शुक्रवार, जानेवारी ०६, २००६

गाडगीळ सर

मी आठव्या इयत्तेत असतानाची गोष्ट. उन्हाळ्याची सुटी चाललेली होती. अस्मादिकांचे दिन सुखात चालले होते. एकदा अशीच निवांत वेळ "साधून" आईने विचारले, "काय, तुला पुढच्या वर्षी गाडगीळ सरांच्या class ला जायचंय का? आपल्या ओळखीचे आहेत ते, तुला घेतील class मध्ये - आता जरा १०वीच्या द्रुष्टिने विचार करायला हवा!"

दहावीच्या द्रुष्टीने विचार! हा भलता विचार तोपर्यंत माझ्या बालमनास कधीच शिवलेला नव्हता. मी (फारसा विचार न करताच) "बरं. जाईन" असं उत्तर देउन टाकलं. त्या दिवसापर्यंत माझा "अभ्यास" म्हणजे "ग्रुहपाठ" असा सोयीस्कर समज होता. नंतर काही काळ तो तसाच टिकला आणि बारावी आणि मग नंतर engineering च्या आयुष्यात त्याचा फुगा फुटला.

तर अशा तऱ्हेने आठवीच्या शेवटी मी गाडगीळ सरांचा student झालो.

पांढराशुभ्र, अजिबात सुरकुत्या नसलेला झब्बा - पायजमा, नाकावर सोनेरी काडिचा चष्मा (तो नाजूक नव्हता), एखाद्या संशोधकालाच शोभून दिसेल असे भव्य टक्कल, तीक्ष्ण नजर आणि त्याहूनही तीक्ष्ण भाषा - class च्या पहिल्या दिवशीच माझी जाम तंतरली.

तशी मला अभ्यासात बऱ्यापैकी गती होती, पण class मध्ये सगळेच गतिमान, शिवाय धीटपणे बोलण्याची कला अजून अवगत झालेली नसल्यामुळे, माझी तिथे काय गत झाली, काही विचारू नका! पण हळुहळू सगळ्यांबरोबर वेगात धावायची सवय झाली - आणि वातावरण एकंदरीत मैत्रीपूर्ण झालं.

सरांचा गतीवर फार विश्वास होता आणि त्यावरच ते फार भर द्यायचे. भरभर विचार करण्याची सवय लावण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असायचा. "ते काSSय ते - speed आणि accuracy फार महत्त्वाची असते... मी एकदा सांगणार, फार तर दुसऱ्यांदा- परत नाही. बघा झेपतंय का ते." काही जणांना या speed ची फार चीड यायची. परंतु अशा लोकांची तक्रार लक्षात येईपर्यंत सर फार पुढे निघून गेलेले असायचे!

मग हळुहळू ही गती डोक्यात भिनली. भराभर दोन-तीन steps पुढे जाऊन काय result मिळणार आहेत किंवा काय वेगळी युक्ती लढवावी लागणार आहे याचा आधीच अंदाज बांधण्याची कला आत्मसात केली. कधीकधी सर मुद्दामच काहितरी बारीकशी चूक करायचे आणि काही ठराविक मुलांकडे (मी त्यांतला नव्हे) नजर टाकायचे. त्या मुलांना ही गोची आधीच कळलेली असायची - मग ही पोरं आणि सर यांच्यात हावभावांची एक देवाणघेवाण व्हायची. बाकीची मुलं सोडवण्यात दंग! मग हळुहळू एकेकाच्या ध्यानात हा घोळ यायचा. सर मिश्किलपणे हसत म्हणायचे, "at least some of you [got that?]" चला पुढे.

क्लासमध्ये अक्षरशः मान वर करून बघायला वेळ नसायचा. एखादा वर मान करून "इकडे तिकडे" बघत असला, की समजावं महाशयांनी चुकीचं गणित उतरवून घेतलंय किंवा मागचं गणित आत्ता कुठे संपलंय.

सरांच्या काही खास phrases होत्या - "हातवारे" ही त्यातलीच एक. हातवारे करून cartesian co-ordinates पासून ते motion of sound waves यापर्यंत सगळं काही ते शिकवायचे. ११वीत असताना (माझ्यासारख्या, मराठी माध्यमातून आलेल्या (अजागळ) मुलांसाठी) "आधी English मध्ये मग मराठीत" असे राखीव उद्गार होते. "I hope you get that" मधला "I" ते कधीकधी खाऊन टाकायचे तेव्हा समजावं सर आज खुशीत आहेत. एखादा (भयानक) theorem सिध्द करून झाल्यावर (अर्थातच त्यात काही सोप्या पण महत्त्वाच्या steps गाळलेल्या असायच्या) "काय? शोध आणि बोध?" किंवा "चमत्कार का?" असं विचारायचे. बहुतेकांना त्या क्षणी तरी ते सारे जादूचे प्रयोगच वाटत असायचे!

"VVVVIMP" हा असाच अजून एक "VIP" त्याचबरोबर, "पूर्वी फार वेळा विचारायचे, आता frequency कमी झाली आहे" असा एखाद्या "कोपऱ्या-कोपऱ्यातल्या गणिता"वर शेरा मिळायचा. सरांना गेल्या कितीतरी वर्षांचे बोर्डाचे पेपर तोंडपाठ असावेत.

"अर्थं?" आणि log-antilog गडबडगुंडा - पाहिलं की उत्तर" या अजरामर concepts आहेत. पेपरमध्ये log-antilog आणि मग उत्तर अशा पध्दतशीरपणावर सरांचा विश्वास नव्हता. "गूपचूप" calculator वापरा आणि काहितरी "बंडल" log-antilog लिहून टाका - कोणाला वेळ आहे ते तपासायला, असा मौलिक सल्ला त्यांनी आम्हाला दिला होता. समोर गणित पाहिलं की त्याचं उत्तर दिसलं पाहिजे असा त्यांनी घालून दिलेला आदर्श आम्ही पुरता अंगी बाणावला होता. काही वेळा तर प्रश्न पुरा व्हायच्या आतच आम्ही उत्तर देत असू. अर्थात यात पाठांतराचा कुठलाही भाग नव्हता हे सांगण्याची गरज नाही.

पंधरा-वीस वर्षं शिकवण्याचा दांडगा अनुभव आणि अत्यंत धारदार स्मरणशक्ती यांच्या जोरावर त्यांनी मुलांकडून पाण्यासारखे marks पाडून घेतलेत. त्यांचा भर मात्र नेहमी पुढचे उच्चशिक्षण आणि तिथली स्पर्धा यांवर असे.

"पुढे engineering ला गेल्यावर १-down २-down ची भाषा सुरू होते पोरांची. पण speed आणि accuracy ची सवय असेल तर फारसा problem येत नाही आपल्याकडच्या पोरांना" अशी एक धमकीवजा अपेक्षा ते नेहमी व्यक्त करायचे. त्यावेळी त्यांना काय अपेक्षित होतं, ते पुढे engineering ला गेल्यावर चांगलंच लक्षात आलं. पण सरांची दीक्षा लाभलेली असल्यामुळे कधीच काही (फारसं) अवघड असं वाटलं नाही.

शाळा, दहावी-बारावीनंतर आदरानं "सर" म्हणावं, ज्यांच्या शिकवण्याच्या आठवणी आणि काहितरी शिकल्याचा आनंद मनात जपावा असे शिक्षक (IISc join करेपर्यंत) पुढे लाभलेच नाहीत. स्वतःच स्वतःचे शिक्षक बनावे लागते हे सरांनी वेगवेगळ्या शब्दांत पढवलं होतं, त्याचं प्रत्यंतर वारंवार आलं.

माझं ग्रुहपाठ म्हणजेच अभ्यास हे समीकरण बदलवून टाकणाऱ्या आणि बारावीनंतरच्या so-called competitive जगातला माझा प्रवेश आणि नंतरचे so-called यश याची नांदी ठरलेल्या त्या गतीने भारावलेल्या क्लासच्या आठवणी विसरणं अशक्य आहे. शिकण्यातल्या खऱ्या आनंदाची जाणीव करून देणाऱ्या गाडगीळ सरांना माझा सविनय प्रणाम...

२ टिप्पण्या:

shruti म्हणाले...

memories and words from sir are unforgettable :-) happy shikshak din! :-) any contact with sir these days ?

Aamod Joshi म्हणाले...

Wow.. this blog makes me feel nostalgic. It seems it was just yesterday that I was in Sir's class. There are too many memories of Sir to put in this comment. :)

Gadgil Sir is one of the very few teachers who has made a mark in my memory.