शनिवार, एप्रिल ०७, २००७

मराठी!

एक 'काळ' असा होता की पुरे आता भाषणं असं होऊन जायचं. सांस्कृतिक कार्यक्रमांचा बक्षिस समारंभ, क्रिडामहोत्सवाचे पारितोषिक वितरण, संस्थापक दिवस, एक नाही तर दोन - शाळेत असताना "भाषण ऐकायला येतोस का?" या प्रश्नाचे उत्तर केवळ नकारार्थी नसायचं तर त्याबरोबर तोंड वाकडंही केलं जायचं.

शाळा सोडली, उच्च विद्याविभूषित झालो (आणि हो एकदा तर मलाच भाषण करावे लागते की काय अशीही वेळ आली होती..), आणि त्याचबरोबर भाषण ऐकण्याची सवय गेली. आता तर इच्छा असूनही संधी मिळत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर या वर्षी गुढीपाडव्याला मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष श्री. अरूण साधू यांचे भाषण ऐकायची संधी चालून आली. त्या भाषणाचा हा आढावा:

मराठी भाषेची सद्य 'अवस्था कशी आहे आणि तिचे भवितव्य काय असा साधारणतः भाषणाचा विषय होता. मराठी लोकांचे मराठीवरचे प्रेम ओसरते आहे का? तिचा वापर करायला लोक कचरत आहेत की काय? असे प्रश्न पुढे आले. मराठी भाषिकांच्या वाचन-सवयींचे काय? पूर्वीपेक्षा आता मराठी वाचन कमी होतेय असा ओरडा आहे. पूर्वी पुस्तकांच्या हजार प्रती मोठ्या मुष्किलिनं खपायच्या. क्वचितच पुनर्मुद्रण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय व्हायचे. आजच्या परीस्थितीवर नजर टाकल्यास, याच्या उलट परीस्थिती दिसेल. दहा हजार प्रतीही खपताहेत हातोहात! अर्थात लोकसंख्यावाढ आणि शैक्षणिक प्रगती यांचा त्यास हातभार आहेच. त्याचबरोबर वाचकांच्या आवडीनिवडीही बदलल्या असणार. दुर्दैवाने वाचनालयांतून देवाण-घेवाण होणाऱ्या पुस्तकांच्या संदर्भात सखोल अभ्यास झालेला नाही. कुठला वयोगट कुठल्या लेखकांची, कुठल्या विषयांवरची पुस्तके वाचतो, कथा-कादंबऱ्यांच्या विषयांचा त्या वाचल्या जाणाऱ्या गावांशी-शहरांशी काही संबंध आहे का? इत्यादी, भाषेच्या आरोग्याबद्द्ल मोलाची सूचना देणारी माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही-- त्यामुळे, मराठीची तब्येत खरोखरच बिघडते आहे का त्याचे निदान कसे करणार?

दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला--- लिखित माध्यमांची भाषा आणि रोज वापरली जाणारी, बोलीभाषा यांच्यातले अंतर वाढत चालले आहे. कथा-कादंबऱ्यांमधून वाचतो ती भाषा आणि बाजारात-दुकानांत-कॉलेजांमध्ये वापरली जाणारी व्यावहारीक मराठी यांच्यात नक्कीच तफावत आहे. त्यात वाईट वाटून घेण्यासारखे मात्र काही नाही.

मराठी भाषा बदलते आहे - नव्हे, जगातील सगळ्याच भाषा बदलत आहेत. वेगाने बदलणाऱया जगात जर तुमची भाषा लवचिक नसेल, सुसंगत, योग्य बदलास पोषक नसेल तर तिचे टीकून राहणे कठीण. "महापूरे वृक्ष जाती, तिथे ..."असे म्हटलेलेच आहे. मराठी ही एक लवचिक भाषा आहे. त्यामुळे ती हा योग्य बदल स्वीकारून टीकून राहिलच, एवढेच नव्हे तर एका प्रगत भाषेचा दर्जा प्राप्त करेल.

केवळ पुस्तकी भाषेला चिकटून राहिलो तर काही खरं नाही. उदाहरणादाखल ज्ञानेश्वरी घ्या -- ती भाषा मराठीच आहे; परंतु समजायला महा-अवघड. तळटीपा आणि संदर्भांचा आधार न घेता ओव्यांचा अर्थ समजणे जवळजवळ अशक्यच! ज्ञानेश्वरी सोडा, तुकारामाचे अभंगही आता कठीण वाटतात की नाही? हे सगळे असे झाले यास कारण म्हणजे भाषा बदलली. सोळाव्या शतकापासून आतापर्यंत हा बदल सुरूच आहे. बदलाची गती मात्र आताच्या वेगवान जीवनमानाला साजेशी-- अतिजलद बनली आहे. बहुभाषिक समाज, राजकीय-आर्थिक घडामोडी, आधुनिक तंत्रज्ञान यांचं प्रतिबिंब केवळ मराठीच नव्हे तर जगातील इंग्लिशसकट सगळ्या भाषांवर पडते आहे.

संस्कृती आणि भाषा यांचं नातं अतूट आहे, या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरकच होत. केवळ संस्कृती किंवा केवळ भाषा माणसाला घडवते असं मात्र नाही. आजूबाजूची सामाजिक परीस्थिती, संपर्कात येणारे लोकविशेष, अनुभवही माणसाला घडवत असतात. जर भाषा या सगळ्यांना व्यक्त करू शकली नाही, सामावून घेऊ शकली नाही तर त्या भाषेचे अस्तित्त्व धोक्यात येईल. आणि म्हणूनच, बदलत्या समाजास अनुकूल असे भाषेने बदलायला हवे. ज्ञानाची नवी क्षितिजे खुणावतात तेव्हा भाषा त्या क्षितिजासारखी रुंदावते - 'परकी' भाषेतल्या पाहुण्यानाही आपल्यात सामावून घेते. भाषेस आत्ता-आत्तापर्यंत नवखे असणारे तंत्रज्ञान मग तिचे आपले होऊन जाते. यास भाषेचा ऱ्हास म्हणायचा का? नव्हे, हा तर भाषेचा विस्तार. हा विस्तार, अर्थातच कुठल्याही निरोगी वाढीसारखा, मर्यादेत, योग्य-अयोग्यतेच्या कसोट्यांवर लागू पडत, सुसंगत अशा पध्दतीने व्हायला हवा. तेव्हाच ती बदललेली भाषा बदललेल्या समाजास 'आपली' वाटेल आणि समाजाबरोबरच प्रगती करेल.
---
श्री. अरूण साधूंच्या भाषणातून मी जे काही टीपून घेतले ते मांडण्याचा हा प्रयत्न.

मराठी भाषेचा दर्जा खालावतो आहे का? याचे सकारात्मक किंवा नकारात्मक उत्तर जरी या भाषणातून मिळाले नसले; तरी आपण सावध असायला हवे याची सूचक जाणीव त्यांनी नक्कीच करून दिली. भाषण ऐकून एक प्रकारचा विश्वास मात्र नक्की गवसला.

"पूर्वीची मराठी राहीली नाही आता," असे (रड)गाणे तर सदैव सुरूच राहणार - पण मी म्हणतो, पूर्वीचा समाज तरी कुठे पूर्वीसारखा राहिलाय आता? मग भाषा - जे समाजाचे सच्चे प्रतिबिंब आहे, ते तरी पूर्वीसाखे का म्हणून रहावे?

लवचिक रहाल तर वाचाल (आणि वाचाल तर वाचाल - ते तर आहेच) हाही योग्य संदेश मिळाला. "मला मराठीचा गर्व आहे," असे म्हणून बदल स्वीकारला नाही तर कदाचित महापूरातील वृक्षासारखी मराठीची अवस्था होईल, कदाचित होणार देखील नाही. पण म्हणून गर्व कशाचा असू नये. गर्वाचे घर खाली म्हणतात ते बरोबरच आहे. मात्र त्यापेक्षा, "मला मराठीचा अभिमान आहे (आणि हो, काळजी आहे, काळजी वाटतेय असं नाही [आणि काळजी, चिंता नाही हं!])" असे म्हणून भाषेच्या बदलत्या स्वरुपाचा आस्वाद घ्यावा असे मला वाटते. काय?

२ टिप्पण्या:

Nandan म्हणाले...

जर भाषा या सगळ्यांना व्यक्त करू शकली नाही, सामावून घेऊ शकली नाही तर त्या भाषेचे अस्तित्त्व धोक्यात येईल. आणि म्हणूनच, बदलत्या समाजास अनुकूल असे भाषेने बदलायला हवे.
-- khare aahe. English ani Sanskrit/Latin kade pahile tar he mhaNane sahaj kaLoon yeil.

अनामित म्हणाले...

Saw your blog listed on Indibloggs and came here. Marathi blog pahum edkdam chaan vatle..marathi vachun ata barich varshe zali ani marathi bolaichi kitihi iccha zali tari ata bolaila suddha javalpaas kuni nahi. Sagle hindi/english madhye boltat. Mhane comfortable aahe and easy to understand :).

- Vrinda