शुक्रवार, मे १३, २००५

वादकास

त्या निवांत नि रम्य संध्याकाळी, खचाखच भरलेल्या सभाग्रुहात,
टाचणी पडली तरी ऐकू येईल एवढ्या शांततेत, माझ्या मनाच्या गाभाऱ्यात,
तू पियानोवर बोटे फिरवलीस, आणि सूरांऐवजी रत्नेच बाहेर पडली,
मुद्दाम केलेला अंधार कुठच्या कुठे पळाला, ते स्वर जे बरसले-
त्या धारा ज्या कोसळल्या, त्या लहरी ज्या थिरकल्या, खरं सांगतो,
सूर नव्हतेच ते - कधी बिजली, कधी थेंब, तर कधी हिमही, की होते कोवळे सूर्यकिरण?
सर्वदूर पसरलेल्या शांततेच्या पटलावर, ज्या सहजतेने तू तरंग उमटवलेस,
ज्या नजाकतीने रेखा ओढल्यास, त्यास जबाब नव्हता
एक स्थिरावताच सूर पुढचा तयारच होता - जणू शुभ्र घोड्यावरचा उमदा वीर,
कधी तलवार हातात, तर कधी घायाळ करी त्याचा तीर,
शब्द प्रेमाचे, शब्द कठोर, शब्द उमदे, शब्द ते सुंदर,
सूर तुझे बोलत होते, की होतो ऐकत माझेच विचार?
न जाणे, "वाह क्या बात है!" किती वेळा केला उच्चार
ठाऊक आहे मजला टाळ्यांच्या कडकडाटात असेल विरली माझी पुकार,
तरी विश्वास माझा आहे द्रुढ, एका क्षुद्र का होईना, पण सच्च्या रसिकाचं मन तू असशीलच वाचलं-
सच्चा रसिक तूही या जीवनाचा, आणि नंतरच एक अप्रतिम वादक!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: