सोमवार, ऑक्टोबर ०४, २००४

विस्मरणाचे दान तुझे

विस्मरणाचे दान तुझे ते सरे आज
आठवणींचा घेउन आलिस सुंदर साज

तसले कही तेव्हाचे ते
मनी न माझ्या भलते सलते
उरी न कटुता शल्यही काही नुरले आज
आठवणींचा घेउन आलिस सुंदर साज

कुठे बोलणे? हसलिस नाही
घडलेच जणू नव्हते काही
पाळिलास नच साधा तू रीतिरिवाज
आठवणींचा घेउन आलिस सुंदर साज

असून ओळख अनोळखी तू
असून उत्सुक अनुत्सुकही तू
हसली का मग जिवणीतुनि सोनेरी लाज
आठवणींचा घेउन आलिस सुंदर साज

लकब तुझी ही काही निराळी
शब्दांवर मौनाची जाळी
विरक्तिंत शिशिराच्या दडला पण रुतुराज
आठवणींचा घेउन आलिस सुंदर साज

त्रुप्त गडे मी व्यथा कोठुनि?
मोहरले पण मौन स्वरांनि
चांदण्यात उरि यमुनाकाठी हसला ताज
आठवणींचा घेउन आलिस सुंदर साज

- कवि मंगेश पाडगावकर, "जिप्सी"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: