मंगळवार, मे २९, २००७

आम्ही करायचं तरी काय?

सचिन तेंडूलकरबद्दल मला आताशा सहानुभूती वाटते.

काही वर्षांपूर्वी मनापासून आदर वाटायचा, आता सहानुभूती वाटते. म्हणजे, कसंही खेळा, तो चर्चेत आहेच. शून्यावर बाद झाला तर टीका, शतकांमागून शतकं काढून भारताला अंतिम फेरीत पोहोचवले खरे, पण सर्वांत महत्त्वाच्या त्या सामन्यात अपयशी ठरला म्हणून टीका; बरेच दिवस धावा जमल्या नाहीत म्हणून टीका; आणि आता सलग दोन कसोटींमध्ये शतकं ठोकली - पण ती बांग्लादेशसारख्या कमकुवत संघाविरुध्द आणि तीही कासवाच्या गतीने; म्हणूनही शेवटी टीकाच!

अर्थात या बाबतीत मला टीका करायची नाहिये असं नाही; खरं सांगायचं तर मला तसं काही मतच नाहीये. आणि म्हणूनच मला सचिन तेंडूलकरबद्दल सहानुभूती वाटतेय.

त्यानं करायचं काय सांगा!

असो. सचिन तेंडूलकरचं सोडा. आपल्यासारख्या, नको - माझ्यासारख्या सामान्याने नक्की काय करावं असा अनेकदा प्रश्न पडतो. क्रिकेट विश्वचषक सोडा, अगदी रोजच्या धकाधकीच्या 'जीवनात' मी करायचं तरी काय? हाच तो प्रश्न.

चहा प्यावा की कॉफी? एक संशोधक सांगतो चहामध्ये औषधी गुण आहेत, तर दुसरा लगेच म्हणतो की चहा ह्रुदयासाठी वाईट. कॉफी जास्त पिऊ नका; बध्दकोष्ठता (म्हणजे नेमकं काय ते देव जाणे) वाढते म्हणे. दूधाच्या बाबतीतही असेच परस्परविरोधी सल्ले ऐकू येतात.

दारू आणि मांसाहार या नॉनव्हेज बाबतींत तर इतके परस्परविरोधी सल्ले मिळतात की काही विचारायलाच नको.

कुठेतरी जायचं असेल तर बसने जावं की पायी? एक सल्लेखोर (हा माझा पेटंट शब्द आहे) म्हणणार बस कशाला? पायी जा; तेवढं पेट्रोल वाचवलं तर ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल. दुसरा म्हणणार; कसला कंजूष आहे बघा, पटकन बस-रीक्षा करून जायचं ते नाही! उगाच व्यायामाचं कारण कशाला दाखवा, पैसे वाचवायचे आहेत असं सरळ सांगा की!

लहानपणी, ऐकावं की दंगा करू नको; आणि दंगा केला नाही तर; उगाच कसला मोठ्या माणसासारखा आव आणतंय बघा कार्टं!

शुध्द मराठीचा वापर करावा तर आपण 'गणू' किंवा 'बाळू' ठरणार. जरा इंग्रजीचे प्रयोग करून पाहिले तर, "मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचं भविष्य धोक्यात आहे रे बाबा!" असे टोमणे.

ऑफिसमध्ये नवी जबाबदारी द्या म्हणालो तर ते पॉलिटिकली करेक्ट ठरत नाही - दुस-याच्या कामात नाक खुपसलेलं बॉसला आवडत नाही. बरं, दुस-याची जबाबदारी मला देऊ नका म्हणालो तर पुढच्या प्रगतीपुस्तकात ती एक ठळक उणीव म्हणून दिसणार.

रागावर संयम ठेवावा तर काही विद्रोही प्रवृत्तीच्या लोकांना तो भ्याडपणा वाटणार; रागवावे तर तो सहा शत्रुंपैकी एक म्हणून सतत छळत राहणार.

शिस्त पाळावी तर "अरे बिन्धास्त राहण्यात काय मजा आहे हे तुझ्यासारख्या शिस्तप्रिय माणसाला काय कळणार, छ्या! जाऊदे" असं ऐकायला मिळणार. तर कधी शिस्त मोडली तर, "काय हे, तुझ्याकडून तर हे मला कधीच अपेक्षित नव्हतं" अशा प्रतिक्रिया!

उधळपट्टी करावी तर "बचत म्हणजे कशाशी खातात कळणार नाही बुवा याला कधीच"! आणि मला "पराक्रम" केला असं वाटायला लावणारी बचत केली तर ती १००% कंजूषी ठरणार.

खाईन तर तुपाशी... असा पवित्रा घेतला तर म्हणणार की अरे प्राप्त परीस्थितीत जे आहे त्याचाच स्वीकार केला पाहिजे. आणि आहे ते तसंच मान्य केलं; तर अल्पसंतोषी अल्पसंतोषी असा गलका होणार. नक्कीच!


पण असो. आयुष्यातल्या अशा विरोधाभासांमध्ये, तर खरी मजा आहे. आणि पुढ्यात इतके सारे विकल्प आहेत; हेही नसे थोडके.

माझ्यासारख्याला इतके प्रश्न पडतात तर सचिन तेंडूलकरचं तर काय विचारता!
"पूल करायला हवा होता" "पूल कसला करताय? स्क्वेअरकट करायचा बॉल तो."

"आता रनरेट वाढवायला हवा." "हं. आणि आऊट झाला म्हणजे? गडगडणार ना सगळी टीम?. टीकून खेळायला पाहिजे मी सांगतो"

"बाउंन्सरला घाबरतोय आताशा सचिन. वय झालं हो" "गेली वीस वर्षं खो-यानं धावा जमवल्यात आमच्या सचिननं. बाउन्सरला लहानपणीसुध्दा घाबरला नव्हता; आत कसला घाबरतोय?"

"सचिननं आता क्रिकेटला रामराम ठोकायला पाहिजे." "काहीही काय? अजून पाच वर्षं नक्की खेळणार सचिन."
असे एक नाही तर हजारो सल्ले. त्यानं करावं तरी काय?

कोण्या एका शहाण्या माणसाने एक फार मोलाची म्हण मराठी भाषेला प्रदान केली आहे, ती म्हणजे, "ऐकावे जनाचे, करावे मनाचे". मी असंच करतो. जनाचे ऐकून शेवटी मनाचेच करतो. सचिन तेंडूलकरच्या बाबतीतही माझे असेच मत आहे. त्यानेही या सगळ्या जनांचे ऐकावे, पण शेवटी करावे ते माझ्या मनाचेच!

आणि ते म्हणजे चांगली सहा सात शतके ठोकून नंतर दिमाखात निवृत्त व्हावे!

६ टिप्पण्या:

अनु म्हणाले...

Hmm.
Mala pan he prashna satavtat.
Probably experience reduces the dilemma, I feel.

Yogesh म्हणाले...

sachinala chhota karaycha media prayatna karatay asa vatata.

Anand Sarolkar म्हणाले...

A very good post!

Ha prashn uttaracha khel kadhi sampatach nahi.

Ajit म्हणाले...

Yogesh,
सचिनला (वयाने) छोटा करण्याचा मिडियाचा प्रयत्न सफल झाला तर चांगलेच, काय?

अनामित म्हणाले...

aashi Sachinvar tika hi honarach.. tya shivay media valyanchi pot kashi bharnar.
post chan ahe.. apan kayamach confused asato. kasehi vagale tari lok kahi tari bolnarach.. tyamulech "aaikave janache ani karave manache"... pan nehmich he shakya hot nahi :(

- Sagar

प्रशांत म्हणाले...

तुमच्या ब्लॉगवरील लेख आवडले. शुभेच्छा आणि अभिनंदन.
-प्रशांत