बुधवार, जानेवारी ०४, २००६

एखादी सारखी सारखी घडणारी घटना जोपर्यंत आपल्या स्वत:च्या बाबतीत - आपल्या अगदी जवळ अशी घडत नाही; तोपर्यंत तिचे गांभीर्य आपल्याला जाणवत नाही. मुंबईला अति-पावसामुळे महापूर आला - घरांमध्ये पाणी शिरले ही बातमी ऐकून, "अरेरे, हो का?" यापलिकडे मी गेलो नव्हतो - जोपर्यंत माझ्या स्वत:च्या घरी पूराचे पाणी शिरले नव्हते.

जगातला आतंकवाद, काश्मीरचे दहशतवादी - आपण सगळं कसं अगदी सवय असल्यासारखे वाचत/ऐकत असतो - जोपर्यंत तशी परिस्थिती आपल्या जवळपास निर्माण होत नाही; तोपर्यंत त्याचं कहिच वाटत नाही - अर्थात एका मर्यादेपलिकडे.

मागच्या आठवड्यात IISc मध्ये दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्यानंतर मला या सगळ्याची प्रकर्षाने जाणीव झाली.

IISc सारख्या जागेवर अशा तऱ्हेने रक्त सांडावं? कितीतरी वेळ मला काही सुचतच नव्हते. का? या हल्ल्यामागे काय "हेतू" असावा? या हल्ल्यानंतर त्यांनी काय मिळवलं? दहशत बसली; पण कशावर? IISc च्या पावित्र्यावर? तिथल्या शांत वातावरणावर? तिथे चालणाऱ्या संशोधनावर? दहशत वाईट गोष्टींवर बसवून परिस्थिती काबूत आणतात असा आपला माझा एक बाळबोध विचार होता. पण हे तर सगळ विपरीतच!

अशा दहशतवादी प्रव्रुत्तीमागे काहिही logic नसते अशा मताचा आता मी झालेलो आहे.

आंधळ्या सूडासाठी आणि निव्वळ पैशासाठी या थराला जाणारी लोकं असतात याची जाणीव मला होतीच; परंतु IISc तरीही कुठल्याही समीकरणात बसत नव्हते - तसं बसणंही अशक्यच आहे.

यापुढे भविष्यातही अशा निर्घुण गोष्टी/घटना घडत राहणारच. दोन्ही बाजूंना पलिकडची बाजू चुकीची, वाईटच दिसणार - कारण या दोन्ही प्रव्रुत्ती परस्परविरोधी आहेतच. अशा परीस्थितीत सुजाण-सुशिक्षित जनांनी काय करावे? त्यांना त्यांचे उज्ज्वल आयुष्य जगण्याचा अधिकार आहे की नाही? निष्पाप जीवांनी अशा तऱ्हेचे विनाकारण प्राणार्पण का करावे?

एक नव्हे तर अनंत असे प्रश्न समोर उभे राहतात. आयुष्य अचानक अत्यंत अवघड, अनिश्चित वाटायला लागतं. आपले एतके अलवार-हळुवार विचार-कल्पना आपण लिहित असतो - कथा कविता नाटके पाहत, ऐकत, वाचत असतो. या गोळीबाराच्या कानठळ्या बसवणाऱ्या कोलाहलात ते सारं हळुहळू विरून जायला लागतं. क्वचित हास्यास्पद वाटायला लागतं. सारं कसं अनिश्चित, क्षणभंगूर, क्षूद्रसं वाटायला लागतं. यात दोष कोणाचा, बरोबर कोण, चूक कोण याला सर्वमान्य उत्तर नाही. तसं असतं तर कदाचित हे सारं घडलंच नसतं. प्रत्येकास जे योग्य वाटेल ते त्याच्यासाठीचं बरोबर उत्तर. या अशा आयुष्याच्या धांदलीत, आपण आपली आणि आपल्या स्नेहींची काळजी घ्यावी एवढंच सत्य...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: