बुधवार, जुलै २६, २००६

लांडगा आला रे!

मागल्या रविवारी दिवसभर वीज गायब असल्याने आमचा दूरचित्रवाणी संच (यापुढे यास टि.व्ही. असे संबोधले जाईल) बंदच होता. जगात केवढा कोलाहल चाललेला असतो ते रविवारच्या निवांत दिवशी लक्षातच येत नाही. म्हणजे इतर दिवशी येतो असं नव्हे; पण कानावर बातम्या पडत असतात - कुठल्यातरी नटीला कुत्रं चावल्याची बातमी, किंवा विमानात (विमान)सुंदरीने मद्य अंगावर सांडवल्यामुळे झालेली एखाद्या उद्योगपतीची फजिती आदि कित्येक चविष्ट बातम्या कचेरीत चघळल्या जातात, त्यामुळे तशी जाग असते.

तर मुद्दा असा की जेव्हा अवघे भारतवर्ष देवाकडे प्रार्थना करीत होतं, तेव्हा आम्ही चक्क झोपा काढत होतो. ज्या अविस्मरणीय रविवारी सगळा देश SMS/e-mail पाठवून राजपुत्राला कसे वाचवता येईल अशा युक्त्या लढवत होता, त्या दिवशी आम्ही कपडे धुण्यात मग्न होतो! अरे रे, काय हा दैवदुर्विलास...

"सध्या आपली मनस्थिती कशी आहे?"
"तुमच्या मुलाचा आवडता रंग कुठला?"
"तो डावरा आहे??"
"काय रे, तुमचा मित्र खोड्या काढतो का शाळेत?"
"साहेब, त्याला बाहेर काढण्यात इतका का खोळंबा होतो आहे हे हळुहळू, नीट विस्ताराने सांगाल का?"
"पहा - या इथे त्याची क्रिकेट खेळण्याची बॅट ठेवली आहे! नीट पहा-"
"ही बातमी तुमच्यापर्यंत अहोरात्र पोहोचवण्याची कामगिरी करताहेत आमच्या वाहिनीचे बहाद्दर वार्ताहर"

यात अतिशयोक्तीचा बराच मोठा वाटा असला, तरी जे काही त्या दिवशी चाललं होतं ते ब~यापैकी याच चालीचं होतं. तो बिचारा प्रिन्स तिथे लढतोय आणि यांना काळजी पडली आहे की आपल्याच चॅनेलने ही बातमी कशी जगासमोर आणली याचा प्रचार कसा करावा याची.

आमच्या प्रार्थना तर त्याच्या पाठीशी होत्याच हो; पण SMS मागवल्याखेरीज ते सिध्दच होऊ शकत नाही अशी या चॅनेल्सची खात्री असावी. या राजपुत्राची बातमी ही काही पहिली अशी बातमी नाही. अलिकडे मात्र अशा "सनसनीखेज" बातम्या सादर करण्याची टूमच निघाली आहे. "Breaking News" असं वाचल्यावर आम्हांस त्याचे काहीच वाटेनासे झाले आहे. त्यात काय आहे - दर तासाला अशी एक तरी बातमी "फुटत"च असते की. रोज मरे त्याला कोण रडे असं त्याचं हसं जर झालं तर त्यास हे चॅनेलच जबाबदार ठरणार आहेत.

"लांडगा आला रे" या प्रख्यात इसापनितीची आठवण होते; तसे न व्हावे हेच आमचे मागणे :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: