बुधवार, मार्च २२, २००६

कडू कारले

कडू कारले कितीही साखरेत घोळले तरी कडू ते कडूच. हे सत्य आहे.
---

मुंबई कसोटीत भारत (दारुण) पराभवाच्या मार्गावर आहे. ८८/६ अशा बिकट परीस्थितीतून बाहेर पडण्याची शक्यता लाखांत एक, नव्हे, त्याहूनही कमीच दिसते आहे.

आता पराभवाची कारणे शोधायला हवीत- भारतीय खेळाडू कुठे कमी पडले-

* नाणेफेक जिकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय भारताला भोवला. कदाचित, पाच गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णयही.
* त्यानंतर फलंदाजांची अपयशे - सचिन-सेहवाग द्वयी दोघांत मिळून केवळ सात धावा काढू शकली. धोनी (दुर्दैवीरीत्या?) धावबाद झाला.
* दुस़ऱ्या डावात भारताने अनंत झेल सोडले. पहिल्या डावातही बरेच झेल सोडल्याच्या आठवणी ताज्या असतानाही असे घडल्याने ते अजूनच झोंबले.
* दुसऱ्या डावातली भारतीय फलंदाजी फारच कमकुवत ठरली. दुसऱ्या डावात फलंदाजी करणे नेहमीच कठीण असते, तरीही!

अशा अजून पाच-सहा गोष्टी तरी पुढे मांडता येतील, पण असो.

"साहेबा"नी या कसोटीत आपला खेळ चांगलाच उंचावला. मुख्य खेळाडू दुखापती आणि अन्य कारणांनी त्रस्त असतानाही उरलेल्या, आणि नवख्या खेळाडूंनी जी परिपक्वता दाखवली ती उल्लेखनीय होती. आयुष्यात आणि क्रमेणे खेळात अनेक गोष्टी माणसाच्या नियंत्रणाबाहेर असतात. तसेच काहिसे या नवख्या खेळाडूंच्या बाबतीत घडले. अशा परिस्थितीला एक आव्हान समजून तोंड देण्याचा आणि फक्त तोंड देण्याचा नव्हे तर ते आव्हान लिलया पार करण्याचा पराक्रम पाहुण्या संघाने केला आहे. त्यांचे अगदी मनापासून अभिनंदन.

पराभवातून शिकवण घेणे यात मोठेपणा आहे, आणि तो मोठेपणा भारतीय संघ मिळवेल यात शंका नाही. व्यावसायिक खेळाडूंसाठी विजय आणि पराभव या दोन्हींतून शिकणे हे रोजचेच असते. (किंवा रोजचेच झालेले असणे अपेक्षित आहे!) शेवटी क्रिकेट हा खेळ आहे, हार-जीत होणारच, वगैरे सांत्वनपर शब्द ठीक आहेत. या शब्दांमुळे पराभवाचे शल्य काही कमी होत नाही.

माझ्यासारख्या, क्रिकेटच्या आणि त्यातही भारतीय संघाच्या चाहत्या मंडळींसाठी पराभवाचे कारले कितीही साखरेत घोळले तरी ते कडूच लागणार !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: