शुक्रवार, ऑक्टोबर २१, २००५

महावासू

चामिंडा वास हा एक अत्यंत हुषार गोलंदाज म्हणता येईल. माझ्या मते कुठल्याही संघाचे गोलंदाज (एक शेन वॉर्न सोडला तर) भारताविरुद्ध आपापला फॉर्म परत आणण्याच्या उद्योगात असतात. वासचा अपवाद का असावा! तर चामिंडा वास हा एक नावाजलेला गोलंदाज आहे. आणि मुख्य म्हणजे तोच मुद्दा आहे.

तर मुद्दा असा, की चामिंडा वास हा एक उत्तम गोलंदाज आहे. हॉस्टेलमध्ये असताना मेसमध्ये क्रिकेटची मॅच टिव्हीवर सुरू झाली की एकंदरीत दंगाच असायचा. मिळेल ती जागा पकडून लोक मॅचचा आनंद लुटायचे. फक्त पंख्यावर जागा रिकामी सापडायची - तीही पंखा फिरत असायचा म्हणून. खचाखच भरलेल्या त्या मेसमध्ये मग एकच गोंगाट चालायचा. क्रिकेट हा पडला बोलायचा खेळ, त्यात मग मुलांचे हॉस्टेल असल्यामुळे काही अर्वाच्य शब्दही सामील व्हायचे. असो. तो मुद्दा नाहिये. मुद्दा आहे चामिंडा वास!

तो काळ असा होता की श्रीलंका वन-डे मॅचच्या सुवर्णयुगात होती. आणि भारतीय संघही फार लांब सातासमुद्रापलिकडे जाऊन कशाला हरा, इथे लंकेतच पानिपत झालेले काय वाईट अशा पावित्र्यात होता. भारत-श्रीलंका बरेचदा आमनेसामने असायचे. असो. तर मुद्दा आहे चामिंडा वास!

तर मग अशी मॅच सुरू व्हायची. सचिन तेंडूलकर आणि गांगुलीची जोडी मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरायची. उगाच वर बघ, इकडेतिकडे बघ, मग साइट-स्क्रीनची हलवाहलव करायला सांग, मधूनच खेळाडूंची शिरगणती कर, पंचांबरोबर उगाचच हास्यविनोद कर, टाळी दे-घे, असा भरपूर टाईमपास झाला की मग आपला गार्ड घेण्यास मग फलंदाज एकदाचा तयार व्हायचा. इकडे प्रेक्षकांची स्वतःची कॉमेंट्री सुरू असायचीच. असो. तर मुद्दा आहे चामिंडा वास.

"जंटलमन, प्ले", असं साहेबी थाटात पंचांनी मॅचचं उद्घाटन केलं की मग गोलंदाज पहिला चेंडू टाकण्यास तयार व्हायचा. आणि तो गोलंदाज असायचा, चामिंडा वास. तर चामिंडा वास हा मुद्दा आहे.

या क्षणी मेसमधली (बरीचशी अर्ध्या चड्डीतली) जनता आपापली नाके मुरडायची, आपापली नाके आपापल्या मुठीत धरायची. का? मुद्दा आहे चामिंडा वास. हळूच कुजबूज व्हायची, "आला, वास आला!". हं. तर सगळा मुद्दा होता वास. आधी सांगितलं नव्हतं?

इथल्या रेडिओ सीटी नावाच्या चॅनेलवर आजकाल "महावासू अगरबत्ती"ची फार जाहिरात होतेय. जाहिरात कन्नडामध्ये असली तरी, महावासू अगरबत्ती घ्या, ती तीन सुगंधांमध्ये मिळते, असं तोडकंमोडकं मला कळलं. आणि त्या प्रॉडक्टनिर्मात्याच्या प्रतिभेचे कौतुक वाटले. नाव काय छान ठेवलंय नाही, महा"वासू" !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: