मंगळवार, ऑगस्ट १५, २००६

श्रावणमासी

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे
बंगलोरला यावर्षी आषाढ लागलाच नाही. थेट श्रावणच. आधीच बंगलोरची हवा आक्रमक आषाढाला साजेशी नाही. सोनेरी सकाळी ढगांचा मागमूस नसावा, झालाच तर संध्याकाळी थोडासा पाऊस, तेवढाच. मात्र तेवढा पाऊस इथली सारी तळी पूर्ण भरून टाकायला पुरेसा आहे - म्हणजे - तळी उथळ आहेत असं नाही - पाऊस पुरेसा आहे. आणि नुसताच पुरेसा नाही, तर सुखदही.

रोजच्या ऑफिसच्या जगात श्रावण काय आणि वैषाख काय, सगळ्या ॠतूंमधली A/C हवा आम्हाला सारखीच. त्याचबरोबर बंगलोरला हिरवळीचं तसं काही वावगंही नाहिये. 'आता नॉन व्हेज नाही महिनाभर' असं कुणीतरी म्हणाल्यावर श्रावण-आगमनाची आम्हाला वार्ता लागली. मग लक्षात आलं की, अरे! हवासुद्धा बदलली आहे बरं का! दोन-तीनदा इंद्रधनुष्य दिसल्यावर तर खात्रीच पटली.
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणि भासे
असे मंगल तोरण नभोमंडपात खुद्द निसर्गानेच बांधल्यावर मग सणासुदीला काय उत्साह! बाजारही फुलांनी ओसंडून वाहत होते (आजकाल आम्हाला रस्ते आणि बाजार, चुकलो, मॉल फक्त माणसांनीच ओसंडून वाहू शकतात असे वाटायला लागले होते). पूजेसाठी फळे, इतर गोष्टीही आल्याच त्याबरोबर. संध्याकाळ होऊ लागली की सूर्य तेवढा मावळायला सज्ज होतो, उत्साह नाही!
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे
संध्याकाळच्या ऊन-पावसाच्या लपंडावात मग रस्त्यांवरचे दिवेही सहभागी होतात. नुकताच शिडकावा होऊन गेला असल्यामुळे चमकणारे असंख्य थेंब आपसूकच लक्ष वेधून घेतात. पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याची निवलेली किरणे गवताची पाती मग त्याच असंख्य थेंबांमधून पिऊ पाहतात. तोच तेजोनिधी लोहगोल आपली दिवसातली शेवटची जादू मग आकाशात सादर करतो.
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

आकाश केवळ विमानांसाठीच तयार केलेले असावे असे वाटणाऱ्या आकाशात खरंच बगळे दिसतात. विश्वास बसत नाही - नेहमीच दिसत असावेत हे बगळे - आपली नजरच विमानांचा शोधात फिरत असावी - असंही वाटून जातं. पाच-पाच सात-सातच्या रांगा करून, वाऱ्याचा रोध कमी होईल अशा ऐटीत ही बलाकमाला क्षितिजावर आस्ते आस्ते अदृश्य मग होऊन जाते.
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
बालकविंच्या या प्रख्यात कवितेतले पुढले संदर्भ मात्र आमच्या शहरी जीवनात फारच विसंगत वाटतात. त्यामुळे त्या पंक्तीबद्दल जास्त वक्तव्य न करता आहेत तशाच पुढे लिहितो आहे-

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
आमच्यासारख्या पक्क्या "शहरी" झालेल्या वाचकांच्या मनांत (सुद्धा!) ही कविता वाचून श्रावण बरसला असेल अशी आशा आहे!

४ टिप्पण्या:

शैलेश श. खांडेकर म्हणाले...

अजित,

या सुंदर लेखासाठी आपले मनःपूर्वक आभार, :) असे अजून येऊ द्यात की!

Nandan म्हणाले...

आमच्यासारख्या पक्क्या "शहरी" झालेल्या वाचकांच्या मनांत (सुद्धा!) ही कविता वाचून श्रावण बरसला असेल अशी आशा आहे!

-- नक्कीच. लेख आवडला.

Ajit म्हणाले...

शैलेश, नंदन, Thanks!

shambhagwat म्हणाले...

शाळेत असताना ही कविता पाठ नसल्यामुळे शिक्षकांची छडी खावी लागली होती. त्याची आठवण झाल्यामुळे नीट enjoy करू शकलो नाही. क्षमस्व.