टीका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
टीका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जानेवारी १५, २०२१

विरोधाभास

एका बाजूला covid १९ च्या विषाणूचा सखोल अभ्यास करणारे वैज्ञानिक. तो अभ्यास सुकर होण्यास उपकारक अशी उपकरणे. प्रोटीन आणि जनुकीय तंत्रज्ञान - या सगळ्या अत्यंत अवघड संशोधनातून, जागतिक पातळीवरच्या अथक परिश्रमानंतर तयार झालेली (झालेल्या) लस. अशी एकंदरीत मानवजातीची प्रगती. 


आणि 


दुसऱ्या बाजूला  या दुर्धर रोगाची, त्यातून तयार झालेल्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांची खिल्ली उडवत, उद्दामपणे नियम मोडत स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात ढकलणारे पुराणमतवादी.. 


सगळी गम्मत आहे.

रविवार, एप्रिल २७, २००८

काय वाट्टेल ते होईल!

काल की परवा IPL च्या मॅचनंतर पराभवाचं शल्य (टोचायला नको त्या ठिकाणी) टोचल्यामुळे रागाच्या भरात कर्णधार हरभजन सिंगने आपला हुकुमी गोलंदाज शांता श्रीशांतच्या श्रीमुखात भडकवली. चारचौघात आपल्या कर्णधाराने आपले गाल लाल चुटूक केल्याचं टिचभर दुःख अनावर झाल्याने श्रीशांतने टिव्हीवरच भोकाड पसरले.

या बातम्यांमध्ये ख-या बातमीपेक्षा त्या बातमीत वापरलेली मराठी जास्त मनोरंजक असते! माझ्या डोळ्यांनी श्रीशांतचे अश्रू टीपले नाहीत आणि हरभजनसिंगला कर्णधार कोणी केला म्हणून ढाळलेही नाहीत. मी वेचला तो अनुप्रास! कर्णधाराचा मुकुट काटेरी खरा!
---

आज अंतुशेट असते तर, "परवा वर्च्या आळीतली पोरं खेळत होती क्रिकेट. झाल्या मा-यामा-या मॅच संपल्यानंतर. व्हायच्याच, आजकालची वाह्यात कार्टीच ती. पण म्हणून, छापाल काय ही बातमी उद्याच्या पेप्रात?" असं म्हणाले असते!
---

मंगळवार, ऑक्टोबर ०२, २००७

एकदिवसीय लढत

कोचीनची एकदिवसीय लढत (!) बघायला मी गेलो नाही हे बरंच झालं. नाही म्हणजे कोचीनचं जवाहरलाल नेहरू स्टेडियम म्हणजे काही चार रुपयांचं तिकिट काढलं बसचं आणि पोहोचलो इतकं काही मला जवळ नाही; खरं तर कोचीनला जायचा विचारही मला शिवला नव्हता. पण तरीही म्हणतो, की कोचीनची एकदिवसिय लढत बघायला मी गेलो नाही हे बरंच झालं. मुख्य कारण म्हणजे दूरदर्शनवरच्या अप्रतिम हिंदी समालोचनाला मी मुकलो असतो. आणि अर्थातच श्रीसंत नामक "भडकू"च्या नाटकांचा रसास्वाद नीटपणे घेता आला नसता तो वेगळाच.

अतुल वासन (हा भारतासाठी कसोटी खेळला आहे अशी अफवा आहे म्हणतात), यशपाल शर्मा आणि अरूण लाल (हाही लाल होता बहुतेक) या द्रुतगती त्रयींच्या धावत्या समालोचनाने भारतीय विनोदी साहित्यासाठी एक मोठा धडा घालून दिला असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

"महेंद्र सिंग धोनीने टॉस जीतकर ऑस्ट्रेलिया को बल्लेबाजी का निमंत्रण दिया। उनके निर्णय से मै सहमत नहीं हूं।" "मेरे खयाल से काफी सोच के बाद यह निर्णय लिया गया है। हरभजन सिंह जैसे वर्ल्ड क्लास स्पीनर को आज खिलाया जा रहा है। मेरे खयाल से यह सही निर्णय है।"

"श्रीसंत ने नपीतुली गेंदबाजी की थी साऊथ आफ्रिका मे, उसीका नजारा फिर देते हुये -- और ये लगा चौका! मॅथ्यू हेडन बहुत अच्छे फॉर्म में दिख रहें है आज।"

"कितने बडे है मॅथ्यू हेडन!" (ही अतिशयोक्ती नाही!)

"ऑस्ट्रेलिया के खिलाडी स्पीन गेंदबाजी अच्छी तरह से खेलने का रेप्युटेशन नहीं रखते।"

"रमेश पोवार काफी महॅंगे पड रहे है आज"

"फ्लाईट देने से नहीं चुकते हरभजन। और यह शॉर्ट पीच गेंद, विकेट किपर भी चुके और बाईज के चार रन!"

"सचिन तेंडूलकर से बोलिंग कराई जानी चाहिये। इस मैदान पर ऑस्ट्रेलिया के खिलाफ उनका रेकार्ड अच्छा है!"

"श्रीसंत ने यह कॅच पकडकर सायमंडस को दिखा दिया कितने अच्छे गेंदबाज वे है।"

"भारत की अच्छी शुरुआत। और ये गंभीर आऊट! ऐसा शॉट खेलने की कोई जरूरत नहीं। पुरी तरह चुके और क्लीन बोल्ड"

"सचीन सॅंभालकर खेल रहे है। और यह क्या!!! सचीन आऊट। बहुत ही खराब शॉट।"

"इरफान पठान के रन आऊट होने के बाद भारत की परीस्थिती बिगडती हुई। भारत एक सौ उनतालीस पर छह।"

"सौ रन से जादा मार्जीन से हारना पचास ओव्हर की मॅच में बहुत बुरी चीज़ समझी जाती है। मेरे खयाल से महेंद्र सिंग धोनी की यही कोशिश होनी चाहिये की स्कोर किसी भी तरह दोसों से उपर लेके जायें।"

काय एकेक मुक्ताफळे! हे हिंदी समालोचक क्रिकेटचं धावतं वर्णन करत नाहीत तर भारत कसा खेळतोय (आणि त्यापेक्षा भारताने कसे खेळायला हवे) याचीच जास्त बडबड करतात. दुसरं म्हणजे हे लोक असतात दिल्लीत, आपल्याला जे टीव्हीवर दिसतंय तेच त्यांनाही दिसत असतं. त्यामुळे "यह लगा छक्का ... अरे नहीं.. और ये बल्लेबाज आऊट" अशी नेहमी त्यांची गल्लत होत असते.

मजा येते पण ऐकायला!

आजच्या दुस-या नाट्याचे नायक म्हणजे आपले श्री संत महाराज, श्री"संथ". ऍंड्र्यू सायमंडसला खुन्नस देण्यागोदर त्याने खालील गोष्टींचा सखोल अभ्यास करावा असे माझे नम्र मत आहे:
  • सायमंड्सचे वजन (आणि वय) आपल्या वजनाच्या किती पट आहे हे हाताच्या बोटावर आधी मोजावे
  • आपण किती खोबरेल तेल चोपडतो आणि सायमंड्स किती ते बघावे. उगाचच हमरीतुमरीवर असं "घसरू" नये.
  • शाळेच्या पहिल्या दिवशी कोण किती रडलं होतं याची आठवण ठेवावी.
  • सायमंड्सच्या केसांची लांबी आणि गालावरचं क्रिम पाहून थोडंसं तरी वचकून असावं.
  • भूताचा सिनेमा पाहताना मागच्या वेळी थिएटरमधून कोणी पळ काढला होता ते स्वतःलाच विचारून ठेवावं
  • अगदीच सगळं विसरलास तर आपली कितवी ओव्हर चालू आहे, स्कोर कोणाचा किती झालेला आहे, कॅप्टन आपल्यावर कसा खूष नाहीये, आपली आत्तापर्यंत किती पिटाई झालेली आहे, आणि अजून किती नक्की होणार आहे, या आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर झालेला आपला पोपट सुंदर दिसणार नाही याचं तरी भान ठेवावं!
पण यातलं काही म्हणजे काही झालं नाही. एक कॅच काय घेतला भाऊनं आणि कसोटी क्रिकेटमध्ये सातशेवा बळी मिळाल्याचा आनंद झाला चट्टाला.

श्री चट्टा, थोडं सॅंभालके, लॉर्डस अभी दूर है!

मंगळवार, मे २९, २००७

आम्ही करायचं तरी काय?

सचिन तेंडूलकरबद्दल मला आताशा सहानुभूती वाटते.

काही वर्षांपूर्वी मनापासून आदर वाटायचा, आता सहानुभूती वाटते. म्हणजे, कसंही खेळा, तो चर्चेत आहेच. शून्यावर बाद झाला तर टीका, शतकांमागून शतकं काढून भारताला अंतिम फेरीत पोहोचवले खरे, पण सर्वांत महत्त्वाच्या त्या सामन्यात अपयशी ठरला म्हणून टीका; बरेच दिवस धावा जमल्या नाहीत म्हणून टीका; आणि आता सलग दोन कसोटींमध्ये शतकं ठोकली - पण ती बांग्लादेशसारख्या कमकुवत संघाविरुध्द आणि तीही कासवाच्या गतीने; म्हणूनही शेवटी टीकाच!

अर्थात या बाबतीत मला टीका करायची नाहिये असं नाही; खरं सांगायचं तर मला तसं काही मतच नाहीये. आणि म्हणूनच मला सचिन तेंडूलकरबद्दल सहानुभूती वाटतेय.

त्यानं करायचं काय सांगा!

असो. सचिन तेंडूलकरचं सोडा. आपल्यासारख्या, नको - माझ्यासारख्या सामान्याने नक्की काय करावं असा अनेकदा प्रश्न पडतो. क्रिकेट विश्वचषक सोडा, अगदी रोजच्या धकाधकीच्या 'जीवनात' मी करायचं तरी काय? हाच तो प्रश्न.

चहा प्यावा की कॉफी? एक संशोधक सांगतो चहामध्ये औषधी गुण आहेत, तर दुसरा लगेच म्हणतो की चहा ह्रुदयासाठी वाईट. कॉफी जास्त पिऊ नका; बध्दकोष्ठता (म्हणजे नेमकं काय ते देव जाणे) वाढते म्हणे. दूधाच्या बाबतीतही असेच परस्परविरोधी सल्ले ऐकू येतात.

दारू आणि मांसाहार या नॉनव्हेज बाबतींत तर इतके परस्परविरोधी सल्ले मिळतात की काही विचारायलाच नको.

कुठेतरी जायचं असेल तर बसने जावं की पायी? एक सल्लेखोर (हा माझा पेटंट शब्द आहे) म्हणणार बस कशाला? पायी जा; तेवढं पेट्रोल वाचवलं तर ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल. दुसरा म्हणणार; कसला कंजूष आहे बघा, पटकन बस-रीक्षा करून जायचं ते नाही! उगाच व्यायामाचं कारण कशाला दाखवा, पैसे वाचवायचे आहेत असं सरळ सांगा की!

लहानपणी, ऐकावं की दंगा करू नको; आणि दंगा केला नाही तर; उगाच कसला मोठ्या माणसासारखा आव आणतंय बघा कार्टं!

शुध्द मराठीचा वापर करावा तर आपण 'गणू' किंवा 'बाळू' ठरणार. जरा इंग्रजीचे प्रयोग करून पाहिले तर, "मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचं भविष्य धोक्यात आहे रे बाबा!" असे टोमणे.

ऑफिसमध्ये नवी जबाबदारी द्या म्हणालो तर ते पॉलिटिकली करेक्ट ठरत नाही - दुस-याच्या कामात नाक खुपसलेलं बॉसला आवडत नाही. बरं, दुस-याची जबाबदारी मला देऊ नका म्हणालो तर पुढच्या प्रगतीपुस्तकात ती एक ठळक उणीव म्हणून दिसणार.

रागावर संयम ठेवावा तर काही विद्रोही प्रवृत्तीच्या लोकांना तो भ्याडपणा वाटणार; रागवावे तर तो सहा शत्रुंपैकी एक म्हणून सतत छळत राहणार.

शिस्त पाळावी तर "अरे बिन्धास्त राहण्यात काय मजा आहे हे तुझ्यासारख्या शिस्तप्रिय माणसाला काय कळणार, छ्या! जाऊदे" असं ऐकायला मिळणार. तर कधी शिस्त मोडली तर, "काय हे, तुझ्याकडून तर हे मला कधीच अपेक्षित नव्हतं" अशा प्रतिक्रिया!

उधळपट्टी करावी तर "बचत म्हणजे कशाशी खातात कळणार नाही बुवा याला कधीच"! आणि मला "पराक्रम" केला असं वाटायला लावणारी बचत केली तर ती १००% कंजूषी ठरणार.

खाईन तर तुपाशी... असा पवित्रा घेतला तर म्हणणार की अरे प्राप्त परीस्थितीत जे आहे त्याचाच स्वीकार केला पाहिजे. आणि आहे ते तसंच मान्य केलं; तर अल्पसंतोषी अल्पसंतोषी असा गलका होणार. नक्कीच!


पण असो. आयुष्यातल्या अशा विरोधाभासांमध्ये, तर खरी मजा आहे. आणि पुढ्यात इतके सारे विकल्प आहेत; हेही नसे थोडके.

माझ्यासारख्याला इतके प्रश्न पडतात तर सचिन तेंडूलकरचं तर काय विचारता!
"पूल करायला हवा होता" "पूल कसला करताय? स्क्वेअरकट करायचा बॉल तो."

"आता रनरेट वाढवायला हवा." "हं. आणि आऊट झाला म्हणजे? गडगडणार ना सगळी टीम?. टीकून खेळायला पाहिजे मी सांगतो"

"बाउंन्सरला घाबरतोय आताशा सचिन. वय झालं हो" "गेली वीस वर्षं खो-यानं धावा जमवल्यात आमच्या सचिननं. बाउन्सरला लहानपणीसुध्दा घाबरला नव्हता; आत कसला घाबरतोय?"

"सचिननं आता क्रिकेटला रामराम ठोकायला पाहिजे." "काहीही काय? अजून पाच वर्षं नक्की खेळणार सचिन."
असे एक नाही तर हजारो सल्ले. त्यानं करावं तरी काय?

कोण्या एका शहाण्या माणसाने एक फार मोलाची म्हण मराठी भाषेला प्रदान केली आहे, ती म्हणजे, "ऐकावे जनाचे, करावे मनाचे". मी असंच करतो. जनाचे ऐकून शेवटी मनाचेच करतो. सचिन तेंडूलकरच्या बाबतीतही माझे असेच मत आहे. त्यानेही या सगळ्या जनांचे ऐकावे, पण शेवटी करावे ते माझ्या मनाचेच!

आणि ते म्हणजे चांगली सहा सात शतके ठोकून नंतर दिमाखात निवृत्त व्हावे!

शनिवार, एप्रिल ०७, २००७

मराठी!

एक 'काळ' असा होता की पुरे आता भाषणं असं होऊन जायचं. सांस्कृतिक कार्यक्रमांचा बक्षिस समारंभ, क्रिडामहोत्सवाचे पारितोषिक वितरण, संस्थापक दिवस, एक नाही तर दोन - शाळेत असताना "भाषण ऐकायला येतोस का?" या प्रश्नाचे उत्तर केवळ नकारार्थी नसायचं तर त्याबरोबर तोंड वाकडंही केलं जायचं.

शाळा सोडली, उच्च विद्याविभूषित झालो (आणि हो एकदा तर मलाच भाषण करावे लागते की काय अशीही वेळ आली होती..), आणि त्याचबरोबर भाषण ऐकण्याची सवय गेली. आता तर इच्छा असूनही संधी मिळत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर या वर्षी गुढीपाडव्याला मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष श्री. अरूण साधू यांचे भाषण ऐकायची संधी चालून आली. त्या भाषणाचा हा आढावा:

मराठी भाषेची सद्य 'अवस्था कशी आहे आणि तिचे भवितव्य काय असा साधारणतः भाषणाचा विषय होता. मराठी लोकांचे मराठीवरचे प्रेम ओसरते आहे का? तिचा वापर करायला लोक कचरत आहेत की काय? असे प्रश्न पुढे आले. मराठी भाषिकांच्या वाचन-सवयींचे काय? पूर्वीपेक्षा आता मराठी वाचन कमी होतेय असा ओरडा आहे. पूर्वी पुस्तकांच्या हजार प्रती मोठ्या मुष्किलिनं खपायच्या. क्वचितच पुनर्मुद्रण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय व्हायचे. आजच्या परीस्थितीवर नजर टाकल्यास, याच्या उलट परीस्थिती दिसेल. दहा हजार प्रतीही खपताहेत हातोहात! अर्थात लोकसंख्यावाढ आणि शैक्षणिक प्रगती यांचा त्यास हातभार आहेच. त्याचबरोबर वाचकांच्या आवडीनिवडीही बदलल्या असणार. दुर्दैवाने वाचनालयांतून देवाण-घेवाण होणाऱ्या पुस्तकांच्या संदर्भात सखोल अभ्यास झालेला नाही. कुठला वयोगट कुठल्या लेखकांची, कुठल्या विषयांवरची पुस्तके वाचतो, कथा-कादंबऱ्यांच्या विषयांचा त्या वाचल्या जाणाऱ्या गावांशी-शहरांशी काही संबंध आहे का? इत्यादी, भाषेच्या आरोग्याबद्द्ल मोलाची सूचना देणारी माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही-- त्यामुळे, मराठीची तब्येत खरोखरच बिघडते आहे का त्याचे निदान कसे करणार?

दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला--- लिखित माध्यमांची भाषा आणि रोज वापरली जाणारी, बोलीभाषा यांच्यातले अंतर वाढत चालले आहे. कथा-कादंबऱ्यांमधून वाचतो ती भाषा आणि बाजारात-दुकानांत-कॉलेजांमध्ये वापरली जाणारी व्यावहारीक मराठी यांच्यात नक्कीच तफावत आहे. त्यात वाईट वाटून घेण्यासारखे मात्र काही नाही.

मराठी भाषा बदलते आहे - नव्हे, जगातील सगळ्याच भाषा बदलत आहेत. वेगाने बदलणाऱया जगात जर तुमची भाषा लवचिक नसेल, सुसंगत, योग्य बदलास पोषक नसेल तर तिचे टीकून राहणे कठीण. "महापूरे वृक्ष जाती, तिथे ..."असे म्हटलेलेच आहे. मराठी ही एक लवचिक भाषा आहे. त्यामुळे ती हा योग्य बदल स्वीकारून टीकून राहिलच, एवढेच नव्हे तर एका प्रगत भाषेचा दर्जा प्राप्त करेल.

केवळ पुस्तकी भाषेला चिकटून राहिलो तर काही खरं नाही. उदाहरणादाखल ज्ञानेश्वरी घ्या -- ती भाषा मराठीच आहे; परंतु समजायला महा-अवघड. तळटीपा आणि संदर्भांचा आधार न घेता ओव्यांचा अर्थ समजणे जवळजवळ अशक्यच! ज्ञानेश्वरी सोडा, तुकारामाचे अभंगही आता कठीण वाटतात की नाही? हे सगळे असे झाले यास कारण म्हणजे भाषा बदलली. सोळाव्या शतकापासून आतापर्यंत हा बदल सुरूच आहे. बदलाची गती मात्र आताच्या वेगवान जीवनमानाला साजेशी-- अतिजलद बनली आहे. बहुभाषिक समाज, राजकीय-आर्थिक घडामोडी, आधुनिक तंत्रज्ञान यांचं प्रतिबिंब केवळ मराठीच नव्हे तर जगातील इंग्लिशसकट सगळ्या भाषांवर पडते आहे.

संस्कृती आणि भाषा यांचं नातं अतूट आहे, या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरकच होत. केवळ संस्कृती किंवा केवळ भाषा माणसाला घडवते असं मात्र नाही. आजूबाजूची सामाजिक परीस्थिती, संपर्कात येणारे लोकविशेष, अनुभवही माणसाला घडवत असतात. जर भाषा या सगळ्यांना व्यक्त करू शकली नाही, सामावून घेऊ शकली नाही तर त्या भाषेचे अस्तित्त्व धोक्यात येईल. आणि म्हणूनच, बदलत्या समाजास अनुकूल असे भाषेने बदलायला हवे. ज्ञानाची नवी क्षितिजे खुणावतात तेव्हा भाषा त्या क्षितिजासारखी रुंदावते - 'परकी' भाषेतल्या पाहुण्यानाही आपल्यात सामावून घेते. भाषेस आत्ता-आत्तापर्यंत नवखे असणारे तंत्रज्ञान मग तिचे आपले होऊन जाते. यास भाषेचा ऱ्हास म्हणायचा का? नव्हे, हा तर भाषेचा विस्तार. हा विस्तार, अर्थातच कुठल्याही निरोगी वाढीसारखा, मर्यादेत, योग्य-अयोग्यतेच्या कसोट्यांवर लागू पडत, सुसंगत अशा पध्दतीने व्हायला हवा. तेव्हाच ती बदललेली भाषा बदललेल्या समाजास 'आपली' वाटेल आणि समाजाबरोबरच प्रगती करेल.
---
श्री. अरूण साधूंच्या भाषणातून मी जे काही टीपून घेतले ते मांडण्याचा हा प्रयत्न.

मराठी भाषेचा दर्जा खालावतो आहे का? याचे सकारात्मक किंवा नकारात्मक उत्तर जरी या भाषणातून मिळाले नसले; तरी आपण सावध असायला हवे याची सूचक जाणीव त्यांनी नक्कीच करून दिली. भाषण ऐकून एक प्रकारचा विश्वास मात्र नक्की गवसला.

"पूर्वीची मराठी राहीली नाही आता," असे (रड)गाणे तर सदैव सुरूच राहणार - पण मी म्हणतो, पूर्वीचा समाज तरी कुठे पूर्वीसारखा राहिलाय आता? मग भाषा - जे समाजाचे सच्चे प्रतिबिंब आहे, ते तरी पूर्वीसाखे का म्हणून रहावे?

लवचिक रहाल तर वाचाल (आणि वाचाल तर वाचाल - ते तर आहेच) हाही योग्य संदेश मिळाला. "मला मराठीचा गर्व आहे," असे म्हणून बदल स्वीकारला नाही तर कदाचित महापूरातील वृक्षासारखी मराठीची अवस्था होईल, कदाचित होणार देखील नाही. पण म्हणून गर्व कशाचा असू नये. गर्वाचे घर खाली म्हणतात ते बरोबरच आहे. मात्र त्यापेक्षा, "मला मराठीचा अभिमान आहे (आणि हो, काळजी आहे, काळजी वाटतेय असं नाही [आणि काळजी, चिंता नाही हं!])" असे म्हणून भाषेच्या बदलत्या स्वरुपाचा आस्वाद घ्यावा असे मला वाटते. काय?

रविवार, मार्च १८, २००७

पराभवानंतर...

इ.स. १८८२ साली जेव्हा प्रथमच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने इंग्लंडला त्यांच्या भूमीवर, ओव्हल मैदानात धूळ चारली तेव्हा "इंग्लिश क्रिकेटचे काल निधन झाले, देहावर अंत्यसंस्कार करून अस्थी ऑस्ट्रेलियाला नेण्यात येतील" अशी छोटीशी निधनवार्ता इंग्लिश वर्तमानपत्रात छापून आली. आणि त्यातूनच ऍशेस मालिकेचा जन्म झाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये क्रिकेटच्या बाबतीत इतकी चुरस कशी हा रंजक प्रश्न आहे. क्रिकेटचा जन्म ब्रिटिश बेटांवर झाला असला तरी राणीच्या साम्राज्याबरोबर तो ब्रिटिश वसाहतींमध्येही पसरला, करमणूक आणि व्यायाम एवढेच त्याचे स्वरूप न राहता तो हळूहळू प्रतिष्ठेचाही मुद्दा बनू लागला. पारतंत्रातल्या भारतात सामाजिक बदल घडवून आणण्यात क्रिकेटचा मोठा हातभार होता असेही म्हणता येईल. रामचंद्र गुहा या ख्यातनाम इतिहासकाराचे "A Corner of A Foreign Field: The Indian History of a British Sport" हे पुस्तक क्रिकेटच्या इतिहासाचा अत्यंत मनोरंजक आढावा घेते. उच्च दर्जाचे इंग्रजी, सखोल अभ्यासपूर्ण लेखन आणि खेळकर लेखनशैली ही या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये. ब्रिटिश साहेबाकडून पाहून-पाहून शिकता शिकता वस्तुतः पूर्णतः 'गोरा' खेळ भारतीय मातीत कसा रुजला आणि फळाला आला याची ही कथा. कोणत्याही प्रकारच्या तुफानी आकडेबाजीचा आधार न घेता, जुन्या पुराण्या वर्तमानपत्रांतील टीपणे, वाचकांचे पत्रव्यवहार, इ. इ. संदर्भ देत हे पुस्तक आपल्याला खिळवून ठेवेल.

...क्रिकेट अनिश्चिततांचा खेळ आहे असे म्हणतात. ते कितपत खरे अशी शंका वाटायला लागली. कालची बांग्लादेशविरुध्दची मॅच पाहता याची आठवण होत होती. अर्थात भारतीय संघाचा खेळ पाहता पराभव होणार यात काहीच अनिश्चितता वाटत नव्हती. भरवशाच्या म्हशीला टोणगा ही घिसिपीटी म्हण पुन्हा एकदा वापरात येणार, वर्तमानपत्रांतून रकानेच्या रकाने भरून टीका होणार, श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात मोठा विजय मिळवला नाही तर परतीच्या विमानाची तिकिटे काढायला पाठवावे लागणार, बांग्लादेशी संघावर बक्षिसांचा वर्षाव होणार हे सगळे तर नक्कीच. बांग्लादेशसारख्या 'लिंबू-टींबू' संघाने भारतासारख्या (कागदावर का होईना) बलाढ्य संघावर विजय मिळवून वाहवा तर मिळवलीच आहे, आता पुढच्या सामन्यांमध्ये ते कशी कामगिरी करतात यावरही भारताचे आव्हान अवलंबून आहे. तिकडे आयर्लंडच्या संघाने पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करून अजून एक धक्का दिला.' भारत-पाकिस्तान' सामन्याकडे डोळे लावून बसलेल्या रसिकाचा आणि त्याहून महत्त्वाहे म्हणजे, टि.व्ही. चॅनेल्सचा घोर अपेक्षाभंग केल्याचे पातक आयर्लंड संघाने केले आहे. परंतु कालच्या दोन्ही सामन्यांच्या विजेत्यांची कामगिरी खरोखर नेत्रदीपक किंवा डोळे दिपवून टाकणारी अशीच होती. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या नेहमी नावडत्या राणीसारखे दुर्लक्ष होणाऱ्या बाबतींत बांग्लादेश आणि आयर्लंडने कमाल करून दाखवली, आणि त्याचेच योग्य बक्षिस त्यांना जवळजवळ नक्की झालेल्या पुढच्या फेरीच्या स्थानात मिळाले आहे.

भारतीय संघाची दुय्यम दर्जाची कामगिरी ही नेहमीचीच डोकेदुखी आहे, ती बाजूला ठेवून या 'नवशिक्या' संघांच्या जोरदार कामगिरीला प्रसिध्दीमाध्यमे आणि ग्लॅमर दुनिया योग्य न्याय देतील ही अपेक्षा.

