गुरुवार, मे ०३, २००७

बगळ्यांची माळ...

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात

त्या भेटी त्या गोष्टी नारळीच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात

हातासह सोन्याचे साज गुंफताना
बगळ्याचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना
कमळापरि मिटती दिवस उमलुनि तळ्यात

तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे
तडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात

बगळ्यांची माळ फुले...


-- कवी वा.रा. कांत.

वा.रा. कांतांचे शब्द.
पं. वसंतरावांचे सूर..
आणि अविस्मरणीय त्या आठवणी...

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

छेडिती पानात बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात फुले उन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो, दूर डोंगरात ॥ १ ॥

हे ह्या कवितेचं पहिलं कडवं आहे. केवळ अप्रतीम. वा.रा.कांतांच्या सगळ्याच कवितांना शेवटी दु:खाची छटा असते.. 'त्या तरूतळी विसरले गीत', 'आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको' यांसारख्या अनेक कवितांची पुढे गाणी झाली आणि गाजली देखिल!

कांतांचे शब्द, डॉक्टरांचा आवाज ह्याईतकीच खळेअण्णांची चाल अप्रतीम आहे.

आपल्या जालवासरीला शुभेच्छा!