रविवार, ऑक्टोबर ०७, २००७

एक सुखद महामूर्ख

काही वेळा आपण जगातले नव्हे विश्वातले सर्वोत्तम महामूर्ख आहोत असं वाटतं. नुसतं वाटतंच असं नाही; तर ते खरंही असतं! म्हणजे तसे आपण नसतो महामूर्ख वगैरे, चांगले हुषार असतो; पण म्हणतात ना, की नुसतं हुषार असून काय उपयोग? तसंच होतं कधीकधी...
एक सुखद दिवस
ऑफिसमधे सुखद दिवस कमीच. त्यातही ब-याच मिटींगा झाल्यानंतरही दिवस सुखद ठरावा हा आणखी एक सुखद धक्का त्या दिवशी मला मिळाला. सवयीनुसार कोणी जास्त कामाचा भार माझ्यावर टाकला नाही. सवयीनुसार मी देखील जास्त कामाचा भार ओढवून घेतला नाही. दुपार उलटून गेली तशी ती दुपार आणखीनच सुखद वाटायला लागली. छान नवी गाणी लावून वगैरे मी नेहमीचीच रटाळ जुनी कामं उरकत होतो. त्यात व्यत्यय आणायला कोणीही क्युबमध्ये येऊन उगाच प्रश्न-बिश्न विचारत नव्हते. अर्धे अधिक लोक रजेवर असावेत, कारण एकंदरीत कचेरीत शांतता सुखनैव नांदत होती.

आज संध्याकाळी ट्वेन्टी-२० ची फायनल मॅच होती आणि त्याकडेच अस्मादिकांचे डोळे लागले होते.

एक सुखद संध्याकाळ
जरा लवकर निघावं ऑफिसातनं तर लोकांच्या भुवया एक दोन इंच वर जातात इतर दिवशी, पण आज नाही. कारण सगळेच लवकर निघणार होते. क्रिकेटज्वराने मॅनेजरलादेखील ग्रासले होते. त्यामुळे मोठ्या दिमाखातच मी निघालो. एक-दोन जणांशी ठरलेले हास्यविनोद उरकून बाईकवर बसलो तेव्हा साडेपाच वाजून गेले असावेत. ट्रॅफिक नावाच्या दिव्यातून आजही जावे लागणार या चिंतेतच मी किक मारली आणि निघालो. नशिब कधीकधी (च) आपल्या वाटेने चालून येतं; तसं ते आज आलं आणि आणखी सुखद वाटायला लागलं. निघालो तर नेहमी लागतात तसे ट्रक-बस-आणि मोटारींचे लोंढे गायब! म्हणजे अगदीच गायब नाहीत; पण मला जायचे त्या दिशेने गायब! काय सुखद संध्याकाळ असा विचार करत चौथ्या गियरमध्ये बाईक टाकली तेव्हा वेळेवर पोहोचीन असे नुसते मनसुबे नव्हते; तर घराचं दारच जणू दिसत होतं.

एक सुखद प्रवास
ऑफिसपासून माझं घर किती अंतरावर आहे असं विचारण्यापेक्षा किती मिनिटांवर आहे असं विचारणं संयुक्तिक ठरेल. म्हणजे मी उत्तरही त्या दृष्टिनेच देतो नेहमी. आठ किलोमीटर अंतर पार करायला बॅंगलोरमध्ये दहापासून शंभरपर्यंत कितीही मिनिटे लागू शकतात. ही झाली घड्याळातली मिनिटं, एकेक चौक पार करताना एकेक युग उलटतंय असे untimely विचार माझ्या मनात अनेकदा डोकावून जातात.

आजचा दिवस मात्र खासा निराळा. म्हणजे सगळं कसं जुळून आलेलं. आपल्याला जायचंय त्या दिशेने ट्रॅफिक नाही, ऑफिसकडे जायच्या दिशेने मात्र शेकडो वाहनं रांग करून (आणि मोडूनही) ही अशी उभी. "आयला, ऑफिसच्या दिशेने कोण एवढे लोक जाताहेत बोंबलायला संध्याकाळी, घरी जाऊन मॅच बघायची मस्त तर नाही," असे "देवा यांना माफ कर, ते काय करताहेत ते त्यांचं त्यांना कळत नाहिये" धर्तीवरचे पवित्र विचार मी मनाशी बांधून ठेवले. ट्रॅफिक इतका कमी होता की हे फक्त मनाचे खेळ होते अशी शंका आल्यामुळे मी एकदोनदा रस्त्याच्या मध्येच एकदम गाडी बंद पाडून किती हॉर्न ऐकू येतात हेही पाहून घेतलं. माझ्यामुळे कोणालाच अडथळा झालेला नव्हता. दुस-या बाजूला तिष्ठत उभ्या असलेल्यांसाठी एक करमणूकीचा खेळ करून दाखवला एवढंच.
एक सुखद महामूर्ख!
ट्रॅफिक आणि प्रतिस्पर्धी संघ नेहमी आगाऊ वक्तव्यांचा सूड घेतात. घेतला तर घेऊ देत. आज हमें कोई नहीं रोक सकता! मुख्य रस्ता डावलून घराकडे जाणा-या छोट्या गल्लीत वळलो तेव्हा बहुदा टॉस झालेला होता. भारताची पहिली बॅटींग एवढी पुसटशी बातमी मी पादचा-यांच्या तोंडून ऐकली आणि चला, घरी लवकर पोहोचतो आहोत, आणि पहिली बॅटींग, वाह, असं वाटलं. पुढच्या एक दोन गल्ल्यातून तर मी जणू काही उडतोच आहे की काय अशा थाटात बाईक हाणली आणि बिल्डींगच्या पार्किंगमध्ये लॅंड झालो. घड्याळात फक्त पावणेसहा वाजले होते. म्हणजे पंधरा मिनिटांत घरी तेसुध्दा संध्याकाळी, अहाहा काय सुखद अनुभव!

"चक देSSS इंडिया" --- शीळ घालतच जिने चढलो, जॅकेट काढलं आणि घरची किल्ली बाहेर काढण्यासाठी हात खिशात घातला. तत्क्षणी साधारण साताठ ठोके चुकले आणि आपण एक सुखद महामूर्ख आहोत याची खात्री पटली.

आज आम्ही घराची किल्ली ऑफिसमध्येच विसरून आलेलो होतो!!!

1 टिप्पणी:

TheKing म्हणाले...

Match pahili ki nahi mag?