रविवार, मे ०३, २००९

चिकट विनोद!

फणस कापणे म्हणजे केक कापण्याइतकी सोप्पी गोष्ट नाही. 

हम केक खाने के लिये पेक्षा, हम गरे खाने के लिये किधर भी जा सकते है, यात जास्त निर्लज्जपणा आहे असे आम्हाला वाटते. ज्यांनी स्वतः फणस कापला आहे (किंवा प्रयत्न केला आहे) त्यांना आमचं म्हणणं नक्की पटेल. बाहेरचे काटेरी दात बाजूला करून  मुद्याला हात घालायचा; सुरीला तेल चोपडून तसंच घमघमाटात (तेलाच्या नव्हे, ग-यांच्या) एकेका ग-याची गच्ची पकडून त्याला चिकाच्या बंधनातून मुक्त करणं म्हणजे काही सोपं नाही! नुसत्या आठवणींनी थर’काप’ उडतो. अगदी ‘काप’रं भरतं, तुम्हाला सांगतो!

सुरी चालवण्यात सर्जनचा हात कोणी धरू शकत नाही असं म्हणतात (सर्जन सुरी चालवत असताना त्याचा हात कुणी धरूही नये म्हणा!). त्याच सर्जनला आमचं खुलं आव्हान आहे की फटाफट एक फणस कापून दाखवावा. बक्षीस म्हणुन बरका फणसाचे गरे मिळतील कापा! (सॉरी, बक्षीस म्हणून कापा फणसाचे गरे मिळतील बरंका!)

तर मुद्दा असा की फणस कापण्यापेक्षा तो खाणं, ही सोप्पी गोष्ट असावी. फणस कापणारा गडी जर तरबेज नसेल तर मग ग-यांना फणसाचा चीक चिकटून बसतो. मग चवीचवीनी गरे खाताना जर जीभ त्या चिकाच्या सापळ्यात अडकली, तर त्यालाच "टंग इन चीक" विनोद म्हणत असावेत...

हा विनोद रुचला नसेल, आणि त्यामुळे डोकेदुखीसद्रुष आजार बळावला असेल तर कायदेशीर मार्गानी या‘चिका’ दाखल करावी ही नम्र सूचना! आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवेपर्यंत ‘चिका’र याचिका दाखल झाल्या असतील, तेव्हा लाजू नका :-)

१२ टिप्पण्या:

Yawning Dog म्हणाले...

ha ha ha ha...sahee
Sagale shlesh jabaree ahet

Raj म्हणाले...

sahee.. vachayala survat kelyanantar phakta pj mojat hoto :D

Nandan म्हणाले...

सही! ’टंग-इन-चीक’ तर एकदम भारी. इतके कष्ट करून गरे मिळवण्यात ’गर्हणीय’ काहीच नाही ;)

ॐ म्हणाले...

तुमचा we-know-the चांगला चिकटलायनामला... ( चिकटलाय मनाला )

Milind म्हणाले...

:D :D
'टंग इन चीक' एकदम भन्नाट!

Ajit म्हणाले...

सर्वांना धन्यवाद!

आता या पोस्टचा गर्व करून उगाच माज करायला लागलो तर त्याला गरेरावी करतो असं म्हणायला लागेल :-)

Sheetal Kamat म्हणाले...

Amazing :)

Unknown म्हणाले...

hahaha... sahi zalay post!!!

Nandan म्हणाले...

raap-chik :)

Snehal म्हणाले...

ekdam "Chik"na zalay...

Copyright © 2001 – 2009 Devendra Deshpande म्हणाले...

रसगरहण:
अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. याचा समावेश ’सुलभ(?) एकसौ एक ’गरे’लू उद्यम’ च्या पुढील हंगामात करण्यात येईल.

फणसाचे ’सर्जन’शीलतेशी नातेही स्पष्ट झाले. "हात नाही ’काप’त तर धंद्यात राही ’बरक’त" अशी म्हणही व्यावसायिकांत रुजेल.

कोकणात नवर्‍यासाठी खास ’घो-गरा’ काढून ठेवतात असे ऐकिवात आहे. यात नवर्‍याचा आवाज खाली नेण्याचा सामाजिक उद्देश असावा. याचाही अभ्यास करावा.

असेच ’चिका’टीने कार्य चालू ठेवा.

गर्‍यापेक्षा आठळी मोठी लिहिल्याबद्दल क्षमस्व.

अनामित म्हणाले...

Great punning...!!