बुधवार, ऑक्टोबर २४, २००७

गिन्न्या

तिसरी चौथीत असतानाची गोष्ट - की दुसरीतली? कोण जाणे! प्राथमिक शाळेत असतानाची एवढं नक्की. कुणाला काय काय छंद असतात - पानं-फुलं वहीत घट्ट मिटून ठेवायची किंवा पोस्टाची तिकिटं जमवायची, खेळाडूंची चित्र जमवयची- शंख-शिंपल्यांचा खच जमवून ठेवायचा -- एक नाही तर दोन. मी त्या तिसरी-की-चौथीत असतानाची गोष्ट. आमच्या वर्गात गिन्न्या जमवायचं फॅड निघालेलं.

गिन्न्या म्हणजे रिकाम्या आगपेट्या - किंवा आगपेटीचं नुसतं वरचं चित्र. म्हणजे फक्त "शीप" किंवा "सायकल" पुरतं नाही; तर "कंदील" पासून ते इंपोर्टेड मेणाच्या काड्यापेट्यांपर्यंत! वर्गात त्याचं लोण पसरलेलं. सगळ्यांचाच हा छंद असल्यामुळे मग तुझ्याकडे किती - माझ्याकडे किती - डुप्लीकेट किती - exchange कुठल्या करणार इत्यादी व्यापार उदीम चालायचा. अर्थातच मधल्या सुटीमध्येच किंवा मग शाळा सुटल्यानंतर. सहा एक महिन्यांत माझ्याकडेही चांगला गठ्ठा जमलेला.

त्यावेळी (नाशिकच्या) यशवंत व्यायामशाळेतून जिमनॅस्टीक्सहून येताना मान खाली आणि नजर कुठली नवी गिन्नी रस्त्यावर दिसतेय याच्याकडे असायची. रस्त्यावरच्या कच-यात हात घालूनच हे सोनं मिळत असल्याने वडिलधा-यांच्या नजरा चुकवूनच करावे लागायचे. किंबहुना घरच्यांना गिन्न्या हे प्रक्रणच कदाचित माहित नसावं; इतकी या स्व-छंदाबद्दल गुप्तता मी पाळलेली. exchange इत्यादी वाटाघाटींच्या माध्यमातून माझ्याकडे मोठाच साठा जमलेला. आमच्या त्या वेळच्या घराच्या गच्चीच्या दारापाशी अडगळीचं म्हणाल्यास मोठा सन्मान होईल असं एक पिंपवजा डबडं होतं. त्याच डबड्यावजा तिजोरीत मी हे सारं ज्वालाग्राही कलेक्शन ठेवायचो.

दिवाळीच्या की उन्हाळ्याच्या मोठ्या सुटीनंतर एके दिवशी हा माझा खजिना लुटला गेला असल्याचं माझ्या लक्षात आलं. हा सारा गुप्त खजिना असल्यामुळे सांगायचं तरी कुणाला? वर-खाली दहादा त्या धुळीच्या कोप-यात शोधून झालं; सापडायचा पत्ता नाही!

आणि आजतागायत ती माझी संपत्ती गायब आहे ती गायबच.

त्यावेळी मला नक्की काय वाटलेलं ते आता पुसटसंही आठवत नाही. जीवापाड जपलेल्या अशा काही गोष्टी नाहिश्या होतात - परत कधीही न मिळण्यासाठी. हरवतात तेव्हा त्या अनमोल असतात ख-या; पुढे काळाची पुटं त्यावर चढतात आणि त्या सोनेरी आठवणी काळवंडून जातात. जखमांवर खपल्या चढतात ख-या; पण व्रण मात्र कायमचेच!

दहा पैशाच्या काड्यापेट्यांची ती दवडीमोल कव्हरं - छंदही काय जडलेला आम्हाला वाह! आज मनात आणलं तर अशा हजारो काड्यापेट्या विकत घेऊ शकीन; आहे काय त्यात. पण त्या जुन्या झालेल्या; धुळीने अर्ध्या भरलेल्या प्लॅस्टीकच्या पिशवीतल्या पन्नासेक गिन्न्या परत आणू नाही शकत. तीच पिशवी आज परत मिळाली तर काय मजा येईल असं अनेकदा वाटतं खरं; पण वास्तव मात्र एवढंच दिसतं की ती पिशवी काळाच्या पडद्याआड गेलेली आहे; परत न येण्यासाठी.

हे सगळं असं असलं तरी त्या जीवापाड जपलेल्या आणि कच-यातून शोधून काढलेल्या अमूल्य गिन्न्यांच्या आठवणी (अजून तरी) घट्ट माझ्याच आहेत.

आणि नेहमीच असतील!

१० टिप्पण्या:

Tejaswini म्हणाले...

खुप छान लिहीलंय!
खजिना लुट्ला गेला हे वाचल्यावर मलाचं खुप वाईट वाटंल!

अनामित म्हणाले...

मी सुद्धा गिन्न्या जमा करायचो. आम्ही भावंडं ह्या गिन्न्या वापरलेल्या वह्यांवर चिकटवायचो. घरी अजूनही असतील त्या वह्या. यावेळी घरी गेलो की नक्की हा खजिना परत उघडेन. आठवणींना उजाळा दिल्या बद्दल धन्यवाद!

अमोल पदमावार

Tiu म्हणाले...

excellent post... :)

mala pan lahaanpani kaay ved hota ginnya jama karnyacha...ekda mahabaleshwarla amhi sagli family firaayla gelo astanna, baki sagle points vagaire baghnyaat ramlele aani maza sagla laksha khali ekhadi changli ginni miltey ka tyaat...:D
kharach tyaveli to ek khajinach hota...
mastta lihilay!!! :)

Anand Sarolkar म्हणाले...

Sahich!

Ha tar majha pan chhand hota.

Majhaykade ajun astil ghari eka Chotya patryachya peti amdhe thevlelya!

Exchange kartos ka? ;)

Yogesh म्हणाले...

mast ... amhi ticketa gola karayacho... koni pahune ale ki khau chya adhi tikite odhun ghyaycho.. ;)
je pahune bus aivaji jeep vagarie ne yetil te avadat nasat. :p

कोहम म्हणाले...

chaan lihilay avadala

Ajit म्हणाले...

सगळ्यांना धन्यवाद!

असं दिसतंय की हे छंद त्यावेळी सगळीकडे साधारणतः सारखेच होते. "महाराष्ट्रातील शाळांमधले छंद व खेळ: काल आणि आज" असा एक सामुदायिक 'ऐतिहासिक' प्रबंध लिहायला हरकत नाही :-)

Raamya म्हणाले...

khup chan lihilay.....

Hyala aamachya kade "Chaape" mhanayache....Ha chand me sudhha kahi mahine japala.....Tirupati la gelo hoto. sagale dev-darshanaa chya maage aani me Chaapyanchya maage....
Aai cha maar kahallya nantarach band zaal.....

Kiran म्हणाले...

I really liked ur post, thanks for sharing. Keep writing. I discovered a good site for bloggers check out this www.blogadda.com, you can submit your blog there, you can get more auidence.

Sagar म्हणाले...

khare ahe ajit.. tu ani baki barech jan vegvegalya gavatun shaLatun asal.. ani sagalyanche chand matra almost ekach hote.. mi pan he udyog kele ahet..
it will be interesting to see whats the running "hobby" in present schools.. may be collection of computer games or something simillar :)
keep writing ....