गुरुवार, मे १०, २००७

बंगलोरी उन्हाळा

दुपारची वेळ. बेंगलोरच्या मानानं रणरणतं ऊन - 'मी' म्हणणारं. त्यातून तापलेले रस्ते आणि धूर ओकणारी वाहनांची अनंत गर्दी. काही कामानिमित्त पायीच बाहेर पडलो होतो. सवयीप्रमाणं डोक्यास टोपी घालण्यास विसरलेलो. त्यातून रीक्षा नावाच्या तीन चाकांच्या उपद्रवी वाहनांचे भोंगे ठणठणत होते. धूळ उडत होती, आधीच रुक्ष असणारा तो रस्ता आणखीच रुक्ष वाटत होता. झाडंही आकाशाकडे डोळे लावून होती- कधी एकदा संध्याकाळ होते ती! वातावरणाचा एकूणच पारा चढलेला...

एकंदरीत काय, तर चढतं ऊन पार अगदी डोक्यात गेलेलं होतं.

तेवढ्यात बाजूनं एक सायकलवाला गेला. त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या त्या अवताराचा आणि त्याच्या नोकरीचा अगदी पूर्ण हेवा वाटून गेला. आमची पडली किबोर्डं बडविणेची नोकरी; त्यात दुसऱ्यांनी तयार केलेली आव्हानं निस्तरायची (हो, आणि कधीकधी दुसऱ्यांसाठी कामं वाढवूनही ठेवायची!). क्वचितच कुणाला आमच्या नोकरीचा हेवा वाटणार. मात्र त्या दिवशी मला आपण अगदी 'हे' असल्यासारखं वाटलं.

पूर्वी एकदा असंच म्हणालो होतो, (तेव्हा 'कडक' हिवाळा होता), या कोळसे वापरणाऱ्या इस्त्रीवाल्याची काय मजा आहे ना! पण क्षणार्धात कुणीतरी जागं केलं, हो आणि उन्हाळ्यातली मजा तर विचारूच नकोस!

तर मुद्दा असा की अस्मादिकांस त्या सायकलीवरून जाणाऱ्या व्यक्तीचा फार हेवा वाटला. का? अहो तो भर उन्हाळ्यात, दुपारच्या उन्हांत बर्फाच्या फॅक्टरीतून (नाव नक्की "हिमालय आईस फॅक्टरी" असणार!) कुणाकडे तरी बर्फाची लादी डिलिव्हर करत होता.

अहाहा! काय 'कूल' जॉब नाही?

1 टिप्पणी:

Anand Sarolkar म्हणाले...

Grass is always greener on the other side;)