शुक्रवार, जून १७, २००५

लेखक आणि नाटक

पात्र १ : पहिलंच वाक्य माझ्या तोंडी यावं हा मी योगायोग समजावा, की माझ्या लेखकानं जाणीवपूर्वक रचलेला डाव ?

पात्र २ : आणि तुझ्या या वाक्यानंतर माझी पाळी! नेमकं काय उत्तर द्यावं हे अजून लेखकानं ठरवलेलं दिसत नाही. असो! नमनाला एवढंच तेल पुरे झालं. आता मूळ विषयाकडे वळावं.

पात्र १ : तो कोणता ?

पात्र २ : हं काय बरं? हं - आज आपण आपल्या विचारस्वातंत्र्याबद्दल बोलूयात. विचारस्वातंत्र्य म्हणजे -

पात्र १ : डोंबलाचं विचारस्वातंत्र्य! अरे आपले संवाद तरी आपल्या ताब्यात आहेत का? विचारांचं तर सोडच.

पात्र २ : अरे हो! पण असं बघ, आजचा संवाद जर विचारस्वातंत्र्याबद्दल घडणार असेल - तर तो घडायलाच हवा. याबद्दलच मी - किंवा आपला लेखक कितीतरी दिवस विचार करत होता.

पात्र १ : साफ खोटं. तू हा विचार करत होतास हे पूर्णत: खोटं आहे. अरे आपण अस्तित्त्वात आलो याला १५-२० वाक्यं तरी पूर्ण झाली आहेत का? लेखकाच्या मनात हा विषय घोळत असण्याची शक्यता आहे - पण -

पात्र २ : आता पण काय आणखी?

पात्र १ : तोच तर विचार करतोय! तसं असतं तर आपण बऱ्याच दिवसांपूर्वीच अस्तित्त्वात आलो असतो!

पात्र २ : पटलं! हे म्हणणं पटलं. पण एक सांग, तू तुझ्या अस्तित्त्वाचा कालावधी असा मोजून दाखवू शकतोस?

पात्र १ : मला ठाऊक नाही. ते राहू दे. आपलं विषयांतर होतंय.

पात्र २ : हो! विचारस्वातंत्र्य. जर लेखक मंडळी या अधिकाराचा वापर हक्कानं करत असतील तर आपण का नाही? की आपण केवळ गुलाम आहोत - त्यांच्या विचारांचं निव्वळ वाहन? कुणीही स्वार व्हावं आणि हाकावं?

पात्र १ : तुला अजून लक्षात येत नाहिए का? यावेळचा आपला लेखक जरा निराळा वाटतोय. त्याला आपलं म्हणणं ऐकून घ्यावसं वाटतंय. तू मात्र उगाच..

पात्र २ : कशावरून? त्यानं अशी काय सरबराई केलीय रे?

पात्र १ : नाही. नाहीतर आत्तापर्यंत आपल्या स्वभावांना त्यानं पैलू पाडले असते - आपल्या शब्दांना निरनिराळे हेल, लकबी बहाल केल्या असत्या. थोडक्यात आपल्याला साचेबद्ध करून तो मोकळा झाला असता.

पात्र २ : खरंय की! मला तर मी अजून बाई आहे की बुवा हेच ठाऊक नाहिए!

पात्र १ : नशिबवान आहेस - तुला तर तू माणूस आहेस हे तरी समजलंय. माझ्या बाबतीत तर तोही अंधार! प्रतीकात्मक शैली ही खुबी आहे म्हणतात या लेखकाची--

पात्र २ : अरे कळेलच लवकर. आपण वाट बघायला हवी.

लेखक : आज मनासारखी हुषार पात्रं सापडली आहेत! मूडही मस्त लागला आहे. पण तावडीत सापडली म्हणून "विचारस्वातंत्र्या"सारखा जड विषय त्यांच्यावर लादणं बरोबर नाही. आज कोणताही विषय लादायचा नाही. अगदी खरंखुरं विचारस्वातंत्र्य बहाल करून टाकायचं.

पात्र १ : अरे किती वेळ वाट बघायची?

पात्र २ : त्याला काही सीमा नसते बघ. मागे एकदा सगळं काही संपल्यावर समजलं की मला खरं अस्तित्त्वचन नव्हतं. "पडद्यामागून येणारा गूढ आवाज" एवढंच स्वरूप.

पात्र १ : अरे बापरे! कठीणच आहे की मग. पण जाउदेत. जे होणार त्याला मी काही थांबवू शकत नाही. आले लेखकाच्या मना -

पात्र २ : ते ठीक आहे रे! असो. आज आपण एक गंमत करुया.

पात्र १ : काय ती?

पात्र २ : आज आपण आपल्या लेखकावरच आपले विचार लादूयात. कळू देत त्याला कसं वाटतं ते.

पात्र १ : हा हा! छान कल्पना आहे. पण ते जमणार कसं?

पात्र २ : आपल्या विचारांना मोकाट सोडायचं. धरणाचे दरवाजे पूर्ण उघडून टाकायचे.

पात्र १ : फुलपाखरांना चिमटीतून सोडून द्यायचं?

पात्र २ : हो!आज मोकळ्या रानात सुसाट पळायचं.

पात्र १ : सोप्पय की ते!

पात्र २ : बघ बघ त्या तारका- तो चंद्र.

पात्र १ : आणि तो सूर्यही! ती नाजूक नाजूक फुलं - तो शांत समुद्र!

पात्र २ : आणि दवावर आकाशाचं प्रतिबिंब? वाऱ्यावरचं भिरभिरतं गाणं!

पात्र १ : राजकुमार आणि राजकन्येची गोष्ट! खूप खूप वर्षांपूर्वीची!

पात्र २ : ती गोड कहाणी! बघ तो शुभ्र अश्व आणि चमकती नक्षत्रं?

पात्र १ : होय रे! रंगीबेरंगी मासे- तुटला तो तारा, सरला किनारा!

पात्र २ : आसमंत सारा, ओहो! मोराचा पिसारा!

पात्र १ : होय होय! कापसाचे ढग - बघ ते आकाशात निळ्या. बघ.

पात्र २ : नव्हे, ते तर गोंडस पिल्लू. पाहिलीस ती नदी?

पात्र १ : निळे निळे पाणी, ऐकू आली गाणी?

पात्र २ : रात्रीच्या अंधाराचा हुंकार - पण त्यातच उद्याची पुकार!

पात्र १ : सारे परंतु क्षणभंगूर- उगाच आपला विचार...

पात्र २ : आपला विचार?

पात्र १ : काय रे, काय झालं?

पात्र २ : काही जाणवलं तुला? हे सारे क्षणभंगूर! आपलं अस्तित्त्व, आपल्या विचारांचही अस्तित्त्व!

पात्र १ : हं...

पात्र २ : तुला कळलं? तुझी स्वत:ची ओळख पटली? आपण निघालो होतो रे आपल्या लेखकावर आपले विचार लादायला - पण समजलं तुला?

पात्र १ : हो! जाणवलं, नव्हे पटलं, दिसलं आणि अनुभवलं. आत्ता मला कळलं-

पात्र २ : की आपली जन्मजन्मांतरीची असावी अशी ओळख कशी ते! तू, मी आणि आपला लेखक...

लेखक : बरोबर आहे तुमचं. तुम्हाला तुमची ओळख पटली ना! तुम्ही,मी आणि हे वाक्य लिहिणारा, सगळे एकच आहोत. विचारांचे केवळ वाहक...या संवादातून आनंद मिळाला, आणि सगळं साधलं. सगळं सगळं साधलं!

1 टिप्पणी:

शैलेश श. खांडेकर म्हणाले...

मस्तच लिहिलंय. मनापासुन आवडलं. काहीतरी वेगळं वाचण्याचं समाधान भेटलं.