रविवार, सप्टेंबर ०३, २००६

विधिलिखित

युवा मराठी संघ बंगलोरच्या एकांकिकेचे 'समीक्षण' करण्यासाठी मी काही लौकिकार्थाने लायक नाही, हे मला मान्य आहे. काल सादर झालेल्या "विधिलिखित" या एकांकिकेबद्दल काय वाटले एवढे मात्र लिहितो आहे...

"उजेड फुला," "जिवंत," "साठेचं काय करायचं?" "कॅरम" इत्यादि एकांकिका अत्यंत उच्च पातळीवर सादर केल्याचा अनुभव युवाकडे आहे. "विधिलिखित" ही प्रमोदने लिहिलेली, अगदी in-house एकांकिका. भविष्य पाहिलेला शास्त्रज्ञ भूतकाळात परत येतो आणि आपले संशोधन पूर्ण होऊ नये अशी व्यवस्था करु पाहतो. कारण असे की भविष्यात तेच संशोधन चुकीच्या हातांत पडल्यामुळे पृथ्वीवर विनाश झालेला आहे. त्याचबरोबर वर्तमानात त्या संशोधकाचा सहकारी संशोधनाचे योग्य श्रेय न मिळाल्यामुळे नाराज आहे. इतका नाराज की त्याने त्या संशोधकाला ठार मारायचे ठरवले आहे. अशा परीस्थितीत भविष्य पाहिलेला सहाय्यक संशोधकही वर्तमानात परत येतो - कारण त्याला एकट्याला ते संशोधन पूर्ण करणे जमलेले नाही, आणि मुख्य संशोधकाच्या हत्येचे पातक त्यास उद्ध्वस्त करते आहे म्हणून. आणि हा परत आलेला सहाय्यक संशोधक मुख्य संशोधकाला मारू नकोस असे सांगतो आहे.

एका शक्यतेत तो मुख्य संशोधकाला मारत नाही, आणि त्याच शक्यतेच्या भविष्यातून हो मुख्य संशोधक परत आलेला असतो. दुसऱ्या शक्यतेत तो मुख्य संशोधकाला मारतो आणि स्वतःच्या विनाशास कारणीभूत ठरतो - त्या शक्यतेच्या भविष्यातून परत आलेला सहाय्यक संशोधक ते टाळू पाहतो आहे.

या सगळ्या गुंतागुंतीत योग्य-अयोग्यतेचा निर्णय एकांकिकेतले मुख्य पात्र असलेल्या, वर्तमानातील सहाय्यक संशोधकाला घ्यायचा आहे. मारावे तरी संकट आणि न मारावे तरी संकट अशा catch-22 परीस्थितीत तो अडकला आहे.

शेवटी काय होते ते मी इथे सांगणार आहे (कारण हा काही सिनेमा नाही, जो तुम्ही जाऊन बघणार होतात आणि मी गौप्यस्फोट केल्यामुळे तुमचा रसभंग झाला!)

भविष्यातून आलेले दोघेही संशोधक परत आपापल्या काळात जातात. वर्तमानातला मुख्य संशोधक आणि सहाय्यक संशोधक तेथे उरतात. हातात पिस्तूल, दिव्यांचा खेळ, उचललेले पार्श्वसंगीत अशा climax मध्ये अचानक दिवे जातात आणि तेव्हाच गोळीबाराचा आवाज येतो. सूत्रधार मग जाहीर करतो की सहाय्यक संशोधकाच्या हत्येच्या आरोपातून मुख्य संशोधकाची सुटका कशी झाली, संशोधन पूर्ण होऊन मग भारत कसा भरभराटीस आला इ. इ.

आता नाटिकेच्या सादरीकरणाबद्दल :
पार्श्वसंगीत उत्तम! बातम्यांचे background music, finger-print detector चा synthetic आवाज, इ. विशेषतः उठून दिसले, किंवा ऐकू आले. Timing सुध्दा perfect!

युवाचे नेपथ्य नेहमीप्रमाणेच सुरेख आणि अचूक. आधुनिक lab ची cubicles मधली मांडणी, तिथला फोन, white-board, अगदी waste-basket पण perfect होती. lab मध्ये येतानाचे sliding door भाव खाऊन गेले.

प्रकाशयोजना प्रसंगांना अनुरूप अशीच होती. द्विधा मनःस्थितीत अडकलेल्या सहाय्यक संशोधकावर दोन spot टाकून संवादाप्रमाणे switch करण्याची कल्पना आवडली. Blackout सुद्धा अचूक पार पडले. विशेषतः भविष्यातून परत आलेला शास्त्रज्ञ क्षणात अवतीर्ण होतो आणि क्षणात नाहिसा होतो हे प्रसंग crisp होते.

अभिनयाच्या बाबतीत म्हणायचे तर मयुरेश नेहमीप्रमाणेच फॉर्मात होता. त्याचे पात्र मुख्य आणि पूर्ण वेळ stage वर असल्याने त्यास भरपूर वाव होता. सुरुवातीस संशोधनाचे श्रेय न मिळाल्याने संतापलेला आणि नंतर योग्य-अयोग्य निर्णयाच्या कात्रीत सापडलेला विवेक सरदेसाई मयुरेशने उभा केला. श्रेय न मिळाल्याने आलेला संताप मात्र "वैताग" या category तला वाटला. आणि (कदाचित संहितेमुळे असेल) अचानक तो मुख्य संशोधकाला ठार मारण्याचा निर्णय का घेतो, आणि तो निर्णय तेव्हा योग्य कसा हे मात्र तो प्रेक्षकास पटवून देण्यात यशस्वी ठरला नाही असे वाटले.

भविष्यातून परत आलेल्या विवेकची संवादफेकीची शैली तरूण विवेकच्या शैलीपेक्षा फारच वेगळी वाटली. त्यात पश्चात्तापाची छटा कमी, मात्र ज्यासाठी आलो आहे ते काम पूर्ण झाले पाहिजे असाच दृष्टीकोन जास्त दिसत होता.

एकांकिकेचे कथानक कमकुवत ठरले असे वाटले. प्रथमतः मुख्य संशोधकाचा खून करणे हे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर पटत नाही. (अर्थात कोणाचा तरी मृत्यू झाल्याशिवाय पुढचे कथानक घडू शकत नाही हेही खरेच.) त्याचबरोबर विनाश होऊ घातलेल्या भविष्यातून परत आलेल्या मुख्य संशोधकाला नेमके काय साधायचे आहे तेही कळत नाही. जर भूतकाळ बदलता येऊ शकतो हे मान्य केले; तर फक्त चुकीच्या हातांत ते संशोधन पडू नये याची काळजी घेण्याचा तो प्रयत्न का करत नाही? नाटिकेच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे, जर विधिलिखित अटळ असेल, तर तो मुख्य संशोधक (किंवा भविष्यातून परत आलेला विवेक) नेमके काय साधणार आहेत हा प्रश्नही अनुत्तरीतच राहतो. समांतर जगांच्या शक्यता इत्यादि खोलात जाऊन स्पष्टीकरण जर नाटिकेत दिले आहे, तर मग बाकीचे असे सगळे मुद्दे अनुत्तरीत ठेऊन काही अंशी प्रेक्षकांची निराशाच झाली असे वाटले.

एका प्रसंगात विवेक म्हणतो, "मला आता परत जायला हवे, माझी energy level कमी होतेय." माझ्या शेजारी बसलेले एक आजोबा (पुण्याचे असावेत ;p) पुटपुटले, "हो, आणि प्रेक्षकांची सुध्दा!"

शेवटी कालप्रवासाचा गहन प्रश्न खरोखरच अतिशय गुंतागुंतीचा आहे यात वाद नाही. त्याच्या किती छटांचा वेध घ्यायचा हा निर्णय लेखकाने घ्यायचा आहे हे नक्की. नाटकाच्या दृष्टीने पाहिले तर शास्त्रीय संकल्पनांचा ठाव घेताना मानवी भावनांचा धागा इथे थोडासा सुटलेला वाटला; कारण योग्य-अयोग्यतेचे निर्णय शास्त्राच्या पुढे जातात बहुतेक वेळा...

टीका करणे हा समीक्षकाचा धर्म - यावर नाटकांतूनही कोपरखळ्या दिल्या जातात. म्हणूनच, समीक्षक असे न म्हणवून घेता वाटले ते लिहावे हेच बरे :-) नाटिकेच्या निमित्ताने का होईना विचारमंथन घडून आले यातच सगळे आले.

जाता जाता याच गहन विषयावर माझी साधीशी कविता (उगाचच) लिहून जातो. बघा आवडते का ते---
What it could have been
And what it could not;
Nobody will ever know.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: