शुक्रवार, नोव्हेंबर ०९, २००७

चकली!

आज गेली कित्येक वर्षे आमची आई दिवाळीला चकल्या करता आलेली आहे। म्हणजे, फक्त दिवाळीच्या फराळासाठीच नव्हे तर इतर वेळीसुद्धा - सुटटीचा खाऊ म्हणून आमच्याकडे चकल्या केल्या जातात। परन्तु लेखाच्या सुरुवातीलाच इतकं असत्य-वदनी असू नये असा आमचा प्रघात आहे; त्यामुळे आमच्याकडे कधी-कधी चकल्या केल्या जातात? यांची सनावळी देण्याऐवजी, आमच्याकडे कधीच चकल्या केल्या जात नाहीत असा गौप्यस्फोट करतो। दिवाळीच्या फराळावरचा असा खुसखुशीत लेख असा न-काराने सुरु करू नये हे जरी खरं असलन तरी त्यास इलाज नाही -- कारण आमच्याकडे कधीच चकल्या होत नाहीत; होतात ते तुकडे!

चकाल्यांच्या या तुकड्यांना इतिहास आहे - शाळेतल्या इयत्तांच्या तुकडीला असतो तसा। 'ड' तुकडी नेहमी दंगा घालणारी -- तसेच दिवाळीतले तुकडे विशेष करु लक्षात राहणारे। प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते; ती वेळ आल्याखेरीज काही होत नाही म्हणतात। चकाल्यांचेही असंच असावं। प्रत्येक भाजणीची एक वेळ असते। उत्तम भिजवून त्यात (प्यारे) "मोहन" घालून, त्याहून छान वर्णन सांगून चकल्या पाडल्या की तुकडे तयार! मग आमची आई "या वर्षी तांदूळच कसा बरोबर नव्हता (म्हणजे गेल्या वर्षीसारखाच) " पासून ते "पावसाची लक्षणं ना बाहेर आज?" वरुन "सो-या जरा जास्तचा घट्ट बसलाय आज" ते "राजकीय अनिश्चितता आहे ना आफ्रिकेत" अशी सगळी कारणमीमांसा देते। त्यात मग आमचे सल्ले सुरु होतात। "गँस कमी करा -- गँस जास्त करा", "पीठ मळून देऊ का मजबूत हातांनी?" "पीठ जास्त मळायला नको होतं" "जाऊ द्या, पुन्हा भिजवा पीठ!" "नको? मग नवीन भाजणी आणा" आशा विविध सल्ल्यांनी आम्ही भंडावून सोडतो। अर्थात अशा गुगली सल्ल्यांनी आमची आई कधी "चकली"ये असं कधीही झालेलं नाही। "९४ साली सगळं व्यवस्थित हौनसुध्दा तुकडेच पडले होते ना?" असं काहीतरी ती पुटपुटते आणि पुढचा घाणा काढायला पुढे सरसावते।

४७च्या फाळणीनंतर कशाचे तुकडे झाल्याचं दुःख पुन्हा फारसं सारखं सारखं; आणि तेही दिवाळीच्या उत्साहात कोणाला आमच्याइतकं झालं नसेल।

या सगळ्या पूर्वेतिहासामुळे "चकली" या प्रकाराविषयी आम्ही फार संवेदनशील आहोत। "लाडू फार छान झालेत हो" किंवा "शंकरपाळी? झक्कास!" असं तुम्ही म्हणालात तर त्याचा आम्हाला फारसा अभिमान वाटेलाच असं नाही। मात्र, "चकलीची चव छान आहे, आणि नळी पण मस्त पडलीये" असं म्हणणार असाल तर तेवढ्यावरच थांबवा - पुढे "तुकडेच पडलेत म्हणून काय झालं" असे पुढचे पाच शब्द त्या तुकड्यांबरोबरच गिळून टाका -- कारण तो भलता धगधगता एरीया आहे - केव्हा दंगल भडकेल कळणारसुध्दा नाही। तीन दिवाळ्यांपूर्वी अशाच काहीतरी वक्तव्यांवरुन आमची आई भलतीच उ"चकली" होती। बरं तर बरं मागच्या वर्षी चकलीवर संभाषण येताच तिनं जो अविर्भाव केलेला तो पाहूनच आमची मामी बि"चकली" आणि गुपचूप चकलीचा तुकडा तोंडात टाकला होता।

एखादी न जमलेली गोष्ट पुन्हापुन्हा प्रयत्न केल्यानेच जमते हा सुविचार म्हणून चांगला आहे। चकल्यांच्या बाबतीत आमची आई तो आचरणात आणतेही आहे। अगदी जिद्दीनं - इरेस पेटूनाही चकली हां फराळरुपी प्रांत अजून तरी आमच्या अधिपत्याखाली आलेला नाहिये। एके दिवशी सारं काही मनासारखं होईल आणि छान गोलाकार, केवळ बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा, खमंग-रुचकर अत्यंत खुसखुशीत चकल्या आमच्या आईच्या सो-यातून घडतील आणि आम्ही सारे धन्य होऊ। असो, लेखाच्या अखेरिसही इतकं असत्य-वदनी असू नये अशी आमची काही तत्त्वे आहेत। "सत्यं वद" असं म्हणून म्हणतो की आजही आमची आई अवीट चवीचे जे तुकडे करते तेसुध्दा छान गोलाकार, इ। इ। विशेषणांनी ठासून भरलेल्या चकली नामक पदार्थाचेच असतात मिस्टर, आहात कुठे?

=-=-=-=-=

आमच्या तमाम रसिक वाचकांना शुभ दीपावली!

५ टिप्पण्या:

Meghana Bhuskute म्हणाले...

khihihihihhihkhihihihihihi! dha-maa-l.

Yogesh म्हणाले...

ha ha... mast.. :)Diwalichya shubhechchha.

archana म्हणाले...

ha ha ha ha. mast.

HAREKRISHNAJI म्हणाले...

happy diwali

अनामित म्हणाले...

chan!
by the way kakuna mahit ahe ka
he!
sagar