मंगळवार, मे १६, २००६

गृहपाठ?

शाळेत असताना, घरचा अभ्यास केला नाही तर शिक्षा व्हायची; (पण तो "पूर्ण करुन आणा" असं दर वेळी सांगितलं जायचंच असं नाही). तरीसुध्दा सगळ्या वर्गासमोर असे धिंडवडे निघू नयेत याकडेच मग माझा कल असायचा.

अचानक "तू याचं उत्तर सांग" असा पुकारा झाल्यानंतर थोडा वेळ तंतरायची खरी; पण वेळ मारुन नेण्यापुरता हुषार नक्की असल्याने मी त्यातून लिलया सुटका करुन घ्यायचो.

मोठ्या लोकांना असा जबाब विचारत असतील का हो? असा प्रश्न मात्र मला पडायचा. कदाचित नसतील, असं हवं तसं उत्तर स्वतःला देऊन मग मी मोठा होण्याची वाट पाहायचो. आता बऱ्यापैकी मोठा झालो तरी असे बाके प्रसंग वेळोवेळी पडत असतातच. आणि वयोमानाप्रमाणे त्यातून वाट काढण्याचे मार्गही मोठे झाले असल्यामुळे त्याचं काही आता वाटत नाही. तरीही मग माझ्या बालमनाला प्रश्न पडतोच, हापीसातल्या साहेबाला अशा प्रसंगांतून जावं लागत असेल का? कदाचित नसेल असं समाधान करून मी आता वाट पाहतोय :-)

हे सगळं माझ्यासारख्या सामान्य (म्हणजे कोणीही कोकिळा ज्याच्यासाठी गायली नाही-अशा-) माणसाचं झालं.
आज ही बातमी वाचल्यानंतर पुन्हा सुस्कारा सोडला. म्हणजे सरकार दरबारी मंत्री झालो तरी गृहापाठापासून सुटका नाही तर!

... आणि मग हळूच निश्वासही टाकला - अभ्यास न करताच काही हे लोक पेट्रोलचे दर वाढवणार नाहियेत तर. वा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: