शुक्रवार, एप्रिल १४, २००६

मराठी साहित्य आणि मी

नंदन (हा Internet जगात झालेला नवा मित्र!) च्या blog वर "मराठी साहित्याचा दर्जा" -- "उच्च प्रतीचे" साहित्य आणि "हीन दर्जाचे" लेखन यावरची चर्चा वाचून ही सगळी विचारमाला सुरू झाली. या विचारांमधल्या काहींना शब्दरुप देण्याचा हा प्रयत्न ---

"एक होता काऊ आणि एक होती चिऊ" या शेणा-मेणाच्या घराच्या गोष्टीपासून कदाचित माझा "साहित्य" प्रवास सुरु झाला असावा! शेवटी साहित्य साहित्य म्हणजे तरी काय? कल्पनेच्या विश्वात संचार करण्याचे एक माध्यम - तो प्रवास सुखकर करणारे ते "साहित्य". लहानपणी आई-बाबा-आजी-आजोबांनी हा प्रवास गोष्टींमधून सुरू करून दिलेला असतो. पुढे शालेय शिक्षणातून स्वतः लिखाण-वाचन करणे शिकल्यानंतर आपण स्वतंत्रपणे अशी साधने शोधायला लागतो. अशा वयात (आणि कदाचित पुढेसुध्दा) मासिके, वर्तमानपत्रे - जे काय वाट्टेल ते समोर येईल ते वाचून खाऊन टाकणे याचे व्यसन लागणं ही भाग्याचीच गोष्ट म्हणायची. सुरुवातीचा, जे समोर दिसेल ते खाऊन टाकण्याचा अधाशीपणा मग वयाप्रमाणे बदलत जातो. शाळेतल्या पाठ्यपुस्तकांमधले लेखक वाचून काढण्याचा सपाटा सुरु होतो. वाचनालयात अशा प्रत्येक लेखक-कवींची असंख्य पुस्तके सापडतात. मग हळूहळू कथा-कादंबऱ्या-लघुनिबंध-निबंध-वैचारीक अशी विभागणी व्हायला लागते. मित्रमंडळी आदींकडून पुस्तकांची देवघेव सुरु होते, आणि कधीमधी पुस्तकांवर चर्चासुध्दा. मला स्वतःला अशी चर्चा कधीच करता आली नाही. पुस्तकांच्या बाबतीत मी प्रचंड स्वार्थी होतो - आहे. पुस्तक वाचतानाचा आलेला अनुभव मी फक्त माझ्याकडेच जपून ठेवतो. किंबहुना, मला तो इतरांना योग्य पध्दतीने सांगता येत नाही -पुस्तक परीक्षण हे फक्त त्या पुस्तका"बद्दल" लिहिणं असतं. ते पुस्तक प्रत्यक्ष वाचताना आलेला अनुभव अशा परीक्षणांतून व्यक्त करणं अशक्यच आहे! तो प्रत्येकाने आपापल्या परीने लुटायला हवा.

तर, "एक होता काऊ आणि एक होती चिऊ" यापासून प्रत्येकाचा सुरू झालेला प्रवास हळूहळू विविध दिशांकडे जातो. वैयक्तिक आवडी-निवडी तयार होतात. त्याप्रमाणे निरनिराळे विषय हाताळले जातात. कविता-कथा-कादंबऱ्यांमध्येही आणखी वर्गीकरण केले जाते. शेवटी मग एक प्रकारचा समतोल साधला जातो. आणि तेच महत्त्वाचं!

माझ्या मते माझ्या या प्रवासात फार मोठा वाटा माझ्या शाळेचा आणि शाळेतल्या ग्रंथालयाचा आहे. माझ्या नशिबाने मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेच्या वाचनालयात (तेव्हाच) दहा हजार पुस्तके होती - आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे उत्तेजन देणारे शिक्षक! पाचवी ते दहावी या पाच वर्षांत मी प्रचंड पुस्तके वाचली. आणि शेवटी एक वेळ अशी आली की केवळ एक वाचक न उरता, मी स्वतः लिखाण करायला लागलो. ती वर्षे अशी होती, की निबंधाची वही आणि निबंध स्पर्धा यापलिकडे लिखाणाची फारशी संधी मिळायची नाही. पण तेवढ्यांत का होईना, मी माझी हौस भागवून घ्यायचो. मी जात्याच अबोल असा आहे, त्यामुळे वक्तृत्त्व स्पर्धा वगैरेंच्या वाटेला मी कधीच गेलो नाही; पण ते सारं उट्टं (!) मी निबंध-लेखनातून फेडायचो. पुढे Engineering शिक्षणाच्या काळात मी माझं लेखनप्रेम पत्रलेखनातून सुरू ठेवलं. त्यापलिकडे फारसं लेखन घडायचं नाही. पुढे नोकरी सुरू झाल्यानंतर डायरीत अनेकदा लिहायचो. पण खऱ्या अर्थाने व्यसनाधीन झालो; ते म्हणजे "blog" च्या उदयानंतर. माझ्या मते blog ही एकंदरीतच साहित्य जगाला मिळालेली दैवी देणगी आहे. प्रत्येकाच्या ठायी असलेला सुप्त लेखक-कवी जागा करण्याचं फार मोठं काम या माध्यमाने केलं आहे. आता "साहित्य" हा तसा जड शब्द फक्त ख्यातनाम लेखकांशी निगडीत उरला नाही. म्हणायचं तर आता प्रत्येक blogger (आणि हो, मीसुध्दा!) एक साहित्यिकच आहे!

आता पुढचा प्रश्न असा की मग त्यांत चांगला साहित्यिक कोण? किंवा blog वर प्रकाशित होणाऱ्या साहित्याचा "दर्जा" काय? साहित्याचा दर्जा ही "पुरणपोळीची चव" यासारखीच एक अभौतिक गोष्ट आहे. अर्थातच, सगळ्यांनाच पुरणपोळी आवडतेच असं कुठे आहे! माझ्या मते पुरणपोळी करून वाढण्याचा आईचा आनंद ती खाणाऱ्या मुलाच्या आनंदात सामावून जातो - अगदी तसंच; लिखाण करणाऱ्याचा आनंद, जर ते लिखाण वाचकाला आवडलं तर कित्येक पटींनी मोठा होत असतो...

आधीच सांगितल्याप्रमाणे साहित्याच्या बाबतीत मी बराच स्वर्थी आहे. मी वाचतो ते माझ्या आनंदासाठी. मी लिहितो ते मुख्यतः माझ्या आनंदासाठी. पुलंच्या कीर्तनकाराप्रमाणेच, ऐकायला कोणी आहे किंवा नाही याची पर्वा न करता मी लिहितो. यास उद्दामपणा/उर्मटपणा म्हणा हवं तर - पण आजच्या मितीस तरी हे असं आहे. आनंदाची बाब अशी की मित्रांना - वाचकांना ते बऱ्याचदा आवडतं आणि त्यातून लिहिण्यास मला प्रोत्साहनही मिळतं.

याच धर्तीवर, "साहित्याचा दर्जा" यावर भाष्य करताना मला वाटतं की लेखकाच्या दृष्टीने ही फार वेदनादायक चर्चा आहे. मान्य आहे की एकंदरीत समाजाच्या लेखी एखादं लिखाण अत्यंत हीन दर्जाचं ठरू शकतं. जर तो लेखक शहाणा असेल तर तो यास एक "चांगला" अभिप्राय मानून तो पुढे सुधारणा करेलही; परंतु सारखीसारखी अशी चर्चा करण्यात तरी काय हशील आहे? एकदा "दुय्यम दर्जाचा" असा शिक्का बसलेल्या लेखकाचं सगळंच लिखाण कायमच दुय्यम ठरावं का? 'र' ला 'र' ; 'ट' ला 'ट' लावून लिहिलेल्या कवितांमध्ये नेहमीच "काहीच" नसतं का? ती कविता लिहिताना मिळालेला आनंद वाचक कवीकडून अशा पध्दतीने जेव्हा हिरावून घेतो तेव्हा कवीला दुःख होणारच. ती निराशा- तो राग मग त्याच्या पुढच्या कामावर विपरीत परीणाम करणार इत्यादी इत्यादी. अर्थात, याचा अर्थ वाचकाने सतत असे "दुय्यम" साहित्य मान्य करावं असा नाही. परंतु लेखकाला योग्य संधी मिळायला हवी एवढेच.

पुरणपोळी अगोड झाली कधीतरी तरीसुध्दा आपण आईच्या हातची ती पोळी चवीने खातोच की - त्यातलंच हे झालं...

४ टिप्पण्या:

Sumedha म्हणाले...

वा! संदर लेख. बहुतेक ब्लॉगर्स मधे लपलेले "साहित्यिक" आणि "वाचक" यांचा प्रवास थोड्याफार फरकाने असाच झालेला असावा, माझा असाच झाला आहे.

या माध्यमाला त्रिवार मुजरा :-)

अनामित म्हणाले...

अजीत,

'स्वांत सुखाय' या न्यायाने लेखन आणि वाचन करण्याचा आपला विचार आवडला. अपेक्षांच्या दडपणाखाली अत्युत्तम रचना होणे हा तसाही दुर्मिळच योग असतो. त्यामुळे आपल्याला जे रूचेल ते लिहीत जावे. वाचकांना आवडले तर लिहीण्याचा आनंद हजारो पटींनी वाढतो. परंतु, एखादी रचना स्वतःला आवडली आणि वाचकांना आवडली नाही तरीही हरकत नाही. कारण, लिहीण्याच्या प्रयत्नातूनच साहित्यिक घडत असतो असे माझे नम्र मत आहे.

Nandan म्हणाले...

Ajit, lekh aavadla. Tu vyakt kelelya matanshi aani Sumedha, Shailesh yanchyashi sahmat aahe.

Ajit म्हणाले...

Shailesh, Sumedha aaNi Nanadan, Thanks!