शंभर वर्षांपूर्वी जेव्हा भारतात क्रिकेटचा खेळ जोम धरत होता, तेव्हा अधून-मधून होणाऱ्या पराभवांकडे (हिंदू-पारसी-मुस्लिम संघांकडून) ब्रिटिशांनी कदाचित दुर्लक्ष केलेही असेल. लिंबू-टींबूची वागणूक (केवळ खेळाच्या दर्जामुळे नव्हे तर, राजकीय परीस्थितीमुळेही) सतत आपल्या संघांना मिळत असेलही, परंतु चिकाटीने त्यातून वाट काढूनच आताचे आपले संघ अस्तित्त्वात आले आहेत. त्याचप्रमाणे आयर्लंडसारखे संघ आता पुढे येत आहेत असे दिसते. एका विजयाने सगळे काही साधले असे नाही, परंतु हा एक मोठा टप्पा नक्कीच आहे. अर्थात भारतीय संघाने एका पराभवामुळे सारे काही गमावले असेही नक्कीच नाही. एकंदरीत खेळाच्या दर्जात होणारी सुधारणा उत्साहवर्धक आहे. जागतिक क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट-प्रसाराच्या धोरणासाठीही हे महत्त्वाचे आहे. नाणेफेक, खेळपट्टीचा (चुकलेला) अंदाज, पंचाची (खराब) कामगिरी, इ.इ. अशा अनेक गोष्टी पराभवाची कारणे म्हणून पुढे करता येऊ शकतात; परंतु ह्याच सगळ्या गोष्टींना विजेत्या संघासही परत कधीतरी सामोरे जावे लागणारच. सगळ्या अडथळ्यांवर मात करून जो शेवटी उरेल त्यासच विश्वविजेता घोषित केले जाणार आहे. त्यामुळे विजेत्या आणि पराभूत दोन्ही संघांनी हे लक्षात ठेवूनच पुढच्या सामन्यांची तयारी करावी.

दोन्ही संघांना पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा!

(आणि हो, (या स्पर्धेतला) पहिला पराभव होता, म्हणून भारतीय कामगिरीवर फारशी तोफ डागलेली नाही. पुढच्या वेळी असेच लिहिले जाईल याची शक्यता कमीच, त्यामुळे भारताने पुढचे सामने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश करावा हे श्रेयस्कर)

मंगळवार, फेब्रुवारी ०६, २००७

हिमनारंगी आणि सात बुटके?

"वातावरणाचे 'ताप'मान वाढतेय ते मनुष्यनिर्मित कारखाने, बेसुमार जंगलतोड, हवेतले कार्बनडायऑक्साईडचे चढते प्रमाण यामुळे" असा निर्वाळा शास्त्रज्ञांनी नुकताच दिल्याची बातमी आपण वाचली. ती बातमी शिळी होते न होते तोच रशियातली ही बातमी वाचा.

भविष्यकाळात हिमगौरीच्या सुंदर नावाचे आणि त्याहूनही सुंदर गोष्टीचे रुपांतर "हिमनारंगी" अशा बेढब आणि विकृत नावात होऊ नये इतकेच मागणे!

मंगळवार, नोव्हेंबर १४, २००६

राहुल द्रविड आगे बढो!

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर काल रात्री रवाना झाला. यापूर्वीच्या सगळ्या दौऱ्यांमध्ये भारतीय संघाने आपल्या कोट्यवधी चाहत्यांची निराशाच केलेली आहे. आता चॅपेल गुरुजींच्या कडक शिस्तीत प्रशिक्षण घेणारा आपला संघ कशी काय कामगिरी करतो ते बघायचे.

चॅंपियन्स चषकाच्या (घोर) अपेक्षाभंगानंतर आता या तारांकित खेळाडूंकडून अधिक चांगल्या खेळाची अपेक्षा तर नक्कीच आहे. आणि काल रात्रीच्या अजब प्रकरणानंतर, आम्हांस असेही म्हणावेसे वाटते की, राहुल द्रविड आगे बढो, हम आपकी टीम के कपडे सॅंभालते है!

विनोदाचा भाग सोडतो आणि द्रविडास यश चिंतितो.

रविवार, सप्टेंबर ०३, २००६

विधिलिखित

युवा मराठी संघ बंगलोरच्या एकांकिकेचे 'समीक्षण' करण्यासाठी मी काही लौकिकार्थाने लायक नाही, हे मला मान्य आहे. काल सादर झालेल्या "विधिलिखित" या एकांकिकेबद्दल काय वाटले एवढे मात्र लिहितो आहे...

"उजेड फुला," "जिवंत," "साठेचं काय करायचं?" "कॅरम" इत्यादि एकांकिका अत्यंत उच्च पातळीवर सादर केल्याचा अनुभव युवाकडे आहे. "विधिलिखित" ही प्रमोदने लिहिलेली, अगदी in-house एकांकिका. भविष्य पाहिलेला शास्त्रज्ञ भूतकाळात परत येतो आणि आपले संशोधन पूर्ण होऊ नये अशी व्यवस्था करु पाहतो. कारण असे की भविष्यात तेच संशोधन चुकीच्या हातांत पडल्यामुळे पृथ्वीवर विनाश झालेला आहे. त्याचबरोबर वर्तमानात त्या संशोधकाचा सहकारी संशोधनाचे योग्य श्रेय न मिळाल्यामुळे नाराज आहे. इतका नाराज की त्याने त्या संशोधकाला ठार मारायचे ठरवले आहे. अशा परीस्थितीत भविष्य पाहिलेला सहाय्यक संशोधकही वर्तमानात परत येतो - कारण त्याला एकट्याला ते संशोधन पूर्ण करणे जमलेले नाही, आणि मुख्य संशोधकाच्या हत्येचे पातक त्यास उद्ध्वस्त करते आहे म्हणून. आणि हा परत आलेला सहाय्यक संशोधक मुख्य संशोधकाला मारू नकोस असे सांगतो आहे.

एका शक्यतेत तो मुख्य संशोधकाला मारत नाही, आणि त्याच शक्यतेच्या भविष्यातून हो मुख्य संशोधक परत आलेला असतो. दुसऱ्या शक्यतेत तो मुख्य संशोधकाला मारतो आणि स्वतःच्या विनाशास कारणीभूत ठरतो - त्या शक्यतेच्या भविष्यातून परत आलेला सहाय्यक संशोधक ते टाळू पाहतो आहे.

या सगळ्या गुंतागुंतीत योग्य-अयोग्यतेचा निर्णय एकांकिकेतले मुख्य पात्र असलेल्या, वर्तमानातील सहाय्यक संशोधकाला घ्यायचा आहे. मारावे तरी संकट आणि न मारावे तरी संकट अशा catch-22 परीस्थितीत तो अडकला आहे.

शेवटी काय होते ते मी इथे सांगणार आहे (कारण हा काही सिनेमा नाही, जो तुम्ही जाऊन बघणार होतात आणि मी गौप्यस्फोट केल्यामुळे तुमचा रसभंग झाला!)

भविष्यातून आलेले दोघेही संशोधक परत आपापल्या काळात जातात. वर्तमानातला मुख्य संशोधक आणि सहाय्यक संशोधक तेथे उरतात. हातात पिस्तूल, दिव्यांचा खेळ, उचललेले पार्श्वसंगीत अशा climax मध्ये अचानक दिवे जातात आणि तेव्हाच गोळीबाराचा आवाज येतो. सूत्रधार मग जाहीर करतो की सहाय्यक संशोधकाच्या हत्येच्या आरोपातून मुख्य संशोधकाची सुटका कशी झाली, संशोधन पूर्ण होऊन मग भारत कसा भरभराटीस आला इ. इ.

आता नाटिकेच्या सादरीकरणाबद्दल :
पार्श्वसंगीत उत्तम! बातम्यांचे background music, finger-print detector चा synthetic आवाज, इ. विशेषतः उठून दिसले, किंवा ऐकू आले. Timing सुध्दा perfect!

युवाचे नेपथ्य नेहमीप्रमाणेच सुरेख आणि अचूक. आधुनिक lab ची cubicles मधली मांडणी, तिथला फोन, white-board, अगदी waste-basket पण perfect होती. lab मध्ये येतानाचे sliding door भाव खाऊन गेले.

प्रकाशयोजना प्रसंगांना अनुरूप अशीच होती. द्विधा मनःस्थितीत अडकलेल्या सहाय्यक संशोधकावर दोन spot टाकून संवादाप्रमाणे switch करण्याची कल्पना आवडली. Blackout सुद्धा अचूक पार पडले. विशेषतः भविष्यातून परत आलेला शास्त्रज्ञ क्षणात अवतीर्ण होतो आणि क्षणात नाहिसा होतो हे प्रसंग crisp होते.

अभिनयाच्या बाबतीत म्हणायचे तर मयुरेश नेहमीप्रमाणेच फॉर्मात होता. त्याचे पात्र मुख्य आणि पूर्ण वेळ stage वर असल्याने त्यास भरपूर वाव होता. सुरुवातीस संशोधनाचे श्रेय न मिळाल्याने संतापलेला आणि नंतर योग्य-अयोग्य निर्णयाच्या कात्रीत सापडलेला विवेक सरदेसाई मयुरेशने उभा केला. श्रेय न मिळाल्याने आलेला संताप मात्र "वैताग" या category तला वाटला. आणि (कदाचित संहितेमुळे असेल) अचानक तो मुख्य संशोधकाला ठार मारण्याचा निर्णय का घेतो, आणि तो निर्णय तेव्हा योग्य कसा हे मात्र तो प्रेक्षकास पटवून देण्यात यशस्वी ठरला नाही असे वाटले.

भविष्यातून परत आलेल्या विवेकची संवादफेकीची शैली तरूण विवेकच्या शैलीपेक्षा फारच वेगळी वाटली. त्यात पश्चात्तापाची छटा कमी, मात्र ज्यासाठी आलो आहे ते काम पूर्ण झाले पाहिजे असाच दृष्टीकोन जास्त दिसत होता.

एकांकिकेचे कथानक कमकुवत ठरले असे वाटले. प्रथमतः मुख्य संशोधकाचा खून करणे हे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर पटत नाही. (अर्थात कोणाचा तरी मृत्यू झाल्याशिवाय पुढचे कथानक घडू शकत नाही हेही खरेच.) त्याचबरोबर विनाश होऊ घातलेल्या भविष्यातून परत आलेल्या मुख्य संशोधकाला नेमके काय साधायचे आहे तेही कळत नाही. जर भूतकाळ बदलता येऊ शकतो हे मान्य केले; तर फक्त चुकीच्या हातांत ते संशोधन पडू नये याची काळजी घेण्याचा तो प्रयत्न का करत नाही? नाटिकेच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे, जर विधिलिखित अटळ असेल, तर तो मुख्य संशोधक (किंवा भविष्यातून परत आलेला विवेक) नेमके काय साधणार आहेत हा प्रश्नही अनुत्तरीतच राहतो. समांतर जगांच्या शक्यता इत्यादि खोलात जाऊन स्पष्टीकरण जर नाटिकेत दिले आहे, तर मग बाकीचे असे सगळे मुद्दे अनुत्तरीत ठेऊन काही अंशी प्रेक्षकांची निराशाच झाली असे वाटले.

एका प्रसंगात विवेक म्हणतो, "मला आता परत जायला हवे, माझी energy level कमी होतेय." माझ्या शेजारी बसलेले एक आजोबा (पुण्याचे असावेत ;p) पुटपुटले, "हो, आणि प्रेक्षकांची सुध्दा!"

शेवटी कालप्रवासाचा गहन प्रश्न खरोखरच अतिशय गुंतागुंतीचा आहे यात वाद नाही. त्याच्या किती छटांचा वेध घ्यायचा हा निर्णय लेखकाने घ्यायचा आहे हे नक्की. नाटकाच्या दृष्टीने पाहिले तर शास्त्रीय संकल्पनांचा ठाव घेताना मानवी भावनांचा धागा इथे थोडासा सुटलेला वाटला; कारण योग्य-अयोग्यतेचे निर्णय शास्त्राच्या पुढे जातात बहुतेक वेळा...

टीका करणे हा समीक्षकाचा धर्म - यावर नाटकांतूनही कोपरखळ्या दिल्या जातात. म्हणूनच, समीक्षक असे न म्हणवून घेता वाटले ते लिहावे हेच बरे :-) नाटिकेच्या निमित्ताने का होईना विचारमंथन घडून आले यातच सगळे आले.

जाता जाता याच गहन विषयावर माझी साधीशी कविता (उगाचच) लिहून जातो. बघा आवडते का ते---
What it could have been
And what it could not;
Nobody will ever know.

बुधवार, ऑगस्ट ०२, २००६

मोलप्रकरण

माजी परराष्ट्रमंत्री श्री. जसवंतसिंह सध्या जोरदार चर्चेत आहेत. पंतप्रधान कचेरीतला फितूर कोण ते आपल्याला ठाऊक आहे; पण ते जगजाहिर करता येणार नाही असा काहिसा 'आमाला माहित्येय, पण आमी नाई सांगणार जा!' पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. (याच घडामोडीवर हिंदू दैनिकात आलेले हे व्यंगचित्र पहा).

पंतप्रधानपदाला मोल नाही हे खरे!

...
आणि उद्या 'मोल'करणी लक्षवेधक बातम्यांमध्ये आल्या तरीही नवल नको!

रविवार, जुलै ३०, २००६

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?

यास भेट द्या...

कधीकधी सद्य सरकारला उद्देशूनही असेच उद्गार काढावेसे वाटतात; परंतु खेदही असा वाटतो की ते शेवटी आपणच निवडून दिलेले सरकार आहे!

बुधवार, मार्च २२, २००६

कडू कारले

कडू कारले कितीही साखरेत घोळले तरी कडू ते कडूच. हे सत्य आहे.
---

मुंबई कसोटीत भारत (दारुण) पराभवाच्या मार्गावर आहे. ८८/६ अशा बिकट परीस्थितीतून बाहेर पडण्याची शक्यता लाखांत एक, नव्हे, त्याहूनही कमीच दिसते आहे.

आता पराभवाची कारणे शोधायला हवीत- भारतीय खेळाडू कुठे कमी पडले-

* नाणेफेक जिकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय भारताला भोवला. कदाचित, पाच गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णयही.
* त्यानंतर फलंदाजांची अपयशे - सचिन-सेहवाग द्वयी दोघांत मिळून केवळ सात धावा काढू शकली. धोनी (दुर्दैवीरीत्या?) धावबाद झाला.
* दुस़ऱ्या डावात भारताने अनंत झेल सोडले. पहिल्या डावातही बरेच झेल सोडल्याच्या आठवणी ताज्या असतानाही असे घडल्याने ते अजूनच झोंबले.
* दुसऱ्या डावातली भारतीय फलंदाजी फारच कमकुवत ठरली. दुसऱ्या डावात फलंदाजी करणे नेहमीच कठीण असते, तरीही!

अशा अजून पाच-सहा गोष्टी तरी पुढे मांडता येतील, पण असो.

"साहेबा"नी या कसोटीत आपला खेळ चांगलाच उंचावला. मुख्य खेळाडू दुखापती आणि अन्य कारणांनी त्रस्त असतानाही उरलेल्या, आणि नवख्या खेळाडूंनी जी परिपक्वता दाखवली ती उल्लेखनीय होती. आयुष्यात आणि क्रमेणे खेळात अनेक गोष्टी माणसाच्या नियंत्रणाबाहेर असतात. तसेच काहिसे या नवख्या खेळाडूंच्या बाबतीत घडले. अशा परिस्थितीला एक आव्हान समजून तोंड देण्याचा आणि फक्त तोंड देण्याचा नव्हे तर ते आव्हान लिलया पार करण्याचा पराक्रम पाहुण्या संघाने केला आहे. त्यांचे अगदी मनापासून अभिनंदन.

पराभवातून शिकवण घेणे यात मोठेपणा आहे, आणि तो मोठेपणा भारतीय संघ मिळवेल यात शंका नाही. व्यावसायिक खेळाडूंसाठी विजय आणि पराभव या दोन्हींतून शिकणे हे रोजचेच असते. (किंवा रोजचेच झालेले असणे अपेक्षित आहे!) शेवटी क्रिकेट हा खेळ आहे, हार-जीत होणारच, वगैरे सांत्वनपर शब्द ठीक आहेत. या शब्दांमुळे पराभवाचे शल्य काही कमी होत नाही.

माझ्यासारख्या, क्रिकेटच्या आणि त्यातही भारतीय संघाच्या चाहत्या मंडळींसाठी पराभवाचे कारले कितीही साखरेत घोळले तरी ते कडूच लागणार !

मंगळवार, फेब्रुवारी २१, २००६

वाढता असंतोष की वाढत्या अपेक्षा?

हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमच्या मतांचे स्वागतच आहे.

एका महिन्यापूर्वी मी BSNL या भारतातल्या सर्वांत मोठ्या telecommunication कंपनीकडे broadband साठी अर्ज केला होता. त्यानंतर त्याआधीचा telephone line चा (वाईट) अनुभव मनात ताजा असल्यामुळे या अर्जाचा अगदी पुरेपूर पाठपुरावा मी केलेला आहे. गेल्या शनिवारी जेव्हा BSNL ची मंडळी modem बसवून गेली तेव्हा मला आशेचा किरण दिसला; पण तो फारच अल्पजीवी ठरला. सगळं काही आता आहे - telephone line (जिवंत) आहे, घरी computer आहे, broadband चे अत्याधुनिक modem आहे, पण काहिही उपयोग नाही. मला अजून username आणि password काही त्यांनी दिलेला नाही. जाताना ही मंडळी पैसे (लाच) मागण्याआधी मोठ्या आवाजात सांगून गेली, "आमचे साहेब स्वतः तुम्हाला password घरपोच आणून देतील संध्याकाळी". मी पैसे देत नाही असं दिसल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा राग मला चांगलाच दिसत होता, पण त्यांनी telephone line लावून देण्याचे अनंत उपकार केल्यानंतर मी पैसे दिले होतेच, आता यावेळी अजून लाड नाहीत. असो.

आज त्या गोष्टीला दोन दिवस होऊन गेले, अजूनही त्यांचा "साहेब" उगवलेला नाही. तो फोनही उचलत नाही. अशा वेळी काय करायचे सांगा?

शिक्षणाने माणूस सम्रुध्द होतो, त्यास विचार करण्याची क्षमता प्राप्त होते, हे सर्वमान्य आहे. शिक्षणाने माणसाचा आणि एकंदरीतच समाजाचा विकास होत असतो. त्यातूनच नवे तंत्र, गोष्टी करण्याचे नवे मार्ग पुढे येत असतात. दहा वर्षांपूर्वी जी गोष्ट करत होतो, त्याच प्रकारे आजही करत बसलो तर त्यात कसला म्हणायचा विकास? स्वतःचा आणि समाजाचाही.

त्याचबरोबर असाही प्रश्न पुढे येतो की या शिक्षणामुळे आपण अवास्तव अपेक्षा ठेवायला लागलो आहोत का? उच्च शिक्षणामुळे मिळालेल्या ज्ञानामुळे कित्येक गोष्टी अधिक चांगल्या पध्दतीने करता येतील असं मला दिसतं. पण ते जेव्हा घडत नाही, आणि केवळ एखाद-दुसऱ्या बाबतीत नाही तर जागोजागी, तेव्हा एक प्रकारचा असंतोष मला खायला उठतो. यात चूक काय - की अशा (अवाजवी) अपेक्षा ठेवणंच बरोबर नाही?

BSNL हे फक्त निमित्त झालं - रिक्षावाला ते भाजीवाला, आणि BSNL ते बस महामंडळ कुठेही बघतो तेव्हा मला असा असंतोष जाणवतो. आपण मोठ्या नम्रतेने वगैरे वागावं तर तो समोरचा आपल्याला हाड-हूड करणार, मग आपण तरी ते का ऐकून घ्यावं? मग असा असंतोष वाढतच जातो...

तुम्हांसही असे अनुभव नक्कीच आले असतील. या सगळ्यातून मार्ग काय? Win-win situation पर्यंत कसे पोहोचता येईल?

की "(या देशात) हे असेच चालणार, आपल्या हातात कितीही म्हटलं तरी काहीच नसतं" असं म्हणून मनातल्या मनात एखादी शिवी हासडून सगळं सोडून द्यायचं?

