मंगळवार, मार्च २८, २००६

डासबोध

(हा लेख माझ्याच या लेखावरुन)

बंगलोर (अ.न्यू.स.) आमचा खास वार्ताहर कळवतो की उद्यानांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगलोर शहराचे नागरीक सध्या डासांच्या उपद्रवाने हैराण आहेत. कित्येक दिवसांपासून महापालिकेत तक्रारी नोंदवूनसुद्धा काहिही परीणाम न झाल्याने डासांचे डसणे अधिकच त्रासदायक ठरते आहे. वास्तविक डासांमार्फत होणारा रोगांचा प्रसार हा बर्ड फ्ल्यूपेक्षा अधिक धोकादायक आहे (बंगलोरमधील डासांची संख्या कोंबड्यांच्या संख्येपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे). "त्यांचं (सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांचं) लक्ष बर्ड फ्ल्यूकडेच जास्त आहे, पण डास त्याहूनही जास्त धोकादायक आहेत," असं मत डॉ. एस. टी. सुब्बु (नाव बदललेले) यांनी व्यक्त केलं.

डासांच्या उपद्र्वाचा अजून एक फारसा प्रकाशात न आलेला परीणाम म्हणजे वीजेचा वाढलेला वापर. मोठ्या प्रमाणावर डासविरोधी उपकरणे (गूड नाईट इत्यादी) वापरल्यामुळे रात्रीच्या वीज वापरात वाढ झाल्याच्या बातमीस सरकारी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. वीजेची एकंदरीतच कमतरता आणि उन्हाळ्याचे दिवस या गोष्टी लक्षात घेता डासांचा उपद्रव रोखणे अधिकच गरजेचे झालेले आहे.

डासांची ही बेसुमार प्रजा-वाढ फक्त पाणथळ जागा आणि तळ्यांच्या आसपास झालेली नसून सर्वत्रच झालेली आढळून आली. "जिथे लोक तिथे डास," असा शेरा एका गृहिणीने मारला. वास्तवात, "जिथे रक्त तिथे डास," म्हणणे अधिक योग्य ठरले असते. "माझ्या ऑफिसमध्ये, ए.सी. मध्ये सुद्धा डास!" श्री. राजा यांनी तक्रार केली. श्री. राजा हे सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहेत. "तुम्हाला खरं वाटत नाही ना?" ते पुढे म्हणाले. वैद्यकीय खात्यात विचारणा केली असता, अधिकाऱ्यांनी, "आम्ही तक्रार नोंदवून घेतली आहे," असे जुजबी उत्तर दिले आणि त्याचबरो्बर वेळ आणि एक डासही मारून नेला. "पाहिलंत? आम्ही पावले उचलत आहोत. आत्ताच तुमच्यासमोर एक डास मारला! नाही?" पण बंगलोरला गरज आहे ती लक्षावधी डासांच्या कत्तलेची.

डासांच्या संख्येत एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची कारणे काय असावीत? काही कारणे सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहेत - शहराच्या ज्या भागात कचरा (वेळेवर) उचलला जात नाही तिथे डासांची वाढ ५०% जास्त झालेली दिसते. तसेच साचलेल्या डबक्याची संख्या ज्या भागात जास्त आहे, असे भाग या उपद्रवाने जास्त त्रस्त आहेत. परंतु एवढेच नव्हे तर शहरातील काही अत्यंत उच्चभ्रू वस्तीच्या भागांतही डास काही कमी नाहीत. "स्थलांतर!" असे कारण एका आघाडीच्या संशोधकाने दिले. डासांचे स्थलांतर या विषयात त्यांचा हात धरणारे कोणी नाही. (तेव्हा ते खरे असणार!)

डासांचा वाढता उपद्रव लक्षात घेता महापालिकेने काही फतवे आणि उपाय प्रकाशित केले आहेत. घराजवळ पाणी उघड्यावर साचू देऊ नका, इत्यादी इत्यादी. तसेच नागरीकांना पूर्ण बाह्यांचे कपडे परीधान करण्याची विनंती करण्यात येत आहे. विद्यार्थी समुदाय आणि सिनेमा नट्यांचा यास विरोध असला तरी डॉक्टर लोक यामागे ठामपणे उभे आहेत. सॉफ्टवेअर कंपन्यांना आपल्या कामगारांचे या संदर्भात बौधिक घेण्याचा सल्ला दिला गेला आहे. "आम्ही आगोदरच उपाय सुरू केले आहेत. आमच्या कॉल सेंटरचे काम रात्रीच असल्यामुळे डासांचा त्रास आम्हाला नेहमीच सतावतो," श्री मोहन यांनी सांगितले.

कठोर उपाययोजना कृतीखाली असली तरी आजची परीस्थिती काही फारशी चांगली नाही. जोपर्यंत सगळ्या योजना अमलात येत नाहीत तोपर्यंत बंगलोरकरांना सुखाची झोप मिळणार नाही असे दिसते आहे. निदान विद्यार्थी वर्ग आणि सिनेमा नट्यांना तरी नक्कीच नाही.

२ टिप्पण्या:

Vishal K म्हणाले...

छान लेख (बातमी) आहे. अ.न्यू.स.चे वार्ताहर फक्त बेंगलूरमध्येच आहेत का?

अनामित म्हणाले...

saheeeeeeee bhidu!

ekdum dhammal lihila ahe! amha partakaranchi chhan nakkal keli ahes! :D the best was '(nav badalale ahe)!

jhakkas lihitos mitra! pan mala sang, tujhya ya batmicha kay 'impact' zala? ya 'das-bodhatun' maha-palikene kahi bodh ghetla ka?? ka ajun-hi uchchhad suruch ahe?