटचा आघात त्यावर झाला तेव्हाच जणू काही चार धावा त्यावर छापल्या गेलेल्या. पण कव्हर म्हणतात की काय त्या भागात उभ्या ठाकलेल्या त्या छोटूच्या मनात काही वेगळंच असावं. चेंडूवर नजर आणि मनात विश्वास ठेवून त्यानं आपलं लवचिक शरीर हवेत भिरकावलं. फुटबॉलमध्ये गोलकीपर जसा पूर्ण आडवा होत बॉल जाळ्यात जाण्यापासून वाचवतो; तशीच काही पोझ या बेट्यानं दिली आणि जो चेंडू पुढच्या क्षणी सीमारेखेपार जाणार होता, तो एकहाती झेलला! अगदी अशक्य वाटावा असा तो झेल!

त्याचे सगळे मित्र जमले; त्याला हवेत काय फेकला; काय आरडाओरडा काय विचारायला नको. माझ्या डोक्यावर जर त्यावेळी टोपी असती तर मी ती बिरबलासारखी खाशी हवेत भिरकावून दिली असती. हा सगळा खेळ पाहून माझी सकाळ अजूनच सुंदर झाली. मी इकडेतिकडे पाहिलं; कोणी होतं का माझ्यासारखंच नशिबवान ज्याला हे नाट्य बघायला मिळालं? कोणी नाही. झाडावरचे कावळे आपल्या नित्यक्रमात मश्गूल; एक रिक्षा प्रचंड धूर (आणि आवाज) सोडत पुढे निघालेली. तीन-चार बायका "काय एवढा गोंधळ आहे" असा एक त्रासिक चेहरा घेऊन रस्ता क्रॉस करत होत्या. बाजूच्याच घरातून एक काकू क्रिकेटकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत तुळशीला पाणी घालून आत गेल्या.

आणि मी? त्या विलक्षण नाट्यात सहभागी नाही तरी एक भाग्यवान प्रेक्षक बनल्याचं समाधान घेऊन सायकल हाकीत पुढे सरकलो.

---
माझ्याच "The Unsung Hero" वरून.

२ टिप्पण्या:

आजानुकर्ण म्हणाले...

वा! मस्त

Surendra म्हणाले...

हात सोडून सायकल चालवण्यात काय मजा आहे ते हेल्मेट घालून मागे बसणा-याला नाही कळायच!

हेल्मेट घालून सायकलवर मागे बसणा-याला??

छान लाईन आहे :-)