रविवार, मार्च १८, २००७

पराभवानंतर...

इ.स. १८८२ साली जेव्हा प्रथमच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने इंग्लंडला त्यांच्या भूमीवर, ओव्हल मैदानात धूळ चारली तेव्हा "इंग्लिश क्रिकेटचे काल निधन झाले, देहावर अंत्यसंस्कार करून अस्थी ऑस्ट्रेलियाला नेण्यात येतील" अशी छोटीशी निधनवार्ता इंग्लिश वर्तमानपत्रात छापून आली. आणि त्यातूनच ऍशेस मालिकेचा जन्म झाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये क्रिकेटच्या बाबतीत इतकी चुरस कशी हा रंजक प्रश्न आहे. क्रिकेटचा जन्म ब्रिटिश बेटांवर झाला असला तरी राणीच्या साम्राज्याबरोबर तो ब्रिटिश वसाहतींमध्येही पसरला, करमणूक आणि व्यायाम एवढेच त्याचे स्वरूप न राहता तो हळूहळू प्रतिष्ठेचाही मुद्दा बनू लागला. पारतंत्रातल्या भारतात सामाजिक बदल घडवून आणण्यात क्रिकेटचा मोठा हातभार होता असेही म्हणता येईल. रामचंद्र गुहा या ख्यातनाम इतिहासकाराचे "A Corner of A Foreign Field: The Indian History of a British Sport" हे पुस्तक क्रिकेटच्या इतिहासाचा अत्यंत मनोरंजक आढावा घेते. उच्च दर्जाचे इंग्रजी, सखोल अभ्यासपूर्ण लेखन आणि खेळकर लेखनशैली ही या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये. ब्रिटिश साहेबाकडून पाहून-पाहून शिकता शिकता वस्तुतः पूर्णतः 'गोरा' खेळ भारतीय मातीत कसा रुजला आणि फळाला आला याची ही कथा. कोणत्याही प्रकारच्या तुफानी आकडेबाजीचा आधार न घेता, जुन्या पुराण्या वर्तमानपत्रांतील टीपणे, वाचकांचे पत्रव्यवहार, इ. इ. संदर्भ देत हे पुस्तक आपल्याला खिळवून ठेवेल.

...क्रिकेट अनिश्चिततांचा खेळ आहे असे म्हणतात. ते कितपत खरे अशी शंका वाटायला लागली. कालची बांग्लादेशविरुध्दची मॅच पाहता याची आठवण होत होती. अर्थात भारतीय संघाचा खेळ पाहता पराभव होणार यात काहीच अनिश्चितता वाटत नव्हती. भरवशाच्या म्हशीला टोणगा ही घिसिपीटी म्हण पुन्हा एकदा वापरात येणार, वर्तमानपत्रांतून रकानेच्या रकाने भरून टीका होणार, श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात मोठा विजय मिळवला नाही तर परतीच्या विमानाची तिकिटे काढायला पाठवावे लागणार, बांग्लादेशी संघावर बक्षिसांचा वर्षाव होणार हे सगळे तर नक्कीच. बांग्लादेशसारख्या 'लिंबू-टींबू' संघाने भारतासारख्या (कागदावर का होईना) बलाढ्य संघावर विजय मिळवून वाहवा तर मिळवलीच आहे, आता पुढच्या सामन्यांमध्ये ते कशी कामगिरी करतात यावरही भारताचे आव्हान अवलंबून आहे. तिकडे आयर्लंडच्या संघाने पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करून अजून एक धक्का दिला.' भारत-पाकिस्तान' सामन्याकडे डोळे लावून बसलेल्या रसिकाचा आणि त्याहून महत्त्वाहे म्हणजे, टि.व्ही. चॅनेल्सचा घोर अपेक्षाभंग केल्याचे पातक आयर्लंड संघाने केले आहे. परंतु कालच्या दोन्ही सामन्यांच्या विजेत्यांची कामगिरी खरोखर नेत्रदीपक किंवा डोळे दिपवून टाकणारी अशीच होती. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या नेहमी नावडत्या राणीसारखे दुर्लक्ष होणाऱ्या बाबतींत बांग्लादेश आणि आयर्लंडने कमाल करून दाखवली, आणि त्याचेच योग्य बक्षिस त्यांना जवळजवळ नक्की झालेल्या पुढच्या फेरीच्या स्थानात मिळाले आहे.

भारतीय संघाची दुय्यम दर्जाची कामगिरी ही नेहमीचीच डोकेदुखी आहे, ती बाजूला ठेवून या 'नवशिक्या' संघांच्या जोरदार कामगिरीला प्रसिध्दीमाध्यमे आणि ग्लॅमर दुनिया योग्य न्याय देतील ही अपेक्षा.

शंभर वर्षांपूर्वी जेव्हा भारतात क्रिकेटचा खेळ जोम धरत होता, तेव्हा अधून-मधून होणाऱ्या पराभवांकडे (हिंदू-पारसी-मुस्लिम संघांकडून) ब्रिटिशांनी कदाचित दुर्लक्ष केलेही असेल. लिंबू-टींबूची वागणूक (केवळ खेळाच्या दर्जामुळे नव्हे तर, राजकीय परीस्थितीमुळेही) सतत आपल्या संघांना मिळत असेलही, परंतु चिकाटीने त्यातून वाट काढूनच आताचे आपले संघ अस्तित्त्वात आले आहेत. त्याचप्रमाणे आयर्लंडसारखे संघ आता पुढे येत आहेत असे दिसते. एका विजयाने सगळे काही साधले असे नाही, परंतु हा एक मोठा टप्पा नक्कीच आहे. अर्थात भारतीय संघाने एका पराभवामुळे सारे काही गमावले असेही नक्कीच नाही. एकंदरीत खेळाच्या दर्जात होणारी सुधारणा उत्साहवर्धक आहे. जागतिक क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट-प्रसाराच्या धोरणासाठीही हे महत्त्वाचे आहे. नाणेफेक, खेळपट्टीचा (चुकलेला) अंदाज, पंचाची (खराब) कामगिरी, इ.इ. अशा अनेक गोष्टी पराभवाची कारणे म्हणून पुढे करता येऊ शकतात; परंतु ह्याच सगळ्या गोष्टींना विजेत्या संघासही परत कधीतरी सामोरे जावे लागणारच. सगळ्या अडथळ्यांवर मात करून जो शेवटी उरेल त्यासच विश्वविजेता घोषित केले जाणार आहे. त्यामुळे विजेत्या आणि पराभूत दोन्ही संघांनी हे लक्षात ठेवूनच पुढच्या सामन्यांची तयारी करावी.

दोन्ही संघांना पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा!

(आणि हो, (या स्पर्धेतला) पहिला पराभव होता, म्हणून भारतीय कामगिरीवर फारशी तोफ डागलेली नाही. पुढच्या वेळी असेच लिहिले जाईल याची शक्यता कमीच, त्यामुळे भारताने पुढचे सामने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश करावा हे श्रेयस्कर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: