रविवार, नोव्हेंबर २६, २००६

रसिक

दिवसभराच्या कामाचा उरक पाडून रसिकजन एकामागून एक सभागृहात स्थानापन्न व्हावेत. हवेतला उष्मा कमी होऊन हवेत एक प्रसन्न गारवा यावा. दूर जलाशयावरून येणाऱ्या झुळुकेचा स्पर्श वातानुकुलित सभागृहातही जाणवावा. अशा अतिशय आनंददायक वातावरणात मंचावरचा पडदा उघडला जावा. टाळ्यांच्या कडकडाटात तानपुऱ्याचा 'सा-प-सा' मिसळून जावा. सुजाण रसिकांची इजाझत घेत मग गायकाने आपली आलापी सुरू करावी.

सकाळच्या प्रसन्न प्रहरी शौकिनांनी प्रेक्षागारात हजेरी लावावी. कोवळ्या उन्हांनी खेळपट्टीवरील दंव शोषण्यास सुरूवात करावी. संघनायकांमधल्या नाणेफेकीनंतरच्या हस्तांदोलनात स्पर्धाभावनेची ऊबही असावी. पंचांच्या आगमनानंतर पाठोपाठ टाळ्यांच्या कडकडाटात फलंदाजांचेही आगमन व्हावे. मोठ्या उत्साहात गोलंदाजाने आपला छोटासा सराव करून घ्यावा. फलंदाजाने आपली 'पट्टी' आखून घेतल्यावर प्रेक्षकांमध्ये रोमांचाची रेख उमटावी. "प्ले!" अशा पारंपारीक सूचनेनंतर गोलंदाजाने आपली धाव सुरू करावी.

पहिला स्वर गायक कसा लावेल? कुठला राग असेल, अशी सगळी उत्सुकता रसिकांमध्ये नेहमीच असते; त्यात कुठली बंदिश असेल बरे, याची भर पडावी. गायकाने पहिला आलाप सुरू करताच तबलजीने हळूच तबला कडक लागला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. रागाच्या उत्तम आरंभाची पावती हार्मोनियम साथीदाराने आपल्या झुकलेल्या नजरेने द्यावी. आलापीला थोड्याच वेळात शब्दांचा साज चढताच तबलजी आणि रसिकजन सावध व्हावेत. बरोब्बर समेवर 'धीं" ची थाप पडावी आणि हळूहळू रसिकांच्या मनात एकतालाची धुंदी चढू लागावी.

फलंदाजाने पहिल्या चेंडूला योग्य मान देऊन यष्टीरक्षकाकडे जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा. पहिल्या एक-दोन षटकांत दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीचा रंग पारखलेला असावा. फलंदाजांची कसोटी पाहत गोलंदाजाने उसळते चेंडू टाकावेत. एखादा तेज चेंडू यष्ट्यांची हालहवाल विचारत अगदी जवळून सळसळत जावा. प्रेक्षकांच्या मनातले बोल फलंदाजाने आपल्या बॅटमधून काढावेत. दहा-पंधरा षटकांनंतर गोलंदाज आणि फलंदाज आपापल्या लयीत मग्न झालेले दिसावेत. प्रेक्षकांनी फलंदाजांच्या नजाकतीला "वाह" ची शाबासकी द्यावी; आणि गोलंदाजांच्या दिमतीला आपल्या टाळ्यांची फौज धाडावी.

प्रत्येक तानेपाठोपाठ हार्मोनियमची साथ अधिकच सरस होत जावी. गायकाच्या कल्पकतेस ती साथ वरचेवर मोलाची ठरावी. अवखळ सरगम मग प्रेक्षकांवर आपली भुरळ पाडण्यासाठी अवतीर्ण व्हावी. रसिकांची तिने थोडी फिरकी घ्यावी, आणि कळत-नकळत भिंगरीसारख्या तानेत अदृश्यच होऊन जावी. "वाह, क्या बात है!" ची दाद पहिल्या रांगेपासून शेवटच्या आसनापर्यंत सगळ्यांनाच आधीच ठरवल्याप्रमाणे एकाच वेळी द्यावी लागावी. आपल्या विनम्र परंतु आश्वासक नजरेने गायकाने या कौतुकाचा स्वीकार करावा. आणि मग मंद लयीचे अचानक जलद तीनतालात रुपांतर व्हावे.

प्रत्येक चेंडूला योग्य सन्मान देत तो खेळून काढावा. एखाद्या कमजोर चेंडूला सीमेपार धाडण्याचा विश्वास फलंदाजांत चेंडूगणिक वाढतच जावा. खेळपट्टीच्या पुढे, मागे, डावीकडे-उजवीकडे चौफेर फलंदाजीचा आनंद फलंदाजांपेक्षा प्रेक्षकांनाच अधिक वाटावा. उच्च प्रतीचा झेल प्रेक्षकांनी डोक्यावर घ्यावा. मैदानावरील सामन्याचा थरार एखाद्या उत्तुंग षटकाराने प्रेक्षकांमध्ये झटक्यात पसरावा. सहा मात्रांच्या तालावर फलंदाजांनी आपली लयकारी रंगवावी.

दृत तीनतालात, अगदी नवख्या रसिकालाही भावेल असा आक्रमक तराणा बोलू लागावा. एकाहून एक सरस-सुरील्या तानांना साथ करताना साथीदारांची थोडीशी धांदलच उडावी. पहिल्या षड्जरूपी कळीला या अखेरच्या आवर्तनांमध्ये बहर यावा. टाळ्यांच्या अविस्मरणीय कडकडाटात आकर्षक तिय्या घेत मैफिलीची समाप्ती व्हावी.

अखेरच्या षटकांतील चुरशीला अनोखा रंग चढावा. दोन्ही संघांमधील स्पर्धा अधिकच तिखट व्हावी - आणि त्याबरोबरच सामन्यातील रंजकता आणखी वाढत जावी. एका फलंदाजाच्या किंवा गोलंदाजाच्या कामगिरीमुळे, आणि अर्थातच त्याच्या साथीदारांच्या मदतीमुळे संघ विजयाच्या समीप पोहोचावा. असंख्य चाहत्यांच्या साक्षीने वरचढ संघाने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करावे. विजेत्या संघाचेच नव्हे; तर पराभूत संघाचेही चाहते एक उच्च दर्जाचा सामना बघितल्याच्या खुशीत मैदानातून बाहेर पडावेत.

"वाह! काय सामना झाला!"
आणि
"वाह! काय मैफिल जमली होती!"
असे दोन्ही उद्गार एकाच जल्लोषात उमटावेत.

सच्च्या रसिकाला शास्त्रीय संगीत असो वा क्रिकेटचा सामना, दोन्ही तितक्याच तीव्रतेने भावणार, नाही का? थोडक्यात काय, तर शास्त्राच्या पलिकडे जाणारे संगीत आणि तंत्राच्या पलिकडे जाणारा खेळ; दोहोंचा आनंद लुटण्यासाठी फक्त रसिकता आणि अमाप उत्साह यांचीच आवश्यकता असते. शास्त्र आणि तंत्र जाणण्याची नव्हे!

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

bhau,

atishay sundar.. apratim... cricket aani shastriya snagitachi tumhala kiti manapasun aawad aahe te kalale aani te shabdat itkya sulabhatene utarvile tumhi... surekhach... : Anurag