बुधवार, मार्च १६, २००५

सागरा ...

शाळेत असताना जवळजवळ प्रत्येक वर्षी कोकण trip घडायचीच. कोलेजात असताना मित्रमंडळींबरोबर एकदा श्रीवर्धनची सॆर झाली. त्यानंतर मात्र आता ३-४ वर्षं कोकण आणि माझी भेट झालेली नाहिये.


"मोठ्ठं पाणी" अशी माझी अगदी लहानपणीच समुद्राशी गट्टी झालेली. थोडीशी भीती, पायांच्या तळव्यांना होणारा खेकड्यांचा स्पर्श यामुळे समुद्र लहानपणापासूनच माझा लाडका. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मासे - श्रीवर्धनच्या त्या लहानश्या खानावळीत पॆज लावून खाल्लेले मासे अजुनही माझ्या चेहर्यावर समाधानाचे हसू आणतात. आवडीचा पदार्थ मिळाल्यावर होणारा आनंद मी लपवू शकत नाही - तो माझ्या हसण्यातून कायम पुढे येत असतो. Sea-Fish ची चवच वेगळी - ती आणखिनच रंगते जर साथीला समुद्र असेल तर!

आज खूप दिवसांनंतर कोकणातल्या लाल मातीची आठवण झाली. सहलीच्या - प्रवासाच्या majority आठवणी कोकणातल्या! दाभोळला श्री. वॆशंपायनांच्या घराभोवतीची बाग - ते भले मोठे अननस, आवळे, काजूच्या कच्च्या फळांची चुरचुरती चव आणि गर्द माडांमधली पाण्याने गच्च भरलेली ती विहिर - दुपारची वेळ आणि भर उन्हाळ्यातला दिवस असूनही हवेतला गारवा!

कोकणातल्या झाडांनी आच्छादलेल्या रस्त्यांची मजा काही औरच. सोबतीला बाजूनी शास्त्री किंवा मांडवी नदी लपाछपी खेळायला - कॆर्यांनी-कोकमांनी लदलेली झाडं - मातीचा विलक्षण लाल रंग. उतरत्या कौलांची सुबक ठेंगणी घरं - नारळांच्या कडक शिस्तीत उभ्या असलेल्या समांतर रांगा - गावातल्या बाजारात विकायला आलेले फणस, आंबे, चिकू, अननस आणि शहाळी - रस्ता हळूहळू चढण घेतो - नदी डावीकडच्या दरीत हळूच काढता पाय घेते - समुद्राची चाहूल लागते - अंदाज बांधणी सुरु होते - आणि अचानक क्षितिजावर अनंत तेजाने चमकणारे विशाल पाणी दिसते - हा अनुभव अविस्मरणीय असतो - नजर पोहोचेल तिथपर्यंत पाणीच पाणी ! मग हळूच गणपतीपुळे किंवा मुरुडचा किनारा दिसावा - सोनेरी वाळूत उमटणार्या फेसाळत्या लाटांच्या पाऊलखुणा दिसाव्यात - नागमोडी वाट कोकणातल्या त्या टुमदार गावात एकजीव व्हावी - किनार्यावरच्या माडा-नारळांच्या ओळीमधून वाट काढत तापलेल्या वाळूवर नाचत-धावत जाउन शेवटी पायांना पाण्याचा स्पर्श व्हावा - समुद्राच्या धीरगंभीर गाजेला आमच्या मौनाने प्रतिसाद द्यावा - भरतीची लाट परतताना पायाखालच्या सरकणार्या वाळूने मजेदार गुदगुल्या कराव्यात. सगळ्या व्यापापासून दूर आलेल्या मनाने निसर्गाचा आनंद असा नखशिखांत अनुभवावा - दिवसभर तापलेल्या सूर्याने मग विश्रांतीसाठी सागरात डुबकी मारावी - सूर्याला good-night! म्हणताना आकाशाने अनंत रंगांचे वस्त्र परिधान करावे - मासेमारीसाठी सकाळी निघालेल्या नावा आता माघारी परताव्यात - अंधारणार्या आकाशावर त्यांच्या गर्द प्रतिमा मोठ्या होत होत धक्क्याला लागाव्यात - सूर्यनारायणाच्या निव्रुत्तीनंतर आभाळाचा ताबा मग चंद्राने घ्यावा - समुद्राच्या गाजेतले गाभीर्य आणखीनच तीव्र व्हावे - संथ शीतल लाटा मानाच्या किनार्यावर येउन फुटाव्यात ...

३-४ वर्षांचा हा विरह आता सहन होत नाही - म्हणावेसे वाटते - "सागरा प्राण तळमळला!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: