शनिवार, मार्च १८, २००६

खेळाची वही

परवा असाच बोलताबोलता विषय निघाला -

मित्र म्हणाला, "काय तू स्पोर्टस्टार वाचतोस?"

"हो, का?"

"काय फोटो कापून ठेवतोस का आणि?"

"नाही. फोटो कापून नाही ठेवत."

आणि झटकन मला माझ्या शाळेतल्या "खेळाच्या वहीची" आठवण झाली. किती आटापीटा करून आम्ही खेळाची वही तयार करत असू. दर वर्षी मार्च-एप्रिल महिना उगवला की खेळाची वही submit करायची वेळ व्हायची. मग एकच धांदल. "मी तुला अझरुद्दीन देतो, तू मला स्टेफी ग्राफ दे" असे सौदे सुरु व्हायचे. डाव्या बाजूला खेळाडूचा फोटो आणि उजव्या पानावर त्याचे "वर्णन" की काय ते. लोकल (नाशिकच्या गांवकरी - देशदूत - सकाळ) वर्तमानपत्रांमधून कापलेले ते (दिव्य) फोटो म्हणजे एक प्रकरणच असायचं. कुणीतरी मग आपल्या आई-बाबांकडे हट्ट करून एखादे स्पोर्टस्टार मिळवायचा. मग त्याची चंगळ असायची. एक स्पोर्टस्टार एका वर्षाची खेळाची वही पूर्ण करायला पुरेसा असायचा. रंगीत फोटो असल्याने आमचे खेळाचे सरही खूष होण्याची शक्यता वाढायची. पण बहुतेक मुलांच्या वह्या मात्र लोकल डिंक आणि लोकल वर्तमानपत्रांतले फोटो यांनी पूर्ण "फुगलेल्या" असायच्या.

ते काहीही असो, मात्र खेळाची वही हा एक अत्यंत आवडता उपक्रम असायचा.

त्या लहान वयात आम्ही ती खेळाची वही प्रयत्नपूर्वक तयार करून नक्की काय मिळवलं ते मला सांगता येणार नाही. मला तर काय सगळेच खेळ प्रचंड आवडायचे (आता तर आणखीच जास्त आवडतात), त्यामुळे कुठल्याही प्रसिद्ध खेळाडूची चित्रं मी चिकटवायचो. अगदी मनापासून. तेव्हा त्या लहान वयात "role model" वगैरे concepts नव्हत्या. नव्हत्या असं नाही, पण त्याचा बाऊ असा नव्हता - मला अझर आवडायचा, आणि पीट सांप्रस!

मला तर खूप सही याचंच वाटतं की तेव्हा मी छोट्या-छोट्या गोष्टी कशा पद्धतीने करतो याची चिकित्सा कोणी केली नाही. माझ्या चित्रकलेवरून (कला?) माझ्या स्वभावाबद्दल कोणी अंदाज बांधले नाहीत. माझ्या मामे-मावस-चुलत भावंडांच्या शाळेतल्या activities आणि पालक सभा यांच्याबद्दल मी जेव्हा ऐकतो तेव्हा मला तर भितीच वाटते.

असो.

मला नुकत्याच वाचलेल्या एका कवितेचं नाव आठवतं - ज्या ज्या वयात जे जे करायचं त्या त्या वयात ते ते करायचं. तसंच करतो, आणि फारशी मीमांसा न करता, आवरतं घेतो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: