रविवार, मार्च ०४, २००७

रविवार दुपार

'काय कटकट आहे,' असे उद्गार काढत डोळे उघडले तेव्हा समोर फक्त दोन बारीक ठिपके दिसत होते. महत्प्रयासाने पुन्हा त्या दोन ठिपक्यांवर नजर रोखली तेव्हा ते जरा मोठे झाल्यासारखे दिसले. त्या दोन ठिपक्यांच्या बाजूला शेजारीच चार चांगल्या मोठ्या रेघाही दिसत होत्या. खिडकीतून येणारे विविध अनाकलनिय आवाज कानाच्या पडद्यावर आघात करत होते. आणखी प्रयत्नानंतर या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करेपर्यंत आणखी चांगली चार-पाच मिनिटे गेली असावीत.

घड्याळाचे काटे सरकताहेत हे केवळ त्यांच्या टिकटिकीमुळे जाणवत होते. पापण्या जड झालेल्या होत्याच. 'मै कहॉ हू?' हा तद्दन फिल्मी विचार तेवढ्यात मनाला चाटून गेलाही. सभोवतालच्या वातावरणाचे (स्थळ, काळ, तापमान, आणि आर्द्रता) पूर्ण आकलन झाले तेव्हा असा निष्कर्ष काढण्यात मी यशस्वी ठरलो की आपण अजून पृथ्वीतलावरच असून समोर दिसणारे दोन ठिपके हे दोन मोठ्या कोळ्यांच्या शरीराकृती आहेत आणि त्या ठळक मोठ्या रेषा म्हणजे सीलिंग फॅनचे हात होत. आपले शरीर जमिनीस पूर्णतः समांतर पसरलेले असून डोळे उघडण्यास नेहमीपेक्षा अधिक प्रयास पडताहेत. काही क्षणांपूर्वी (किंवा काही मिनिटांपूर्वीही असावी) बाहेर दोनदा मोठा आवाज झालेला असून त्यामुळे लवकरच आपल्याला आपले शरीर सद्य अवस्थेतून हलवण्याची गरज आहे. इतके विश्लेषण करायलाही प्रचंड कष्ट घ्यावे लागले असावेत...

रविवार दुपारचा हा प्रसंग तसा काही नवा नाही. दुपारचे उशिरा आणि जड झालेले जेवण म्हटले की त्यानंतरची वामकुक्षी ही आलीच. आठवड्याचे पाच दिवस डोळ्याला डोळा लागू न देण्याची काळजी घेणारे कचेरीतले काम रविवारी गुंडाळून ठेवले की अशी काही सपाटून झोप लागते की वाह! त्यास 'तोड' (की मोड?) नाही. पण अशी तोडीची झोप मिळायला भाग्य लागतं. "आराम हराम है।" या चाचा नेहरुंच्या संदेशाची शिकवण इतरांना देण्याची जबरदस्त हुक्की कपाळावर आठ्या असलेले इस्त्रीवाले, भूतकाळातले वर्तमानपत्र विकत घेणारे रद्दी पेपरवाले, दहादा इकडून तिकडे फेऱ्या मारणारे हजार फेरीवाले, मोजे-हातरूमाल-टाय विकणारे मोजके एजंट, एनसायक्लोपीडीया ९०% सूट देत विकणारे ज्ञानवंत, इ.इ. महान व्यक्तिंना रविवारीच येते. नुसते रस्त्यावरून 'पेSSSपSSSSर,' अशा आरोळ्या मारून थोडीच त्यांचा डेली कोटा पूर्ण होतोय, म्हणून अगदी वर येऊन बेल वाजवून विचारपूस करणारे उद्योगी फेरीवाले आमच्या भागात कार्यरत आहेत. रविवार म्हटला की मंडळी नक्की घरी सापडणार या अपेक्षेने मग एकामागून एकांची रांगच लागते. बिचाऱ्यांना काय ठाऊक की ही सगळी साहेब मंडळी दुपारच्या झोपेत असतील! एखाद दुसरा असला 'वाला' 'sorry to disturb you' अशीही सुरुवात करतो. झोपमोड झालेल्या त्या अवस्थेत खरं तर काहीही सुधरत नसतं. मगाशी सांगितलं तशी 'मै कहॉ हू?" अशी पंचाईत झालेली असते, अशा मोडकळीस आलेल्या परीस्थितीत काय मोजे विकत घ्यायचे! पण इलाज नसतो, एकाला कटवून पुन्हा आडवे व्हावे तर पुन्हा झोप कसली येतेय. मग अशा वेळी भिंतीवरचे कोळीनृत्य पाहण्यात एक दोन मिनिटे जातात आणि कधीकधी निद्रादेवी प्रसन्न होते.

आमचे एक शेजारी आहेत तमीळ. माझ्या सुदैवाने या भाषा मला कळत नसल्याने माझ्या निद्रेवर त्याचा फारसा परीणाम होत नाही. खिडकीतून येणारा गरम वारा आणि सूं सूं करत जाणारे तमीळ शब्द अक्षरश: माझ्या डोक्यावरून निघून जातात. त्यामुळे त्याचा मला फारसा त्रास होत नाही.

दुसऱ्या शेजाऱ्यांच्या गोंडस मुलास (यास मराठीत कार्टं असाही शब्द राखून ठेवलेला आहे) भिंतीवर ठोकठोक करायचा खेळ बऱ्याचदा सुचतो (तसं हुषार आहे कार्टं!). मग त्यामागून त्याच्या वडीलांचे रागावणे ऐकू येते. या मुलाचे बाळबोध तेलुगू मला आणि माझे बालबोध हिंदी किंवा इंग्रजी त्याला कळत नसल्याने आमची फक्त हाय-हॅलो एवढीच मैत्री आहे. भिंतीवरच्या ठोक-ठोक मध्ये काहीतरी 'कोड' दडलेला आहे आणि तो सोडवण्याची माझी खटपट चालू आहे असे धूसर स्वप्न त्या भर दुपारी मला पडू लागले की मग माझी खात्री पटते की मला परत झोप लागलेली आहे तर.


सकाळी अत्यंत आरामात वाचलेल्या बातम्या मनात घर करून असतात. सकाळी निवांत ऐकलेल्या 'गुजरी तोडी'ची धून कुठेतरी एक कोपऱ्यात वाजत असते. दुपारच्या फक्कड 'जमलेल्या' खिचडीची चव अजूनही चवीच्या केंद्रात रेंगाळत असते. काल संध्याकाळी जरा जास्तच खेळल्यामुळे पायात बारीकशी दुख असते. भरपेट आणि उशिरा जेवल्यामुळे 'चढलेली' सुस्ती पोटाचा ताबा पूर्ण घेऊन बसलेली असते. चढती दुपार त्या सुस्तीला पोषकच ठरते. आंघोळ बिंघोळही निवांत आणि मनसोक्त झालेली असल्यामुळे सगळं अंगं कसं relax झालेलं असतं. आणि अशा सगळ्या परीस्थितीत निवांत लागलेली झोप! यासारखे सुख दुसरे ते काय! अर्थात अशात कोणा तिऱ्हाईतामुळे जर निद्रानाश झाला तर त्यासारखे दुर्दैव नाही दुसरे.

म्हणूनच म्हणतो, श्रेष्ठ भीष्माचार्यांना इच्छामरणाचा वर मिळाला होता. आजच्या आधुनिक जगात जर कोणी मला इच्छानिद्रेचा वर दिला तर काय बहार येईल... अर्थात त्याचबरोबर अशी रविवारच्या दुपारी झोपमोड होणार नाही असा 'उप-वर' किंवा accessory मात्र हवीच, नाही का?

२ टिप्पण्या:

शैलेश श. खांडेकर म्हणाले...

मस्त लेख! इच्छानिद्रेच्या वरासोबत अजून एक उपवर म्हणजे हव्या त्या स्थितीत झोप लागायची सोय हवी. एखाद्या रवीवारी आवरा-सावर करायची हुक्की आली तर त्यानंतर जो प्रचंड थकवा (?!) येतो त्याने बसल्या-बसल्याही तितकीच गाढ झोप लागायला हवी. :)

अनामित म्हणाले...

Chan lekh ahe. vachun mala kharech zop ali.

- Sagar