आपलं बॉलीवूड ही खरीखुरी स्वप्ननगरी आहे यात शंका नाही. उदाहरणार्थ पुढील पटकथा घ्या:
एक तरूण. सर्वगुणसंपन्न/लाडावलेला. गरीब/श्रीमंत पालक. कमवायची अक्कल असलेला/नसलेला. हुशार/ढ.एक तरूणी. लाडावलेली/सर्वगुणसंपन्न. श्रीमंत/गरीब पालक. कमवायची अक्कल नसलेली/असलेली. ढ/हुशार.असे दोन जीव - ज्यांचा एकमेकांशी काडीमात्रही संबंध नाही - जवळ येतात. आपल्यात असलेली उणीव त्याच्यात/तिच्यात नाही हे पाहतात, प्रेमात पडतात. एखाद-दुस-या खलपात्रावर मात करतात. पत्रिका छापणे, केळवणं जेवणे, चांगले कार्यालय शोधून ते बूक करणे, उन्हाळ्यातला पाणी प्रश्न सोडवणे, तमाम फ्यामिलीबरोबर लग्नाची कपडेखरेदी करणे या सगळ्या फालतू अडचणींना बगल देत, पंडितजींचे (म्हणजे मराठीत गुरूजी किंवा भटजी) आशीर्वाद घेऊन त्यांच शुभमंगल पारही पडतं. पुढच्याच सीनमध्ये अगदी छान सजवलेल्या घरात प्रवेश होतो. कालांतराने "इन-लॉज’ चं घर मला छोटं पडतं अशा बायकोच्या तक्रारीला वैतागून आपला हिरो लगेच नवीन घर घेतो. एक दोन दिवसांतच दोघे या नवीन घरात सुखी संसार करायला लागतात.
असे सिनेमे/मराठी सीरीयल्स पाहिल्या की माझ्या तोंडी एकच हिंदी शब्द येतो: "काश"
एक वेळ मला ही सगळी प्रेमकहाणी पटेल - पण एक दोन दिवसांत नवीन घरात सुखी संसार?! ही शुद्ध फसवणूक आहे - शुद्ध चारसो बीसी.
लग्न पहावं करून आणि त्यानंतर घर पहावं बांधून या दोन्ही म्हणींमधला ’वं’ काढून टाकावा आणि ’च’ लावावा अशी माझी भाषापंडितांना नम्र विनंती आहे. कारण तसं केलं तरच त्यातला प्रथम पुरूषी ’प्रयोग’ नष्ट होईल आणि केवळ एक चेतावनी हा खरा अर्थ पुढे येईल.
लहानपणीच्या गोष्टींमधला लाकूडतोडा अगदी प्रामाणिक वगैरे असेल, पण ख-या जगातले फर्निचरवाले महाडॅंबिस. आमच्या नवीन घरातील साहसकथा अरबी सुरसकथांना लाजवतील अशा. अरेबियन नाईट्सप्रमाणे सविस्तर सांगायच्या तर आख्ख्या वर्षाच्या रात्री कमी पडतील. चवीपुरती एखाद दुस-या सांगतो:
स्वयंपाकघरातील सुखसुविधा:
स्वयंपाकघरासारखी दुसरी ज्वलंत जागा घरात दुसरी नाही! तो प्रश्न सोडवणं माझ्या दृष्टीनं काश्मीर प्रश्न सोडवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. तातडीनी आम्ही मॉड्युलर किचन वाल्याकडे गेलो:दुकानदारीण (माझ्या पैशाचं पाकिट ठेवलेल्या खिश्याकडे बघत): "या या."आम्ही: "आम्हाला आमच्या किचनचं सगळं काम करायचंय"दु. "करू की. किती मोठं आहे? काही प्ल्यान वगैरे आणला आहे का?"मी: "आहे, ब-यापैकी मोठं आहे. प्ल्यान असा आहे की महिन्याभरात सगळं करून हवंय"ही: "अरे तसा प्ल्यान नाही. हं. हा बघा प्लोरप्ल्यान. एल-शेप्ड आहे."......[तांत्रिक बाबींना कात्री]दु. "ठिक आहे. तुम्हाला उद्या आम्ही डिझाईन दाखवतो. मग कॉस्टींग वगैरे करू, मग काम सुरुच, कसं?"मी (खूष होत) "नक्की आम्ही येतो उद्या मग परत."दु. "हो हो. पण असं कसं जाता. कोल्ड-ड्रिंक मागवलंय ते कोण पिणार हाहाहा :-)"आम्ही: "कोल्ड ड्रिंक का? वा वा वा! बरं - हा ऍडव्हान्सचा चेक!"दुसरा दिवस:आम्ही फोनवर "हॅलो. आज तयार आहे ना डिझाईन? येतो आम्ही मग."दु. "ऍक्च्युअली आमचा डिझायनर आजारी पडला आहे."आम्ही: "ठीक आहे. फोन करा मग केव्हा येऊ ते सांगा. काय?"दु. "नक्की नक्की!"दहावा दिवस:आम्ही फोनवर "हॅलो. काय तुमचा फोन नाही आला?"दु. "अहो आत्ता तुमचाच नंबर शोधत होते. शंभर वर्षं आयुष्य आहे. आमचा डिझायनर अजून आठ दिवस काही तापातून उठत नाही."आम्ही "आठ दिवस? अहो दहा दिवस असेच उलटून गेलेत..." (या गाढवला स्वाईन फ्लू झाला की काय, अरे देवा!)दु. "काळजी नको, आम्ही बघतो काहितरी जमवतो."आम्ही (मनात): या रेटनी काम होणार असेल तर शंभर वर्षं हवीतच मला!विसावा दिवस:आम्ही: "चांगलं झालंय डिझाईन हं. केव्हा काम होईल सगळं"दु. "पॉलिसीप्रमाणे पुढच्या ३०-४५ दिवसांत. सर, पुढचा चेक?"आम्ही: "थोडं लवकर जमवा! हा चेक. कोल्ड ड्रिंक नाही का या वेळी?"दोन महिन्यांनंतर:आम्ही: "अहो तो सुतार त्याची हत्यारं घेऊन जायला अगदी आमच्या वेळेला मान देऊन येतो सकाळी लवकर. कामाच्या वेळेला मात्र आमच्या ऑफिसची मिटींग बुडवून यायला लागतं त्याचा स्वागतासाठी. काय हे?"दु. "हो का? मी बोलते हं त्या सुताराशी!"आम्ही: "बरं मग आता कपाटाची दारं कधी लावताय? दोन महिन्यांहून जास्त झालेत दिवस!"दु. "ती दारांची ऑर्डर आम्ही मागच्याच सोमवारी दिलीये. पंधरा दिवसांत सगळं काम होईल.आम्ही: "ठीक आहे. तुमची दारं ठोठवायची एवढंच काम आहे आम्हाला सुद्धा. चला."दु. "सर, पुढचं पेमेंट? कंपनी पॉलिसीप्रमाणे १५% आत्ता द्यावे लागतील."आम्ही: "असं का? तुमच्या माणसाला पाठवा चेक घेऊन जायला."अजून एका दीर्घ महिन्यानंतर:आम्ही: "हद्द झाली. आत्तापर्यंत तरी कामं पूर्ण व्हायलाच हवी होती."दु. "मला तुमच्या ऑर्डरबद्दल कल्पना नाही. तुम्हाला हॅंडल करणारी सुट्टीवर आहे."आम्ही: "बरं तीचा मोबाईल नंबर द्या"दु. "कंपनी पॉलिसीप्रमाणे तो आम्ही देऊ शकत नाही"आम्ही "ठीक आहे"अजून पंधरा दिवसांनंतर शनिवारी संध्याकाळी ६:३० वा.:फोन: "हॅलो सर. मी किचनचं मटेरीयल घेऊन आलोय. हो. तुमच्या दारातच उभा आहे. कुठे आहात तुम्ही? काय घरी नाही? किती वेळ लागेल? काय वीस मिनिटं? अहो खोळंबा होतोय. लवकर या हं, मी थांबलोय!"
अशा अनंत चित्रविचित्र संभाषणांनंतर किचनच खदखदता प्रश्न आत्ता कुठे सुटला आहे.
---
दुर्दैव असं की या सगळ्याची कल्पना आधीच न आल्यामुळे आम्ही बेडरूममधल्या कपाटाची ऑर्डरही त्यांनाच देऊन बसलो. असंख्य रंगछटांमधून आमच्या आवडीचा रंग आम्हाला निवडता येतोय म्हंटल्यावर आम्हालाही भरून आलं होतं. खरे रंग तर पुढेच दिसणार होते म्हणा. आधीच्या अंदाजाप्रमाणे, अहो अगदी १२ दिवसांत करून देतो आम्ही कपाट. कपाटाचं टेन्शन नाही, किचनलाच वेळ लागतो असं आम्ही ऐकलं होतं. वीस दिवसांनंतर म्हणे, की तुम्ही निवडलेला रंग जर्मनीहून मागवावा लागणार आहे. त्याला यायला २० दिवस लागतील. दिड महिन्यानंतर म्हणाले की हो, मटेरीयल आलं होतं पण ते डॅयामेज्ड होतं. आता पुन्हा तोच रंग मिळवायचा म्हणजे आमचा सप्लायर म्हणतो कि कधी मिळेल ते सांगता येत नाही. तुम्ही या इकडे आणि दुसरा रंग निवडा बरं.
आलिया भोगासी म्हणत आम्ही जातो. एक रंग (आम्हा दोघांचं एकमत व्हायला वेळ लागतोच) शेवटी आम्ही निवडतो. बहुतेक हा आहे ऍव्हेलेबल, पण मी सांगते कन्फर्म करून. त्यानंतर, सॉरी सर- तो रंग आहे, पण तुम्हाला जश्या लाईन्स करून हव्यात ना, तश्या नाही करता येणार असं म्हणतो आहे सप्लायर. ठीक आहे. मग कुठला रंग आहे आता? हा पहा हा फिका पिवळसर रंग आहे ना, तो एक आहे. तो वापरू?
काय बोलावं आता!
---
हे झालं फक्त सुतारकामाचं. प्लंबर, इलेक्ट्रीशियन, पेंटर असे अनेक खलनायक आमच्या फिल्म मध्ये फिचर करून गेलेत. "तेरे घर के सामने एक घर बसाऊंगा" असं गाण्या-या देव आनंदला माझं खुलं आव्हान आहे: घर बांधशील पठ्ठ्या, पण त्यात पटकन सेट्ल होऊन दाखव!
असो. फर्निचरवाल्याचा इतका उद्धार केल्यानंतर आता मात्र मला भीती वाटायला लागली आहे. पुढचा जन्म सुतारपक्ष्याचा मिळतो की काय!
४ टिप्पण्या:
हा हा हा हा... कायच्याकाय भारी आहे. जाम हसलो.
"लग्न पहावं करून आणि त्यानंतर घर पहावं बांधून या दोन्ही म्हणींमधला ’वं’ काढून टाकावा आणि ’च’ लावावा अशी माझी भाषापंडितांना नम्र विनंती आहे." हे तर ब्येष्टच !!
आणि वाळवीचा जन्म मिळाला तर? :)
farach chhan :)
"स्वयंपाकघरासारखी दुसरी ज्वलंत जागा घरात दुसरी नाही!"
>> lol..true...!!
टिप्पणी पोस्ट करा