बुधवार, जून १३, २००७

माझा नावडता ऋतू

भारत देशात तीनच ऋतू असतात. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. त्यापैकी माझा सगळ्यात नावडता ऋतू म्हणजे पावसाळा. हा ऋतू नेमेचि येतो. बाकीचे नेमेचि येतातच असे नाही असे म्हणतात.

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाळा मला भंडावून सोडतो. जूनच्या सुरुवातीला ईशान्य, नैऋत्य, वायव्य आणि आग्नेय या अगम्य दिशांपैकी कुठल्यातरी एका दिशेने मोसमी वारे दर वर्षी आपल्याकडे चाल करून येतात आणि चार महिने धुमाकूळ घालतात. मोसमी चटर्जी नावाची एक नटी होऊन गेली की आहे. आधी हा गडी दगडी चाळीत दडी मारून बसतो. आपण "हरलो बुवा" असं म्हटलं की मगच तो येतो. मग सुरुवातीला पावसाबरोबर विजांचेही तांडव आपल्याला बघायला मिळते. मला विजांची खूप भीती वाटते. (घरात वीज गेली तरी भीती वाटते, आली तर विचारूच नका). पाऊस पडायच्या आधी खूप सारे नखरे करून घेतो. वादळी वारे आणून घरातली रद्दी बाहेर आणि बाहेरची धूळ आत असे पसारे करून ठेवतो, ते मलाच आवरावे लागतात. पावसाळा आपल्याबरोबर नाजूक पंखांचे असंख्य किडे घेऊन येतो (आणि परत मात्र घेऊन जात नाही). त्या किड्यांना माझ्या शर्टापासून दूर ठेवण्यासाठी मला ट्यूबलाईट बंद करून बसावे लागते. अंधारात त्या किड्यांना मी दिसत नाही.

दिवस रात्र पावसाने जोर धरला की माझे (धुतलेले) कपडे वाळत नाहीत. त्याचबरोबर सर्वत्र गवत माजते आणि बेडकांच्या ड्र-काळ्यांनी माझी झोप उडाल्यासारखी होते. मला बेडूक उड्या मारता येतात. माझ्या चपला त्यांच्याबरोबर बाहेरचा चिखल घरात घेऊन येतात आणि राडा करतात. नको त्या गोष्टी घरात घेऊन येणं त्यांना बरोबर जमतं. अति पावसामुळे नदी-नाले, झरे-ओढे, तलाव-तळी, बाथरूम-बेसीन इ. मधील पाण्याची पातळी वाढते. धरणांना पाण्याचे ओझे सहन न झाल्यामुळे ते आपले बांध फोडतात आणि पाण्याला वाट मोकळी करून देतात. नद्यांबरोबर साहित्यिकांच्या प्रतिभेलाही पूर आल्यासारखे होते आणि वेगवेगळ्या प्रमाणात पाणी घालून कमी-अधिक लांबीच्या कवितांचे पेव फुटते. कावळ्यांसाठी आणि कुत्र्यांसाठी निसर्ग छत्र्यांची व्यवस्था करतो. मात्र दर वर्षी किती छत्र्या हव्यात याचा अंदाज कसा चुकतो ते कळत नाही. आकार मोठा करण्याऐवजी जास्त संख्येत छत्र्या केल्या तर त्या पुरतील असा त्याचा समज असावा. दर वर्षी नेमाने माझी मात्र छत्री हरवते आणि छत्रीवीण पोरका मी छत्र शोधत, भिजत वाट काढतो. रस्त्यावर सर्वत्र चिखल होतो, तो हळूच माझ्या मोज्यांमध्ये शिरला की जीव नकोसा होतो.

जेव्हा हवा तेव्हा पाऊस कधीच येत नाही. तो फार मानी आहे. त्या मानाने उन्हाळा किंवा हिवाळा चांगली शिस्त पाळतात. पाऊस हवा असेल तर पावसाला पैसा देऊ करावा लागतो. खोटा पैसा दिला तर मोठा पाऊस येतो असा एक सार्वत्रिक समज आहे. असा मोठा पाऊस आल्यावर बाहेर ठेवलेली मडकी, माठ, मालमोटारी, पाणी इ. वाहून जातात. म्हणून मी मडकी आधी घरात आणून ठेवतो. पाऊस यायच्या आधीच दूरदर्शन आणि रेडिओवाले पावसाच्या गाण्यांचा पाऊस पाडून घेतात. घनन घनन पासून पाSSऊSSस पहिला जणू सानुला पर्यंत, अबके सावन ऐसे बरसे पासून श्रावणात घननीळा बरसला पर्यंत (हो, टीप-टीप बरसा पण), सगळी गाणी तीनदा ऐकवून झाल्याखेरीज त्यांची तहान भागत नसावी. चातक नावाचा पक्षी म्हणे फक्त पावसाचंच पाणी पितो. म्हणजे बाकी वर्षभर त्याला निर्जळी उपास घडत असणार. पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येतं. (म्हणजे, इतर वेळी पाणी येत नाही).

