मंगळवार, जून १३, २००६

राजपुत्राने दिलेल्या त्या मेजवानीत अचानक एक माणूस प्रकट झाला. अतिशय उमद्या अशा त्या राजपुत्राच्या सन्मानासाठी अनेक मातब्बर मंडळी जमलेली होती. अशा सगळ्या मंगल वातावरणात या केवळ एक डोळा असलेल्या माणसाचे आगमन फारच विसंगत वाटत होते. दुसऱ्या डोळ्याच्या खोबणीतून अजूनही रक्त वाहताना पाहून राजपुत्र म्हणाला, "अरे रे, अशी तुझी अवस्था कशी झाली?"

"राजन्, मी पेशानं एक चोर आहे, आणि आज अमावास्येची रात्र! असा हा मुहूर्त साधून मी सावकाराच्या घरी चोरी करायला गेलो. खिडकीतून आत शिरतो तोच मला जाणवलं की माझ्या हातून चूक झाली आहे. मी चुकून विणकराच्या घरात शिरलो होतो. त्या धावपळीत मी त्याच्या मागावर आदळलो आणि माझा एक डोळा हा असा निकामी झाला आहे. आणि आता मी तसाच आपल्याकडे न्याय मागण्यासाठी म्हणून आलो आहे, महाराज,"

राजपुत्राने ताबडतोब त्या विणकराला दरबारात घेऊन येण्याचा आदेश दिला. तो दरबारात उपस्थित होताच, त्या विणकराचा एक डोळा काढून घ्यावा असा आदेश दिला.

"राजन्, तुमचा न्याय मी योग्यच समजतो, माझा एक डोळा काढून घेतला जावा; पण हाय दुर्दैव! मला माझ्या कारगिरीसाठी दोन्ही डोळे आवश्यक आहेत. त्याशिवाय मी कापडाच्या दोन्ही बाजू कशा पाहू? माझा शेजारी आहे एक चांभार, ज्याचे दोन्ही डोळे आहेत, पण त्याच्या व्यवसायाला त्या दोन्हींची गरज नाही.

राजपुत्राने त्या चांभाराला बोलावून घेतले, आणि त्याचा एक डोळा काढून घेण्यात आला.

आणि त्याचबरोबर न्यायनिवाडा पूर्ण झालेला होता.
---

खलिल जिब्रानची ही एक रुपककथा. विचित्र आणि क्रूर अशी. केवळ ही कथा वाचून सगळं संपत नाही.
या कथेचं खरं रुप पुढे येतं ते तिच्या शीर्षकात. आणि शीर्षक आहे, "युध्द". खरं ना?

५ टिप्पण्या:

Nandan म्हणाले...

खरं आहे. या रुपककथेला बायबलमधील या वाक्याचा संदर्भ असू शकेल का?

Ajit म्हणाले...

हं. श्लेषाचा भाग सोडूयात...

महात्मा गांधी म्हणतात, "An eye for an eye and a tooth for a tooth and the whole world would soon be blind and toothless."

मला हेही १००% पटतंय!
---
अजून काही मुद्दे जाणवले का? १. राजपुत्राची मेजवानी अमावास्येच्या रात्री होती. २. अंधाराचा फायदा घेणाऱ्या चोराला आपला डोळा गमवावा लागला. इ.

Nandan म्हणाले...

ह्म्म्म. नव्हते जाणवले, आता तू सांगितल्यावर लक्षात आले. शीर्षक युद्ध का आहे, ते मात्र अजून नीट समजले नाही. बळी तो कान पिळी - दुर्बल कायमच भरडला जातो, किंवा युद्धाचा वैय्यर्थ (absurdity) असेच सुचवायचे आहे का त्याहून अधिक काही?

Ajit म्हणाले...

असं बघ (हे माझं interpretation आहे):
चोर = चुगलखोर, आगाऊ राष्ट्र
विणकर = अत्यंत diplomatic आणि आप-मतलबी राष्ट्र
चांभार = कोणाच्या अध्यात-ना-मध्यात असलेला (गरीब!) देश.

या कथेत एकूणच चोराचे उदात्तीकरण झालेले दिसते. विणकर (ज्याची तशीही काही चूक नाही) मात्र हुषार वाटतो. चांभार बिचारा या सगळ्या मूर्खपणाची शिकार ठरतो- खरा गुन्हा चोर आणि राजपुत्राचा असताना!

जिब्रानच्या कथा अवघड असतात, आणि प्रत्येक वेळा निराळा अर्थ समोर येताना दिसतो.

तुझ्या blog वर रुपककथांबद्दल लिही!

Nandan म्हणाले...

मी अमेरिका - इस्त्रायल - इराक/अफगाणिस्तान - सीरिया हे कुठल्या रोलमध्ये बसतात याचाच विचार करत होतो. रुपककथा वाचलेल्या नाहीत फारशा(मराठीतल्या / अनुवादित ) आणि संदर्भालासुद्धा इकडे तेवढ्या उपलब्ध नाहीत. जी. एं. वर लिहायचा विचार करत होतो, पण त्यांचे पण एकच पुस्तक वाचलंय. त्यामुळे सध्यातरी अवघड आहे लिहिणे.