बुधवार, डिसेंबर ०३, २००८

मी... शेतकरी!

फार म्हणजे फार जुनी काही गोष्ट नाही. आठवी-नववीत असेन तेव्हाची. मोठेपणी तुला काय व्हायचे आहे इत्यादी प्रश्नांचा ब-यापैकी अर्थ कळतो असं ते वय असावं. अर्थात प्रश्नाचा फक्त अर्थच कळतो, नेमकं उत्तर मात्र ठाऊक नसतं असं ते वय (म्हणजे अजुनही सापडलंय की नाही ते माहित नाही, असो); पण मुद्दा तो नाही. त्यावेळी तो प्रश्न कुणी seriously विचारला असता, तर माझं उत्तर अगदी तयार होतं --- शेतकरी!

अगदी पाचवी-सहावीत असल्यापासून शेतावर जाण्याच्या आठवणी अगदी पक्क्या आहेत. शनिवार किंवा रविवारी दुपारी, ढगाळ हवेत, किशोर कुमारच्या जुन्या गाण्याची कॅसेट गाडीत ऐकत किती तरी वेळा मी बाबांबरोबर आमच्या अंजनेरीजवळच्या शेतावर गेलो आहे. सगळीकडे भाताची हिरवी हिरवी शेतं, त्यांत डोक्यावर इरलं घेऊन राबणारे शेतकरी, बांधावर उगीच चार बाभळीची किंवा कडूनिंबाची झाडं, हात जरा वर केला तर हातात ढग येतील असं भरून आलेलं आकाश-- त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावर वर्षानुवर्षे हा सीन अगदी नेमानं, तसाच्या तसा घडत आलेला आहे. निसर्गाला याहून चांगलं स्क्रीप्ट अजून तरी सुचलेलं नाही! त्या वळणावळणाच्या रस्त्यावर महिरावणीजवळ दुथडी भरून वाहणारी नदी लागायची, एकेक करत ती छो्टी-छोटी हिरवी गावं मागे पडायची, आणि लांब समोर ढगांनी पांघरूण घातलेला त्र्यंबकचा डोंगर दिसायला लागायचा. डाव्या बाजूला नाणे संशोधन संस्थेची इमारत ओलांडून पुढे गेलं की लगेचच उजव्या बाजूला बेजे गावाकडे जाणारा रस्ता लागतो-- त्याच रस्त्यावर आमचं शेत!

अठरा एकरांवर पसरलेलं ते शेत म्हणजे "तीर्थ"क्षेत्रच होतं, म्हणजे फक्त पावसाळ्यात :-). एका बाजूला जुनी विहिर, त्यावर झुकलेलं चिंचेचं झाड-- पाणीपुरवठा समितीचा हा एकमेव asset! कालांतराने मग वरच्या अंगाला अजून एक विहिर खणली. विहिरीच्या बाजूनी भाताची सलग तीन-चार आवणं. वरच्या बाजूला टोमॅटोच्या रांगा (टोमॅटोला "तांबाडे" यापेक्षा सार्थ दुसरं नाव नाही मराठीत!) या सगळ्यांच्या सोबतीला शेडच्या जवळपास मग कुठे थोड्या मिरच्या, वालाचे वेल, थोडी पालेभाजी इत्यादी लागवड असे. प्रमुख उत्पादन म्हणजे भात आणि तांबाडेच. जागा, हवामान आणि उत्साह यांचा अंदाज घेऊन मग भूईमूग, उडीद आणि खुरासणी टाकली जायची. खुरासणी(किंवा कारळं)चं तेल काढतात. तेल काढून उरलेल्याची मग चटणी असायची. शेतावरच्या वालाची भाजी आणि एका पोळीत कारळ्याची चटणी मी अनंत वेळा डब्यात नेली आहे - विशिष्ट पदार्थ आणि स्थळांशी निगडीत अशा कितीतरी आठवणी घट्ट होतात - मजा आहे!

दिवाळी होऊन गेली, की 'निळी' भाताची आवणं पिवळी पडायला लागतात. आवणात अजूनही पाणी असेल आणि दाणा भरला असेल तर आवणाच्या बाजूला उभं राहून तो भाताचा सुगंध तासंतास अनुभवावा. "औंधा पाणी बराबर पडलं अन उतारा कसा बेस आलाय," याचा आनंद तिथे कसणा-या आमच्या संतूकाका आणि इतर मंडळींच्या डोळ्यांतून बघत रहावा. भाताच्या कापणीची आणि नंतर तो झोडपायची तयारी होते. वीस-वीस पंचवीस-पंचवीस मजूर रोजगारीवर बोलावले जातात. आवणा-आवणांतून पिवळं पडलेलं ते सोनं मग त्या छोट्या शेडच्या पुढ्यात आणून टाकलं जातं. झोडपून मग हिरव्या-पिवळ्या सालासकट तांदळाचा दाणा वेगळा केला जातो. हवेवर टाकून कचरा वेगळा होतो. बारदानात भरून एकामागून एक पोत्यांची गणना होते. अनपेक्षित पावसापासून संरक्षण म्हणून ती पोती आतल्या खोलीत आणि उरलेली ताडपत्री टाकून नीट रचून ठेवली जातात. काळ्या मातीत उगवलेलं ते सोनं अशा त-हेने तिजोरीत जमा होतं. भाताच्या उरलेल्या काड्यांचे व्यवस्थित ढिग करून ठेवले जातात. त्यावर पोरांचं खेळणं सुरू होतं - मनसोक्त खेळून झाल्यावर केसांत अडकलेली तुसं आणि अंगाला सुटलेली खाज या पोरांच्या तक्रारींकडे आया दुर्लक्ष करतात.

