रविवार, नोव्हेंबर ११, २००७

जे जे उत्तम...१

(पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा नंदनने सुरु केलेला एक स्तुत्य उपक्रम. त्यात माझी काय ती थोडीशी भर घालतोय!)

आरामखुर्ची
[...]
आणि यात मनाचा दोष आहे असे नाही. कारण आरामखुर्ची ही चीज मला अत्यंत प्रिय आहे. सोळा हजार बायका असूनही श्रीकृष्ण नेहमी रुक्मिणीच्याच महालात असायचा, त्याप्रमाणे माह्ज्या खोलीत जेव्हा आरामखुर्ची असते तेव्हा इतर खुर्च्यांकडे दुर्लक्ष करुन मी आरामखुर्चीचाच नेहमी आश्रय घेत असतो. आरामखुर्चीवरील या गाढ प्रेमामुळे आजवर दोनतीन आरामखुर्च्यांचा मी बळी घेतला आहे. ती नसली म्हणजे मी तिच्यासाठी दुःख करतो; परंतु ती असली म्हणजे तिच्या सुखदुःखाची पर्वा न करता, तिचा इतका अतिरिक्त आणि अविरत उपयोग करतो की, तिचे कृश शरीर लौकरच गलितगात्र होते आणि तिच्या निखळलेल्या लाकडांची मोळी अडगळीच्या खोलीत टाकावी लागते, किंवा दारावर आलेल्या सौदागराच्या स्वाधीन करावी लागते. ज्या वस्तूवर आपण प्रेम करतो ती वस्तू वापरण्यास त्या प्रेमामुळेच आपण खरोखर अपात्र असतो हे सत्य नाही काय? केक खाणे आणि जवळ बाळगणे या दोन्ही गोष्टी एकदम होऊ शकत नाहीत अशी इंग्रजीत म्हण आहे ती या दृष्टीने फार यथार्थ आहे. भुकेला माणूस केकवर प्रेम करतो आणि त्या प्रेमामुळेच तिचे भक्षण म्हणजे तिचा नाशही करतो. लहान मुलाला एखादी वस्तू आवडली, तिच्यावर आपले प्रेम जडल्याचे त्याने अंगविक्षेप आणि मुद्राभिनय यांच्या द्वारा सिध्द केले म्हणजे आपण (त्या वस्तूविषयी आपल्यालाही काही प्रेम असेल तर) ती चटकन बाजूला उचलून त्याच्या दृष्टीआड करतो. तसे न केल्यास त्या वस्तूची जीवनयात्रा समाप्त झाली असे आपण समजतो. उदाहरणार्थ, तुमच्या अंतःकरणातील वात्सल्यरस ओसंडू लागल्याने तुम्ही आपल्या अपत्याला टेबलावर बसविले. (वात्सल्याच्या आवेगात नेहमी होणा-या अपराधांपैकी एक अपराध) आपल्या त्या कुलदीपकाची दृष्टी सहजच टेबलावर असलेल्या काचेच्या रंगीत, नक्षीदार दौतीकडे जाते. दुष्यंताचे शकुंतलेवर प्रथमदर्शनी प्रेम जडते त्याप्रमाणे त्या दौतीच्या दर्शनाने तो चिमुकला दुष्यंत घायाळ होऊन जातो. त्याचे डोळे विस्फारतात, त्याच्या ओठांवरती हास्यलहरी नाचू लागतात, त्याच्या तोंडातून काहीतरी अमानुष चीत्कार बाहेर पडतात, त्याचे बाहुपाश वरती जातात आणि (तुम्ही झटपट केली नाही तर) दुस-या क्षणी ती दौत आतल्या शाईसह त्याच्या हातात जाते! होऊ नये ती गोष्ट होऊन गेली आहे, आता तिची पूर्तता पाहण्यावाचून तुम्हाला गत्यंतर नाही. दौतीच्या त्या चारी बाजूंचे ते बालक कसोशीने कौतुक आणि निरीक्षण करते. तिच्यातील शाईचा शेवटचा थेंब बाहेर काढते आणि शेवटी तिचे सामर्थ्य अजमावून पाहण्यासाठी खालच्या फरशीवर जोराने भिरकावून देते. बालकाच्या प्रेमामुळे दौतीच्या काचा होतात! मोठी माणसे हीसुध्दा आकाराने वाढलेली मुलेच असतात. तीही आपल्या गाढ प्रेमाने कोणत्या तरी वस्तूचा, कोणत्या तरी व्यक्तीचा नाश करीत असतात! पुष्कळसे प्रेमविवाह अयशस्वी होतात याचे कारण विवाहाइतकेच प्रेम हेसुध्दा असते यात संशय नाही.

[...]

या ऐहिक जगात सर्वगुणसंपन्न असे काय आहे? जगात आल्यावर देवाचा देवसुध्दा एका पायाने लंगडा आणि मनाने ठकडा झाल्याचे आपल्या ऐकिवात आहे. सर्व चांगल्या गोष्टींप्रमाणे आरामखुर्चीच्या चांगुलपणालाही मर्यादा आहेत. आरामखुर्चीत बसल्यावर देवांनीही आपला हेवा करावा अशी परिस्थिती निर्माण होते ही गोष्ट खरी. परंतु म्हणून दिवसाचे चोवीस तास आरामखुर्चीत बसूनच आपण जीवन कंठू लागलो तर ते इष्ट होणार नाही. सकाळच्या वेळी आरामखुर्चीत सहसा बसू नये असे माझे अनुभवसिध्द मत आहे. सकाळ ही काम करण्याची सर्वोत्कृष्ट वेळ आहे आणि आरामखुर्ची ही काही काम करण्याची जागा नव्हे. आरामखुर्चीत बसून कामाचा विचार करता येतो, काम करता येत नाही; मनोराज्य करता येते, व्यवहार करता येत नाही. वाचता येते, लिहिता येत नाही. आरामखुर्ची ही काही कर्मभूमी नव्हे. सकाळी खुर्चीवर आणि रात्री किंवा संध्याकाळी आरामखुर्चीवर, ही माणसाच्या बसण्याची आदर्श व्यवस्था आहे असे मला वाटते. संयम ठेवला नाही तर आरामखुर्चीचे सुखातून व्यसनात रूपांतर व्हायला उशीर लागत नाही. आरामखुर्चीचे राजकारण हा निंदाव्यंजक शब्दप्रयोग अस्तित्त्वात आला त्याचे कारण हेच की, असले राजकारण करणा-या लोकांना आरामखुर्ची हे राजकारण करण्याचे स्थळ किंवा जागा नव्हे हे समजले नाही. रणांगणावर तरवार किंवा व्यासपीठावर वक्तृत्व गाजवून परत आल्यावर आरामखुर्ची ही विश्रांती घेण्याची जागा आहे. परंतु हे लोक आरामखुर्चीतून लढाई करू लागल्यामुळे लोकनिंदेशिवाय दुसरे काहीच त्यांच्या पदरी पडले नाही. आरामखुर्चीच्या बाजूने मी इतकेच म्हणेन की, हा दोष आरामखुर्चीचा नसून तिच्या योजनेचा आहे. आरामखुर्चीचा इतका काटेकोर सदुपयोग करणे मलाही कधी जमलेले नाही. हे सारे ध्यानात घेऊनही आरामखुर्ची ही सुसंस्कृत मानवाच्या जीवनातील एक श्रेष्ठ अशी संस्था आहे हे कोणालाही मान्य करावेच लागेल. या संस्थेत मी लौकरच पुन्हा दाखल होण्याची आशा करतो.


=-=-=-=-=-=-=-=-=

लघुनिबंध हा माझा आवडता साहित्यप्रकार. "आरामखुर्ची" नावाच्या एका लघुनिबंधातले हे काही उतारे. कोणाला टॅग करण्याऐवजी, सगळ्यांनाच कोडे म्हणून विचारतो, की या लघुनिबंधाचे लेखक ओळखू शकाल काय?

४ टिप्पण्या:

Nandan म्हणाले...

काणेकर [किंवा खांडेकर] हा अंदाज :) . "पुष्कळसे प्रेमविवाह अयशस्वी होतात याचे कारण विवाहाइतकेच प्रेम हेसुध्दा असते यात संशय नाही." - हे मस्तच.

peshwa म्हणाले...

वि वा शिरवाडकर? 'आहे आणि नाही' या पुस्तकात वाचल्यासारखा वाटतोय. पण ते जवळ नसल्याने खात्री करुन घेता येत नाहीये.

Yogesh म्हणाले...

malahi shirwadkar vatat ahe.

Ajit म्हणाले...

कुसुमाग्रज + "आहे आणि नाही" = सही जवाब!