गुरुवार, डिसेंबर १०, २००९

काळा बाजार

नाशिकला (आणि आणखी ब-याच गावांमध्येही असेल) बुधवारचा बाजार भरतो. जुन्या नाशकात, गोदेकाठी सकाळी सकाळी ताजी भाजी विकायला येते. जुने जाणकार (कापडी!)पिशव्या घेऊन आपापल्या ठरलेल्या विक्रेत्याकडून भाजी घेतात. मग तिथल्या तिथेच थोडीशी घासाघीस आणि बराचसा हसी-मजाक होतो.

लहानपणी बाबांबरोबर जायचो बाजारात तेव्हाच्या "भाSSSऊ.. अरे तोंडली गोड हायती. सस्ती लावली" अशा हाका अजून कानात आहेत. मग अर्धा किलो (तेव्हा अर्धा शेर म्हणायचे बहुतेक) घेताना ती भाजीवाली १००-२०० ग्रॅम अगदी सहजच जास्ती घालायची. शिवाय सकाळची पहिली ’भवानी’ असल्यामुळे भावातही अजून सूट मिळायची ती वेगळीच. आश्चर्य म्हणजे सगळ्यांनाच ही पहिली बोहनी मिळायची! भाजीच्या जागा ठरलेल्या-पालेभाजी कुणाकडे, तर कुणाकडे कांदे-बटाटे, आले-लिंबू-कोथिंबीर दुस-याकडून आणि शेवटी भिकाभाऊंकडून फळं! चार-पाच पिशव्या भरून भाजी घरी यायची. पिशव्या रीकाम्या केल्यावर, "अर्धाच्या भावात तीन पावशेर दिलेला दिसतोय कोबी" असे आईचे शब्द नेहमीचेच.

काळ बदलला तसा बाजारही बदलला. आता गंगेवर तुरळक बाजार भरतो. पूर्वी बुधवार आणि शनिवार दोन दिवस गर्दी लोटायची. आता थंडीतही विशेष भाजी येत नाही तिथे असं बाबा सांगतात. रीलायन्स फ्रेश किंवा मोअर किंवा अजून दुसरं काही अशा कितीतरी चकाचक दुकानांमध्ये आता भाज्या दिसतात. प्राणीसंग्रहालयातले प्राणी आणि ख-या जंगलातले प्राणी यांत जो फरक आहे तोच गंगेवरच्या आणि असल्या मॉलमधल्या भाज्यांमधे मला वाटतो. मॉलमध्ये दोन किलो कांद्यांवर एक लिंबू फुकट मिळत असले, तरी त्याला अर्ध्याच्या भावात तीन पावचा ओलावा नाही.

आणि मॉलमधल्या कोंडलेल्या शांततेचा आणि गंगेकिना-यावरच्या मोकळ्या आरडाओरड्याचा तर तीळमात्र संबंध नाही.

***
इथे अमेरीकेत काही ठिकाणी आपल्या गंगेसारखा बाजार भरतो, पण जास्त करून रीलायन्स फ्रेशचंच साम्राज्य. त्यातही सगळीकडे "डील्स" ची पद्धत. काही आठवड्यांपूर्वी जबरदस्त सेलचा अनुभव आला. इथे म्हणजे सगळ्याचाच अगदी बाजार मांडलेला! सगळ्या गोष्टींवर जबरदस्त सूट. लोक आदल्या रात्रीपासून दुकानांसमोर रांगा लावून उभे. पाच-दहा टक्के सूट आणि काही ठराविक गोष्टींवर तर ५०%पर्यंत! आम्ही गम्मत बघायला म्हणून त्या शुक्रवारी गेलो तर लोक बटाटे विकत घ्यावेत तसे टीव्ही विकत घेताना दिसले. पाच दहा सेकंदांत दहा-पंधरा टीव्ही विकले गेलेले दिसले. त्याचबरोबर सीडी-डिव्हीडीज, लॅपटॉप हे सगळंही जोरात खपत होतं. कपड्यांच्या दुकानांतही अशीच धूम असावी यात शंका नाही. सस्त्यातली एवढी मजा कोण सोडेल?

सणाच्या सुटीच्या दिवशी अशी सूट द्यावी अशी टूम ज्या बिझनेसमन नी काढली त्याला मानलं पाहिजे! (बाकी आख्खं पाश्चात्य विश्वच ’सूट’ या संकल्पनेवर जगत असावं - घालायला तो सूट, मागायची ती सूट आणि प्रेम-लग्नाच्या बाबतीतही ’सूटर’च! डिस्काऊन्ट सेल खतम झाल्यावर पाळायचं ते सुटक. पुरे!)

अशा खरेदी समारोहाच्या दिवसाला ब्लॅक फ्रायडे का म्हणतात हे एक कोडंच आहे (विकीपीडीयात हेही उत्तर मिळेल. पण असो).

***
असा हा काळा बाजार बघितल्यावर आपल्या देशी बाजाराची आठवण झाली म्हणून हे लेखनप्रयोजन!

1 टिप्पणी:

अपर्णा म्हणाले...

black friday बद्द्ल इतकी छान टिपणी पहिल्यांदीच वाचली...