सोमवार, जुलै २४, २००६

आठवण

आठवण...
सायकल चालवताना पहिल्यांदा पडलो तेव्हाची.
गणपतीला नैवेद्य दाखवायच्या आधीच मोदक खाल्ला तेव्हाची.
चिंचेच्या झाडावर मारलेला दगड नेम चुकून विहिरीत पडला तेव्हाची.
"उंदिर पळाला"च्या घोषात भोकाड पसरून रडलो तेव्हाची.
कागदी बोट पावसाच्या पाण्यात वाहून गेली तेव्हाची.
बेभान वाऱ्याशी स्पर्धा करत पेच खेळलो तेव्हाची.
मधल्या सुट्टीत सगळ्यांसमोर पाय घसरून पडलो तेव्हाची.
जिलबी ताटात पुढे दिसल्यावर दिलखुलास हसलो तेव्हाची.
जत्रेतून आणलेला फुगा घरी येताच फुटला तेव्हाची.
फुलाचा जवळून वास घेताना मधमाशीच चावली तेव्हाची.
रंगपंचमीला अर्धेवट रंगूनच पुरणपोळी हादडली तेव्हाची.
'इंद्रधनुष्यात सातच रंग का'च्या प्रश्नात तासंतास हरवलो तेव्हाची.
सीताफळाची बी गिळून बसलो तेव्हाची.

अशी जपून ठेवलेली एकेक आठवण: पुन्हा पुन्हा परतून येते, आणि जाणवतं ते काय?
ते चिमुकलं जग मागे सोडून आपण फार पुढे आलेलो आहोत.

किंवा ते चिमुकलं जगच आपल्याबरोबर मोठं झालंय.

खूपदा मला त्या जगात पुन्हा जावसं वाटतं - पळून...

आणि मग मी माझा कप्पा उघडतो, माझी वही माझ्याकडे पाहून हसते, आणि हे असं काहीतरी लिहायला भाग पाडते!

२ टिप्पण्या:

Y3 म्हणाले...

सुरेख..
खरच, चिमुकल जग आपल्याबरोबर मोठ होत जात.. आणि छोट्या छोट्या आठवणी मनाच्या कोण्या एका कप्प्यात जाउन लपून बसतात.
एकदम पटल.

श्रद्धा म्हणाले...

सुरेख लेख.