शनिवार, डिसेंबर ०१, २००७

बारश्याचं जेवण

(कोणाला नावं ठेवणे हा या लेखाचा उद्देश नाही. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये कसे मजेदार फरक असतात ते टीपण्याचा हा (उगाच) प्रयत्न)

गेल्या रविवारी एक बारसं ऍटेन्ड करण्याचा चान्स मिळाला. आमच्या ऑफिसमधला पक्का कन्नडिगा मित्र, त्याच्या मुलीचं बारसं. बंगलोरमधल्या कन्नडा हार्टलॅंड म्हणता येईल अशा लोकवस्तीतल्या एका छानशा देवळात हा बारशाचा समारंभ आयोजित केलेला. आम्ही "नॉर्थ इंडियन" मुलं-मुलं पत्ता शोधताना "ये किधर आयेगा" असं बिचा-या हिंदीत विचारीत होतो. शेवटी एकदा ते देऊळ सापडलं.

बारसं म्हटलं की एक पाळणा (ज्यात बाळ झोपलेलं असतं, एखाद दोन फिरणारी खेळणी त्यावर टांगलेली असतात तो, आणि स्वयंघोषित गानसरस्वती बायका मंडळी म्हणतात तोही) आला, "कोणी गोविंद घ्या - कुणी गोपाळ घ्या" आलं, कानात काहीतरी कुर्रर्र सांगणं आलं, आणि त्यानंतर स्नॅक्स इत्यादी, असा साधा सोपा प्रकार आपल्याकडे असतो. इथे तसलं काही नव्हतं. पोहोचलो तर आमचा मित्र एका होम-हवनाशेजारी बसून यज्ञ करत होता. गुरुजी/भटजी मंत्र सांगत होते. एका बाजूला नातेवाईक मंडळी गाण्याच्या भेंड्या खेळत होती. एकंदरीत मजा होती!

थोड्या वेळाने बाळाला प्रेझेन्ट देण्यासाठी रांग लागली. त्या भटजीबुवांच्या हातून गिफ्ट द्यायच्या होत्या. भटजीबुवा प्रत्येकाला नाव विचारून मग ती भेटवस्तू/पाकिट इ. यजमानांच्या स्वाधीन करत होते. मग मी आणलेलं ते सॉफ्ट टॉय त्या भटजीबुवांच्या खरखरीत हातांमार्फत त्या छोटीच्या नाजूक हातांमध्ये ठेवलं. आणि नाव काय ठेवलं असं विचारलं, तर मित्र म्हणाला, "अनु हेच्च!" आणि त्यानं त्या नावामागची कथाही ऐकवली. खरं नाव होतं अन्नपूर्णेश्वरीदेवी. पण ऑफिशियली, "अनु हेच्च" म्हणजे "अनु हरीतसा (गोत्राचं नाव)"! श्रुंगेरीजवळ अन्नपुर्णेश्वरीदेवीचं देऊळ आहे, तिथे हा दर वर्षी नेमानं जातो. त्या देवीच्या नावावरूनच त्यानं आपल्या मुलीचं हे नाव ठेवलेलं!

त्यानंतर यथासांग भोजनाचा कार्यक्रम झाला. अगदी पारंपारीक कानडी पद्धतीचं जेवण! भात, खीर, होळीगे रोटी (म्हणजे पुरणपोळी), असा उत्तम बेत होता. देवळाच्या त्या गाभा-यातच पंगती उठत होत्या.

बारशाला जाऊन आल्यावर छान वाटलं!

असो. बारसं या विषयावरचं एक कोडं सुचलं. ते घालतोय:
बळवंतरावांच्या घरी बारसं होतं. सगळी मंडळी जमलेली. उत्साहाचं वातावरण होतं, वगैरे वगैरे. छान फुगे बिगे, फुलांनी सजविलेल्या पाळण्यात बळवंतरावांचे चिरंजीव मात्र रडून रडून थैमानच घालत होते म्हणा ना! कुणी गोविंद घ्या- गोपाळ घ्या वगैरे झालं पण चिरंजीव काही रडू आवरेनात. बाळाचं नाव ठेवण्याची वेळ झाली. मातोश्रींनी बाळाच्या कानात कुर्रर्र वगैरे केलं आणि बाळाला त्याचं नावही सांगितलं. आणि अहो आश्चर्यम! बाळ रडायचं थांबलं आणि गालातल्या गालात मस्त हसू लागलं - अगदी फोटो काढावा असं हास्य!

कोडं असं आहे की बाळाचं नाव सांगा!

७ टिप्पण्या:

Raamya म्हणाले...

बहुतेक 'बेंबट्या'

सर्किट म्हणाले...

koDyaca uttar = RAHUL ... kyonki "naam to suna tha" :)

Nandan म्हणाले...

faarach ajaagaL uttar aahe, paN tari try karun pahto --
hasmukh?

Ajit म्हणाले...

चांगले प्रयत्न!!

नंदन, "फारच" अजागळ असं कुठलंच उत्तर नसतं, तुझा प्रयत्न माझ्या उत्तराच्या ब-यापैकी जवळ जात असल्यामुळे मी तुला ०.८८९८९३३१८८४७००९३१/१ गुण बहाल करतो आहे. आणखी वाढवून मागू नकोस, काय!

माझं उत्तर अगदी सोप्पं होतं: बाळाचं नाव ठेवलं होतं "विनोद" (आईने बाळाच्या कानात विनोद सांगितला ;-))

नावांच्या बाबतीत सांगायचं तर माझ्या एका चुलत बहिणीने तिच्या मुलीचं नाव "ओवी" असं ठेवलं. इतर नातेवाईकांशी गप्पा मारताना सगळ्यांचं म्हणणं पडलं, "ईईईई, "ओवी" हे कसलं काय नाव!!!" मी म्हणालो, "तुमचा आक्षेप रास्त आहे. मुलगा झाला असता तर काय "ओवा" नाव ठेवलं असतं का? नाही ना? :-)"

Yogesh म्हणाले...

ova cha joke bhannat.

btw majhi adhichi comment disat kashi nahi?

madhuri म्हणाले...

Liked your blog. (-:

TheKing म्हणाले...

Aata tuza naav Ajit aahe, mhanoon ka tu haar na manata, PJ martos ka? :-)