रविवार, फेब्रुवारी १९, २००६

वटवट

"अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची," कवि केशवसुतांनी लिहूनच ठेवलंय. त्यापुढे आम्ही कोण टिकोजीराव जे उद्दामपणे त्यास आक्षेप घेणार!

वटवट करीत राहणे हाच अमुचा धर्म. गेली कित्येक (कित्येक म्हणजे तीन) वर्षे हा उपक्रम लेखकाने कोणी काहीही म्हणो पण आम्ही लिहिणार या निष्ठेने पार पाडत आणलेला आहे. मग तो इंग्रजीत असू द्या किंवा मराठीत. वटवटीला भाषेचे बंधन नाही. होय, पण वाचकांचे मात्र आहे. तुम्ही म्हणाल, की किर्तनकाराने कीर्तन करीत जावे, कोणी ऐकायला आहे किंवा नाही याची चिंता करू नये. मान्य आहे लेखकाला हे, पण लेखकाने सुद्धा कधीतरी (द्रुष्ट लागू नये म्हणून तरी) वाचकांची सोय बघितली तरी कोणी त्यास आगाऊपणा म्हणणार नाही.

अगदी म्हणूनच हा आगाऊपणा लेखकाने आज केलेला आहे. आणि पेशल, म्हणजे णवीन असे पान या internet की काय ते म्हणतात त्यात उघडले आहे. उघडले तर आहे, पण वाचकांचा कितीसा प्रतिसाद लाभतो ते बघायचे - नाहीतर कीर्तनकाराचा उद्दामपणा उपयोगी पडणार याची खात्री लेखकाला वाटते आहे. अहो, म्हणूनच तर हे सारे पुराण!

कोणाला आवडले तर आवडले, नाही तर नाही. web page च्या नावातच सारे आले - हा सगळा खटाटोप अगदी उगाच असा आहे, कोणी मनाला वगैरे लावून घेऊ नका- रागाऊ तर नकाच नका.

नमनाचे घडाभर तेल ओतून झाल्यावर, आता मूळ मुद्द असा -

या web page वरची जुनी लिखाणे लेखकाच्या या blog वरचीच आहेत. पण संदर्भासाठी पुन्हा येथे उद्ध्रुत करण्यात आलेली आहेत. तरी रसिकांनी (मनात - डोंबलाचे रसिक!) मनापासून आस्वाद घ्यावा (मनात - आस्वाद कसला आलाय बोंबलायला!).

कळावे, आपला लेखक

[पुणेकरांवर विनोद केला नाही तर पुलंच्या भाषेत, तो फाऊल धरला जाईल, तेव्हा, हेही लक्षात घ्यावे की लेखकाचे मूळचे गाव पुणे नाही.]

४ टिप्पण्या:

शैलेश श. खांडेकर म्हणाले...

अभिनंदन अजीत. लेख तर छानच आहे! पुढील लेखांची प्रतिक्षा आहे. आपल्या अनुदिनीच्या ह्या स्थळाची सजावट आवडली.

Nandan म्हणाले...

Welcome back, Ajit.

Pawan म्हणाले...

अजित,
मराठीकरिता वेगळा ब्लॉग बनवल्यामुळे आता मराठी रसिकां(?)ना इंग्रजी लेखांमधून वाट काढत बसावे लागणार नाही. तू सातत्याने अशीच वटवट येथे करीत रहावीस ही सदिच्छा!

जयदीप म्हणाले...

तुझी वट्वट पुन्हा सुरु झालेली पाहून आणंद झाला !