वाढता असंतोष आणि वाढत्य अपेक्षा या अशा प्रकारे linked आहेत का? असणं योग्य आहे का?


सुरूवातीला म्हणालो त्याप्रमाणे, हा माझा स्वतःचा अनुभव झाला. तुमच्या मतांचे स्वागतच आहे.

बुधवार, जानेवारी ०४, २००६

एखादी सारखी सारखी घडणारी घटना जोपर्यंत आपल्या स्वत:च्या बाबतीत - आपल्या अगदी जवळ अशी घडत नाही; तोपर्यंत तिचे गांभीर्य आपल्याला जाणवत नाही. मुंबईला अति-पावसामुळे महापूर आला - घरांमध्ये पाणी शिरले ही बातमी ऐकून, "अरेरे, हो का?" यापलिकडे मी गेलो नव्हतो - जोपर्यंत माझ्या स्वत:च्या घरी पूराचे पाणी शिरले नव्हते.

जगातला आतंकवाद, काश्मीरचे दहशतवादी - आपण सगळं कसं अगदी सवय असल्यासारखे वाचत/ऐकत असतो - जोपर्यंत तशी परिस्थिती आपल्या जवळपास निर्माण होत नाही; तोपर्यंत त्याचं कहिच वाटत नाही - अर्थात एका मर्यादेपलिकडे.

मागच्या आठवड्यात IISc मध्ये दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्यानंतर मला या सगळ्याची प्रकर्षाने जाणीव झाली.

IISc सारख्या जागेवर अशा तऱ्हेने रक्त सांडावं? कितीतरी वेळ मला काही सुचतच नव्हते. का? या हल्ल्यामागे काय "हेतू" असावा? या हल्ल्यानंतर त्यांनी काय मिळवलं? दहशत बसली; पण कशावर? IISc च्या पावित्र्यावर? तिथल्या शांत वातावरणावर? तिथे चालणाऱ्या संशोधनावर? दहशत वाईट गोष्टींवर बसवून परिस्थिती काबूत आणतात असा आपला माझा एक बाळबोध विचार होता. पण हे तर सगळ विपरीतच!

अशा दहशतवादी प्रव्रुत्तीमागे काहिही logic नसते अशा मताचा आता मी झालेलो आहे.

आंधळ्या सूडासाठी आणि निव्वळ पैशासाठी या थराला जाणारी लोकं असतात याची जाणीव मला होतीच; परंतु IISc तरीही कुठल्याही समीकरणात बसत नव्हते - तसं बसणंही अशक्यच आहे.

यापुढे भविष्यातही अशा निर्घुण गोष्टी/घटना घडत राहणारच. दोन्ही बाजूंना पलिकडची बाजू चुकीची, वाईटच दिसणार - कारण या दोन्ही प्रव्रुत्ती परस्परविरोधी आहेतच. अशा परीस्थितीत सुजाण-सुशिक्षित जनांनी काय करावे? त्यांना त्यांचे उज्ज्वल आयुष्य जगण्याचा अधिकार आहे की नाही? निष्पाप जीवांनी अशा तऱ्हेचे विनाकारण प्राणार्पण का करावे?

एक नव्हे तर अनंत असे प्रश्न समोर उभे राहतात. आयुष्य अचानक अत्यंत अवघड, अनिश्चित वाटायला लागतं. आपले एतके अलवार-हळुवार विचार-कल्पना आपण लिहित असतो - कथा कविता नाटके पाहत, ऐकत, वाचत असतो. या गोळीबाराच्या कानठळ्या बसवणाऱ्या कोलाहलात ते सारं हळुहळू विरून जायला लागतं. क्वचित हास्यास्पद वाटायला लागतं. सारं कसं अनिश्चित, क्षणभंगूर, क्षूद्रसं वाटायला लागतं. यात दोष कोणाचा, बरोबर कोण, चूक कोण याला सर्वमान्य उत्तर नाही. तसं असतं तर कदाचित हे सारं घडलंच नसतं. प्रत्येकास जे योग्य वाटेल ते त्याच्यासाठीचं बरोबर उत्तर. या अशा आयुष्याच्या धांदलीत, आपण आपली आणि आपल्या स्नेहींची काळजी घ्यावी एवढंच सत्य...

सोमवार, मे २३, २००५

सानिया

सानिय मिर्झाचं नाव (की नावापेक्षा फोटो?) सध्या फारचं गाजतंय. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी तिनं स्वत:भोवती प्रसिद्धीचं प्रचंड मोठं वलय तयार केलंय. आजच्या द्रुतगती जगातल्या media चा तिच्या या यशात बराच वाटा आहे. क्रिकेट ज्या देशात राष्ट्रीय खेळापेक्षा कितीतरी पटींनी जास्त लोकप्रियता मिळवतो, त्या देशाला टेनिसकडे वळवणारी ही सम्राद्नी.

अथक परिश्रम, जन्मजात कौशल्य आणि अविजित आत्मविश्वास यांच्या जोरावर जरी तिनं हे यश मिळवलेलं असलं, तरी केवळ media मुळे ते तिनं एका रात्रीत मिळवल्यासारखं वाटतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्याही खेळात यश मिळवणं अत्यंत कौतुकास्पद आहे. वरवर पाहता मात्र ही कामगिरी अल्पायुषी ठरते की काय अशी शंका आल्यावाचून राहत नाही.

खेळातलं यशापयशाचं चक्र अटळ आहे. पण प्रसिद्धीच्या शिखरावर असताना येणार अपयश उद्ध्वस्त करणारं ठरू शकतं एका विख्यात खेळाडूचं एक वाक्य आठवतं, " यशस्वी झाल्यानंतर माझ्या चाहत्यांच्या अपेक्षांचा मला डोंगर न वाटता तो माझ्यासाठी स्फूर्तीदाता ठरला!"

अशा लहान वयात यश मिळवणं ही एक achievement तर आहेच; परंतु त्यापेक्षाही भविष्यात तितक्याच ताकदीनं perform करण्यासाठी आव्हानही आहे. हूरळून न जाता हुरूप घेऊन सतत focused राहणं यातचं खरं खिलाडूपण.

आजच्या professional जगाअत या गोष्टींची तिला स्वत:ला जाणीव असणारच - किंवा कोणीतरी तिला योग्य प्रकारे ही जाणीव करून देइलच. मात्र आज तरी ती तिच्या खेळापेक्षा कोर्टाबाहेरील उपक्रमांमुळे गाजते आहे.

सानिया हे मात्र एक प्रतीक आहे - एक उदाहरण - झटपट प्रसिद्धी मिळाली असं वाटायला लावणारं. काळ्या चष्म्याआड आणि झकपक कपड्यांमागे मात्र एक उच्च दर्जाचा खेळाडू आहे हे विसरायला लावणारं!

घेणाऱ्याने उत्तम तेचि घ्यावे या न्यायाने आपण मात्र तिच्या खेळातले spirit, नजाकत घ्यावी, आणि बाकीच्या दाखवायच्या गोष्टी कशा करू नयेत ते शिकावं!