असा हा पाऊस काही लोकोपयोगी गोष्टीसुध्दा करतो. भारत हा शेतीपरधान देश आहे. शेतीला पाणी पुरवण्याचे काम मुख्यतः पाऊस करतो. हे काम तो मोबदला न घेत करत असल्याने त्याची मनमानी शेतकरी सहन करतो. खरीप पिकांची लागवड पाऊस आल्यानंतरच होते. भाताला दुप्पट पाणी लागते - पाऊस ते देतो. नदीच्या पाण्याची अडवणूक करून आपण आपल्या पोटापाण्याची सोय करतो. त्या नद्यांना पाणी हा पाऊसच पुरवतो. त्या पाण्याचे बिल मात्र आपण सरकारचे खाती भरतो. उन्हाळ्यात झाडे, इमारती, जुन्या मोडक्या मोटारी, उघडेबोडके डोंगर यांच्यावर प्रचंड प्रमाणात धूळ साचते. ती अंतराळातून येत असावी. त्या सगळ्यांन स्वच्छ आंघोळ घालण्याचे काम पाऊस करतो. लक्स साबण त्याला आवडतो. मला आवडत नाही. त्याचबरोबर, सहा महिने झोपलेल्या बेडकांना (ज्यांना खूप भूक लागलेली असते) उठवण्याचा उदीम पाऊस करतो. पाऊस स्वतःबरोबर हिरवी शाल घेऊन येतो आणि ती निसर्गावर पांघरतो. दर वर्षी नवी शाल अशा तर्हेने निसर्गाला (फुकटात) मिळत असते. अशा प्रकारे पाऊस आपल्या सर्वांच्या उपयोगासही सरसकट धावून येतो. शिवाय हवामानखात्याशी अंदाजपंचे लपाछपी खेळून तिथल्या वैज्ञानिकांना सतत बिझी ठेवण्याचे उद्योग तो करतो.

असे सगळे असले तरी पाऊस माझा नावडता ऋतू आहे. कारण---
- मला बाहेर जायचे असले की तो (धड)पडतो.
- मी ऑफिसला पोहोचलो की त्याची शिफ्ट संपते आणि उन्हाची सुरू होते. मला तसेच ओले बसावे लागते. थोड्या वेळाने खुर्ची ओली होते आणि लोकांचे गैरसमज होतात.
-लहानपणापासूनच माझा हा नावडत ऋतू आहे कारण पावसाळा सुरू झाला की शाळाही उघडायची. बरे एवढाही तो पडायचा नाही की शाळेभोवती तळे साचावे!
-कुठे ना कुठे चिखलात माझा पाय फसतो आणि नवे बूट खराब होतात. या चिखलास कारणीभूत असतो तो पाऊस!
- पावसाच्या कवितांचा शिडकावा होत नाही -- मारा होतो. अक्षरशः गड-बुडून जायला होते.
- दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुराचे पाणी आमच्या घरात शिरले होते. तेव्हा पाण्याबरोबर तो जे काही घेऊन आला (आणि जे काही घेऊन गेला) त्याच्या आठवणींनी आजही माझ्या रेनकोटवर काटा उभा राहतो.
- पावसाळ्यात मला सर्दी होते. सर्दीवर अजून कुठलेच औषध सापडलेले नाही. सर्दी मला आवडत नाही. विशेषतः नाक चोंदले की तोंडाने श्वास घ्यावा लागतो. ते आवडत नाही.
- पावसाळ्यात मासेमारी बंद होते आणि चांगला फिश मिळत नाही खायला.
- पावसाळ्यात सारखे सारखे जायला लागते. असो.
- अशी अनेक कारणे


************
पावसाळा माझा नावडता कसा हे जसे मी आपल्याला पटवून दिले तसेच पावसाळा माझा आवडता कसा हेही पटवून देऊ शकतो. त्यामुळे वरील मतांमुळे माझ्याबद्दल कुठलेच मत करून घेऊ नका. पावसासारखा मीही हुलकावणी देण्यात पटाईत आहे. मैने भी बहुत पावसाळे देखे है म्हटलं!

१० टिप्पण्या:

Bhagyashree म्हणाले...

khup bhari lihlay !! lol....

Dhananjay म्हणाले...

Hey.. good article... shaletyala nibandhachi athavan jhali :)

Yogesh म्हणाले...

khi khi khi :))

Harshad म्हणाले...

Jabardast! aapun to fyan ho gaya aapka..

Milind म्हणाले...

- दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुराचे पाणी आमच्या घरात शिरले होते. तेव्हा पाण्याबरोबर तो जे काही घेऊन आला (आणि जे काही घेऊन गेला)

-या नंतर 'कणा' ही कविता म्हटली होती का? :)

Sagar म्हणाले...

Good one!! Thoda "Gaay" chya lines var ahe... pan aagadi thodach.. pavasal changala kasa asato ase baryacha janani lihale ahe ("shravanmasi harshmanasi" vagere :) ) pan vait kasa asato he chan lihale ahes tu..

Ajit म्हणाले...

Thanks, sarvanchyaa abhipraayaasaaThi!

Anand Sarolkar म्हणाले...

Hahaha...jhakas!

bheeshoom म्हणाले...

मस्तच लिहिलेय! वाचताना कुठेतरी अस॑ जाणवल॑ की, तुम्हाला पाऊस आवडतो सुध्दा!

सहीच आहे! लगे रहो!

अनामित म्हणाले...

sundar lekh ahe!
arti kulkarni.