शुक्रवार, जून २०, २००८

उन्हाळ्याची सुट्टी

झुकुझुकू अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहू या--- मामाच्या गावाला जाऊ या!
आगीन गाडीनं मामाच्या गावाला जायचा योग आमच्या लहानपणी कधीच आला नाही (आणि भविष्यात तरी येणार की नाही कोण जाणे). नाशिक-पुणे हा उन्हाळ्यातला प्रवास आई आणि बहिणीबरोबर नेहमीच बसने व्हायचा. आख्खा रस्ता अतिशय रुक्ष, त्यामुळे पळती झाडे बिडे पाहण्याचा योगही नाही! उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या पुण्याच्या आठवणी धुरांच्या रेषांप्रमाणे विरून जायच्या आत कुठेतरी उमटवून ठेवाव्यात म्हणून हा लेखन प्रपंच!

मंडईच्या दारात आमच्या आजोबांचा वाडा होता. तो अगदी लहानपणी. त्या घराच्या फारशा आठवणी नाहीत. एका मोठ्या हॉलवजा खोलीत उंच टांगलेल्या हंड्या (आणि त्यात लकलकणारा दिवा), वरती माडीवरच्या खोलीत अभ्यास करत बसलेला मामा, आत स्वयंपाकघरात आजीची चाललेली धावपळ, खाली आजोबांच्या वर्कशॉपमधले (हो, आमच्या आजोबांनी घरी अनेक यंत्र घेतलेली) लेथ, ड्रीलिंग मशीनचे ते अवाढव्य डाग, देवघरातले असंख्य देव, आणि खाली मंडईचा अविरत आवाज एवढंच काय ते आठवतंय. माझ्या आठवण्यासारख्या वयात घालवलेल्या सगळ्या सुट्ट्या त्या कोथरूडच्या घरात!

कोथरूडचं घरही आकाराच्या दृष्टीनं जरा अजबच. त्याचं कारणही तसंच खास. या घराच्या पहिल्या मजल्यावर आजोबांनी बॅडमिंटन कोर्ट बांधलेलं. त्या कोर्टाच्या खाली आमचं हे घर. घराचं नावही मस्तच: "खेळीया"! बाहेर ब-यापैकी बाग. नारळ, गुलाब, आंबा, पेरू इत्यादी जुजबी कलमं. घराच्या अगदी समोर एक भला मोठा ट्रान्स्फॉर्मर! बॅडमिंटन कोर्टाकडे जाणा-या जिन्याच्या बाजूला चढलेले जाई की जुईचे वेल, आणि घराच्या दाराजवळचा चंद्रहास. लहानपणच्या आठवणी अशाचा जिन्याला धरून चढणा-या वेलासारख्या असाव्यात!

कोणी 'करवंद' म्हणालं, की त्या काळ्या छोट्याश्या आंबट-तुरट-गोड फळाऐवजी मला 'ले काSSSळी मैना--- कोकणची मैना" अशी करवंदंवालीची जोरदार हाकच ऐकू येते. पुणं सोडून कुठेही मी अशी हाक ऐकलेली नाही. नाशकाची द्राक्ष इतकी प्रसिद्ध, पण तिथे कोणीही अशी हाक टाकून द्राक्ष विकायला येत नाही! वर्षानुवर्षं मी ही हाक ऐकलेली. एकंदरीतच आजोळी खाण्यापिण्याची ऐश! आमची आजी सुगरण. आणि आमचे आजोबा खवय्ये! घरी न विचारताच खवा घेऊन यायचे आणि मग आमच्या आजी-आजोबांमध्ये भांडण व्ह्यायचं. "अहो.... खवा आणलाय," ला "अहो पण मागच्याच आठवड्यात झालेत ना गुलाबजाम" असा जवाब मिळायचा. आमची चैन, दुसरं काय! आमचे आजोबा स्वतः जिलब्या करायचे. स्वेटर विणायच्या सुईने तयार जिलब्या तेलातून पाकात सोडण्याच्या कलेचं प्रात्यक्षिक त्यांच्याकडूनच पहावं. त्याआधी मग मुद्दाम मोठा नारळ आणून त्याच्या करवंटीला भोक पाडणे इत्यादी पूर्वतयारी झालेली असायची. जेवायला बसल्यावर, "हाण तू" असं परमीट मिळालेलं असायचं. खव्याच्या पोळ्या ही आमच्या आजीची खास रेसीपी. लाडक्या नातवा-नातीसाठी आम्ही "अगं असू दे, असू दे" म्हणत असूनही पोळीच्या अगोड कडा ती काढून द्यायची. भेळ, पॉटचं आईस्क्रीम, आम्रखंड (आजोबांकडे उडप्याकडे असतं तसं चक्का रगडण्याचं मशीन होतं), कैरीचा भात (हा प्रकार मला बिल्कूल आवडत नाही), अशा पाककृती ठरलेल्या. या व्यतिरीक्त माझा एक अत्यंत नावडता प्रकार म्हणजे गव्हाचा चीक. कुरडया नामक दोन मिनिटांमध्ये संपणा-या तळकट पदार्थासाठी इतका व्याप का करावा असं माझं मत आहे. शिवाय त्या एक-दोन दिवसांमध्ये स्वयंपाकघरात नाक ठेवणं अशक्य होऊन बसतं. पापडाचा कार्यक्रमही मोजून व्ह्यायचा दर वर्षी. पोह्याचे, नागलीचे आणि कसले कसले पापड व्ह्यायचे. त्याचं पीठ तेल लावून सही लागतं, ते खायला मजा यायची. पण पापडाची चुलतबहीण कुरडई मात्र अंत बघायची. हे सगळं झालं घरी. याशिवाय मग सारस बागेतली भेळ, तुळशीबागेजवळचे कावरे आईस्क्रीम, बाजीराव रोडवरचं मुरलीधर रसवंतीगृह, अशी सगळी चैन असायची ती वेगळीच! त्यासाठी आई आणि मावशीबरोबर साड्यांच्या दुकानांतून रपेट करायला(ही) त्यामुळे काही वाटायचं नाही.

सुट्टीत खाणं-पिणं आणि खेळणं इतकाच उद्योग असलेल्या त्या वयात पुण्याच्या आमच्या घरी पुष्कळ उद्योग होते. आमच्या आजी-आजोबांच्या लग्नात त्यांना भेटवस्तू म्हणून पत्याचे तीन-चार डझन कॅट मिळाले होते. (यामागचं प्रयोजन काय ते विचारू नका, मलाही ठाऊक नाहिये!). मग प्रत्येक सुट्टीत एक नवीन कॅट नक्कीच बाहेर काढला जाई. दुपारी आमरस वगैरेचं जेवण झाल्यानंतर आजीबरोबर पत्त्यांचा डाव ठरलेला असायचा. आमचा खेळ पाहत आजोबा बसल्याबसल्या डुलक्या काढायचे. आम्ही कितीही म्हटलं तरी आत जाऊन आडवे काही व्ह्यायचे नाहीत! पत्त्यांचा कंटाळा आल्यावर मग आजी 'सकाळ'मधल्या सुटीच्या पानातलं काहिसं वाचून दाखवायची. मग सावकाश आम्ही सगळेच आडवे व्ह्यायचो. बाहेर अर्थातच सूर्य तळपत असायचा.

लहानपणापासून मी म्हणे बाबा-वेडा आहे. पुण्याला जायच्या वेळी म्हणे अगदी लहानपणी मी चक्कं रडायचो. सुट्टीच्या शेवटी शेवटी बाबा घ्यायला आले की आमची दोन इंच उंची वाढलेली असायची! मी कधीकधी बाबांना पोस्टकार्ड लिहायचो. त्यावेळी फोनचंही एवढं काही नव्हतं... आठवड्यातून एकदा असं म्हटलं तरी पुण्याच्या सुट्टीत एक-दोनदाच नाशिकला फोन! त्यापैकी एक रीझल्ट कळवायला. मग त्याबद्द्ल आईस्क्रीम पार्टी असं काय काय सगळं ह्यायचं.

शि-यातल्या बेदाण्यांसारख्या या सगळ्या छोट्या-छोट्या आठवणी.

उशा घेऊन मावशीशी केलेली मारामारी असो किंवा भर उन्हाळ्यात मच्छरदाणी नको म्हणून मी केलेला आणि आजोबांनी मोडून काढलेला हट्ट; तुळशीबागेतल्या त्या झाडाजवळचा हळदी-कुंकवाचा वास असो किंवा पी.एम.टी. च्या रंगीबेरंगी तिकिटांचं अप्रूप! पोहायला जायचं नाही म्हणून अडून बसलो ते असो आणि आजोबा दुखरा गुडघा असूनही माझ्याबरोबर बॅडमिंटन खेळले त्याचा आनंद! नाशिकच्या आजीनं मी पुण्याला असताना आंतर्देशीय पत्रातून पाठवलेली, "अजित कुठाय? अजित कुठाय?" कविता! "अत्तर बित्तर मी काही लावत नाही, मला इंजिन ऑइल आणि ग्रीसचा वासच आवडतो" असं आमच्या आजोबांनी अवस्थी अत्तरवाल्यांना सांगितलेल्याचं आठवल्यावर हसू फुटतं.

सगळं कधीकधी असं आठवून जातं, आणि मग आघात करतं ते वास्तव-- पुण्याचे आजी-आजोबा आता नाहीत. आईच्या कपाटात आजी-आजोबांचा एक छान फोटो आहे, त्यातून ते भेटतात अजूनही. आमचे आजोबा अत्यंत सुदृढ-सशक्त होते, त्यांचे योगासनांचे-मयूरासनाचे फोटो पाहून थक्क व्हायचो. "व्यायाम करायचा ज्या दिवशी थांबवशील त्या दिवशी मी समजेन की तू आजोबांना विसरलास," हे आईचं वाक्यं मनात कायमचं कोरलं गेलेलं. आपल्या 'जीन्स'मध्ये आपला स्वभावही लिहिलेला असावा. माझ्यातच मला माझे आजी-आजोबा सापडतात कधीकधी. व्यायामाचा-खेळाचा कंटाळा आलेला असतो कधीतरी, पण आजोबा सांगतात खेळायला पाहिजे, तब्येत उत्तम ठेवायला हवी! कधीकधी आमच्या आजीसारखाच मी मृदूही होऊन जातो, तिच्या खव्याच्या पोळीतल्या मायेची चव आठवायला मग खरी खव्याची पोळी लागतच नाही. माझा देवावर एवढा विश्वास नाही, पण आमचे आजी-आजोबा माझ्यावर लक्ष ठेवून आहेत, माझ्या चांगल्या-वाईट वागण्याचं त्यांना आनंद-दुःख होतं यावर माझा विश्वास आहे!

असो.

पूर्वीचं पुणं राहिलं नाही म्हणतात, पुण्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं म्हणाल तर याहून 'खरं' सत्य दुसरं ते कोणतं?

१० टिप्पण्या:

अमोल म्हणाले...

खुप छान लेख. माझे ही अजोळ पुण्याचे. अगदी अश्याच आठवणी आहेत.
बाकी आता पुण्यात मजा नाही

अमोल

कोहम म्हणाले...

शि-यातल्या बेदाण्यांसारख्या या सगळ्या छोट्या-छोट्या आठवणी.

zakaas

नंदन म्हणाले...

chhan lihila aahes, ajit. Nehamisarakhach agadi balanced.

Rohit म्हणाले...

sundar jamalaay!

आजानुकर्ण म्हणाले...

gavhacha cheek avadat nahi?

are re!!


baki zakas ahe.

अनामित म्हणाले...

mast lekh ajit....shevti shevti dole panavle re....chalaychah.....such is life...

अनामित म्हणाले...

i just lost my aaji...
so i can feel it...
just wanna say...etaka nirvayaj nate konatach nasate...
god bless.
all the best.
ani yes! kharach punyat ata maja nahi...mazi hi ajol pune..

Sagar म्हणाले...

farach chaan lihale ahe.. I have played badminton in Kheliya many times.. (tenvha jar ka tu maza mitra asatas tar fukat khelayala milale asate ;)). mala tuze ajoba aandhukase athavat ahet. barech vela tyanchya kade jaoon booking kele ahe.. (kadhi kadhi vele peksha thode jast khelalo mhanoon orada pan khalala ahe)...
khoop divasani tuza blog vacahala .. it was good stress buster for me.. Thanks!!

keerti म्हणाले...

malahi maze june divas athavle......khup chhan lihilay

Shraddha म्हणाले...

खूप छान लेख...
तस पुणेकरांच आणि माझं नातं काही जिव्हाळ्याच मुळीच नाही... पण तरी तुमचे आजी-आजोबा मनापासून आवडलेत. :)