आमच्याच काय, आजूबाजूच्या सगळ्यांच शेतांत हे असंच नाट्य घडत असणार! वर्षानुवर्षं!

पावसाच्या पाण्यावर आणि क्रमेणं निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेली ही भातशेती प्रत्येक वर्षीच असं मोलाचं पीक देते असं होत नाही. अतिपाऊस किंवा दुष्काळाचा चटका कधी बसेल सांगता येत नाही. कधी रोग पडतो - कधी उंदीर भाताच्या मुळावर ताव मारतात - एक ना दोन - नैसर्गिक संकटं ही अशी पाचवीचीच पुजलेली. तांबाड्यांचही तसंच - उत्तम पीक आलं तर भाव कोसळणार - आणि पीक नाही म्हटल्यावर उत्तम भाव मिळत असूनही त्याचा काय उपयोग!

वर्षामागून वर्षं सरली - एका पावसाळ्यानंतर दुसरा येऊन गेला - अंजनेरीजवळ, बेजे गावाकडच्या वाटेशेजारी ही शेतजमीन तशीच्या तशी अजूनही उभी आहे. बैल जाऊन ट्रॅक्टर आले, डिझेल पंपाची जागा वीजेच्या मोटारींनी घेतली - भातानंतर रब्बीच्या गव्हाची पीकं घेणं सुरू झालं, लहान आंब्यांची कलमं मोठी झाली, डझनावारी आंबे येऊ लागले - कालांतराने मीही मोठा  झालो - माझं शेतकरी होण्याचं स्वप्नं तसंच राहिलं - आमचं शेतावरचं प्रेम काही आटलं नाही.

अलिकडे बाबांनी संतूकाकांना ते शेत विकलं. मात्र कितीही झालं तरी ते शेत मला "आपलंच" वाटत राहणार - आणि कदाचित शेतासाठीही मी आपलाच.

दहा वर्षांनंतर गेलो तरीही विहिरीवर वाकलेलं ते चिंचेचं झाड, "या साली पाणी काय बराबर नाय पडलं बा" म्हणून हळहळेल कदाचित; पण म्हणून काही सुगरण पक्षी त्याच्या खोप्याची जागा तिथून हलवणार नाही. "अजित तू आला -- थोडं आटवलेलं दूध घेऊन जा, वाल खुडायला सांगू का?" असं संतूकाका म्हणणार हे नक्की. "आता द्राक्ष लावतो, फक्त खाल्ल्या अंगाला भात करतो" अशा प्रगतीचा सार्थ अभिमान त्यांच्या डोळ्यांत चमकतांना दिसेल.

"अहो काय सांगू? शाळेत असताना शाळा सोडून मीही शेतीच करायचं ठरवलं होतं!" असं मी बोलून जाईन -- आणि माझ्याबरोबर हसता हसता एखादा थेंब त्यांच्या डोळ्यांत दिसेलही कदाचित. "आता करायची का? तांबाडे लावू या साली?" त्यांच्या या मनापासून विचारलेल्या प्रश्नाला मी फक्त स्मित करीन की दुसरं काही उत्तर देईन हे आत्ताच कसं सांगू?

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

surekh!!

Yogesh म्हणाले...

अजित, सुंदर.

खुरासणी हा शब्द वाचून मजा वाटली. हा शब्द मी पुण्यात वापरायचा प्रयत्न केला होता पण तो चालला नाही. कदाचित मी भेटलो त्या बऱ्याच लोकांना तो समजत नसे. त्यामानाने कारळं हा प्रचलित होता. आमच्याकडे त्या चटणीला सोरट्याची चटणीही म्हणतात. चांगले खरपूस भाजून ही चटणी केली की छान लागते. हा खास हिवाळ्याचा मेनू. जवस आणि खुरासणीची चटणी.

अनामित म्हणाले...

Mast, kasle ssssssahi lihiley. "Khurasani" ha khare tar khandeshatla shabd... "Punekar" "Mumbaikar"ana hya gramin kiva tatsam mool shabdanche vaavde aahe tyamule... aso. Majhi Aaaji(babanchi aai) Dhulyakadchi.. tyamule aamchya gharat khurasnichi chatni faar aavadine khalli jaate.. pan 94 madhe ti geli aani tashi aai la pan ti khurasani karavi vaatenashi jhali... khoop aathvani jagya jhalya aaji chya.... :) mast KHURASANI

Unknown म्हणाले...

साधा सुन्दर लेख. अनेकांच्या आयुष्यातील शेत आणि असे सन्तु काका यांची आठवण करून देणारा...माझ्या आठवणी एकदम दक्षिण टोका कडच्या कोल्हापुर कडच्या पण मातीशी नातं अणि इमान असलेली मानसं एक समान जीवनमूल्य घेवून जगताना अनुभवायला मिळतात...(पर-प्रांतीय सुद्धा! ) आज होमो सेपिएन्स च्या गर्दीत मानूस दुर्मिळ, अन असं स्वच्छ जीवनमूल्य आठवणीत आकसलेलं पण नाहीसं नाही होणार असंही मनाच्या त्या आकसलेल्या कप्यात वाटत असतं आणि हे ही खरं की जीवा-भावा ची मानसं भेटली की नवा हुरूप येतो भले ही तो e- हुरूप का असेना !