मंगळवार, नोव्हेंबर ०८, २००५

नाशिक-पुणे द्रुतगती प्रवासाचे वर्णन

सकाळी ११:४० ला पुण्याहून उद्यान एक्स्प्रेस निघते. बंगलोरला परतण्यासाठी ही एकच "सोयी"ची गाडी. त्याच दिवशी पहाटे नाशिकहून मी पुण्याला येण्यासाठी निघतो. पहाटे ५:३० ची "एशियाड" बस मिळते. पूर्वी पहाटे ५ लाही एक बस असायची; पण आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहित. जर बस उशिरा पोहोचली पुण्याला तर रेलगाडी चुकणारच. आणि यावेळी आमचा तसाच योग येतो की काय अशी पाळी आली!

५:३० ची बस ५:३० ला निघाली तरच आश्चर्य! त्यात मी सीट मिळायलाच हवी म्हणून आधीच अर्धा तास येऊन बसलो होतो स्टॅंडावर. बसमध्ये वाहक नसणे याचा एक सीट वाचवणे याच्यापेक्षा फारसा काही उपयोग नाही. उलट संगमनेर-नारायणगाव स्थानकांमध्ये चढणाऱ्या प्रवाश्यांना तिथल्या "लोकल" वाहकाची वाट बघत बसावे लागते. असो.

तर ५:३० च्या आमच्या विनावाहक बसचा चालक बस पूर्ण भरेपर्यंत बसून होता. मग हो-नाही म्हणत शेवटी ५:४० च्या सुमारास बस निघाली. आणि मी (पहिला) नि:श्वास टाकला. आता या पाच-साडेपाच तासांच्या प्रवासात काय काय होऊ शकते ते पहा -

- बस नाशिक स्थानकातून बाहेर पडते न पडते तोच एका मारुती कारने आमचा पाठलाग करून आम्हांस थांबवले. मग गाडीतून एक (उमदा) तरुण उतरला, आपली बॅग सावरत बसच्या दाराशी झटापट करून झाल्यावर आत येऊन बसला. त्यात आणखी २ मिनिटे गेली. (तसा गाडीचा वेग जेमतेमच होता, त्यामुळे २ मिनिटांमध्ये काही फारसे अंतर कापले नसतेच, पण असो)

- नाशिकरोड स्थानकात, काहीही कारण नसताना गाडी जातेच. मग ती नाशिकलाच पूर्ण भरुन निघालेली का असेना. तिथे भोज्याला शिवले नाही तर पुणे महामार्गाला जाऊ देतच नसावेत. महामार्गाला गाडीचा चक्रस्पर्श झाला तेव्हा जवळजवळ सहा-वीस झालेले होते.

- विनावाहक गाडीने संगमनेरात मोठ स्टॉप घेणे अपेक्षित नाहिये. पण ७:२० ला जेव्हा आमची गाडी संगमनेरी दाखल झाली तेव्हा "इथे पाच मिनिटे गाडी थांबेल" अशी घोषणा करुन वाहक दिसेनासा झाला. इकडे माझ्या काळजाचे ठोके जलद होत होते. ११:१५ पर्यंत तरी पुणे गाठायलाच हवे होते.

- गाडी थांबली की खाली उतरलेच पाहिजे असा काही प्रवाश्यांचा समज असतो. मग कुठे गोळ्या बिस्किटे घे, पोरांना "शू" करायला घेउन जा, काही नाही तर लोकल कंडक्टरबरोबर गप्पा-टप्पा कर, याशिवाय प्रवास पूर्ण होत नसतो अशी यांची समजूत असते. मग अशा नगांमधले काही नग वाहकाने गाडी चालू केली, दार प्रचंड आवाज करुन ओढून घेतले तरी गाडीत परतलेले नसतात. मग आतले सहप्रवासी आरडाओरडा करून वाहकाचे ईंजिनच बंद पाडतात. आपल्याला नको असले की हमखास असे प्रसंग घडतातच. यावेळी तर मला अशा हरकती बिलकुल नको होत्या. त्यामुळेच, हे सगळं यथासांग पार पडल्यानंतरच, म्हणजे जवळजवळ ७:३० ला आम्ही संगमनेर सोडले.

- अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे खादंती. यास खास मराठीत "फक्त चहा घेऊ" असेही संबोधले जाते. जवळजवळ अर्धा रस्ता पार झाल्यावर मग सगळ्यांच्या "चहा"ची वेळ झाली. इथे माझी चहा-कॉफ़ी कसलीच इच्छा नव्हती. एकदा पुण्याला पोहोचवा, मग चहा-कॉफीच काय कोल्ड-ड्रिंकही घेऊ असा माझा साधारण पवित्रा होता. पण जनमताविरुद्ध एकटा माणूस काय करणार! चहाच्या "इथे" मग अजून १५ मिनिटे खाल्ली. आता आठ वाजून गेलेले होते.

- नारायणगाव हे गाव काही माझ्या आवडत्या गावांमध्ये मोडत नाही. मागे एकदा माझी एक बॅग नारायणगावातल्या स्टॅंडावर चोरीला गेली होती. आणि इथले "लोकल" वाहक फार वेळ लावतात तिकेटे द्यायला. नारायणगावच्या बस स्टॉपमध्ये बस शिरली आणि थेट डेपोतच घुसली. आता बसमध्ये काय बिघाड झाले आहे की काय अशा विचारातच होतो, तेवढ्यात डिझेल भरणे हा चालकाचा हेतू असल्याचे समजले. आधीच डिझेल भरून निघायला काय झाले होते, हा प्रश्न अगदी ग्राघ्य असला तरी आता फारच केविलवाणा होता. त्यात भर म्हणून की काय, तिथली वीज गायब होती! मग चालक महाशयांनी आपल्या हातांनी पंपाचा दांडा फिरवायला सुरुवात केली. त्यातच तो दांडा एकदा स्लीप होऊन हातातच आला. या सगळ्या भानगडीत १० मिनिटे गेली.

- बरं आता डिझेल भरून झाल्यावर तडक निघावे, तर नाही. पुन्हा स्थानकात अगदी रिव्हर्स घेऊन गाडी लावली. नवे प्रवासी अगदी शेवटच्या सीटपर्यंत जाऊन बघत होते, "आरं नाहिये झागा हितं" म्हणून परत उतरत होते. काही विचारू नका. दोन नवी "शीटं" आलेली, त्यांना तिकिटं द्यायला मग एक खाकीधारी (एकदाचा) उगवला. तब्बल वीस मिनिटे घालवल्यानंतर मग आमच्या बसने प्रयाण केले.

- चाकण-पुणे हा २५-३० किलोमीटरचा रस्ता उत्तम झाला आहे. परंतु एका पुलाचे काम मात्र पार रेंगाळले आहे. Bottleneck चे उदाहरण हवे असल्यास मी या पुलाचा दाखला देईन. या ठिकाणी मात्र आमच्या चालकाने आपले कौशल्य पणाला लावले, आणि जिथे २० मिनिटे लागली असती तिथे १५ मिनिटांतच "चटकन" गाडी पुढे काढली!

- पुण्यातले सिग्नल्स साथ देतील तर ते पुण्यातले सिग्नल्स कसले! प्रत्येक ठिकाणी एकदा मिनिटभर थांबून "दर्शन" घेतल्याशिवाय पुढे जाताच आले नाही. मात्र आता मी जरासा relax झालेलो होतो, कारण घड्याळात फक्त ११ वाजले होते, आणि रेल्वे आता काही चुकत नाही याची खात्री होती.

तर तात्पर्य असे की जो प्रवास फक्त तीन-साडेतीन तासांतही करता येईल, तोच असा साडेपाच तासांचा चित्तथरारक करायचा आणि प्रवाश्यांना त्यांच्या पैशांचा पुरेपूर मोबदला कसा मिळेल याची काळजी एस.टी. महामंडळ पदोपदी घेत असते. आणि तेच तर महामंडळाचे वेगळेपण आहे!

२ टिप्पण्या:

Vijay Barve म्हणाले...

झकास ! माझ्यावरही असा प्रसंग अनेकदा आला आहे.

विजय

Yogesh म्हणाले...

सही आहे...